‘अस्मितांचा अर्थ आणि अर्थाची अस्मिता’ हा गिरीश कुबेर यांचा लेख (२६ ऑक्टोबर) वाचला. सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या कार्यालयात आणि चिंतन शिबिरांत मोठय़ा अक्षरांत छापून लावावा असा हा लेख आहे. ‘आपल्या मतदारांनी जास्तीत जास्त गरीब राहावे अशीच या पक्षांची इच्छा असते’ किंवा ‘लढणारे जायबंदी lok03होतात आणि लढवणारे मात्र नामानिराळे राहतात..’ ही लेखातील विधाने तर विशेष उल्लेखनीय आणि अगदी मर्मावर बोट ठेवणारी आहेत.
मतदारांना आता राजकारणाचे स्वरूप थोडेफार उमगू लागले असावे असे वाटते. एखाद्या अस्मितेचा गंडा बांधलेले राजकारणी किती सहज पक्ष बदलून दुसऱ्या अस्मितेचा (किंवा विचारधारेचा) गंडा बांधतात, हे आता अगदी ठळकपणे मतदारांसमोर येत आहे. राजकारणातील व्यक्तींनी विचारधारेशी पक्की बांधीलकी बाळगून काम करावे आणि प्रशासकीय सेवेतील व्यक्तींनी कुठल्याही एका विशिष्ट विचारधारेशी बांधीलकी ठेवून काम करू नये अशी अपेक्षा असते. प्रत्यक्षात मात्र राजकीय नेत्यांचे तात्कालिक स्वार्थाकरता ‘प्रशासकीयीकरण’ (आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे वाढते ‘राजकीयीकरण’) होताना जनतेला दिसत आहे. या साठमारीत आपण त्यांच्या लेखी कुठेच नाही आहोत. या नेत्यांप्रमाणेच आपला स्वार्थ आपणच कुठल्याही अस्मितेच्या वा विचारधारेच्या आहारी न जाता साध्य करायचा आहे, याची पक्की खूणगाठ आता मतदार मनात बांधू लागलेला आहे. त्या अर्थाने सामान्य लोक आता राजकारण्यांचे खरेखुरे अनुयायी होऊ  लागले आहेत असे म्हणता येईल.   
 बाजारात एखादा भाजीचे दुकान काढतो, एखादा किराणामाल विकतो, तर एखादा इतर काही वस्तू विकतो. त्या विक्रेत्यांना त्या- त्या वस्तूबद्दल काही विशेष प्रेम वाटते म्हणून ते त्या वस्तूचे दुकान काढतात असे नाही. बाजारातील सद्य:स्थिती,  इतर दुकाने, ग्राहकांची संख्या आणि त्यांचा कल पाहून कोणते दुकान काढायचे, ते ठरवले जाते. सत्ताबाजारातील हे दाहक सत्य समजायला मतदारांना खूप वेळ लागतो, इतकेच!

‘अस्मिता..’चा मार्मिक अर्थ!
‘अस्मितांचा अर्थ आणि..’ या मार्मिक लेखाबद्दल धन्यवाद. खोटय़ा अस्मितेपायी ‘अमेरिकेत पाऊल ठेवणार नाही’ अशी टोकाची निर्बुद्ध पोपटपंची मोदी करत बसले असते तर..’ हा लेखातील उल्लेख महत्त्वाचा आहे. शिवसेनेने निवडणुकीआधी मोठय़ा भावाची अस्मिता जागृत ठेवून युती तोडली. नंतर मराठी अस्मितेच्या नावाखाली मित्रपक्षावरच जहरी टीका केली. निकालानंतर मतदारांचा कल लक्षात न घेता ‘आमचीच तुम्हाला गरज आहे’ या वृथा अस्मितेपायी ‘तुम्ही आमच्याकडे या,’ असे म्हणून त्यांनी भाजपची अडवणूक केली. हे सर्व शिवसेनेच्या चुकीच्या सल्लागारांमुळे घडले. परिणामी महाराष्ट्रावर भगवा फडकविण्याचे मराठी मनाचे स्वप्न दुभंगले. सद्य:स्थितीत या सल्लागार मंडळाची पुनर्रचना करून भाजपचे बोट धरून, ‘२०१९ साली आम्ही स्वबळावर निर्विवाद बहुमत मिळवू’ असे ध्येय ठेवून वाटचाल करणे, हेच शिवसेना आणि महाराष्ट्र दोघांसाठीही हितावह ठरणार आहे. कै. बाळासाहेब ठाकरे यांच्याइतकी लोकप्रियता मिळविणारा नेता एकदाच जन्माला येतो. तेव्हा त्यांची बरोबरी करण्याच्या प्रयत्नांत चुका करू नयेत, इतकेच सांगावेसे वाटते.
– प्रदीप करमरकर, ठाणे.

 ‘मराठी अस्मिता’ म्हणजे नेमकं काय बुवा?
‘मराठी अस्मिता- मराठी अस्मिता म्हणजे नेमकं काय?’ हे इतकी वर्षे महाराष्ट्रात राहून मला अजूनही समजलेले नाही. आपण मराठी असल्याचा मला अभिमान आहे. का नसावा? सगळ्यांना आपापल्या मातृभाषेचा अभिमान असणे यात काहीच गैर नाही. आपल्या भाषेबद्दल अभिमान बाळगताना दुसऱ्या भाषेचा मानदेखील ठेवावा. या निवडणुकीत ‘मराठी अस्मिता’ हा मुद्दा वातावरणात घोंघावू लागला. पण म्हणजे काय? शिवसेनेला मत दिले म्हणजे मराठी अस्मितेची जपणूक होते, की राज ठाकरे यांना मत दिले की? मग शरद पवारांनी किवा पृथ्वीराज चव्हाणांनीच काय घोडे मारले आहे?
डॉ. नीतू मांडके यांनी एक इस्पितळ बांधायचे ठरवले होते. त्यांना वाटले होते की, दानशूर मंडळी या महाराष्ट्रात खूप आहेत, सहज ते बांधून होईल. पण नाही. त्यांचे स्वप्न साकार झाले नाही. ते जिवंत असताना व बाळासाहेब ठाकरे हयात असतानादेखील! ते इस्पितळ पूर्ण झाले ‘कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल’ या नावाने. भ्रष्टाचारात आम्ही कोठेही मागे राहिलो नाही; पण आम्ही एवढय़ा वर्षांत एक इस्पितळही बांधू शकलो नाही.
या निवडणुकीचे निकाल लागले, त्यात मराठी माणसाच्या अस्मितेचा निक्काल लागला. इतकी वर्षे एकत्र राहून बदलत्या काळाचा मागोवा घ्यायला आम्ही कमी पडलो. शरद पवारांसारख्या नेत्याबरोबर एवढे जवळचे संबंध असूनदेखील बेरजेचे राजकारण आपण कधीच शिकलो नाही. पालीचे गणित विसरलो. दोन पावले पुढे जाताना कधी एखादे पाऊल मागेदेखील यावे लागते. दादागिरी करता करता कळलेच नाही, की आमच्या मागचा मराठी माणूस केव्हा दूर गेला ते. आपल्याला आपली पत ठेवायची असेल तर आळस, पोकळ रुबाब, दादागिरी, टगेगिरी वगैरे झटकावी लागेल. नरेंद्र मोदींच्या यशाचे गणित ओळखून मुंबईच्या, महाराष्ट्राच्या, देशाच्या विकासाची कामे केल्यावरच तुम्ही मोदींना शह देऊ  शकाल.
– संदीप पेंढारकर

ढोंगी अस्मिता
‘अस्मितांचा अर्थ आणि अर्थाची अस्मिता’ हा लेख अतिशय आवडला. बऱ्याच दिवसांनंतर असे परखड भाष्य वाचायला मिळाले. विशेषत: शिवसेनेबद्दल एवढय़ा सडेतोडपणे सत्य मांडण्याची हिंमत दाखविल्याबद्दल धन्यवाद. सुसंस्कृत आणि सुशिक्षित समाज हे सत्य बऱ्याच वर्षांपासून जाणून आहे; परंतु कुणी बोलायच्या फंदात पडत नव्हते. शिवसेनेचा हा ढोंगीपणा याआधीच उघडा पडायला हवा होता. निदान तरुणांच्या अनेक पिढय़ा तरी त्यामुळे बरबाद झाल्या नसत्या.
– उल्हास गायकवाड, ठाणे.

सर्व पक्षांना हलवून टाकणारा निकाल
‘अस्मितांचा अर्थ आणि..’ हा अतिशय सुंदर लेख वाचला. मतदार आजवर  भुलले, पुढेही भुलतील असे समजणारे प्रत्येक पक्षात आहेत. या सर्वाना हलवून टाकणारा निकाल लागला. अजित पवार, छगन भुजबळ अशी आणखीही काही मंडळी घरी बसायला हवी होती. त्यांच्या नशिबाने ती तरली.
– अभय देशपांडे

विकासाची आस
‘अस्मितांचा अर्थ’ हा लेख वाचला. केवळ तरुण वर्गालाच नव्हे तर साठी उलटलेल्या लोकांनाही नरेंद्र मोदी यांनी दाखविलेली विकासाची स्वप्ने हवीहवीशी वाटत आहेत. राम मंदिर, बाबरी मशीद यांसारख्या विषयांमध्ये कोणालाही रस नाही. आम्हाला आमच्या देशाचा विकास हवा आहे. या निवडणुकीतून काँग्रेसनेही काही धडा घ्यावा, ही अपेक्षा.
– रमेश गाढवे, डोंबिवली.

अचूक विश्लेषण
‘अस्मितांचा अर्थ आणि अर्थाची अस्मिता’ या लेखात लोकांना काय हवे आहे, याचे नेमके विश्लेषण केले गेले आहे. विकासामुळे माणसांचं जगणं आणि राहणीमान सुसह्य़ होतं. परंतु दुर्दैवाने आपल्याकडील एकाही राजकीय पक्षाला ही गोष्ट समजत नाही.
– आनंद शिंदे, मुंबई.

फाटका नव्हे, नेटका!
‘अस्मितांचा अर्थ आणि अर्थाची अस्मिता’ हा मोदीलाटेची मीमांसा करणारा आणि त्यामागच्या कारणे विशद करणारा लेख केवळ अप्रतिम! प्रादेशिक पक्षांकडे कोणताही योग्य असा अजेंडाच नसल्याने आणि असलाच तर त्याच्या अंमलबजावणीसाठी त्यांना केंद्र सरकारच्या मर्जीवर अवलंबून राहावे लागत असल्याने मला वाटते, आपल्याकडे द्विपक्षीय लोकशाहीचीच आता गरज आहे. भारतीय माणसाला आता ‘फाटका’ राहण्यात रस नाही, त्याला ‘नेटकं’ व्हायचं आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाचे भवितव्य उज्ज्वल बनेल आणि आपण आर्थिकदृष्टय़ा इतके सक्षम होऊ, की आपल्या जीवनात याउप्पर जातपात, प्रांतवाद, भाषावाद, धर्मवाद असल्या फुकाच्या अस्मितांसाठी अवकाशच उरणार नाही.
प्रशांत जोगळेकर