गिरीश पांडुरंग कुलकर्णी 

एरवी नोव्हेंबर महिन्याबद्दल मनात एक हिरवी, ताजी ओल आहे. ‘मीटलेस डे’ अर्थात २५ तारखेला असलेला वाढदिवस हे त्याचं एक महत्त्वाचं कारण. वाढदिवसाचं साऱ्याच मनुष्यजातीला कोण कौतुक! जणू माझ्या जन्मानं पृथ्वीचा कलता आस कलथायचा थांबून मोठाच समतोल राखला गेलाय- असाच त्या सणाचा भाव. यंदा तर निवडणुकांचे निकाल, पाऊस थांबण्याची शक्यता, थंडी पडण्याची शक्यता, कोरडवाहू शेतात साचून राहिलेल्या पाण्याचा निचरा होण्याची शक्यता, नव्या चित्रपटाच्या चालू होणाऱ्या चित्रीकरणाची उत्सुकता, नव्यानं वाचायला घेतलेल्या कुरुंदकरांच्या पुस्तकाची धुंद गुंगी अशी इतरही राजकीय, सामाजिक, वैयक्तिक कारणे नोव्हेंबर नटवत होती. पण सगळ्यात उठावदार कारण होतं ते म्हणजे आयुष्यात प्रथमच मुलाखत घेण्याची मिळणारी संधी. आजवरच्या उण्यादुण्या मगदुराला नशिबाचे टेकू लावून घडविलेल्या कर्तृत्वामुळे इतरांनी मुलाखत घेण्याचे प्रसंग निगरगट्ट साजरे केले; पण इतर कोणाची मुलाखत घेण्याची नम्र गुणग्राहकता साठविणं जमलं नाही. असं असता सोलापूरची घरची मंडळी उपयोगी आली. वाडवडिलांच्या या गावची लोकं जणू गावची प्रसिद्ध चादर लपेटून उबदार आवतण घेऊन आली. ‘मला जमणार नाही’ या विश्वासानंच केवळ मी ते आमंत्रण स्वीकारलं. ‘तिकडं जाऊ नये’ असं सांगितलं की हमखास वाट वाकडी करण्याचा गुण कुणीतरी आजी-मावशीनं आमच्या पाचवीला पुजल्यागत आजवर हट्टानं माती खात आलो. म्हटलं, ‘‘चला, हे करून बघू.’’ आणि सगळ्या पलीकडची गुप्त कळ होती ती म्हणजे ज्यांची मुलाखत घ्यायची होती त्या ऋषितुल्य माणसाचं नाव- माधवराव चितळे!

Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
Ram Navami 2024 Shubh Yog
२०२४ च्या रामनवमीला अत्यंत शुभ योग जुळून आल्याने ‘या’ राशी होणार श्रीमंत? ‘या’ रूपात दिसू शकते श्रीरामकृपा
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार

Precision Camshafts Limited ही सोलापूर शहराची नव्या युगातली ओळख ठरावी अशी आधुनिक कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून भारतातल्याच नव्हे, तर जगभरातल्या अनेक वाहन निर्मात्यांना कॅमशाफ्ट्स पुरविते. त्यांचा उत्पादन प्रकल्प सोलापुरात आहे. सोलापुरात एकेकाळी वसणाऱ्या माळढोक पक्ष्यागत अतिदुर्मीळ अशी कार्यसंस्कृती अन् व्यावसायिकता अंगीकारलेली ही कंपनी सामाजिक अन् सांस्कृतिक क्षेत्रातही उठावदार काम करते. त्यांच्या कार्यक्रमांमध्ये ‘प्रिसिजन गप्पा’ हा गेली अकरा वर्षे सुरू असलेला सांस्कृतिक सोहोळा मानाचे स्थान मिळवून आहे. तर या वर्षीच्या प्रिसिजन गप्पांमध्ये ही मुलाखत घ्यायची होती. ‘जल-व्यवस्थापन आणि ग्रामविकास’ असं विषयसूत्र. मुलाखतकार म्हणून माझी निवड करण्याकरिता मला तरी ‘वाडवडिलांची पुण्याई’ याशिवाय कारण सापडत नव्हतं; पण त्यांनी काही कारणाने माझी निवड केली आणि नोव्हेंबर उजळला!

स्वत:च्या अज्ञानाची सच्ची सोबत सतत असल्याने अशावेळी आत्मविश्वास मिळतो, हे खरं. तर गेलो सोलापुरात. माधवराव देशपांडे यांनी स्वागत केलं. सस्मित, मृदुभाषी माधवराव ‘गप्पां’ची धुरा सांभाळणारे प्रिसिजनचे अधिकारी. त्यांनी साद्यंत कल्पना दिली. दोन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान केल्यानंतर मुलाखत होणार होती. दरवर्षी हे कृतज्ञता पुरस्कार दिले जातात. पुरस्कारात घसघशीत आर्थिक मदतीचा अंतर्भाव असतो. या वर्षी महुद या सांगोल्यातल्या गावकऱ्यांना त्यांनी एकत्र येऊन गावच्या कासाळ ओढय़ाचं केलेलं अनोखं पुनरुज्जीवन पाहून हा पुरस्कार देण्यात येणार होता. दुसरा पुरस्कार ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’ या नावाने सिंधुदुर्गातल्या झाराप गावी डॉ. विजय आणि डॉ. हर्षदा देवधर या डॉक्टर दाम्पत्याने लावलेल्या माणुसकीच्या रोपटय़ाला देण्यात येणार होता. खरं म्हणजे प्रिसिजनबद्दल ऐकतानाच मी अवाक्  झालो होतो. यतीन शहा यांनी एकहाती उभा केलेला हा उद्योग, त्याचा आंतरराष्ट्रीय विस्तार, त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी डॉ. सुहासिनी शहा यांचे सामाजिक अन् सांस्कृतिक भान अन् कार्य या साऱ्याबद्दल ऐकत राहावं असं वाटवणारा सच्चेपणा माधवराव देशपांडय़ांच्या कथनात होता.

मग ते हलकेच म्हणाले, ‘कार्यक्रम ६.२५ ला सुरू होईल.’ मी ते फार मनावर घेतलं नाही. घेऊनही फार उपयोग होत नाही. माझ्या जनुकातलं घडय़ाळच दहा-पंधरा मिनिटं मागे असतं. म्हणजे काळाबरोबर राहण्याचा वकूबच नाही. मनात मुलाखतीचे विचार घोळवत मी पडलो असता त्या पंचतारांकित हॉटेलातल्या स्वागत कक्षातून फोन आला. पलीकडून मला घेऊन जाण्याकरिता आलेले दुसरे अधिकारी होते. ते त्यांच्या वेळेच्या गणितानुसार मला व डॉ. चितळे यांना घेऊन रंगमंदिरी पोहोचले. तर बरं का, श्री. व सौ. शहा जातीने स्वागतास उभे होते. मला तर कुणी राष्ट्राध्यक्ष असल्यासारखंच वाटलं. आपण बोलावलेल्या पाहुण्याला इतकं अगत्य दाखवण्याची ही रीत निराळी होती खास. मग आत एका दालनात चहापानासवे दोन्ही पुरस्कार्थी मंडळींची ओळख करून देण्यात आली. महुद गावाहून सरपंच-उपसरपंच आले होते आणि डॉ. देवधर पती-पत्नी सिंधुदुर्गाहून. ठीक ६ वाजून २० मिनिटांनी आम्हाला सभागृहात नेण्यात आलं आणि अचूक पाच मिनिटांनी पडदा उघडला गेला व रंगमंचावर उजव्या बाजूला ठेवण्यात आलेल्या गणपतीबाप्पांवर पुष्पवृष्टी झाली. ही वृष्टी करणारा प्रिसिजन संघसदस्य दहा मिनिटे आधी मंडपीवर जाऊन ओंजळीत फुले धरून बसलेला होता, हे खुद्द माधवराव देशपांडय़ांनी प्रास्ताविकात सांगितलं. साऱ्या गावात ‘प्रिसिजन टाइम’ हा शब्दप्रयोग कसा सुरू झालाय तेही सांगितलं अन् जे बोललं जातंय त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा दुर्मीळ योग मी अनुभवला. मग डॉ. सुहासिनी शहांनी कंपनीच्या सामाजिक अन् सांस्कृतिक कार्यासंबंधीचे विवेचन केले. अतिशय ओघवत्या अन् सहज शैलीत त्यांनी ज्या कामांची जंत्री सादर केली त्यात आशय-विषयांची विविधता तर होतीच, पण अभिरुची संपन्नता अन् प्रखर सामाजिक जाणीव या गुणांचं दर्शनही लक्षवेधक होतं. शालेय विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण देण्यापासून ते कर्तृत्ववान माणसांच्या मुलाखती घेण्याच्या कार्यक्रमापर्यंतचा ‘प्रिसिजन’ कर्तृत्वाचा पस या पर्जन्यछायेतल्या कोरडय़ा, तप्त पठारावर समृद्ध समाजाचे स्वप्न पेरीत, माणसांची मशागत करीत निरंतर वृद्धिंगत होणारा आहे याची जाणीव होत होती. आयुष्याला अर्थ देण्याची पत धारण करणारी अनेक कार्ये डॉक्टरीणबाईंनी हाती घेतली होती. डॉक्टरी व्यवसाय बंद करून जिल्हा परिषदेच्या शाळेत डिजिटल शिक्षण सुविधा पुरविणे, सरकारी इस्पितळात साधनसुविधा पुरविणे, इथपासून ते खेडय़ापाडय़ांत अन् शाळाशाळांत शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण वर्ग चालविण्यापर्यंत निरनिराळे उपक्रम राबवून समाजाच्या सर्वंकष स्वास्थ्याची काळजी मात्र त्या जबाबदारीनं अन् आनंदानं घेत होत्या.

नंतर पुरस्कार वितरण पार पडलं. अत्यंत सुबक असं हातात हात गुंफल्याचं शिल्प अन् आर्थिक मदतीची थली असं स्वरूप असलेले प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता आणि स्व. सुभाषरावजी शहा पुरस्कार दिले गेले. महुद गावचे सरपंच दिलीप नागणे यांनी गावच्या मर्दुमकीची कहाणी सांगितली. अवर्षणग्रस्त सांगोल्यातलं हे गाव. पाणीटंचाईवर शाश्वत उपाय शोधण्याकरिता गावाने कंबर कसली. ‘कासाळगंगा फाऊंडेशन’ स्थापन करीत गावच्या मृत ओढय़ाचं खोलीकरण, रुंदीकरण तर त्यांनी केलंच; पण पंचक्रोशीला चेतवून या ओढय़ाचं जणू नदीत रूपांतर केलं. आभाळातून पडणाऱ्या हर थेंबाबद्दल अप्रूप जागवत गाव पाणीदार केलं आणि भारत सरकारचा ‘नॅशनल वॉटर’ पुरस्कारही मिळवला. दिलीपभाऊ अन्  महेंद्रकुमार महाजन यांच्या नेतृत्वाखाली आता महुद मॉडेल व्हिलेज बनण्याचा ध्यास घेऊन स्थानिक प्रश्नांना स्थानिक उत्तरं शोधत असल्याचं ऐकताना त्या मातीत राबणाऱ्या द्विपाद देहांतली आभाळभर उमेद सावचित्त सभागृहात आनंद, उत्साहाची शिंपण करीत होती. मग डॉ. प्रसाद देवधर हे दृढदेही व्यक्तिमत्त्व पुरस्काराला उत्तर देण्याकरता काय उभे राहिले, माझी शिकवणीच सुरू झाली. अत्यंत चुरचुरीत, खमंग विनोदाने शृंगारलेलं त्यांचं निवेदन सहजगत्या भावगर्भ होत होतं. डॉक्टरी पेशात जनसेवा करीत असता भवतालातल्या नानाविध प्रश्नांनी डॉ. प्रसाद आणि डॉ. हर्षदा या दाम्पत्याचे लक्ष वेधले. स्वास्थ्य, शिक्षणासहित रोजगार, शेती, पशुपालन ते बायोगॅस निर्माणापर्यंत अनेक विषयांत मग या लक्ष्मीनारायणाने सृजनाची पावले उमटवीत अशुभ वर्तमान जणू पवित्र केले. गावागावांत जलसाक्षरतेचे उपक्रम राबवून सुरू झालेला हा भगीरथ प्रयत्न सिंधुदुर्गातली अनेक गावं समृद्ध करीत शाश्वत विकासाची गंगा गोरगरीबादारी घेऊन जात आहे. एकेक गाव समृद्ध करीत पुढच्या गावी काम सुरू करायला जाणाऱ्या डॉक्टरांची कहाणी ऐकताना मला गरीब लाकूडतोडय़ाची अडचण ऐकून द्रवणारे लहानपणीच्या गोष्टीतले शंकर-पार्वती आठवत होते. मनातल्या मनात झारापला जाण्याचा निश्चय करीत मी पुढच्या उत्तुंग कर्तृत्वशिखराला सामोरं जाण्यासाठी सिद्ध होत होतो.

डॉ. माधवराव चितळे! माझ्या अज्ञानाचे कठोर पाश भेदून स्वकर्तृत्वाने माझे कुतूहल चाळवणारा हा ज्ञानवृद्ध तपस्वी. मी त्यांना म्हटलं की, ‘‘पुलंच्या चितळे मास्तरांची उभ्या महाराष्ट्राला ओढ वाटते. तरी सर्वास ते काही लाभणार नाहीत. तुम्ही मात्र आज आम्हा उपस्थितांस लाभले आहात, तर मी तुम्हाला चितळे मास्तरच म्हणेन.’’ ते हसले. आश्वासक.

नुकतंच पायडलवर उभं राहून हॉपिंग करायला शिकलेल्या पोरानं ‘पहा मी कशी सायकल चालवतोय..’ म्हणत बापाकडे पाहावं अन् त्यानं नजरेतून विश्वास द्यावा, तसंच काहीसं.

तद्नंतर मात्र मी माझं सारं अज्ञान खुलं करीत मास्तरांचं संकीर्तन नचिकेत वृत्तीनं ऐकत राहिलो. कीर्तन म्हणा, वर्ग म्हणा, प्रबोधन म्हणा; मास्तरांनी पुढचे दोन तास सारा श्रोतृवृंद भारून टाकला. इतकंच नव्हे तर आम्हा उपस्थितांचं वैचारिक उन्नयन घडवून आणलं. एकच एक विषयाचा ध्यास घेऊन, आयुष्यभर अभ्यासव्रती राहून कमावलेल्या मास्तरांच्या ज्ञानाची, अनुभवाची घनगर्द सावली प्रश्नांची काहुरं शांत करीत राहिली. पानशेतच्या पुरापासून फराक्काच्या धरणापर्यंत अन् प्रिन्स्टन विद्यापीठापासून स्टॉकहोमच्या राजवाडय़ापर्यंत चहूदिशांची सर मास्तरांनी घडविली. जलसंपदा विभागातल्या घोटाळ्यापासून ते नर्मदा सरोवरापर्यंतच्या साऱ्या विवाद्य प्रश्नांना त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून साक्षेपी उत्तरं दिली. सगळ्यांनी शेती करून भागणार नाही, उसाची कारखानदारी हा फसलेला डाव आहे, शहर आरेखन अन् नियोजन यात आम्ही खूपच मागे पडत आहोत, व्यवस्थांवरच्या अविश्वासाचं मूळ पारतंत्र्याच्या इतिहासात आहे, राजकीय नेतृत्वातही मोक्याच्या क्षणी राष्ट्रहिताची, समष्टीच्या हिताची दृष्टी प्रकटते, इ. चकित करणाऱ्या, परखड सत्यदर्शन घडविणाऱ्या, तत्त्वचिंतन मांडणाऱ्या अनेक मौलिक मतांमधून मास्तरांनी त्यांची निर्माणदृष्टी पेश केली.

‘स्टॉकहोम वॉटर प्राइज’ हे ‘जल’ विषयासाठीचं नोबेल पारितोषिक प्राप्त केलेले मास्तर त्यांच्या आंतरराष्ट्रीय सुसंवाद कौशल्याकरता जगभरात ख्यातकीर्त आहेत. ज्यांच्या शब्दांतले सत्य शत्रुराष्ट्रातील नेतृत्वानंही प्रमाण मानले अशी विश्वासार्हता मिळवणारा हा ज्ञानवृद्ध बालपणीच्या खोडकर स्वभावास अनुसरून ‘सिंचन सहयोग’सारखी नवीन व्यासपीठं उभी करीत आहे. कोयनेच्या भूकंपात कुटुंबकबिल्यासह तिथे राहायला जाऊन जनतेत विश्वास निर्माण करणाऱ्या मास्तरांनी आपलं ज्ञान व्यवहारात उतरवलेलं आहे. अत्यंत कृतज्ञतेने आपल्या मार्गदर्शक ज्येष्ठांची, धर्याने साथ देणाऱ्या सहचारिणीची आठवण काढताना मास्तर लोभस होतात. पाणीग्रहणाच्या आठवणींनी हलकेच लाजतात, तर विरोधी विचारांच्या, अडथळा ठरणाऱ्या विचारांच्या पाठची भूमिका सहनशीलतेनं समजावून घेतात. व्यक्तीस दोष न देता कार्यकारणभावाची वैज्ञानिक दृष्टीने छाननी करून वृत्तीदोष सुधारण्याकरिताचे नमुने आपल्या आचरणातून सादर करतात. लहानपणापासून कीर्तनाची आवड असलेल्या मास्तरांची रामायणावरची कीर्तने लोकप्रिय आहेत. सामाजिक आकांक्षा, व्यवस्था अन् राजकीय नेतृत्व यांची आपल्या असाधारण संवादकौशल्यानं सांगड घालीत त्यांनी महाराष्ट्रच नव्हे, तर भारताच्या उभारणीत एकमेवाद्वितीय कामगिरी बजावली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात देश घडविणाऱ्यांच्या मांदियाळीत मास्तरांचे मानाचे स्थान आहे. अनेकांनी त्यांच्या कर्तृत्वावर ग्रंथ लिहिले आहेत, तर अनेकांनी ते वाचून त्यातून प्रेरणाही घेतली आहे. माझ्यासारख्याला या पाण्याची अथांगता हरखून टाकत होती. जसजसे मास्तर कळत होते तसतसा वळणाआडून सावकाशीनं दृश्यमान होणारा विस्तीर्ण जलाशय पाहिल्यागत मी स्तिमित होत होतो.

आजवर मला त्यांच्याबद्दल खचितच कुतूहल वाटलं होतं. कधीतरी याबद्दल वाचायला हवं असंही वाटत असे. प्रिसिजन परिवारामुळे मात्र हा अविस्मरणीय अनुभव वाटय़ाला आला. एकीकडे सत्तेच्या झेंडय़ाभोवती उसळलेल्या गर्दीत अनेक मानवी मूल्ये धारातीर्थी पडत असताना, भाऊबंदकीचे, मित्रद्रोहाचे, स्वार्थलोलुपतेचे अनेक नवे अध्याय लिहिले जात असताना, भीतीने काकडलेल्या मनाला उबारा देणारी ही एक सोलापुरी चादर मला या नोव्हेंबरनं दिली. त्यात देशपांडे, शहा, नागणे, देवधर, चितळे आदी कर्तव्यपरायण माणसांच्या कबीरवृत्तीची कशिदाकारी आहे. एरवी मळून गेलेल्या या देहामनाचा वाढदिवस या चादरीनं सजवून स्मरणीय केला आहे खास!

girishkulkarni1@gmail.com