News Flash

जीवनशिक्षणाचे शाश्वत गुरुकुल

आपल्या प्रचलित शिक्षणपद्धतीत प्रत्यक्ष आयुष्यात ज्या गोष्टींना माणसाला सामोरे जावे लागते त्याबद्दल कसलेच शिक्षण मिळत नाही.

|| देवेंद्र गावंडे

आपल्या प्रचलित शिक्षणपद्धतीत प्रत्यक्ष आयुष्यात ज्या गोष्टींना माणसाला सामोरे जावे लागते त्याबद्दल कसलेच शिक्षण मिळत नाही. त्यामुळे अनुभवसमृद्ध व्यक्ती म्हणून त्यांची घडणच होत नाही. मुलांची अशी सर्वागीण जडणघडण करणाऱ्या, मुलांना शाश्वत जीवनशिक्षण देणाऱ्या एका आगळ्यावेगळ्या प्रकल्पाबद्दल..

शाळेचे सर्वोच्च कार्यकारी मंडळ ‘मंथन’ची बैठक सुरू आहे. कोणतीही कार्यकारिणी नसलेल्या आणि पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या या मंडळात एका गहन विषयावर गंभीर चर्चा सुरू आहे. आर्चिस कंपनीने एका जाहिरातीत मुलामुलींचा दाखवलेला ‘किसिंग सीन’ योग्य की अयोग्य, यावर बैठकीत निर्भीडपणे मते मांडली जात आहेत. ही चर्चा पोकळ, उथळ होऊ नये यासाठी गेले दोन दिवस मंडळात पोक्सो कायद्याचा कीस पाडण्यात आला आहे. सखोल चर्चेनंतर या जाहिरातीविरोधात कृती करण्याचा निर्णय मंडळात एकमताने घेतला जातो. लगेचच पोलीस आयुक्तांच्या नावे पत्र तयार करण्याचे काम हाती घेतले जाते. आठवीत शिकणारी एक मुलगी याकामी पुढाकार घेते. मग आयुक्तांच्या भेटीसाठी वेळ मिळावी म्हणून मुलेच धडपड करतात. दोन दिवसांनंतर भेटीसाठी होकार येतो. याच काळात या कृतीला सार्वजनिक स्वरूप द्यायचे मंडळात ठरते. त्यासाठी भेटीनंतर पत्रकार परिषदेचा बेत ठरवला जातो. या मुलांचा अभ्यास बघून पोलीस आयुक्तही अचंबित होतात. पत्रकार परिषदेत या विद्यार्थ्यांना नाना प्रश्न विचारून पत्रकार भंडावून सोडण्याचा प्रयत्न करतात. पण विद्यार्थ्यांकडून सगळ्या प्रश्नांची तेवढय़ाच शांतपणे उत्तरे दिली जातात. शेवटी एक बोरूबहाद्दर ‘निवेदन दिल्यावर कारवाई होण्याआधीच ही पत्रकार परिषद कशासाठी?’ असा गुगली टाकतो. ‘या देशातील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पत्रकार परिषद घेऊ शकतात, तर मग आम्ही का नाही घेऊ शकत?’ या प्रतिप्रश्नाने ही गुगली विद्यार्थी लीलया परतवून लावतात. दुसऱ्या दिवशी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर साऱ्या अमरावतीभर विद्यार्थ्यांच्या या कृतीचे भरभरून कौतुक होते. हे विद्यार्थी असतात.. ‘शाश्वत कन्सेप्ट स्कूल’चे!

अमरावतीपासून जवळच वलगाव मार्गावर एका टुमदार इमारतीत असलेली ही शाळा रूढ अर्थाने शाळा नाही. हे जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण देणारे एक केंद्र आहे. संपूर्ण जीवन हेच एक शिक्षण आहे, या सिद्धान्तावर चालणारे ते आधुनिक गुरुकुल आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, त्यासोबत लोकशाहीचे चार स्तंभ कसे काम करतात हे त्यांना समजावून सांगणे, या व्यापक भूमिकेतून चालवल्या जाणाऱ्या या शाळेत पहिली ते दहावीपर्यंत सरकारने निश्चित केलेला विहित अभ्यासक्रम शिकवला जात नाही. साहजिकच दहावीपर्यंत शालांतर्गत पातळीवर घेतली जाणारी परीक्षासुद्धा नाही.  या शाळेत गणित, विज्ञान, इंग्रजी, मराठी, हिंदी असे सर्व विषय शिकवले जातात ते प्रयोग आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून! या शाळेतले विद्यार्थी पाचवी व आठवीला राज्य शिष्यवृत्ती परीक्षा देतात. या परीक्षेत राज्यात उत्तीर्ण होण्याचे प्रमाण साडेतीन टक्के आहे. मात्र, या शाळेचे ५० टक्के विद्यार्थी त्यात उत्तीर्ण होतात. इथले सहावी व नववीतील विद्यार्थी होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा देतात. या परीक्षेत राज्याचे उत्तीर्णतेचे प्रमाण ७.५ टक्के आहे. परंतु या शाळेचे तब्बल ३० टक्के विद्यार्थी या परीक्षेत चमकतात. दहावीतले विद्यार्थी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा देतात. या शाळेने शालान्त परीक्षेसाठी ‘आयजीसीएससी’ हे केंब्रिजचे बोर्ड स्वीकारले आहे. त्याचे शुल्क न परवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ओपन स्कूलचा पर्याय शाळेने खुला ठेवला आहे. या सर्व परीक्षांमध्ये दणदणीत यश मिळवणाऱ्या इथल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम मात्र अनेकांना कोडय़ात टाकणारा आहे. पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांना ‘आय लव्ह यू अमरावती’ हा अभ्यासक्रम आहे. इतर नामांकित शाळांमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेकदा जगातील सर्वात मोठय़ा नदीचे नाव ठाऊक असते, परंतु अमरावतीजवळून वाहणारी नदी कोणती, हे मात्र त्यांना माहीत नसते. अशा अनेक वैशिष्टय़ांसह हा अभ्यासक्रम आखलेला आहे. सातवीला ‘मी मराठी’, आठवीला ‘स्वदेश’, तर नववी व दहावीला ‘ग्लोबल पस्र्पेक्टिव्ह’ अशी अभ्यासक्रमांची नावे आहेत. शनिवार वगळता शाळेत इतर दिवशी गणवेशाची सक्ती नाही. या शाळेत नियमित तासिका नाहीत आणि त्याचे वेळापत्रकसुद्धा नाही. शिक्षकांना एकेक वर्गखोली वाटून दिली आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे शाळेच्या वेळात नियोजन करून जायचे. वर्गात बसण्यासाठी बाकेही नाहीत. खाली दरी किंवा गादीवर बसायचे. त्यांनी कसे बसावे याचा कोणताही नियम नाही. शाळेत ‘शिक्षा’ नावाचा प्रकारच नाही. चूक करणाऱ्या विद्यार्थ्यांला सुधारणेच्या तीन संधी दिल्या जातात. कागदोपत्री येथील विद्यार्थी वर्गात विभागले गेले आहेत खरे, पण रोज शिक्षण घेताना तशी विभागणी आवश्यक नाही. कुणी कुठेही सहभागी होऊ शकतो. शाळेच्या सभोवती शेती आहे. झाडे आहेत. इकडे तिकडे फिरणारी बदके आहेत. कोंबडय़ा आहेत. पाण्यात तरंगणारे मासे आहेत. विद्यार्थीच शेती करतात. त्यांना ‘झीरो बजेट शेती’चे जनक पद्मश्री सुभाष पाळेकरांचे मार्गदर्शन लाभते. ते मुळा, गाजर, टोमॅटोचे पीक घेतात. कीटकनाशके म्हणजे काय, त्यांचा वापर शेतीला कसा घातक ठरतो, हे ज्ञान मुलांना येथे सेंद्रिय शेती करता करता मिळते. शाळेत शिस्तीचा बडगा नसला तरी या अनौपचारिक शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या अंगी आपसूकच एक शिस्त भिनलेली आहे. तिचे पालन होताना पदोपदी जाणवते. शाळा झाडणे, फरशी पुसणे ही कामे विद्यार्थीच करतात. शनिवारी शाळेत ‘बेकिंग इंग्लिश’चा प्रयोग केला जातो. विद्यार्थ्यांनीच वेगवेगळे पदार्थ तयार करायचे. त्यासाठी मोठय़ा चुली बांधायच्या. प्रत्येक पदार्थ चांगला होईस्तोवर करत राहायचा- ही या प्रयोगातील गंमत! त्यात विद्यार्थी मोठय़ा आनंदाने सहभागी होतात. प्रयोगात आलेले अनुभव लिहून काढतात.

ही संपूर्ण शाळा व्यवस्था कशी विचार करते, तिला सामोरे कसे जायचे, या सूत्रावर चालते. मध्यंतरी विद्यार्थ्यांच्या ‘मंथन’मध्ये प्रदूषणावर चर्चा झाली. दिवाळीचा सुमार असल्याने साहजिकच फटाक्यांचा विषय अग्रक्रमाने चर्चेला आला. याबाबत लोकांमध्ये जागृती करण्यासाठी नेमके काय करायचे यावर बराच खल झाला. शेवटी ठरले की, फटाका बाजारात पुस्तकाचे दुकान टाकायचे! संपूर्ण दिवाळीत विद्यार्थी या दुकानात आळीपाळीने बसले. फटाके घ्यायला लोक आले की हे विद्यार्थी पुस्तके घ्या म्हणून त्यांना आग्रह करीत. कुणी वैतागत, कुणी रागावत. तरीही या विद्यार्थ्यांनी संयम सोडला नाही. उद्देश हाच, की जेवढी पुस्तके विकली जातील, तेवढी फटाकेखरेदी कमी होईल. फटाक्यांचे विक्रेते त्यांच्याकडे रागाने बघत. पण या मुलांना पालिकेचा पाठिंबा असल्याने ते काही करू शकत नव्हते. दहा दिवसांच्या काळात या दुकानातून ४० हजारांची पुस्तके विकली गेली. ही सगळी रक्कम नंतर केरळ रिलीफ फंडाला देण्यात आली. अमरावतीत दरवर्षी धान्य उत्सव भरतो. या उत्सवात या शाळेचे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून सहभागी होतात. प्रत्येकाला धान्याची माहिती देण्याचे काम करतात. या शाळेत वार्षिक सहल व स्नेहसंमेलन हा प्रकार नाही. शाळेकडून प्रत्येकी चार ते पाच विद्यार्थ्यांना देशाच्या वेगवेगळ्या भागांत फिरण्यासाठी पाठवले जाते. पैशाची सोय आणि गाडय़ांचे वेळापत्रक सांगितले जाते. या विद्यार्थी गटाने स्वत:च तिकिटे काढायची, मुक्कामाची ठिकाणे शोधायची आणि फिरायचे. जवळचे पैसे संपले की विद्यार्थी मग धर्मशाळा शोधतात, नातेवाईक धुंडाळतात. या सगळ्यातून येणारा अनुभव त्यांना बरेच काही शिकवणारा असतो. विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनास फाटा देऊन ‘शाश्वत टॉक’ नावाचा उपक्रम अमरावतीकरांसाठी सुरू केला आहे. सध्याचा गाजणारा विषय कोणता, यावर ‘मंथन’मध्ये विचारविमर्श करायचा आणि त्यावर मत व्यक्त करणाऱ्या त्या विषयावरील अधिकारी व्यक्ती असलेल्या वक्त्याला बोलवायचे. या उपक्रमात सामान्य नागरिकांनाही सहभागी करून घ्यायचे व स्वत:ही अनुभवसमृद्ध व्हायचे आणि नंतर ते अनुभव लिहून काढायचे, ही विद्यार्थ्यांची कल्पना आता मूळ धरू लागली आहे.

या शाळेत टिपिकल पद्धतीने विज्ञान शिकवले जात नाही. पक्ष्यांचा अभ्यास करायचा असेल तर थेट निसर्ग शिबिराला नेले जाते. तिथे निरीक्षण करा, काय दिसले ते लिहून काढा व मगच पुस्तके वाचा असा फंडा राबवला जातो. इतिहासाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. हे सूत्र लक्षात ठेवून येथील विद्यार्थी इतिहास अभ्यासतात. विद्यार्थ्यांमध्ये धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन कसा विकसित होईल याकडे शाळेत जातीने लक्ष दिले जाते. शाळेत प्रयोगशाळा आहे, पण तिची सूत्रे विद्यार्थ्यांकडे आहेत. खालच्या वर्गातील मुलांना मोठय़ांनी शिकवायचे, हे शाळेचे सूत्र आहे. ‘जंकफूड’ हा सध्या सर्वासाठीच चिंतेचा विषय झाला आहे. त्यावर येथील विद्यार्थ्यांनी स्वत:च मार्ग शोधून काढला आहे. बेकिंग इंग्लिशच्या माध्यमातून अनेक पदार्थ शिकणारे विद्यार्थी शाळेतच शेंगदाण्याचे तेल काढतात. त्यासाठी एक छोटे मशीन लावण्यात आले आहे. एक किलो तेलासाठी साडेतीन किलो शेंगदाणे लागतात. त्याची किंमत होते २८० रुपये. मग बाजारात जे तेल मिळते त्याची किंमत ८० ते १०० रुपये किलो कशी, असे प्रश्न या तेलघाणीमुळे विद्यार्थ्यांना पडायला लागले आहेत. गंमत म्हणजे हेच प्रश्न विद्यार्थी घरी पालकांना विचारतात. हा त्यांच्यातील सकारात्मक बदल आहे. ‘मंथन’ हे या शाळेचे सर्वोच्च मंडळ. मध्यंतरी एचआयव्हीबाधित मुलांना शाळेत घ्यायचे की नाही, यावर या मंडळात बराच खल झाला व शेवटी त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळेतील एखाद्या विद्यार्थ्यांच्या कर्त्यां पालकाचे निधन झाले तर त्याच्या शिक्षणाचा खर्च सर्वानी विभागून घ्यायचा, हाही ‘मंथन’चाच निर्णय. या शाळेत  प्रवेश घ्यायचा असेल तर ‘मंथन’च्या प्रश्नावलीला पालकांना सामोरे जावे लागते. ‘मंथन’मधील मुले या पालकांना ही शाळा कशी आहे हे समजावून सांगतात. त्यांच्याकडून जी प्रश्नावली भरून घेतली जाते त्यावरून पालकांचा कल कळतो आणि त्यानंतर ‘मंथन’ आणि शाळेचे संचालक मिळून नव्या प्रवेश अर्जावर निर्णय घेतात.

दुर्दैवाने सध्याच्या शिक्षणपद्धतीत नागरिकशास्त्राला फारसे महत्त्व दिले जात नाही. या शाळेत सर्वाधिक महत्त्व या शास्त्राला आहे. हे शास्त्रही प्रयोगांद्वारेच शिकवले जाते. विद्यार्थ्यांच्या गटांनी त्यांच्या भागातील नगरसेवकांना भेटायचे, त्यांच्याकडून प्रश्नावली भरून घ्यायची, त्यांना विकासाच्या मुद्दय़ावर प्रश्न विचारायचे, त्यांच्यासोबत छायाचित्रे काढायची, आणि मग हे सारे अनुभव लिहून काढायचे. तक्रारी कशा करायच्या, सुधारणा कशा सुचवायच्या, शहरासाठी एखादी गोष्ट आवश्यक असेल तर ती कुणाला सांगायची, हे सारे ‘मंथन’च्या बैठकीत ठरते. अनेकदा हे करताना विद्यार्थ्यांना वाईट अनुभवही येतात. पण तरी ते हिरमुसत नाहीत. उलट, त्यातून अहंकाराला गाडून टाकण्याची प्रेरणा त्यांना मिळते. निर्णयप्रक्रिया कशी होते हे समजून घेता येते. तसेच त्यांच्या निर्णयक्षमतेत वाढ होते असा विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. या शाळेत कुठलीही खुर्ची कुणासाठी राखीव नाही. शाळेच्या संचालकांच्या खुर्चीत बसून विद्यार्थीसुद्धा निर्णय घेतात. शाळेतून घरी जाताना संचालकांना ‘बाय अतुल..’ म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांची ही अस्सल जीवनानुभव शिकवणारी शाळा आहे. ‘जीवन समजणे म्हणजे स्वत:ला समजणे. हीच शिक्षणाची सुरुवात व शेवट आहे.’ जे. कृष्णमूर्तीचे हे विचार ही शाळा बघताना मनात रुंजी घालत राहतात.

लोकशाही मूल्ये बिंबवणारी शाळा

या शाळेचे संचालक आहेत अतुल गायगोले व त्यांच्या पत्नी अमृता! एकेकाळी अतुल गायगोले हे अमरावतीतील नामवंत वास्तुविशारद होते. त्यांनी मुलीसाठी शाळेचा शोध सुरू केला तेव्हा त्यांना एकही शाळा पसंत पडेना. मग त्यांनी देशविदेशातील अनेक शाळांची पाहणी केली. दिल्लीच्या आयआयटीमधील प्राध्यापक हरीश चौधरी यांनी त्यांना ‘स्वत:च शाळा काढा..’ असा सल्ला दिला. प्रारंभी त्यांनी एका नामांकित शाळेची शाखा उघडली. महागडे शुल्क, महागडी पुस्तके आणि केवळ ज्ञान पाजणारे शिक्षण यावरून त्यांचा संबंधित संस्थेच्या चालकांशी वाद सुरू झाला. शेवटी ही शाखा सोडून त्यांनी ‘शाश्वत’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोटय़वधी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी त्यांचे अनेक मित्र त्यांच्या पाठीशी उभे ठाकले. एका विद्यार्थ्यांला वर्षांला केवळ चाळीस हजारांत चांगले शिक्षण देण्याचा हा प्रयोग आता बाळसे धरू लागला आहे. अतुल गायगोलेंवर महात्मा गांधी आणि जे. कृष्णमूर्ती यांच्या विचारांचा पगडा आहे. या विचारांची छाप या शाळेवर दिसते. लोकशाहीवादी मूल्ये बळकट करणारे शिक्षण देणाऱ्या या शाळेविषयी प्रारंभी पालक कुरकुर करायचे, पण विद्यार्थ्यांचे समृद्ध होत जाणे बघून आता या पालकांचा दृष्टिकोन बदलला आहे. सध्या या शाळेत पाचशे विद्यार्थी आहेत. येत्या काही वर्षांत ही संख्या निम्म्यावर आणण्याचा आणि २०२१ पासून दप्तररहित शाळा करण्याचा त्यांचा मानस आहे. २० विद्यार्थ्यांचा एक वर्ग व कमीत कमी शिक्षक असे या शाळेचे स्वरूप आहे. येथे बहुसंख्य विषय संगणकावर विद्यार्थी स्वत:च शिकतात. शाळेतील शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी गायगोले यांनी दर तीन महिन्यांनी एक महिन्याची सुट्टी ही संकल्पना राबवणे सुरू केले आहे. प्रामुख्याने मध्यमवर्गीय व गरीब विद्यार्थ्यांना या शाळेत प्राधान्याने प्रवेश देण्याचे त्यांचे धोरण आहे. तमिळ चित्रपटसृष्टीत गाजलेल्या शाहीद नावाच्या तंत्रज्ञाने या शाळेवर तयार केलेला लघुपट सध्या जगभरातील लोकशाहीवादी शिक्षण देणाऱ्या शाळांमधून दाखवला जात आहे. ही अनोखी शाळा चालवताना कसल्याही नफ्याचा विचार न करणाऱ्या अतुल गायगोलेंवर कर्जाचा डोंगर असला तरी त्यांचे हौसले बुलंद आहेत. ही शाळा एकदा नावारूपाला आली की इथे तयार झालेल्या विद्यार्थ्यांच्या हाती ती सोपवून मोकळे व्हायचे आणि नव्या प्रयोगाला सुरुवात करायची असा त्यांचा मानस आहे. सध्याची शिक्षणपद्धती बोगस आहे, अशी टीका करण्यापेक्षा नवी शिक्षणपद्धती विकसित करून दाखवण्याचे त्यांचे हे धाडस कौतुकास्पदच आहे. असे अनेक प्रयोग राज्यात उभे राहायला हवेत, हा त्यांचा आशावाद बरेच काही सांगून जाणारा आहे.

devendra.gawande@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2019 12:18 am

Web Title: marathi article in loksatta lokrang by devendra gawande
Next Stories
1 नर्मदेच्या वंशजांचा खरा लढा!
2 नेत्यांस पत्र..
3 अपेक्षानामा
Just Now!
X