‘निरामय कामजीवन’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक     डॉ. विठ्ठल प्रभू हे नाव वाचकांना तसे अपरिचित असण्याचे काही कारण नाही. आजवर त्यांची पंचवीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्या सर्वाचा विषय कामजीवन, आरोग्य आणि त्याच्याशी संबंधित असाच आहे, पण हे पुस्तक मात्र त्या सर्वापेक्षा वेगळे आहे. साहित्य, नाटक, संगीत, पर्यटन अशा विविध क्षेत्रांत रस असणाऱ्या     डॉ. प्रभू यांनी या क्षेत्रांतला आपला प्रवास, खरं तर आठवणी यात सांगितल्या आहेत, पण हे पूर्णपणे आत्मचरित्र नाही. आपल्या आयुष्यातील काही आठवणी, प्रसंग यात आले आहेत खरे, पण तो एकसलग भाग नाही. दादरसारख्या मुंबईच्या सांस्कृतिक भागात वाढलेल्या डॉ. प्रभूंनी पारतंत्र्य, स्वातंत्र्य, आणीबाणी असा मोठा काळ पाहिला आहे. प्रस्तुत पुस्तकात एकंदर आठ प्रकरणे असून पहिलेच प्रकरण दादरविषयी आहे. त्या नंतरच्या प्रकरणात त्यांच्या डॉक्टरकीची गोष्ट आहे. समाजजीवन या प्रकरणात काही सामाजिक अनुभव आहेत. ‘निरामय कामजीवन’ या पुस्तकाच्या निर्मितीची आणि यशाची गोष्टही एका प्रकरणात आहे. नंतरची तीन प्रकरणे अनुक्रमे पर्यटन, नाटक आणि संगीत याविषयी आहेत. मागच्या शतकाचा मोठा काळ पाहिलेल्या, जगलेल्या आणि अनुभवलेल्या   डॉ. प्रभूंच्या या आठवणी वेचक आणि वेधक आहेत.

‘गोष्ट एका डॉक्टरची’ – डॉ. विठ्ठल प्रभू, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे, पृष्ठे – १७०, मूल्य- २०० रुपये.

 

‘लग्न पाहावे करून.. जगून!’

असं म्हणतात की, लग्न करणं ही खूप सोपी गोष्ट असते, पण ते निभावणं हे खूप कठीण असतं. त्यातही लग्न भिन्न संस्कृती वा समाजातल्या जोडीदाराशी असेल तर आणखीनच कठीण होतं. दोन संस्कृतींचा संगम ही साधी गोष्ट नसतेच कधी. त्यात प्रत्येक समाजाच्या धारणा, रूढी-परंपरा, श्रद्धा वेगवेगळ्या असतात, पण अशी आंतरजातीय लग्नं ही आता फारशी नवलाची गोष्ट राहिलेली नाही. त्यात भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये तर संपूर्ण भारताचंच दर्शन घडत असल्याने त्याच्याशी संबंधित असणाऱ्या मंडळींमध्ये ते खूपच सहजपणे स्वीकारलं जातं. अशाच २१ सेलिब्रेटी जोडप्यांच्या आंतरजातीय लग्नाच्या गोष्टी या पुस्तकात सांगितल्या आहेत. यातील सर्व लेख यापूर्वी वर्तमानपत्रांतून सदररूपाने प्रकाशित झाले आहेत. या पुस्तकातून आंतरजातीय लग्न करू इच्छिणाऱ्यांना काही प्रमाणात बळ मिळू शकते, तर आंतरजातीय विवाहाला विरोध करणाऱ्यांचा विरोध काही प्रमाणात मावळूही शकतो, कारण या सर्व यशस्वी लग्नाच्या गोष्टी आहेत.

‘लग्नसंस्कार’ – किशोर धारगळकर, योगेश्वर पब्लिकेशन्स, मुंबई, पृष्ठे- १२१, मूल्य- २१० रुपये.

 

कर्मयोगी समाजशिक्षक

हा एका समाजशिक्षकाचा आणि त्याने उभारलेल्या शिक्षण चळवळीचा गौरवग्रंथ आहे. त्यांचे नाव आहे दोधू आनंदा बोवा ऊर्फ बोवादादा. यांनी उत्तर महाराष्ट्रात आदिवासी पाडय़ांमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल १५००-१६०० पूर्वप्राथमिक शाळा आणि छात्रालये उभारली. अशा या कर्मयोगी समाजशिक्षकाची महाराष्ट्राला ओळख करून द्यावी, या हेतूने हा ग्रंथ तयार करण्यात आला आहे. फुले, कर्वे, कर्मवीर यांच्या मांदियाळीत शोभेल अशी कामगिरी बुवादादा यांनी केली आहे. या ग्रंथात एकंदर ७२ लेख असून बोवादादांच्या वेगवेगळ्या पैलूंवर आणि कार्यक्षेत्रावर अनेकांनी दृष्टिक्षेप टाकला आहे. लेख जरा जास्त आहेत, पण त्यातील कळकळ मात्र सच्ची म्हणावी लागेल.

‘प्रकाशाचे झाड’ – संकलन-संपादन – गोरख पगार, बोवादादा प्रतिष्ठान, मालेगाव, पृष्ठे – २४८, मूल्य – ३२५ रुपये.

प्रेमचंदांच्या निवडक कथा

मुन्शी प्रेमचंद यांच्या कादंबऱ्या आणि कथा या भारतीय साहित्यात अभिजात साहित्यप्रकारात गणल्या जातात. अभिजात असले तरी प्रेमचंदांचे साहित्य तितकेच लोकप्रियही आहे. त्यामुळे त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद वेगवेगळ्या भाषांमध्ये अधूनमधून होतच असतात, किंबहुना परत परत होत असतात. प्रस्तुत संकलनही अशांपैकीच आहे. यातल्या काही कथांचे अनुवाद यापूर्वीही मराठीमध्ये झालेले आहेत, पण या संग्रहातील दहाच्या दहा कथा याआधी पुस्तकरूपाने प्रकाशित झालेल्या नव्हत्या, हेच या पुस्तकाचे वैशिष्टय़. ‘ईदगाह’, ‘बुढी काकी’, ‘कफ़न’, ‘जीवन का शाप’, ‘शांति’ अशा गाजलेल्या कथा या संग्रहात आहेत. या कथा दमदार आणि जीवनाचे अनेकांगी दर्शन घडवणाऱ्या आहेत. प्रेमचंदांची भाषा, कथा सांगायची त्यांची पद्धत आणि निवदेनशैली जशीच्या तशी अनुवादात आणणे तसे कठीणच. अनुवादिकेनी प्रामाणिक प्रयत्न केला असला तरी त्यात त्यांना फारसे यश आलेले दिसत नाही, पण मूळ कथा पकड घेणाऱ्या आहेत. अनुवादात त्यांची काहीशी हानी झाली असली तरी त्या वाचल्याच पाहिजेत अशा आहेत.

‘कालजयी कथा’ – मुन्शी प्रेमचंद, अनुवाद विजया भुसारी, मधुश्री प्रकाशन, पुणे, पृष्ठे – १२०,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मूल्य – १४० रुपये. ठ