25 January 2020

News Flash

संज्ञा आणि संकल्पना : मन वढाय वढाय..

माइंडफुलनेस म्हणजे मन मागे व पुढे भरकटू न देता, वर्तमानातील अनुभवांवर प्रतिक्रिया न देता एकाग्र करणे

(संग्रहित छायाचित्र)

पराग कुलकर्णी

आपण जिथे आहोत असं वाटतं तिथे खरंच असतो का? सकाळी उठल्यावर सकाळच्या प्रसन्न वातावरणाचा अनुभव घेण्याआधीच आपण मनाने दिवसभराच्या कामांना सुरुवात केलेली असते. ‘Monday Blue’साठी कुप्रसिद्ध असणारा सोमवार हा रविवारी संध्याकाळीच सुरू होतो. काही तास, काही दिवस, आठवडे, महिने, वर्ष असं आपलं मन पुढे पळतच असतं. बरं, हे फक्त पुढेच नाही, तर मागेही नेहमी जात असते. मागच्या आठवणी, भावना, विचार, अनुभव, आनंदाचे आणि दु:खांचे प्रसंग असे काय काय मनात येत असते. आणि यात कमी म्हणून की काय, आपला मोबाइल आणि फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, इंस्टाग्राम, ट्विटर यांसारखी समाजमाध्यमं आहेतच. बसल्या जागी बातम्या, फोटोज्, व्हिडीओज् आपल्याला क्षणात दुसऱ्या जगात घेऊन जातात. दिवसातला किती वेळ आपण वर्तमानकाळात जिथे दिसतो तिथे असतो आणि किती वेळा आपलं मन भूत किंवा भविष्यकाळात प्रवास करत असतं? आजची आपली संकल्पना अशीच वर्तमानकाळात राहण्याच्या मानसिक अवस्थेबद्दल आहे- ‘माइंडफुलनेस.’

माइंडफुलनेस म्हणजे मन मागे व पुढे भरकटू न देता, वर्तमानातील अनुभवांवर प्रतिक्रिया न देता एकाग्र करणे. गौतम बुद्धांनी सांगितलेल्या ध्यानधारणेच्या (meditation) संकल्पनांमध्ये याचा समावेश होतो. ध्यानधारणेच्या वेगवेगळ्या पद्धतींनी माइंडफुलनेस वाढवता येतो. यातील एक खूपच प्रभावी पद्धत म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करणे.. नाकातून हवा आत आणि बाहेर जाताना अनुभवणे. आपण एकेक क्षण जोडत जगत असतो आणि या क्षणांना जोडणारा दुवा म्हणजेच आपला श्वास! जेव्हा आपण या श्वासावर लक्ष देतो तेव्हा आपण मनानंही वर्तमानकाळात येतो. कोणतेही दडपण असताना, ताण असताना किंवा चिंताग्रस्त असताना खोल श्वास घ्यावा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करावे असे जे म्हणतात, ते याचमुळे. या सगळ्या नकारात्मक भावना भूतकाळाशी आणि भविष्यकाळाशी जोडलेल्या असतात आणि आपण मनाने वर्तमानकाळात राहून त्यापासून दूर होऊ शकतो.

माइंडफुलनेस वाढवण्याच्या दुसऱ्या पद्धतीने माइंडफुलनेस म्हणजे नेमकं काय, हे जास्त नीट समजते. खरं तर ध्यान करणे म्हणजे आपल्याला मन रिकामे करणे, त्यात कोणताही विचार येऊ न देता ते शुद्ध ठेवणे असे काहीतरी वाटत असते. काही ध्यानधारणा त्या स्वरूपाच्या आहेतही. पण माइंडफुलनेसमध्ये याच्या एकदम उलट करायचे असते. या पद्धतीत मन रिकामे करणे हा उद्देश नाही, तर मन आणि शरीराचे आपण  फक्त त्रयस्थ, साक्षी भावनेने निरीक्षण करायचे. आपण याचा सराव करण्यासाठी शांतपणे बसलो आहोत आणि मनात काय काय विचार येत आहेत याचे निरीक्षण करतोय असं समजू. पहिलाच विचार कदाचित येईल की, ‘हे खरंच असं काही असतं का? माझा काही यावर विश्वास बसत नाही.’ असा किंवा इतर कोणताही विचार मनात येईल तेव्हा आपण फक्त त्याची दखल घ्यायची- की हा असा विचार आला, पण त्यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. थोडक्यात- स्वत:च्या मनाच्या एका भागाने स्वत:च मनाच्या दुसऱ्या भागाचे फक्त निरीक्षण करायचे. या अशा निरीक्षणातून कोणते कोणते विचार येतात, त्यांचे स्वरूप काय आहे, भूतकाळातले विचार कोणते, भविष्यकाळातील विचार कोणते, त्या विचारांचा शरीरावर काय परिणाम होतो, अशी बरीच स्वत:बद्दलची माहिती यातून मिळते. यात दोन गोष्टी साध्य होतात.. एक म्हणजे मनाचा एक भाग हा मनासोबत भूतकाळात किंवा भविष्यकाळात फरफटत जात नाही; आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीला, भावनेला लगेच प्रतिक्रिया न देण्याची सवय होऊ लागते. हे खूप महत्त्वाचं आहे. समजा, आपल्याला खूप राग आला तर आपल्याला राग आलाय हे आपल्याला समजलं पाहिजे, त्यानंतरच मग आपण पुढे काय करायचे हे सारासार विचार करून ठरवू शकतो. ही मधली विचार करण्याची जागा- कोणती आणि कशी प्रतिक्रिया द्यायची हे ठरवण्याची जागा- माइंडफुलनेसमुळे मिळते, वाढते आणि त्याद्वारे आपले आपल्या भावनांवरचे नियंत्रणही वाढते.

जरी हजारो वर्षांपासून ही अवस्था, ती प्राप्त करण्याच्या पद्धती आणि त्याचे फायदे आपल्याला माहीत आहेत, तरीही हे होते कसे, याचे पुरावे विज्ञानाने गेल्या काही दशकांत शोधून काढले आहेत. अमिग्दाला (amygdala) हा आपल्या मेंदूमधला एकदम आदिम भाग. भीती, चिंता, ताण या आणि अशा अनेक नकारात्मक भावनांचे उगमस्थान. तसेच क्षणात ‘fight or flight’ प्रतिक्रिया देण्याचे कामही अमिग्दाला करतो. ज्या लोकांमध्ये भीती, राग, चिंता या भावनांचे प्रमाण जास्त असते त्यांचा अमिग्दाला हा भाग जास्त कार्यरत असतो आणि आकाराने थोडा मोठाही असतो. पण संशोधनानुसार, माइंडफुलनेसच्या काही आठवडय़ांच्या सरावाने या भागाचा आकार कमी तर होतोच; शिवाय काल्पनिक प्रसंगांना नकारात्मक प्रतिक्रिया देण्याची त्याची क्षमताही कमी होते. अमिग्दाला हा मेंदूचा जसा खूप पूर्वीपासून असलेला भाग आहे तसाच ‘प्रीफ्रंटल कॉर्टेक्स’ (Prefrontal Cortex) हा मेंदूचा तसा नव्याने निर्माण झालेला भाग. (इथे नवा-जुना हा संदर्भ मेंदूच्या उत्क्रांतीच्या टप्प्यांसंदर्भात आहे.) प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा भाग एकाग्रता, निर्णय घेणे, विचार आणि त्यानुसार कृती करण्यासाठी नियोजन करणे- या आणि अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी करतो. माइंडफुलनेसमुळे या भागाची वाढ होते असे आढळून आले आहे. थोडक्यात, प्रतिक्रिया देणाऱ्या भावनिक भागाचं नियंत्रण कमी होऊन विचारी भागाचं नियंत्रण वाढण्यास माइंडफुलनेस मदत करते. यामुळेच बा किंवा काल्पनिक मानसिक घटनांना एकदम भावनिक प्रतिक्रिया न देता काय प्रतिक्रिया द्यावी, हा विचार करण्याची सवय लागते. माइंडफुलनेसचे असे अनेक फायदे आहेत. त्याद्वारे ताणतणाव, नराश्य, नेहमी चिंता करण्याची सवय कमी होणे तसेच मेंदूमधल्या बदलांमुळे मानसिक तसेच शारीरिक दु:खाशी सामना करण्याची, त्याला योग्य प्रकारे हाताळण्याची आणि त्याची तीव्रता कमी करण्याचीही क्षमता निर्माण होते.

माइंडफुलनेस ही मनाची एक अवस्था आहे, सरावाने प्राप्त करण्यासारखे एक कौशल्य आहे. आपल्याला ध्यानधारणा करणे, शांत बसणे जमणार नाही असे ज्यांना वाटू शकते, त्यांनीही यामागचा मूळ विचार समजून घेणे आवश्यक आहे. मनाला वर्तमानकाळात ठेवून हाती असलेल्या कामावर लक्ष एकाग्र करणे, ही आपल्या मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली असू शकते. आज प्रत्येक क्षेत्रात ताणतणाव आणि भावनांचे व्यवस्थापन ही काळाची गरज झाली आहे. खेळाच्या क्षेत्रातही आज अनेक खेळाडू याचा उपयोग करताना दिसतात. दबावाखाली खेळत असताना खेळात आधी केलेल्या चुकांनी किंवा पुढे येणाऱ्या यश-अपयशाच्या विचारांनी मनाची एकाग्रता भंग होऊ दिली नाही तरच खेळाडूचा सर्वोत्तम खेळ होऊ शकतो. आणि त्यासाठी वारंवार भरकटलेले मन चालू खेळावर केंद्रित करणे आवश्यक ठरते. खेळ, अभ्यास, काम, आपले जवळचे लोक, नाती या सर्वात आपण शरीराने दिसतो तेवढेच मनानेही असण्याचा प्रयत्न केला पाहिजे. येणाऱ्या क्षणासोबत आलेल्या अनुभवात आपण भूत, भविष्य विसरून हरवलो तरच आपलं आनंदी, निरोगी स्वरूप स्वत:लाच सापडू शकेल.

parag2211@gmail.com

First Published on September 8, 2019 2:03 am

Web Title: mindfulness terms and concepts abn 97
Next Stories
1 गवाक्ष : ओलावा
2 हाये न मन को चन पडे..
3 हवं संगीताचं मुक्त व्यासपीठ
Just Now!
X