‘लोकरंग’मधील (२४ जानेवारी) ‘थांग वर्तमानाचा’ या सदरातील ‘आक्रमकता आणि भय’ हा लेख वाचला. भय हे नैसर्गिक नसून संस्कारीत असते. भय असताना कृती सकारात्मक होईल याची खात्री नसते. मेंदू हा मानवाच्या इतर अवयवांसारखाच एक अवयव आहे. मानवाच्या मनावर जसे संस्कार (क्रिया/ प्रतिक्रिया) होतात तसेच शरीरात घडते. मानसशास्त्राला महत्त्व देण्यापेक्षा शरीराला जास्त महत्त्व दिले जाते, किंवा देण्यास भाग पाडले जाते. आणि याआधारे वैद्यकीय क्षेत्रात बाजार मांडला जातो. माणसाचे मन भयमुक्त, विशुद्ध व संतुलित झाल्यावर त्याच्या सर्व क्रिया संविधानिक, कल्याणकारी व रचनात्मक होतात. तसे मन घडवण्यासाठी काय अभ्यास करावा यावरही सदरात प्रकाश टाकला जावा.

– कानिफनाथ देवकुळे, उस्मानाबाद</strong>

वाचनतृप्तीचा अनुभव

‘लोकरंग’मधील सुभाष अवचट यांच्या ‘रफ स्केचेस’ (२१ फेब्रुवारी) या सदरातील ‘बंद फाईलमधील चित्रं!’ हा लेख वाचला. चित्र काढण्यासाठीचे साहित्य- पॅड, कलर्स, ब्रश- घरातच दडलेले ते हुडकून काढून त्याद्वारे कशी स्केचेस केली याविषयीचे वर्णन वाचून ते कवी नसले तरी त्यांची कल्पक तरलता प्रत्ययास येते. त्यातून त्यांना कवी बाकीबाब बोरकरांचा सहवास लाभला, हे विशेष!  डॉ. संजय ओक यांच्या ‘आभास हा!’ या लेखात मांडलेली ‘नॅशनल करोना मेमोरिअल’ ही संकल्पना उत्तम आहे. ही लोकांनी लोकांसाठी बांधलेली आभासी स्मरणगाथा आहे.  ‘चवीचवीने’ या सदरात भूषण कोरगांवकर यांनी काही गोड, काही सामिष टर्किश पदार्थाचा घेतलेला आस्वाद लाजवाबच! हे वर्णन वाचून जिभेला पाणी सुटले. परंतु आभासी तृप्तीचा ढेकर देण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता.

– अरविंद करंदीकर, तळेगाव दाभाडे

निष्कर्ष खटकला

डॉ.  संजय ओक यांचा ‘नि:शब्द तळ्याकाठी’ हा लेख वाचला; परंतु अंतिम निष्कर्ष मात्र खटकला. अंतिम सत्य फक्त ‘मृत्यू’ हा निष्कर्ष योग्य वाटत नाही. जीवन हेसुद्धा सत्यच आहे. किंवा जीवन आणि मृत्यू दोन्ही सत्य/असत्य असतील/ नसतील कदाचित. जीवन आणि मृत्यू दोन्ही सत्य आहेत कीअसत्य, हे आपल्यासाठी अजून अनुत्तरितच आहे असे वाटते.

डॉ. विशाल भेदूरकर, पुणे</strong>