|| डॉ. आशुतोष जावडेकर

TODAY

अस्मित : इंस्टावर काय बेदम डान्सबिन्स फोटो टाकलेस राव! माझ्यासाठी का नाही थांबलास? शेतातली कामं झाली की येतच होतो मी परत. मग एकत्र गेलो असतो आपण.. बरं, मी आत्ता शेतावर आहे आणि आमचा म्हातारा समोर तंबाखूची चिलीम भरत कडक उभा आहे. फोन काय करत नाही तुला मी. तू लांब मेसेजच लिही. आणि क्रिकेट कधी खेळला तू रे? तेजसदाच्या फेसबुकवर बॉलिंग करतानाचा फोटो पाहिला तुझा. सगळी स्टोरी येऊ दे आणि ऐक : टॉयलेटच्या बाहेर येऊन लिही मला. स्माईली गुणिले पन्नास!

अरिन : टॉयलेटमध्ये बसूनच लिहिणारे तुला अस्म्या.. साल्या! स्माईली इंटू हंड्रेड! कारण तिथे समोर तुझा म्हातारा आहे, तसाच माझा बाबाही आज इथे रूमवर आलाय. आणि मला लेक्चर द्यायलाच आलाय. परवाच त्याने एक मला लांब फोन करून झापलं. अँड यू नो- काही कारण नसताना! तो म्हणाला, ‘‘अरिन, बेटा, आय लव्ह यू.’’ तेव्हाच मी ओळखलं, की आता काहीतरी गेम असणार आहे पुढे! आणि विकेट पडलीच माझी. मी अभ्यासात पुढे असलो तरी किती एकूण कॅज्युअल आहे.. एक वर्षांने मला डिग्री मिळाली की मी कसा एकदम बेरोजगार होईन, परदेशात जायचं का याचा मी काहीच अजून कसा विचार केलेला नाही, आमच्या पाल्र्याच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या राहुलने कसा जीआरईचा स्कोअर आत्ताच भारी आणला आणि मी मात्र कसा फोकस्ड नाही, मी कसा फक्त मज्जा मारतोय, कसा पोरींना फिरवतोय, नुसत्या अभ्यासात ग्रेड्स आणणं म्हणजे काही ग्रेट नाही- बाकी मार्केट- नोकरी सर्चही हवा.. माझे मित्र कसे त्याबाबत स्मार्ट आहेत आणि मी कसा माझ्या नादात एकूण फुटबॉल किंवा खरं तर गोटय़ा खेळत बसलोय असं सगळं लेक्चर दिलं त्यांनी. मला एकदम शॉक व्हायला झालं रे. यार, मला माझा बाबा असं कधीच बोलला नव्हता. मी टॉयलेटमध्ये येऊन रडलो अस्मित! आणि तू मला खूप आठवलास. तू रूमवर असतास ना- तरी बाबाने मला तुझ्यासमोरही झापलं असतंच; पण मग तू काहीतरी तुझा गावाकडचा जोक ऐकवला असतास आणि मी कम्फर्टेबल झालो असतो.

अस्मित : ‘मिस यू- मिस यू’चे स्टिकर टाकत नाही; पण तूही आठवलास खूप मला भावा. ये इकडे शेतावर दोन दिवस राहायला. पावसानं वेड लावलंय.. आता सांग : क्रिकेट- पब.. सगळी स्टोरी.

अरिन : तेजसदा हट्ट करत होता क्रिकेट खेळायचा. तेजसदाला म्हटलं, ‘‘दा, आम्ही रात्री पबमध्ये जातोय. तिथे तू येणार असशील तर मी क्रिकेट खेळतो.’’ डील झालं मग आमचं. तेजसदा आणि त्याचे कंपनीतले मित्र होते खेळायला.

अस्मित : त्यांनी आदल्या रात्री चिकन खात खात एकत्र मॅच पाहिली असणार आणि मग सकाळी खेळताना त्यांना आपण स्वत:च लेकाचे रोहित शर्मा, नाही तर विराट कोहली झालो आहोत असं वाटत असणार.

अरिन : एक्झॅक्टली! पण फक्त वाटत होतं, इतकंच! काय बेकार खेळत होते ते सगळे चाळिशीचे घोडे.. रॅदर हत्ती! तेजसदा बॅटिंग सॉलिड करतो. त्याने एक-दोन स्क्वेअर ड्राइव्ह आणि रिव्हर्स स्वीप जबरी लगावले. पण त्याच्या बाकी मित्रांना प्रॉपर ढेरी आहे. पळतच नव्हते ते रन्ससाठी!

अस्मित : तू सिक्सर मारली का भाऊ?

अरिन : नाही रे! एलबीडब्लू झालो. मला तो छोटा क्रिकेटचा बॉल दिसतच नाही! आम्ही शाळेत खेळायचो क्रिकेट.. स्कूलबॅगमधून लिहिण्याचं पॅड काढून. मला कधी तेही जमलंच नाही. बॉल जोरात आला समोरून की मला नकळत भीतीच वाटायची. फुटबॉल मोठा असतो अरे! डोक्यावर, छातीवर नाचवता येतो. बाबा म्हणतो ते खरं असणार- मला फोकस नाहीये; पण मग मी गोल कसे बरोबर मारतो? ..जाऊ दे. आधी स्टोरी पूर्ण करतो. आम्ही क्रिकेट खेळलो हे माहीला ग्रुपवर फोटो टाकून आम्ही कळवलं तशी ती जाम वैतागली. तिला खेळायचं होतं. पण पोरींना कुठे क्रिकेट जमतं? तेजसदाने बोलावलं नव्हतंच तिला. मग तिने आम्हाला तिच्या घरी क्रिकेटनंतर ब्रेकफास्टला बोलावलं. गेलो आम्ही. झापलं तिने आधी आम्हाला. काय ते मेलं शेव्ह्य़ूनिस्ट वगैरे बडबड केली! स्माईली इंटू फिफ्टी! तिथे तिची कोकणातली गीतामावशी होती. ती माहीकडे राहायला आली आहे दोन-तीन महिने. तिचे मिस्टर एक्स्पायर झालेत आणि मुलगी स्टेट्समध्ये असते म्हणे. मला आधी जरा बोअर वाटलं, पण छान गप्पा झाल्या अरे. मला आवडली गीतामावशी. तिने मला सांगितलं : ‘‘अरिन, मला मावशीच म्हण तूही.’’ तेजस मात्र कधी ‘काकू’, कधी ‘अहो मॅडम’ असं चाचपडत होता आणि पोहे चेपून खात होता. मग रात्री पबमध्ये जायचा विषय निघाला. गीतामावशी एकटी घरात असल्याने नाही येता येणार असं माही म्हणाली. पण गीतामावशी म्हणाली, ‘‘मीही येते ना! मीही नाचेन. मला मंगळागौरीचे खेळ उत्तम जमतात!’’

अस्मित : ६३ऋ ! स्माईली गुणिले अठ्ठावन्न.

अरिन : मग काय! ६३ऋ ! पण रात्री पबमधे मी फार ड्रिंक्स घेतली नाहीत- सगळे होते म्हणून. तेजसदाला नाचायला आवडतं. पण पबचा अंधार त्याला आवडला नाही. तिथला मोठ्ठा आवाज त्याला नकोसा झाला आणि त्याचं डोकं दुखायला लागलं! मॅड असतात ना ही चाळिशीची घोडी? आणि प्लस- त्याच्या भाषेत तो ‘दारू’ही पीत नाही!

अस्मित : स्माईली गुणिले अडीच!

अरिन : येस! पण माही आणि इरा बेदम नाचल्या. इरा जाम हॉट दिसत होती. मला वाटलं की, ती गीतामावशी कोपऱ्यात बसून राहील. तर तीही माझ्यासोबत थोडी नाचली. नाचल्यानंतर मी मजेत गीतामावशीला म्हटलं, ‘‘मी तुला ड्रिंक बाय करणार आता!’’ तर ती हसली आणि म्हणाली, ‘‘पाज मला दारू. एक घोट घेतल्याने कुणी मरत नाही.’’ मग तिने मोजून एक घोट आणि मी एक पेग घेतला. आम्ही बार स्टूलवर बसलो. मागे अँडी मूरचं ट्रान्स म्युझिक सुरू झालेलं. लेझर लाइट आमच्या चेहऱ्यावर मधेच पडत होता. का कुणास ठाऊक, मी गीतामावशीला म्हटलं की, मी फोकस्ड नाहीये. मी या डान्सिंगसारखा आहे. या ट्रान्स म्युझिकसारखा आहे. मी स्टेडी नाहीये.

अस्मित : मग काय बोलल्या मावशीबाई?

अरिन : ती म्हणाली, ‘‘अरिनबाळा! (हो! ती ‘बाळ’ असंच म्हणाली!) पण तुझ्यात केवढी ऊर्जा आहे! केवढा उत्साह आहे! आत्ता नाचतानाही दिसली ती शक्ती. फोकस मिळवण्याआधी मुळात आत शक्ती लागते. ती आहे तुझ्याकडे. आणि तुझ्या डोळ्यांत कुतूहल आहे.’’

अस्मित : अऱ्या, मग काय फोकस असणार आहे तुझा? इरा? जॉब? जीआरई? माही? तेजसदा? बाबा? आई?

अरिन : अस्म्या, व्हायवा घेतोयस का तू साल्या? ओके. लेट मी आन्सर : मला तू हवा आहेस. तुम्ही सगळे हवे आहात सोबत. मला कामही करायचं आहे, पैसेही मिळवायचे आहेत. पण कोरडं नाही जगायचं मला- एकच एक फोकस ठेवून. गुणाकार करायचे आहेत मला.

अस्मित : आमच्या बलगाडय़ांची रेस असते ना, त्यात ते बल असे इंटू वगैरे न करता, कुठे इकडेतिकडे न बघता थेट सरळ बुंगाट धावतात. पण मग एकदाचे जिंकले की काय लाड असतात जोडीचे! सगळे गावकरी सेल्फी घेतात आमच्या बलांसोबत! .. चल, झोप निवांत. देवळात वारीच्या निमित्ताने भजन आहे तिथे मी चाललोय. आमचं ते ट्रान्स म्युझिक!

TODAY

अरिन : गुड मॉìनग डिअर. काल रात्री मला भारी स्वप्न पडलं. माझ्या अंगात शाळेचा युनिफॉर्म होता. समोरून जोरात त्या बॉलरने बॉल टाकला. खूप खूप स्पीडमध्ये. १४० असेल! आणि माझ्या हातातलं पॅड घट्ट घट्ट धरून नेम घेऊन मी बॉल उंचावला. ‘टक्’ असा जोरदार आवाज आला आणि सिक्सर गेली यार. पण त्या फोकस्ड क्षणीही मी एकटा नव्हतो. चीअर करायला मागे तू, तेजसदा, माही, गीतामावशी तुम्ही सगळे होतात.. आत्ता मी हातात कॉफी घेऊन बसलोय आणि पॅडवर बॉल आपटल्यावर आलेला ‘टक्’ असा दणकट आवाज अजून कानात फिरतोय तो ऐकतोय!

अस्मित : विठ्ठल.. विठ्ठल! लव्ह यू भावा!

अरिन : लव्ह इंटू तुला हवे तेवढे!

ashudentist@gmail.com