नाना पाटेकरांनी ७ फेब्रुवारीच्या लेखातील पत्रात वास्तवालाच अलंकृत सौंदर्य देऊन सूर्यकिरणासारख्या नाना कला चोहोकडे पसरवल्या. पत्र एक; पण प्रश्न अनेक! त्यांनी कुठलाही प्रश्न हातचा राखून ठेवला नाही, की अनवधानाने अजून काही राहून गेले आहे, असे वाटत नाही. त्यांनी म्हटलेलंच आहे की, ‘एवढय़ाशा कागदात ब्रह्मांड दडलेलं असतं. पत्र अजमन आहे, चर्चमधली प्रार्थना आहे, बुद्धाच्या डोळ्यांतली करुणा आहे.’ आणि बरेच काही! कल्पनेपल्याडचे काव्यही आहे अन् वास्तवही आहे. असे असूनही शेवटी पत्रास कारण नाही. ‘अधूनमधून नाना’ची प्रतीक्षा साहजिकच आम्हा वाचकांना असणार आहे.
– सी. बी. बोरकर, उल्हासनगर, मुंबई.

अजून कोश हवेत
२४ फेब्रुवारीच्या लोकरंगमधील ‘वाणिज्य कोश पाहावा करून’ या लेखात दत्तात्रेय पाष्टे यांनी ‘डायमंड पब्लिकेशन’ने आजवर विविध प्रकारचे ४० कोश प्रकाशित केले असल्याचे सांगून वाणिज्य कोशाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. एवढे कोश या प्रकाशनाने छापल्याबद्दल ते नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत. मात्र हे सांगत असताना मराठी भाषेमध्ये संदर्भ ग्रंथांचा दुष्काळ असल्याबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. वस्तुत: ‘राज्य मराठी विकास संस्थे’ने ‘मराठी कोश व संदर्भ साधने यांची समग्र सूची-१८०० ते २००३’ (संपादक डॉ. व. वि. कुलकर्णी) यात असे म्हटले आहे की, ‘मराठी भाषेत १२ विविध प्रकारांत २००३ सालापर्यंत ८०० च्यावर कोश प्रसिद्ध झाले असून एवढय़ा संख्येने इतर कोणत्याही भारतीय भाषेत कोश प्रसिद्ध झाले नाहीत. शिवाय २००३ सालानंतर आणखी १०-१५ कोश नक्कीच प्रसिद्ध झाले असणार, कारण मराठी विज्ञान परिषदेनेच चार कोश प्रसिद्ध केलेत. अजून कोश हवेत हे म्हणणे मान्य करू या. पण आहेत, या संख्येबद्दल आनंद व्यक्त करू या.
याच अंकातील ‘मराठी भाषेचे भवितव्य’ या      डॉ. आशुतोष पाटील यांच्या लेखात मराठी विज्ञान परिषद व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ हे एक विज्ञान आणि तंत्रज्ञान कोश प्रसिद्ध करत आहेत, असे म्हटले आहे. हा कोश एप्रिल २००९ मध्ये प्रसिद्ध झाला आणि तो कोश मराठी विज्ञान परिषदेत चुनाभट्टी, मुंबई येथे उपलब्ध आहे.
– अ. पां. देशपांडे,
कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद, मुंबई.

उत्तम लेख
‘लोकरंग’मधील (१० फेब्रुवारी) ‘प्रयत्न आणि नशीब’ हा डॉ. राजीव शारंगपाणी यांचा लेख आवडला. लेखाचा विषय महत्त्वाचा आहेच, परंतु विषयाची मांडणी आणि वाचकांशी संवाद साधण्याची लेखकाची हातोटी विशेष वाखाणण्याजोगी आहे. प्रयत्न आणि नशीब या दोन्हींच्या मर्यादा तसेच सामथ्र्य इतकेच नव्हे तर त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या संधी आणि आव्हाने या सगळ्यांचा सहजसुंदर गोफ त्यांन सोदाहरण विणला आहे. स्वत:त बदल करण्यातले फायदे आणि सोपेपणा विशद करतानाच प्रयत्नाला नशिबापेक्षा किंचित तरी अधिक महत्त्व का द्यायला हवे, ते सांगून केलेला शेवट लेखाची शोभा वाढवतो.
– राजीव मुळ्ये, दादर, मुंबई.

असंबंध दाखले
पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी स्वेच्छानिवृत्तीची घोषणा करून आपला पदभार सोडला आहे. या घटनेबद्दलचे एक मूल्यमापन ‘वेध.. व्हॅटिकनमधील सत्तांतराचा’ या लेखात आनंद हर्डीकर यांनी केले आहे. या मूल्यमापनाचे स्वरूप, त्यासाठी दिलेले असंबंध दाखले तसेच मावळत्या पोपमहोदयांच्या प्रतिमेला विकृत रंग लपेटण्यासाठी केलेली आभासनिर्मिती दुर्लक्ष करण्याच्याच योग्यतेची आहे. परंतु यासंबंधातले वास्तव लोकांसमोर ठेवणे गरजेचे आहे.
आजवरच्या परंपरेनुसार पोपपदावर नव्या नामाभिधानासह विराजमान होत असतानाच त्यांचे पूर्वाश्रमीचे कार्डिनल जोसेफ रात्झिंगर हे नाव इतिहासात विरून गेले. मात्र हर्डीकरांनी सात वर्षांपूर्वी या पदावर झालेल्या पोपमहोदयांच्या निवडीभोवती संशयाचे वलय विणताना मोठय़ा धूर्तपणे त्या नावाचा पुन्हा पुन्हा उल्लेख केलेला आहे. जगातल्या बहुतांश धर्माधिकाऱ्यांची वा मठाधिपतींची निवड ही स्वयंघोषित मार्गाने होत असते. या पाश्र्वभूमीवर लोकशाही व्यवस्थेतील मतदान पद्धतीने होणारी पोपपदाची निवड नक्कीच आदर्श ठरते. ही निवडप्रक्रिया लेखकांनी राजकीय सत्तास्पर्धेतील स्पर्धा ठरवावी, याचे सखेद आश्चर्य वाटते. इतकेच नव्हे तर त्यांनी पोप बेनेडिक्ट सोळावे यांची निवड तेव्हा ‘तात्पुरती उपाययोजना होती,’ असे धक्कादायक विधान केले आहे. अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण वा चर्चच्या सेवेत दाखल होणाऱ्या तरुणींच्या लैंगिक शोषणाशी संबंधित गुन्हेगारीला कारावासाची शिक्षा देते. मात्र, त्यात गुंतलेले सारे धर्मोपदेशकच असल्याचा आभास निर्माण करून मावळत्या पोपमहोदयांनी अशा धर्मोपदेशकांना चक्क पाठीशी घातले, असा अजब शोध आपण कोणत्या तथ्यावरून लावत आहोत, याचे भान हर्डीकरांना राहिल्याचे दिसत नाही.
पोप द्वितीय जॉन पॉल यांच्या निधनानंतर पोपमहोदयांच्या निवडीसाठी एप्रिल २००५ मध्ये व्हॅटिकनमध्ये जगभरच्या तमाम कार्डिनल महोदयांची सभा भरली. त्या निवडणूक प्रक्रियेतून त्यांची पोपपदी बहुमताने निवड झाली.
पोपच्या राजीनाम्याच्या निर्णयामुळे जागतिक चर्चच्या कारभारात अनेक बदल घडणार आहेत. काम करणे जड जात असूनही त्या पदाला चिकटून राहण्याची प्रवृत्ती जर कुणामध्ये असेल तर तशा प्रशासकीय अधिकाऱ्याला अनासक्त वृत्तीच्या या निर्णयापासून महत्त्वाचा धडा मिळू शकेल. त्यांच्या या निर्णयामुळे ऐन उमेदीतील समर्थ उमेदवाराला पोप होण्याची संधी प्राप्त होईल. अगोदरच्या ज्या पाच-सहा पोपमहोदयांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे, त्याला वेगळी कारणे होती. तशा प्रकारची कारणे या पोपच्या राजीनाम्यामागे नाहीत. कार्यभार व्यवस्थित सांभाळत असताना अत्यंत मनमोकळेपणे पोपमहोदयांनी हा निर्णय स्वखुशीने घेतला आहे. अत्यंत तारतम्यपणे पोपमहोदयांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे जगभर स्वागत झाले आहे.
संततिनियमनासारख्या प्रश्नावर गर्भपात हा कुणाला सोयीस्कर उपाय वाटत असेल तर तो विचार त्याने जरूर कवटाळावा. मात्र चर्च अशा गर्भपाताच्या स्वरूपातील भ्रूणहत्या हे अक्षम्य पाप मानते. सुसंस्कृत जग आजही चर्चच्या या भूमिकेचा आदर करते. ‘घटस्फोट, पुनर्विवाह, धर्मोपदेशक म्हणून स्त्रियांना मुभा’ आदी मुद्दय़ांबाबतही चर्चची भूमिका कॅथलिकपंथीय ख्रिस्ती समुदायाने निषिद्ध मानल्याचे कधी दिसून आले नाही. त्यामुळेच कुठे व्हॅटिकनमधील जाणकार सूत्रांचा हवाला देऊन, तर कुठे इटालियन वृत्तपत्रांचा हवाला मोघमरीत्या देऊन नाहक गरळ ओकण्याचा प्रकार निषेधार्ह आहे.
– फ्रान्सिस डिसोजा, भुईगाव, वसई.

पूर्वग्रहदूषित लेख
कॅथलिक धर्मात ‘पोप’ हे सर्वोच्च पद आहे. त्यांच्याविषयी आनंद हर्डीकरांकडून वस्तुनिष्ठ लेखन अपेक्षित होते. पोप होण्यापूर्वी कार्डिनल रॅटझिंगर यांच्या हातून कुठले प्रमाद घडले, याची यादी हर्डीकरांनी दिलेली आहे. परंतु पोप झाल्यानंतर पोपनी लैंगिक शोषणासंबंधी जी स्पष्ट भूमिका घेतली व कार्यवाही केली, त्याकडे मात्र त्यांनी सोयीस्कर डोळेझाक केली आहे. पोपपदाचा स्वीकार केल्यानंतर आपल्या पहिल्याच भाषणात पोपनी घोषणा केली की, प्रथम माझं घर स्वच्छ केलं पाहिजे. बालकांच्या लैंगिक शोषणासंबंधी त्यांनी कडक कारवाई केली. त्यामुळे अनेक बिशपांना पायउतार व्हावे लागले. इंग्लंड भेटीवेळी पोपनी तेथील संबंधितांसमोर जाहीर दिलगिरी व्यक्त केली. एरवी खंबीर असलेले पोप, पण त्या वेळी त्यांचे डोळे भरून आले. ही गोष्ट मीडियाच्या नजरेतूनही सुटली नाही. मात्र लोकांची दृष्टी पूर्वग्रहदूषित असल्याने त्यांना हा सगळा प्रकार नाटकी वाटला.
– नोबेल मेन, भुईगाव, वसई.

निषेधार्ह लेख
आनंद हर्डीकरांचा लेख वाचून धक्का बसला. लेखातील सत्यता पडताळून पाहणे आवश्यक आहे. पोपच्या भूमिका व निर्णयाविषयी करण्यात आलेला उल्लेख आक्षेपार्ह आहे. या लेखात ‘भिक्षुणींचा वापर’ असा जो आरोप केला आहे, तोही निषेधार्ह आहे.
– फादर रेमंड रुमाव, जीवनदर्शन केंद्र,
गिरींज, वसई.

गैरसमज पसरवणारी माहिती
‘वेध.. व्हॅटिकनमधील सत्तांतराचा’ हा लेख माहितीपर असला तरीही काही अंशी वाचकांमध्ये गैरसमज पसरवणारा आहे. ‘आफ्रो-आशियाई देशांमध्ये एड्ससारख्या रोगाच्या झालेल्या फैलावापासून ख्रिस्ती धर्मोपदेशकांचे संरक्षण व्हावे म्हणून भिक्षुणींचा असा वापर झाला, तर तो आक्षेपार्ह मानता येणार नाही,’ अशी त्यांची (पोपची) भूमिका होती,’ हे कपोलकल्पित विधान कॅथलिक धर्माच्या सर्वोच्चपदी असणाऱ्या परमाचार्याच्या माथी मारणे नैतिकतेला धरून नाही. या विधानाचा स्रोत/संदर्भ देणे आवश्यक होते.
‘नायजेरियाचे कार्डिनल फ्रान्सिस आरिन्झे सध्या नव्या पोपच्या जागेचे सर्वात प्रबळ दावेदार मानले जात आहेत,’ हे विधानही वाचकांची दिशाभूल करणारे आहे. कार्डिनल आरिन्झे हे १ नोव्हेंबर २०१२ रोजी ८० वर्षांचे झाल्याने धर्मकायद्यानुसार पोपपदाच्या पात्रतेतून बाद झाले आहेत. हर्डीकरांचे ‘तात्पुरती उपाययोजना केल्यासारखीच रॅटझिंगर यांची (पोपपदी) निवड करण्यात आली होती’, हे विधानही बिनबुडाचे आहे. पोपची निवडप्रक्रिया गुप्तपणे होत असल्याने त्याविषयी कोणताही वृतान्त जाहीर केला जात नाही.
यावरून लेखकाने चुकीचे स्रोत व संदर्भ देऊन आपले अज्ञान प्रकट केले आहे. आणि वाचकांची दिशाभूल केली आहे, हे सिद्ध होते.
– रेमंड मच्योडो, वसई.

चुकीचे आरोप
‘वेध.. व्हॅटिकनमधील सत्तांतराचा’ हा आनंद हर्डीकर यांचा लेख वाचला. लेख अभ्यासपूर्ण होता, पण त्यातील काही विधाने चुकीच्या आधारावर केली आहेत. उदा. अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या धर्मगुरूंना पाठीशी घालणे, त्यांना तंबी न देणे, त्यांच्यावर कारवाई न करणे, गर्भपात करण्याचा अधिकार महिलांना न देणे, संततिनियमनसारख्या प्रश्नावर मार्गदर्शन केले नाही, वगैरे आरोप चुकीचे आहेत.
सेबेस्टीन घोन्सालविस, पापडी.