‘‘भाई’ : पुलंचं भंपक चित्रण’ या मुकुंद संगोराम यांनी मागील  पुरवणीत लिहिलेल्या लेखावर प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस पडला. त्यातील निवडक पत्रे आम्ही यावेळी प्रसिद्ध करीत आहोत.

चित्रपटात पुलं इतके सामान्य का वाटतात?

‘लोकरंग’मधील (१३ जानेवारी) मुकुंद संगोराम यांचा ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटासंबंधीचा ‘भाई : पुलंचं भंपक चित्रण’ हा सडेतोड पंचनामा करणारा लेख तंतोतंत पटला. चित्रपट पाहिल्यावर आवडला नाही, घोर अपेक्षाभंग झाला, हे जाणवले होते. पण डोक्यात थोडा गोंधळ माजला होता. आपण एकेकाळी झपाटल्यासारखे पुलं वाचत होतो. त्यांचे एकही नाटक सोडत नव्हतो. ‘गुळाचा गणपती’ मिळेल तेव्हा पुन:पुन्हा बघत होतो.. ते ‘भाई’ चित्रपटात इतके सपक का होते? ‘आहे मनोहर तरी..’नेही या पुलं-प्रभावास यत्किंचितही धक्का लावला नव्हता. मग या चित्रपटातले पुलं इतके सामान्य का वाटताहेत, असा प्रश्न पडला होता. पण संगोराम यांचा लेख वाचला आणि सगळा उलगडा झाला.

– जान्हवी नवरे

कलात्मक स्वातंत्र्य मान्य; पण..

ज्या व्यक्तीकडे समाज प्रेरणादायी म्हणून पाहतो, तिचे चित्रण त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना दु:ख देणारे असेल तर ते गैर आहेच; पण तो अत्यंत चुकीचा सांस्कृतिक दस्तावेजही असेल. कला आणि कलेचा सन्मान याबाबत या कलाकारांनी आयुष्य पणाला लावून महाराष्ट्राची जी सांस्कृतिक जडणघडण करण्याचा प्रयत्न केला, ती यामुळे मोडली जाते. हिराबाई बडोदेकरांची प्रसिद्धी ऐकून एका मोठय़ा इंग्रज अधिकाऱ्याने मेजवानी आयोजित केली. उभे राहून गप्पा मारत असतानाच त्या अधिकाऱ्याने हिराबाईंना उभ्या उभ्याच आता गाऊन दाखवा अशी सूचना केली. गाणे हे सन्मानपूर्वक आणि समर्पित होऊन गायचे असते आणि सन्मानपूर्वक ऐकायचे असते याची जाणीव त्या अधिकाऱ्याला नव्हती. तेव्हा हिराबाईंनी गाण्यास चक्क नकार दिला. या  प्रसंगातील मूल्यविवेक संस्कारित करून जातो. वसंतराव देशपांडेंना ‘वसंतखाँ’ म्हणताना पुलंनी त्यांच्या गायकीचे मर्म एका शब्दात सांगितले आहे. त्यांच्या गाण्याची थोरवी मराठीजन आनंदाने अनुभवत असताना ते कोणत्या जीवनसंघर्षांतून गेले याची माहिती फार थोडय़ा रसिकांना असेल. नव्या पिढीला तर फारच थोडी. भीमसेन हे तर त्या काळातले गायनातील गौरीशंकरच! प्रकृतीची चिंता न करता देशभर भ्रमंती करणारे आणि शास्त्रीय संगीताने कालखंड गाजवणारे भीमसेनजी! ज्या शारीरिक भात्याच्या जोराशिवाय शास्त्रीय संगीतातील खर्ज लावता येणार नाही, त्यातील एक भाता पूर्णपणे काढून टाकल्यावरही जे श्रेयस संगीत लोकांना कुमारांनी ऐकवले, ते अभिजातता आणि सौंदर्यशास्त्राचा कळस होते. या सर्वाचे गुण पुलंनी आवडीने गायले. सामान्य रसिकांना त्यांच्या गुणांची, त्यांच्या संचिताची योग्य ती जाणीव करून दिली. या पार्श्वभूमीवर ‘भाई’ चित्रपटात काय दाखवायला हवे होते, हे ध्यानात येईल. पुलं आनंदयात्री होतेच; पण त्यांचे गंभीर लिखाणही असामान्य आहे. चित्रपटकर्त्यांचे कलात्मक स्वातंत्र्य मान्यच; पण प्रभावशाली व्यक्तींबद्दल काय मांडावे, काय सांगावे, याकरता त्यांचा सखोल अभ्यास करावा लागतो. तो नसेल तर अशा व्यक्तिमत्त्वांना हातच लावू नये.

– उमेश जोशी, पुणे</p>

‘भाई’ : वास्तविकतेपासून दूर

‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाची संगोराम यांनी केलेली समीक्षा प्रत्येकाने वाचावी अशीच आहे. पु. ल. देशपांडे यांचे प्रसिद्ध झालेले साहित्य, व्यक्तिचित्रे, कथाकथनांचे ध्वनिमुद्रण आजही सुस्थितीत उपलब्ध आहे. पुलंच्या पत्नी सुनीताबाई देशपांडे यांचे ‘आहे मनोहर तरी..’ हे पुस्तक वाचक आजही वाचताहेत. पुलंवरील जीवनपट बनवण्यासाठी उपयुक्त अशा सामग्रीची इतकी उपलब्धता व जोडीला अद्ययावत तंत्रज्ञान असूनही दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी असा सुमार चित्रपट बनवावा याची खंत वाटली. सागर देशमुख यांच्यामध्ये खरे पुलं दिसले असते तर ती समाधानाची गोष्ट ठरली असती. पण तसे न होता पुलंच्या निकटच्या मित्रमंडळींचे चित्रपटात दाखवलेले वय, चालणे-बोलणे व अन्य तपशील यांच्याविषयी गोंधळ आणि घिसाडघाई झालेली दिसली. केवळ केशभूषा आणि वेशभूषा यांच्यावर भर दिला गेला असला तरी चित्रपट वास्तविकतेपासून दूर गेलेला वाटतो.

– सुलभा शिलोत्री, मुंबई</p>

उत्तरार्ध येईपर्यंत वाट बघावी!

‘भाई : पुलंचं भंपक चित्रण’ हा लेख वाचला; मात्र तो अजिबात पटला नाही. माझ्यासारख्या समग्र पुलं कोळून प्यालेल्या अनेकांना तो मनापासून आवडला. मी सत्तरीत असून माझ्या समवयस्क मैत्रिणीने मला ‘अजिबात चुकवू नको’ असे सांगितले आणि एकीने तर सिनेमा तीनदा बघितला. कधी नव्हे ते मराठी सिनेमाला थिएटरमध्ये शंभरेक प्रेक्षक होते आणि ते सगळे आनंदाने बाहेर पडले. पुलं किती आत्ममग्न आणि अव्यवहारी होते याची अनेक उदाहरणे सुनीताबाईंनी त्यांच्या पुस्तकात दिली आहेत. त्यात त्यांची गाडी उशिरा येणार हे माहीत असूनही स्थानकावर न जाता दुसऱ्या दिवशी ‘संत्री आणली का?’ विचारण्याचा प्रसंगही आहे. बेळगाव त्यांनी महाविद्यालयाच्या मंडळाशी झालेल्या मतभेदांमुळे सोडले, हे स्वत: पुलंनीच नमूद केले आहे. अंतू बर्वा, रावसाहेब, नाथा कामत ही वाचकांची आवडती पात्रं आहेत, ती सिनेमात आली तर बिघडले कुठे? वसंतराव आणि कुमारांशी असणारे त्यांचे मैत्र प्रसिद्ध आहे.

आणि सारखे दारू-दारू काय? दारू पिऊन प्रत्येक माणूस गटारात लोळतो किंवा बायकोला मारतो का? संयमाने व्यसन करणारे अनेक असतात. हल्लीच्या काळात कोणी त्यामुळे त्यांच्याबद्दल अनिष्ट मत बनवेल हे संभवतच नाही. हा त्यांच्या जीवनाचा पूर्वार्ध आहे. दुसरा भाग येईपर्यंत तरी वाट बघायला हवी होती.

– नंदिनी बसोले

कलाजीवन व खासगी जीवन

‘भाई : पुलंचं भंपक चित्रण’ हा लेख वाचताना पुलंचं एक वाक्य आठवलं : ‘काही काही लोक नाकाचा उपयोग फक्त मुरडण्यासाठीच करतात. फुलांचा सुगंध घेण्यासाठी नाही.’ असो. त्यानिमित्ताने.. १) लेखक महाशयांनी पहिल्या मुद्दय़ातच षटकार ठोकला आहे. ‘ती व्यक्ती आरपार दिसतेय का, हे महत्त्वाचं.’ म्हणजे नक्की काय? त्या व्यक्तीच्या स्वभाववैशिष्टय़ांचे वेगवेगळे पैलू, त्याच्या चुका, निर्णय हे सारे दाखवायचे असे म्हणायचे आहे का? संपूर्ण चित्रपटात एकूण २२ विनोद आहेत आणि तेही पुलंच्या साहित्यामधून घेतलेले. त्यामुळे ‘केवळ चार-दोन विनोदांच्या जोरावर..’ हा जावईशोध कसा लावला, हे त्यांनी सांगावे. २) पुलंसारख्या एखाद्या मोठय़ा कलाकाराच्या कलाजीवनाप्रमाणेच खासगी जीवनाबद्दलही लोकांना उत्सुकता असू शकते. पूर्ण चित्रपटात पुलं आणि सुनीताबाई यांना अपत्यप्राप्ती झाली किंवा नाही, याबद्दल फक्त दोनच प्रसंग आहेत आणि तेही संयत आहेत. कुठेही त्याबद्दल लांबण लावलेली नाही. ३) माझ्या माहितीप्रमाणे, डॉ. श्रद्धानंद ठाकूर यांनी एका लेखात वसंतराव देशपांडे पुलंच्या लग्नाला होते याचा उल्लेख केलेला आहे. चित्रपटात त्याबद्दलच्या प्रसंगात सुनीताबाईंचे वकील मित्र सहज म्हणतात की, ‘त्यांच्या घरी स्कॉच आहे.’ त्यावर वसंतरावही सहजपणे प्रतिक्रिया देतात. मात्र, ‘दोन तासांच्या अवधीत चित्रपटात पुलंचं पहिलं लग्न आणि दुसरं लग्न यापलीकडे फारसं काही नाही..’ असे म्हणणे कहर आहे. असो.

– मयूर कोठावळे, पुणे

दोन दिवसांत पटकथाबांधणी!      

पु. ल. देशपांडे यांचे साहित्य आणि दूरदर्शनवरील कथाकथनांचे कार्यक्रम मनात ठेवून ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट पाहिला. परंतु चित्रपट कसा वाटला, असे कोणी विचारले तर मी ‘निराशाजनक’ असे उत्तर देईन. तेव्हा मुकुंद संगोराम यांनी या चित्रपटाची केलेली समीक्षा अगदीच रास्त आहे.

तत्पूर्वी महेश मांजरेकर आणि मुख्य भूमिका करणारे सागर देशमुख यांची चर्चा ऐकताना या ‘चित्रपटाची पटकथा माथेरानमध्ये बसून दोन दिवसांत बांधली,’ असे मांजरेकरांनी म्हटल्याचे आठवले. त्यामुळे पुलंच्या जीवनात ज्या व्यक्ती आल्या तितके चेहरे घेऊन, पुलंच्या जन्मशताब्दीचा धंदेवाईक उपयोग करून, मूळ संदर्भ न पाहता सांगोवांगी घटना दाखवत, प्रसंगी विनोदाची झालर लावत नव्या पिढीला पुलंची ओळख करून द्यायची अशी योजना त्यांनी आखली असावी. पुलंच्या जीवनात आलेल्या व्यक्तींची ठळकपणे ओळख पुलप्रेमींना आहे. मात्र अशा व्यक्तींची वैशिष्टय़े, तत्कालीन वयोमान यांचा थोडासुद्धा अभ्यास न करता चित्रपटांत पात्रे निवडलेली दिसतात. वसंतराव देशपांडेंच्या भूमिकेत पद्मनाभ बिंड, पं. भीमसेन जोशींच्या भूमिकेत अजय पूरकर, रावसाहेबच्या भूमिकेतील हृषीकेश जोशी हे जराही योग्य वाटले नाहीत. याउलट शुभांगी दामले अभिनित वृद्धापकाळातील सुनीता देशपांडे आणि सतीश आळेकर यांनी रंगवलेले रमाकांत देशपांडे या लक्षात राहणाऱ्या व्यक्तिरेखा आहेत. सुनीता देशपांडे व हिराबाई बडोदेकर यांच्या वयात  लक्षात येण्यासारखे अंतर होते. चित्रपटात ते जाणवत नाही. शुभांगी दामले यांना सुनीताबाईंच्या संपूर्ण भूमिकेत पाहायला आवडले असते. काही प्रसंग संदर्भ नसूनही या चित्रपटात घुसवल्यासारखे वाटतात.

– यमुना मंत्रवादी, मुंबई

चुका म्हणजे भंपकपणा नव्हे!

मुकुंद संगोराम यांचा लेख वाचला. त्यांनी मांडलेले काही मुद्दे खरोखरच योग्य आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर मला ‘चंपूताई’ ही व्यक्तिरेखा कोणाची, हे समजले नव्हते. परंतु हा लेख वाचल्यानंतर त्या हिराबाई बडोदेकर आहेत असे कळले. पुलंसारखे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व केवळ दोन-तीन तासांत प्रेक्षकांसमोर मांडणे हे कल्पकतेला आव्हान देणारे आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनीही एका कार्यक्रमात हे मान्य केले आहे. आजवर मांजरेकरांनी अनेक चित्रपट केले असून त्यातून आपला ठसा उमटवला आहे. या चित्रपटातील काही विषय वादग्रस्त असू शकतील, पण अभिनय नक्कीच दर्जेदार आहे.

पुलं हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व होते. पुढील पिढीला त्यांचा जीवनपट उलगडून दाखवायचा तर काही बदल करावे लागणारच; पण ते आक्षेपार्ह नसावेत याचीही खबरदारी घेणे आवश्यक होते. परंतु पुलं दाखवताना काही चुका झाल्या असतील तर तो भंपकपणा नाही. या चित्रपटाचा उत्तरार्ध लवकरच येत आहे. त्यासाठी जाणकार, तज्ज्ञांनी योग्य त्या सूचना कराव्यात, म्हणजे उत्तरार्ध परिपूर्ण होण्यास मदत होईल.

– पुरुषोत्तम कृ. आठलेकर, डोंबिवली

कथानक आणि चित्रपट

‘भाई : पुलंचं भंपक चित्रण’ हा लेख वाचला. या लेखातील मुद्दे हे बहुतांशी चित्रपट कथानकाशी संबंधित आहेत. पुलंचे आणि त्यांच्या मित्रांचे विपर्यास करणारे चित्रण चित्रपटात आहे यावर लेखाचा भर आहे. पुलं, भीमसेनजी, वसंतराव हे दारुडे आहेत की काय असे वाटावे अशी अवास्तव दृश्ये सिनेमात असल्याबद्दल लेखकाने संताप व्यक्त केला आहे. हिराबाई बडोदेकर यांच्या चित्रपटातील दर्शनावरही ते नाराज आहेत. पण चित्रपट हे माध्यम कल्पितप्रधान आहे, त्यामुळे ‘बायोपिक’मध्ये असे स्वातंत्र्य दिग्दर्शक घेऊ शकतात. ते किती घ्यायचे, हे त्याच्या बुद्धीच्या वाढीवर अवलंबून असते. ‘बाजीराव मस्तानी’त काशीबाईने पिंगा घातलाच की!

लेखातली त्रुटी म्हणजे त्यात चित्रपट त्यामुळे वाईट झाला आहे असे सांगणारे फारसे काही नाही. चित्रपट म्हणून तो कसा आहे, त्याची दृश्यभाषा प्रभावीपणे समोर येते का, याबद्दल तसेच सिनेमाचा वेग, तांत्रिक अंगे याबद्दल लेखात मतप्रदर्शन नाही. पुलंची बदनामी होते आहे म्हणून सिनेमा पाहू नका, असे म्हणणे योग्य होणार नाही.

– गार्गी बनहट्टी, मुंबई

उत्तरार्ध तरी सुखद व्हावा!

मुकुंद संगोराम यांनी ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाचा केलेला पंचनामा वाचताना खूप वाईट वाटले. त्या अनुषंगाने काही विचार.. १) हा चित्रपट तयार करताना पुलंच्या नातेवाईकांना, मान्यवर सुहृदांना विश्वासात घेतले नसेल का? असल्यास लेखात नमूद केलेल्या प्रसंगांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती का? सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी या मंडळींसाठी खास खेळ आयोजित केला होता का? २) सिनेमात भूमिका करणाऱ्या मंडळींना, लेखकाला, विशेषत: त्या प्रसंगांत काम करणाऱ्यांना या गोष्टी का खटकल्या नाहीत? ३) सत्पात्री दान करण्यात नेहमीच पुढे असणाऱ्या पुलंवर ‘केवळ धंदेवाईक दृष्टीने सिनेमा बेतला आहे’ हे लेखकाचे मत वाचताना वाईट वाटले. ४) पुलंवर सिनेमा काढण्याचा निर्णय घेणाऱ्या महेश मांजरेकरांना धन्यवाद देताना एक पुलंप्रेमी या नात्याने या सिनेमाचा उत्तरार्ध सर्वार्थाने सुखद, आनंददायी व्हावा, ही नटराजचरणी प्रार्थना!

– डॉ. मधुकर घारपुरे, सावंतवाडी

महनीयांचे चारित्र्यहनन टाळावे

मुकुंद संगोराम यांचे ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ चित्रपटावरील सडेतोड प्रश्नोपनिषद वाचले. तुटपुंजी माहिती असणारी मंडळी खोलात न शिरता पुलं पडद्यावर पाहायला मिळतात, या एकमेव भावनेने आंधळेपणाने या चित्रपटाचा उदो उदो करताना दिसतात. पण त्या काळातील योग्य दाखले देऊन संगोराम यांनी तपशीलवार ‘भाई’ चित्रपटातील प्रसंगांतून वारंवार केलेला वस्तुस्थितीचा विपर्यास उघड केलेला आहे. त्यामुळे दिग्गजांच्या व्यक्तिरेखांवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. चित्रपटकर्त्यांनी सर्वज्ञानी असल्याचा गैरसमज सोडून जाणकारांच्या मदतीने पुढील भाग बनवावा. प्रेक्षकांनीही टाळ्या पिटण्याआधी पुलंच्या आणि समकालीन व्यक्तींच्या मूळ व्यक्तिरेखांवर चिखलफेक तर होत नाही ना, हे पडताळून पाहावे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सहजपणे विकले जाईल या हेतूने महनीय व्यक्तींच्या चारित्र्यहननाचा घाट घालू नये.

– नितीन गांगल, रसायनी

कलात्मक स्वातंत्र्याचा योग्य उपयोग गरजेचा!

‘‘भाई’ : पुलंचं भंपक चित्रण’ हा लेख वाचला. एक दिग्दर्शक आणि कलावंत म्हणून असलेल्या स्वातंत्र्याचा योग्य तोच उपयोग करावा, ही लेखात व्यक्त केलेली अपेक्षा रास्तच आहे. भीमसेनजींना तसेच वसंतरावांना मद्यसेवन प्रिय होते हे नाकारायची गरज नाही. पण म्हणून ते कोठेही मोफत प्यायला धावायचे, हे वस्तुस्थितीनिदर्शक आहे काय? आणि हिराबाई बडोदेकरांकडे ते केवळ मद्य पिण्यासाठी गेलेले दाखवलेत, हा शुद्ध आचरटपणा वाटतो. भीमसेनजींचे गुरू सवाई गंधर्व यांच्या त्या समकालीन असाव्यात. आणि गुरूसमान असणाऱ्या किराणा घराण्याच्याच हिराबाईंकडे भीमसेनजी मद्य मागायला बिनधास्त जातात? हे पूर्णपणे अवास्तव वाटते. यात विनाकारण हिराबाईंसारख्या अत्यंत सरळ, साध्या व्यक्तिमत्त्वाचा अवमान केल्यासारखा वाटतो. त्याचप्रमाणे ‘अंतू बर्वा’ या व्यक्तीबरोबर मद्यप्राशनाचा प्रसंगही उगीचच घुसडल्यासारखा वाटतो. पुलंवरील चित्रपट म्हणजे एखाद्या गुन्हेगार अभिनेत्यावरील चित्रपट नव्हे, की व्यसनाधीनतेचे इतके विस्तृत चित्रण करावे. आणखी एक प्रश्न- ज्या काळी ‘कानडा..’ हे गीत निर्माण झाले, त्यावेळी कुमारजी हे महाराष्ट्रात होते काय? माझ्या मते, तेव्हा ते बहुधा देवासला असावेत. मग ते सर्व एकत्र येऊन गाणार कुठे? अर्थात गाणे म्हणून ते ठीक वाटले.

– आल्हाद (चंदू) धनेश्वर