सध्या उत्तराखंडमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. माणसांना, प्रशासनाला त्राहीमाम करून सोडले आहे. एकेकाळी, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात याच भागात नरभक्षक वाघ आणि बिबळ्यांनी असेच थैमान घातले होते. तेव्हा तेथील सर्वसामान्य नागरिकांना आश्वस्त करून या नरभक्षक वाघ-बिबळ्यांचा बंदोबस्त करण्याचे काम जिम कार्बेट यांनी स्वत:चे प्राण पणाला लावून केले. कार्बेट यांच्या बंदुकीच्या अचूक नेमबाजीइतकीच त्यांची लेखणीही थेट आणि धारदार होती. त्यामुळे त्यांनी पुढे आपल्या शिकार कथा लिहून काढल्या. त्या गेली ८०-९० वर्षे भारतभरात पुन्हा पुन्हा वाचल्या जातात, यावरून त्यांचे मोल आणि महत्त्व सिद्ध होते. कार्बेट यांच्या प्रस्तुत दोन्ही पुस्तकांचे मराठी अनुवाद यापूर्वीही झाले आहेत. पण सध्या ते बाजारात उपलब्ध नाहीत. त्यामुळे विश्वास भावे या जंगलप्रेमीने ही दोन्ही पुस्तके पुन्हा मराठीमध्ये आणली आहेत. या दोन्ही पुस्तकांतील शिकार कथा थरारक, रोमांचक आणि साहसी आहेत. अनुवादातही मूळ इंग्रजी लेखनातली गंमत बऱ्यापैकी उतरली आहे. आणि कार्बेट यांची शैली तर कुणाही वाचकाला खिळवून ठेवेल अशीच असते.
‘मॅनइटर्स ऑफ कुमाउँ’ – जिम कार्बेट, अनुवाद – विश्वास भावे, आरती प्रकाशन, डोंबिवली, पृष्ठे – २२१, मूल्य – २४० रुपये.
‘मॅनइटिंग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग’ – जिम कार्बेट, अनुवाद – विश्वास भावे, आरती प्रकाशन, डोंबिवली, पृष्ठे – १५७, मूल्य – १८० रुपये.

भन्नाट, बहारदार व्यक्तिचित्रे
श्रीकांत सिनकर या अवलिया आणि कलंदर लेखकाने लिहिलेल्या पाच बहारदार व्यक्तिचित्रांचा हा संग्रह. तीस-बत्तीस वर्षांनंतर त्याची आता दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. यातील लेख इतके अनपेक्षित, वेगळे आणि भन्नाट आहेत की, त्यातील वास्तव एकाच वेळी अंगावर येतं आणि वाचणाऱ्याला स्वत:बरोबर फरफटवत नेतं. ‘सैली’ हे कुंटणखान्यातील एका वेश्येचे व्यक्तिचित्र, ‘जिन जिमलेट’ ही उच्चभ्रू वर्गातील एका बिनधास्त तरुणीची कहाणी आणि ‘सुंदर सावली सापडली’ हे उपचारासाठी जबरदस्तीने दवाखान्यात भरती झाल्यावर प्रेमात पडून लग्न केलेल्या पत्नीविषयीचा लेख, हे तीन या पुस्तकातले अफलातून लेख आहेत. अधोविश्वातील गयागुजऱ्या लोकांबरोबर ऊठबस असणाऱ्या सिनकरांचे अनुभव आनंददायी आहेत. त्यांची चव चाखायलाच हवी.
‘सैली १३ सप्टेंबर’ – श्रीकांत सिनकर, लोकवाङ्मय गृह, मुंबई, पृष्ठे – २१६, मूल्य – २७० रुपये.

वेचक-वेधक ‘मर्मवेध’
एकाच वेळी मराठी आणि हिंदीमध्ये लेखन करणारे आणि दोन्हीकडे स्वत:च्या लेखनाचा ठसा उमटवणारे समीक्षक डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर यांचा हा मराठी साहित्यिकांविषयीचा लेखसंग्रह. यात साने गुरुजी, वि. स. खांडेकर, गो. नि. दांडेकर, विंदा करंदीकर, वि. वा. शिरवाडकर, विजय तेंडुलकर, चि. त्र्यं. खानोलकर आणि मधु मंगेश कर्णिक या मराठीतील आठ मान्यवर साहित्यिकांच्या वाङ्मयीन योगदानाविषयीचे लेख आहेत. त्यांच्यावरील लेखांच्या शीर्षकावरून त्यांच्या मर्मस्थानांचा अंदाज येतो. या संग्रहातील सर्वच लेखकांच्या वाङ्मयीन कारकिर्दीकडे बांदिवडेकर ज्या जाणकारीने, सामंजस्याने पाहतात, त्यांना आधी नीट समजून घेऊन मग इतरांना समजावून देण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे हा मर्मवेध वेचक आणि वेधक झाला आहे. वाङ्मयीन मूल्यमापन करताना ज्या संयतपणाची आणि नेमकेपणाची गरज असते आणि जो वस्तुनिष्ठपणा आणि ताटस्थ हवे असते, ते या संग्रहातील सर्वच लेखांत सामर्थ्यांने उतरले आहे. म्हणून मर्माचा वेध घेणारा हा संग्रह वाचनीय आहे.
‘मर्मवेध’ – डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर, हर्मिस प्रकाशन, पुणे, पृष्ठे – १३१, मूल्य – १४० रुपये.