प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com

व्यंगचित्र या कलेचं नेमकं प्रयोजन काय? हसवणं? विचार करायला लावणं? हसता हसता विचार करायला लावणं? सत्य सांगणं? सत्याच्या इतर बाजू सांगणं? उत्तम चित्रकला दाखवणं? चित्रकलेच्या माध्यमातून काहीतरी गूढ व्यक्त करण्याचा प्रयत्न करणं? नेमकं काय? हे सगळं की यांच्यातल्या काही गोष्टींचं मिश्रण?

हॉवर्ड शूमेकर हा व्यंगचित्रकार यातल्या काही गोष्टी, थोडे नियम पाळतो आणि बाकीचे मोडतो. तो नियमांना धक्का लावत नाही, तर तोडफोड करून फेकून देतो. जातिवंत बंडखोरच जणू! शाळावगळता त्याने कलेचं रीतसर शिक्षण वगैरे घेतलेलं नाही. पण काही काळ त्याने कमर्शियल आर्टिस्ट आणि ग्राफिक डिझायनर म्हणून काम केलं. त्याच्या व्यंगचित्रांमुळे हसू वगैरे अजिबात येत नाही. ती थोडी विक्षिप्त असतात असं म्हटलं तरी चालेल. त्याच्यात थोडासा चित्रकार अवश्य आहे. त्यामुळे ‘मी चित्रकलेचे नियम समजून घेतो, पण ते मुख्यत्वे मोडण्यासाठीच! नियम माहिती असतील तरच ते मोडता येतात..’ ही त्याची आवडती वाक्यं आहेत. त्याला सेक्साफोन वाजवायला खूप आवडायचं. पण का कुणास ठाऊक, त्याच्यावर ड्रॉइंग बोर्डची मोहिनी पडली आणि संगीत बाजूला पडलं.

त्याला स्वत:ला शब्दविरहित व्यंगचित्रं काढायला आवडतात. बऱ्याच गोष्टी वाचकांवर सोडून द्यायला त्याला प्रचंड आवडतं. ‘मी त्यांना सोप्पं करून किंवा हाताला धरून शिकवणार नाही,’ असं तो स्पष्टपणे म्हणतो. सोबतचं विजेचा बल्ब बदलणाऱ्या माणसाचं चित्र बघून शेवटी आपल्याला एक विचित्र झटका बसतोच!

त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये ‘आत्महत्या’ हा विषय वारंवार येतो. त्याची एक मालिका तर वेगवेगळे व्यावसायिक कशा आत्महत्या करतात याबद्दलच आहे. म्हणजे त्याच्या कल्पनाशक्तीची रेंज लक्षात येईल. उदाहरणार्थ, रोप ट्रिक करणारा पुंगी वाजवून दोरी उभी करतो आणि नंतर त्याचा गळफास करून आत्महत्या करतो. रणगाडा चालवणारा स्वत:च तोफेसमोर उभा राहून लांब दोरीने खटका ओढून मरण्याची तयारी करतो.. इत्यादी इत्यादी.

‘‘या असल्या भयंकर विषयावर इतक्या मोठय़ा प्रमाणावर तू व्यंगचित्रं का काढतोस?’’ असं विचारल्यावर तो म्हणतो, ‘‘देवाने बायबलमध्ये सांगितलंय की, ‘मी तुम्हाला पर्याय देतो.. जीवन आणि मृत्यू. पण तुम्ही जीवनाची निवड करा!’ आणि अर्थातच मी व्यंगचित्रांतून आत्महत्यांना हास्यास्पद ठरवून जीवनाची निवड केली आहे, खरं की नाही?’’ असं विचित्र सत्य तो सहजी सांगून जातो!

मसेक्री सीने (रकठए)  हा केवळ फ्रान्समधलाच नव्हे, तर संपूर्ण युरोपमधला महत्त्वाचा व्यंगचित्रकार. त्याची व्यंगचित्रं बंडखोर किंवा ‘सिक’ म्हणावीत अशी असतात. सर्वसामान्य पारंपरिक समजुती, श्रद्धा यांना धक्का देणारी आणि इतकंच नव्हे तर वैचारिक तोडफोड करणारीही असतात. त्याचं खरं नाव मॉरिस सिनेट. पहिलं महायुद्ध संपल्यानंतरच्या महामंदीच्या काळातला त्याचा जन्म. त्यानंतर जर्मनीने फ्रान्स गिळंकृत केल्यानंतरच्या कालखंडात त्याचं शालेय शिक्षण झालं. या साऱ्याचा परिणाम त्याच्या व्यक्तिमत्त्वावर झाला. त्याने रंगभूषा, वेशभूषा, छपाईकाम वगैरेचं थोडंफार शिक्षण घेतलं आणि नंतर त्याने ते सगळं सोडून दिलं. चित्रकलेच्या बाबतीत घेतलेलं सगळं शिक्षण त्याने विसरून जायचं ठरवलं होतं. थोडे दिवस तो ऑर्केस्ट्रात गातही होता.

त्यानंतर त्याला एक दिवस मिलिटरीत भरती होण्याचं फर्मान निघालं. त्याची अत्यंत नावडती गोष्ट. तिटकारा होता त्याला मिलिटरीचा. त्याने त्याच्या वरिष्ठांना सॅल्यूट ठोकायला नकार दिला. त्यानंतर आठ महिने तो मिलिटरी तुरुंगात राहिला. (गंमत म्हणजे मिलिटरीत राहायचं आणि मिलिटरीला सहकार्य करायचे नाही, हे त्याच्या रक्तातच असावं. कारण त्याच्या वडलांनाही शिस्तभंगाच्या कारवाईवरून शिक्षा झाली होती.)

सीने विशीत असतानाच त्याची काही चित्रं ‘एल एक्स्प्रेस’ या मासिकात प्रसिद्ध झाली. त्यात सरकारवर कडाडून टीका होती. नंतर कालांतराने निव्वळ फ्रेंच राष्ट्राध्यक्षच नव्हे, तर इतरही सेलिब्रिटीज्ची झकास खिल्ली उडवणं, तसंच धर्म, परंपरा, मिलिटरी शिष्टाचार इत्यादी नाजूक विषयांवर जोरदार झटके आणि फटके देत त्याची व्यंगचित्रं गाजू लागली. त्यानं काढलेली अनेक चित्रं आपल्याला साठ-सत्तर वर्षांनंतरही धक्कादायक, अनैतिक, वाह्यत व आक्षेपार्ह वाटू शकतील. विशेषत: आपल्या देशातील भावनाप्रधान वंशाच्या लबाड लोकांना तर ती दंगली घडवण्यासाठी अतिउत्तम पात्रतेची वाटू शकतील!!

डार्विनच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्याने काही चित्रं काढली. त्यातून मिलिटरीवरचा त्याचा राग दिसतो. मिलिटरीमधल्या अधिकाऱ्याचं रूपांतर हळूहळू माकडात होतं, हे त्याचं भाष्य बोलकंआहे.

दुसऱ्या एका मालिकेत त्याने ‘मी राजकारणी व्हायला लायक आहे,’ असं म्हणत काही कारणं दिली होती. त्यापैकी काही महत्त्वाची कारणं म्हणजे- ‘सभागृहात भाषण ऐकतोय असं दाखवताना मी झोपू शकतो, विचार करतो असं दाखवू शकतो.. मी महिन्याला चार लाखांचा पगार मोजू  शकतो..’ अशी भन्नाट कारणं त्याने दिली होती.

एका व्यंगचित्रात त्याने ‘आयुष्यातला वय र्वष अठरा ते साडेअठरा हा काळ कम्युनिस्ट विचारांनी भारून जाण्याचा असतो. त्यानंतर मात्र तुम्ही सर्वसाधारण नागरिक होऊ शकता!’ असं गमतीशीर निरीक्षण नोंदवलं आहे.

पायी चालत जाताना प्रवासात एखाद्या वाहनाकडे लिफ्ट मागणं या प्रकारावर त्याने अनेक चित्रं काढली आहेत. त्यातली अनेक भेदक आणि जहाल आहेत. सोबतचं हे चित्र त्यातल्या त्यात सौम्य म्हणावं लागेल.

मॉडर्न आर्ट, आत्महत्या, टॉयलेट, बॉम्ब इत्यादी विषयांवर त्याने अक्षरश: धक्का देणारी व्यंगचित्रं काढली आहेत. सार्वजनिक कामासाठी जेव्हा काही लोक रस्तोरस्ती वर्गणी मागत फिरतात तेव्हा आपल्या देणगीचं नेमकं काय होणार आहे, हे त्याने नेमकेपणाने दाखवलं आहे. सीने याने काही नामांकित कंपन्यांसाठी विनोदाच्या छटा असलेल्या जाहिरातीही  केल्या. त्याने काही अ‍ॅनिमेशन फिल्म्सही केल्या. जागतिक फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याला पारितोषिकंही मिळाली. पण सीने कायम लक्षात राहतो तो त्याच्या विचित्र, विक्षिप्त आणि बंडखोर व्यंगचित्रांमुळेच!