एकमेकांच्या डोळ्यांत ‘ती’ खूण दिसणं.. काहीतरी खास उमगणं आणि मग एकमेकांचं होणं.. आणि मग हळूहळू एकमेकांत इतकं मिसळून जाणं, की ‘ती’ उन्हात उभी राहिली की सावली पडेल ती तिची, किंवा मग तिच्या प्राणांत मिसळलेल्या ‘त्या’ची!!
lok02इतकं खोलवर एकमेकांच्या प्राणांत रुजणं म्हणजेच ‘कविता’.. आणि म्हणजेच ‘गाणं’.. गेल्या काही वर्षांत काही कविता अशा भेटल्या, की त्या उराशी घेऊन मी हसलो, नाचलो, रडलो. आणि त्यांना कवटाळून शांत निजलो.. आणि माझ्याही नकळत त्याचं गाणं झालं. चाल बांधतानाचा एकही क्षण माझ्या लक्षात नाही, ही त्या कवितांची आणि कवींची जादू.
‘माझ्या कानी बाई वाजे अलगुज
सांगो जाता तुज, गुज सांगता न ये..’
बा. भ. बोरकरांच्या या ओळींमधलं वेडपिसं होणं हे शब्दांनी कागद ‘निळा’ होत जावा इतकं कृष्णमय. ‘अलगुज’.. म्हणजे पावा ऐकू येतोय मला; पण मी नाही सांगू शकत, की काय होतंय! आणि दुर्दैवानं तो दुसऱ्या कोणालाही ऐकू येतच नाही. आपल्या हृदयाचे कान करणारी ‘ती’च ऐकू शकते त्या कृष्णाच्या अलगुजाचा स्वर. आणि मग बोरकर म्हणतात..
‘मागे-पुढे धेनु, चोहीकडे वेणु
नंदाचा नंदनु परि धरता न ये’
सगळ्या खुणा दिसतात त्या ‘सावळ्या’च्या; पण तो सापडत नाही. तिला तो जाणवत तर राहतो; ऐकूसुद्धा येतो. पण ते अनुभवणं शब्दांपलीकडचं.. सतत सुखाच्या डोहात डुंबत ठेवणारं.. अस्वस्थ करणारं.. आणि तरीही हवंहवंसं वाटणारं.
‘सुखानेही असा जीव कासावीस
तरी हा परिस दुरी सारता न ये’
प्रत्येक जीवाने अनुभवलेली ही कासावीशी.. सुखाची कासावीशी. दीदींचं गाणं, कुमारजींची मैफल, लहान मुलाचं खिदळणं.. आणि त्या दोघांचं एकमेकांकडे पाहत राहणं.. सुखाने कितीही जीव गुदमरला तरी हवाहवासा वाटणारा हा परिसस्पर्श!
‘त्याची बाई मज सोडवेना ओढ
लाडीगोडी, भीड मोडवेना..’
स्वत:ला स्वाधीन करता करता दिलेली ही कबुली जीवघेणी आहे. त्या ‘कृष्णा’ची लाडीगोडी अशी आहे, की नाही जमणार मला भीड ओलांडून त्याला नाही म्हणणं.
‘पारखाया मज पाहिले दर्पणी
रूपाची रेखणी आढळेना..’
बोरकरांच्या या ओळी थेट मराठी भाषेतल्या माऊलीच्या विराणीशी नातं सांगणाऱ्या. इतकी भक्ती.. इतकी श्रद्धा.. आणि मग एवढी एकरूपता.. की आता आरशात पाहिल्यावर माझं रूप, माझा चेहरा नाहीच दिसत. कारण मी ‘माझी’ उरलेच नाही.
‘दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले
बापरखुमादेवीवरे विठ्ठले मज ऐसे केले।।’
प्रत्येक क्षणात, प्रत्येक श्वासांत त्याचाच ध्यास. त्याचा विरहही साजरा करण्याइतकी श्रद्धा.. आणि सतत बघितली जाणारी वाट.. आणि यानंतर खरंच ‘तो’ आला.. तर? नुसता निरोप आला, की येतो मी.. भेट होईल आपली.. तर? किती लगबग, किती अस्वस्थता!! खरंच, ज्या व्यक्तीवर आपण आयुष्यभर वेडय़ासारखा जीव लावतो ती व्यक्ती समोर आल्यावर काय बोलायचं? कसा असेल तो प्रत्यक्षात? काय बोलेल?
सुरेश भटसाहेबांच्या या ओळींनी काही महिन्यांपूर्वी माझा ताबा घेतला..
‘सजण दारी उभा, काय आता करू?
घर कधी आवरू, मज कधी सावरू?
मी न केली सखी अजुन वेणीफेणी
मी न पुरते मला निरखले दर्पणी
अन् सडाही न मी टाकिला अंगणी
राहिले नाहणे, कुठुन काजळ भरू
घर कधी आवरू, मज कधी सावरू?’
प्रेमात आकंठ बुडालेल्या नवथर तरुणीची लगबग.. त्याला सामोरं जाताना मनात असणारी हुरहुर.. अशा वळणांनी ही कविता भेटली. पण माझ्या हृदयात त्या कवितेचं गाणं झालं ते या शेवटच्या ओळींनी..
‘बघ पुन्हा वाजली थाप दारावरी
‘हीच मी ऐकिली जन्मजन्मांतरी
तीच मी राधिका, तोच हा श्रीहरी
हृदय माझे कसे, मीच हृदयी धरू?
घर कधी आवरू, मज कधी सावरू?
सजण दारी उभा..’
तो तिला प्रत्येक जन्मात भेटतोच.. कुठल्या ना कुठल्या रूपांत. दरवेळी एका वेगळ्या वळणावर.. ‘हीच’ थाप पडते.. ती दारावर नाही, तर हृदयाच्या दारावर होणारी ही टक्टक्.. मी प्रत्येक जन्मी वाट पाहते, की तो येईल.. त्याची हाक, त्याची नजर फक्त मीच ओळखते. मला आणि त्यालाच हे ठाऊक आहे, की आजूबाजूला सगळं घडतंय ते केवळ आपण पुन्हा एकमेकांसमोर येऊन उभं राहावं म्हणूनच. प्रत्येक जन्मात जागा वेगळी, रूपं वेगळी, नावं वेगळी; पण तोच ‘तो’ आणि तीच ‘मी’!
सुरेश भटसाहेबांच्या हृदयातून आलेल्या काही सर्वोत्तम ओळींपैकी मला भावणारी ओळ..
‘हृदय माझे कसे मीच हृदयी धरू..’
नवथर तरुणीच्या लगबगीपासून एकदम एका भव्य अशारीर प्रेमाच्या स्तरावर नेणारी ही ओळ मला या कवितेचा सर्वोच्च बिंदू वाटतो. मग ती केवळ लगबग राहत नाही; तर एक खोल जाणीव होऊन जाते, की उद्या आपला ‘देव’ आपल्याला भेटला तर किती धावपळ होईल आपली? देता येईल का त्याच्या नजरेला नजर? तेवढी उंची आणि तेवढी खोली आहे आपल्याकडे?
पण तरीही ही ओढ न संपणारी. कारण दोघांची दोन वेगळी अस्तित्वं जाणवतात ती दुनियेला; पण ते मुळात आहेत एकच.
‘कधी माझी, कधी त्याचीही साऊली
रेंगाळे माझिया चोरटय़ा पाऊली..’
आरती प्रभू हे बोरकर आणि सुरेश भटांइतकेच माझ्या हृदयावर राज्य करणारे कविराज!
‘तो’ तर माझ्यामध्ये मिसळून गेला आहेच; पण आता त्याची सावलीसुद्धा माझ्या पावलांशी रेंगाळते. तो समुद्रकिनारी फिरतो; पण पावलं उमटतात माझी.. माझं प्रतिबिंब दिसतं ते आरशात नाहीच.. त्याच्या डोळ्यांतही नाही, तर त्याच्या प्राणांत..
एकमेकांच्या प्राणांत मिसळून गेल्यानंतरची ओढ, एकमेकांना संपूर्णपणे समजल्याची खूण.. याहूनही सुंदर मांडलंय ते एकमेकांवर अवलंबून असणं. सुखात सगळे हात समोर येतात, पण.
‘ऊन मीठ-पाणी काजळाच्या मागे
भिजे माझा पीळ त्याचे धागे धागे’
काजळाच्या मागे लपवलेले अश्रूसुद्धा एकमेकांचेच असणं हे सर्वात सुंदर.. न सांगता वेदना जाणवणं.. आणि मग- ‘अगर मुझसे मोहोब्बत है, मुझे तुम अपने गम दे दो..’ म्हणत त्या वेदनांनाही अनुभवावंसं वाटणं.. न बोलताही एकमेकांवर दोनशे टक्के अवलंबून असणारे ते जीव..
‘वाळू घातलेले माझे पांघरुण
कैसे ओढू त्याचे मावळेल ऊन..’
दोरीवर वाळत असणारं पांघरूणसुद्धा मी हलवू शकणार नाही. कारण ते आहे त्याच्या आयुष्यातल्या ऊन-सावलीशी बांधलेले..
इतकं एकमेकांचं असणं हे भेटत राहतं अनेक प्रतिभावंतांच्या अनेक कवितांमध्ये.. आणि कधी एखाद्या आजी-आजोबांच्या डोळ्यांत.. आणि मग जाणवतं की कदाचित-
‘एकाच घनाच्या दोन आम्ही सरी
प्राणांवर एक, दुजी अंगावरी’
अशी एकरूपता असेल आयुष्यभर- तरच तो त्या संधिप्रकाशात नक्कीच हक्कानं म्हणू शकतो..
‘असावीस पास जसा स्वप्नभास
जीवी कासावीस झाल्याविना
तेव्हा सखे आण तुळशीचे पान
तुझ्या घरी वाण नाही त्याची
तूच ओढलेले त्यासवे दे पाणी
थोर ना त्याहुनी तीर्थ दुजे’

Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
gut health diet
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा
How To Grow Mogra in Small Pot Money Saving Hack
२ रुपयांच्या खडूने मोगऱ्याचं रोप कळ्यांनी गच्च भरून जाईल; लहान कुंडीत फुलबाग सजवण्याचा उपाय, पाहा Video