01 March 2021

News Flash

रफ स्केच : सुर्वे

पुण्यात आले की कवी नारायण सुर्वे हे दि. के. बेडेकरांकडे यायचे.

नारायण सुर्वे

सुभाष अवचट – subhash.awchat@gmail.com

सुभाष अवचट.. चित्रकलेच्या दुनियेत मनमुक्त विहार करणारं कलंदर व्यक्तिमत्त्व. या साप्ताहिक सदरात ते शब्दचित्रं रेखाटणार आहेत.. सहवास लाभलेल्या विलक्षण व्यक्तिमत्त्वांची आणि त्यांच्यासोबतच्या आनंदयात्रेची! नारायणरावांची आणि माझी गमतशीर मैत्री होती.

पुण्यात आले की कवी नारायण सुर्वे हे दि. के. बेडेकरांकडे यायचे. दि. के. बेडेकर म्हणजे मोठे तत्त्वचिंतक, विचारवंत, समीक्षक. त्यांची व माझी मैत्री होती. बेडेकरांचा मुलगा सुधीर- हा माझ्या वयाचा व तोही माझा मित्र. मैत्रीला वयाचं बंधन नसतं. त्यामुळे त्यांच्याकडे माझं येणं-जाणं असायचं. नारायणराव त्यांच्याकडे आले की आम्ही संध्याकाळी फिरायला बाहेर पडायचो. जवळच ‘पूनम’ हॉटेल होतं. तिथं बसायचं, गप्पा मारायच्या, खायचं, प्यायचं व रात्री उशिरा बाहेर पडायचं.

एकदा गप्पा मारता मारता पान खायची इच्छा झाली. जंगली महाराज रोडवर बेडेकरांचा बंगला. रात्री चालत चालत निघालो. पान खाल्लं. थंडी पडलेली. तिथं बाटाचं दुकान होतं- आजही आहे. त्याच्या पायरीवर बसलो. मी म्हणालो, ‘नारायणराव, काहीतरी ऐकवा.’ रात्रीचा दीड वाजला होता. त्यांनी ‘माझे विद्यापीठ’ ऐकवली आणि एकापाठोपाठ एक अशा ‘विद्यापीठा’तल्या सर्व कविता ऐकवल्या. पहाट तिथंच झाली.

आमची मैत्री म्हणजे चहा. नारायणरावांना चहा, सिगारेट आवडायची. हाताचं मधलं बोट आणि पहिल्या बोटाच्या चिमटीत सिगारेट पकडून ते ती ओढायचे. कितीतरी वेळा त्यांचे मित्र बाबूराव बागुल किंवा अमकेतमके- त्यांच्यासोबत रात्र- रात्र जागवायचे. सोबत चहा हवा. बाकी काही नाही. नारायणरावांनी कितीतरी भोगलं होतं, ते त्यांच्या शरीरावर होतं.. चेहऱ्यावर होतं. मागे वळवलेल्या केसांतून हे सारं दिसायचं.

मी त्यावेळी विद्यार्थी होतो. पुण्यात मॉडर्नला. कमर्शिअलचा विद्यार्थी होतो. परीक्षा द्यायला जे. जे. स्कूल ऑफ आर्टला यावं लागायचं. तर मी एकदा परीक्षेला आलो होतो मुंबईला. ‘आऊटडोअर फोटोग्राफी’ हा विषय होता. ते आम्हाला एक कॅमेरा द्यायचे. इनडोअर आणि आऊटडोअर फोटोग्राफी असं दोन्ही करायला लागायचं. म्हणजे त्यांना कळायचं, की उन्हात काढलेल्या फोटोसाठी या मुलाला नीट एक्स्पोजर देता आलं की नाही? आर्टिफिशल लाइटमध्ये ते एक्स्पोजर नीट देता आलं की नाही?

तर मी आऊटडोअर फोटोग्राफीसाठी जे. जे.मधून बाहेर पडलो. आम्हालाच आमचे फोटोग्राफीसाठीचे सब्जेक्ट निवडावे लागत. आम्हालाच फिल्म धुवावी लागत असे. तिचे प्रिंट्स घ्यावे लागत असत. त्या फोटोमागे क्लिक करताना एक्स्पोजर किती वगैरे माहिती लिहावी लागत असे. मी टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीवरून पुढे आलो. समोर बोरीबंदर. (म्हणजे आजचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस!) एकोणिसशे सत्तरच्या दशकातली ही गोष्ट. त्यावेळी रस्त्याला उंच डिव्हायडर नसायचे. रस्त्याच्या मधे शेजारी शेजारी दोन-दोन दगड लावून रस्ता दुभागलेला असे. भर दुपारी बारा-एकचा सुमार असेल. त्यावेळी त्या डिव्हायडरच्या चार दगडांवर एक माणूस हात उशाला घेऊन शांतपणे झोपलेला मला दिसला. भर उन्हात. इकडनं तिकडनं वाहनं वाहताहेत आणि हा मध्ये डिव्हायडरवर झोपलेला. मी तो फोटो क्लिक केला. नंतर नारायणरावांचं ‘माझे विद्यापीठ’ पॉप्युलर प्रकाशनाने काढायचं ठरवलं. कव्हरसाठी ते माझ्याकडेच आलं. मी कव्हरवर  तोच फोटो दिला. ते पुस्तक आणि ते कव्हर खूप गाजलं. आजही तेच कव्हर आहे. नारायणरावांनी तर येऊन मला मिठीच मारली. मी त्यांना म्हणालो, ‘‘अहो, तेच विद्यापीठ आहे. त्या रात्री पुण्यातल्या रस्त्यावर.. बाटाच्या दुकानाच्या पायऱ्यांवर ऐकवलेलं.’’

त्यानंतर नारायणरावांच्या सर्व पुस्तकांची कव्हर्स मीच केली. त्यांच्या ‘जाहीरनामा’ किंवा कुठल्या तरी एका कवितासंग्रहाचं प्रकाशन साहित्य संमेलनात करायचं ठरलं होतं. फारसा अवधी नव्हता. मी त्यावेळी परदेशात गेलो होतो. नारायणरावांनी पॉप्युलर प्रकाशनाला सरळ सांगितलं, ‘‘सुभाष येईपर्यंत थांबू या. कितीही महिने लागोत, तोच कव्हर करेल. त्यानंतर पुस्तक प्रकाशन करू या.’’ मी तीन महिन्यांनंतर परतल्यावर ते कव्हर केलं, त्यानंतर ते पुस्तक प्रकाशित झालं. पुढे नारायणराव गेल्यानंतर पॉप्युलरने ‘सुर्वे’ हे पुस्तक करायचं ठरवलं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं माझ्या मनावर जे इम्प्रेशन पडलं होतं, त्यानुसार त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी कारखाने वगैरे सारं काही असलेलं एक पेंटिंग मी वापरलं. ते नारायणरावांना आवडलं असतं. त्या ग्रंथाचं नाव ‘सुर्वे’ हेही मीच सुचवलं होतं. असं आमचं प्रेम होतं.

मी त्यांच्याबरोबर खूप राहिलोय. चिंचपोकळीला, नाशिकला, पुण्याला.. आणि कुठे कुठे. जेव्हा ते चिंचपोकळीला राहत होते तेव्हा मी विद्यार्थीच होतो. कित्येकदा त्यांच्या घरी उतरायचो. चाळच होती ती. बाहेर सतरंजी टाकून झोपायचो. नारायणरावांकडे त्यांचे अनेक मित्र, बाबूराव बागुलांसह अनेक कविमित्र, चळवळीतली माणसं अशी सारी यायची. रात्री गप्पा मारत बसायची. अपरात्री बाहेर पडून चिंचपोकळी रेल्वे स्टेशनवर जाऊन ग्लासातून चहा प्यायची. मला त्यांच्यासोबत ठेवायची. ते सारं इतकं साधं, इतकं साधं असायचं, की बस! मग तिथूनच मी कामाला निघून जायचो.

नंतर मी स्टुडिओ थाटल्यावर पुण्यात आले की नारायणराव तिथं यायचे. माझ्याकडेच उतरायचे. वर कसलाही त्रास नाही. जे जेवायला असेल ते जेवायचे. आम्ही कधी बाहेर जेवायला जायचो. घरी आल्यावर त्यांना झोपायला गादी वगैरे नको असायची. मला सांगायचे, ‘‘सुभाष, मला बेड वगैरे देऊ नकोस. एक सतरंजी दे. उशीही नको.’’ जमिनीवर सतरंजी टाकून डावा हात उशाला घेऊन हा कवी शांतपणे निजायचा.

आम्ही दोघे कित्येकदा नाशिकला तात्यासाहेबांकडे- म्हणजे वि. वा. शिरवाडकर यांच्याकडे जायचो. ते नारायणरावांना मुलगा मानायचे. नारायणरावांच्या मोठय़ा मुलाची बायको ही नाशिकची. तात्यासाहेबांनीच सारं जुळवलं होतं, आणि त्या लग्नाला ते मुलीकडून आले होते.. असा त्या दोघांचा स्नेह. तात्यासाहेबांना रात्री उशिरापर्यंत झोप यायची नाही. मग ते फिरायला बाहेर पडायचे. त्यांना कोणीतरी सोबत लागायचं. काही वेळा त्यांचा नाभिकही त्यांच्यासोबत फिरायला जायचा. तर आम्ही नाशिकला गेलो की मग रात्री तात्यासाहेब, नारायणराव व मी असे फिरायला बाहेर पडायचो. सोबत माझा नाशिकचा मित्र हेमंत टकलेही असायचा. मी त्याच्याकडेच उतरायचो. नारायणराव, तात्यासाहेब गप्पा मारत मारत फिरत राहायचे. पण मी झोपेनं मरायचो. रात्री उशिरा मला झोप अनावर व्हायची. पण नारायणराव हरायचे नाहीत. या दोघांचं फिरणं सुरूच असायचं. मला आज वाईट वाटतं.. त्यावेळी आजच्यासारखे मोबाइल आणि रेकॉर्डिगच्या सुविधा नव्हत्या, नाहीतर त्या गप्पांचं मी रेकॉर्डिग करून ठेवलं असतं. आजकाल कोणीही उठतं आणि यू-टय़ूबवर काहीही टाकतं. या मोठय़ा माणसांचं केवढं तरी डॉक्युमेंटेशन झालं असतं. असो.

तात्यासाहेबांना जंगलातल्या रेस्टहाऊसचं फार आकर्षण होतं. मलाही हॉटेलवर वगैरे राहण्यापेक्षा जंगलातल्या, डोंगरातल्या, टेकडीवरल्या रेस्टहाऊसवर राहायला आवडतं. तात्यासाहेबांनी एकदा गप्पा मारताना नारायणरावांना व मला सांगितलं, ‘‘एका पावसाळ्यात जव्हार संस्थानात एक डोंगरावरलं रेस्टहाऊस आहे, तिथं जाऊ व भरपूर गप्पा मारू.’’ आम्ही तिघं आणि तात्यासाहेबांचा एक मित्र असं आमचं जाण्याचं ठरलं होतं. तिथं जायचं, गप्पा मारायच्या, सिगारेटी ओढायच्या आणि मद्य घ्यायचं. पण ते कधी जमलं नाही. जमलं असतं तर मजा आली असती. आयुष्यात तो एक पावसाळा आला असता.. पण नाही आला. तात्यासाहेब गेले, नंतर नारायणराव गेले. माणसं अशी पटापट जातात. नंतर हळहळ लागून राहते.

दि. के. बेडेकरांमुळे मला नारायणराव मिळाले, त्यांचं ‘विद्यापीठ’ मिळालं, त्यांच्या कविता मिळाल्या. कसल्या कविता आहेत त्या! स्वयंभू. सगळं स्वत:चं. साधं. बोलण्यात कुठलाही आव नाही की ताव नाही. आयुष्यभर नारायणराव कठीण परिस्थितीत जगले होते. सारं जगणं कामगार वस्तीत. अनाथ. त्या आठवणींचे सगळे वळ त्यांच्या शरीरावर उमटलेले होते. त्यांचं पोट्र्रेट करायचं झालं तर एखादा कामगार डोळ्यांसमोर आणावा. रापलेला, खडबडीत चेहरा. त्यापाठीमागे त्यांनी उपभोगलेल्या वेदनाच जास्त होत्या.

मी रफ स्केचेस काढतो तसे होते नारायणराव. योग्य शब्दच वापरायचा तर ‘रोबस्ट’!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2021 2:57 am

Web Title: poet narayan surve rough sketch dd70
Next Stories
1 अरतें ना परतें.. : माझ्या आतलं आदिम जनावर
2 मोकळे आकाश.. : टपरी, चाय आणि करोना
3 अंतर्नाद : धर्मसंगीत व्यापक परीघ
Just Now!
X