13 August 2020

News Flash

निसर्गाचे रुणझुण गाणे

गाडी महामार्गावरून धावते आहे. दोन्ही बाजूला बदाम, संत्र्या-मोसंब्याच्या, पिस्त्याच्या फळबागा मैलोन् मैल पसरलेल्या.

| August 30, 2015 01:25 am

गाडी महामार्गावरून धावते आहे. दोन्ही बाजूला बदाम, संत्र्या-मोसंब्याच्या, पिस्त्याच्या फळबागा मैलोन् मैल पसरलेल्या. कॅलिफोर्नियातल्या दुष्काळाचे सावट पडून मधली काही मैलांची फळबाग वाळून गेलेली. मन विषण्ण करणारी.
हळूहळू उंच वनराजी डोकावू लागते. गाडी थांबते. खिडकीतून हसरा, प्रेमळ, खाकी गणवेशातला रेंजर आमचे प्रवेशपत्र पाहतो. आमचे स्वागत करतो. हातात नकाशा आणि वर्तमानपत्रासारखी दिसणारी मार्गदर्शिका देतो. आम्ही पुढे निघतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उंचच उंच सूचिपर्णी वृक्षांचे दाट जंगल. कुठे लहानशी सपाट कुरणाची हिरवाई.. बालकवींची आठवण देणाऱ्या निजबाळांसह बागडणाऱ्या सुंदर हरिणी हिरव्या कुरणी. मधेच बाजू्च्या टेकाडावरून दर्शन देणारी सवत्स अस्वलीण.गाडी विसावली. आम्ही पाऊलवाट धरली. ‘तो वारा फिरतो शीळ मुक्त घालतो’ अशी शंकर रामाणींच्या कवितेची आठवण देणारी! वाऱ्याच्या सुरात आता पाण्यानं ताल धरला आहे. वृक्षराजीच्या हिरव्या सतारी गुणगुणत डोलताहेत. त्यावर उन्हाचा कवडसा आणि पाण्याच्या तुषारांची इंद्रधून! समोर आहे योसेमिटीचा तीन-ताली प्रपात.. निसर्गाचं रुणझुणतं गाणं. हजारो वर्षे निसर्गाचे बदलते ऋतू या मैफलीत रंगून गेले आहेत. प्रत्येक बदलता ऋतू या संगीतवृंदाला नवनवीन चैतन्याचा साज चढवतो.योसेमिटी राष्ट्रीय उद्यान- योसेमिटी व्हॅली आणि ११०० चौरस मैलाचा हा अफाट परिसर म्हणजे साक्षात् चैतन्य आहे. दोन तासांपासून दोन हजार वर्षे आयुष्य असलेल्या फुले, पाने, झाडे, पक्षी, प्राणी, किडेमकोडे अशा अनेक सजीवांचं हे जीवनचरित्र आहे. कुणी त्याला म्हटलं आहे-kVibrant Tapestry of Life’!
काही हजार वर्षांपासून या अनाघ्रात परिसराला माणसांचा स्पर्श होऊ लागला. त्यांना ‘या वस्त्राते विणतो कोण’ असा प्रश्न कदाचित पडला असेल का? योसेमिटीच्या परिसरानेही येणाऱ्या माणसांना बदलले आहे. अवानिची ही अमेरिकन इंडियन (आपण ‘रेड इंडियन’ म्हणतो.) जमात इथे प्रथम आली असावी.१८०० च्या समारास युरोपियन्स येऊ लागले. त्यांनी घोडय़ावरून या प्रदेशातल्या वाटा शोधल्या, तशीच सौंदर्यस्थळेही! काही इथल्या भव्य, सुंदर कातळी पहाडांनी स्तिमित झाले. इथल्या जित्याजागत्या निसर्गाचं विराट रूप त्यांना दिपवून गेलं. त्यांनी लेखक आणि चित्रकारांना बोलावलं. वर्णनं चित्रित केली व जगाला या परिसराची ओळख करून दिली. कोणाचातरी गैरसमज झाला की ‘योसेमिटी’ हा शब्द म्हणजे रेड इंडियन जमातीचे नाव आहे. त्यानं या परिसराला नाव दिलं- ‘योसेमिटी’!काहीही असो- या परिसरात नवे लोक येऊ लागले. सर्वच सौंदर्यपूजक नव्हते. काही सुवर्णपूजक होते. त्यांना इथली वृक्षराजी म्हणजे सोन्याची खाण वाटली. जंगलतोड सुरू झाली. काहींना अक्षरश: सोन्याची खाण सापडेल असे वाटले! मग अनेक अर्थानी ‘गोल्ड रश’ सुरू झाला. याला वाली कोण? या मनुष्यधाडीपासून या सुंदर परिसराचं रक्षण कोणी करायचं? अनेक रक्षणवादी आणि निसर्गप्रेमींनी गाऱ्हाणं मांडले आणि १८६४ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी योसेमिटीची संपूर्ण दरी व भव्य परिसर कॅलिफरेनिया राज्याकडे सुपूर्द केला. त्याआधीच इथे एका हॉटेलच्या व्यवस्थापनासाठी नेमलेला तिशीतला जॉन म्यूर नावाचा तरुण या परिसराच्या प्रेमात पडला. खूप भटकला. नकाशे तयार केले. लेख लिहिले. राज्याच्या तुटपुंज्या पैशातून या परिसराचं संरक्षण करण्यापेक्षा अधिक काही महत्त्वाचं घडावं असं त्याला वाटलं. ही नुसती राष्ट्रीय संपत्ती नाही, तर तो राष्ट्रीय विसावा आहे असं त्याला वाटे. त्यानं भव्य स्वप्न पाहिलं की, जागोजागी अशी निसर्गमंदिरं.. राष्ट्रीय उद्यानं व्हावीत! त्याच्याच शब्दात सांगायचं तर- Thousands of tired, nerve shaken, over civilized people are beginning to find out that going to mountains is like going home. Wilderness is necessary.

अखेर या द्रष्टय़ाच्या प्रयत्नांना यश आले. १८९० साली बेंजामिन हॅरिसन या अमेरिकेच्या अध्यक्षांनी हा परिसर राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केला आणि कायद्याचे शिक्कामोर्तब केले. कॅलिफोर्निया राज्याकडून ते मध्यवर्ती सरकारकडे पुन्हा गेले. अमेरिकन संरक्षण खात्याने सैनिक नेमून त्याचे संरक्षण आणि प्रगती सुरू केली.

जॉन म्यूर इथेच थांबला नाही. त्याने नंतरचे अध्यक्ष थिओडर रुझवेल्ट यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना हे उद्यान पाहण्याचे निमंत्रण दिले. १९०३ मध्ये अध्यक्ष आले. त्यांनी तीन रात्री तंबूत राहून या परिसराचा परिसस्पर्श अनुभवला. जॉन म्यूर आणि रुझवेल्ट यांची भेट म्हणजे दोन निसर्गप्रेमी दार्शनिकांचीच भेट! त्यानंतर रुझवेल्ट यांनी अमेरिकन लोकांसमोर एका भाषणात सांगितले, National Parks are for the benefits and enjoyment of the people.’ आज अमेरिकेत सुमारे ४०० राष्ट्रीय उद्याने आहेत. एकटय़ा योसेमिटी राष्ट्रीय उद्यानाला चार दशलक्ष लोक दरवर्षी भेट देतात. १९१६ मध्ये सरकारने राष्ट्रीय उद्यान सेवा विभाग (National Park Service) सुरू केला. त्यात २० हजार पगारी आणि अनेक बिनपगारी स्वयंसेवक काम करतात. शिवाय अनेक स्वयंसेवी संस्था या राष्ट्रीय संपत्तीच्या जपणुकीसाठी झटून काम करतात. पगारी वा बिनपगारी असोत- प्रत्येक रेंजर प्रेमाने, आपलेपणाने मदत करतो. निसर्गसहली, मेळावे, मुलांसाठी माहितीचे कार्यक्रम, उद्यानांची स्वच्छता आणि व्यवस्था, अडकलेल्या लोकांची सुखरूप सुटका, छायाचित्रांचे छंदवर्ग, रात्रीच्या सुंदर नक्षत्रखचित आकाशाची ओळख..

शुभ्र तुरे माळून आल्या

निळ्या निळ्या लाटा

रानफुले लेवून सजल्या

या हिरव्या वाटा..

मंगेश पाडगावकरांची ही कविताच हे रेंजर उलगडून दाखवतात.

राष्ट्रीय उद्यान ही अमेरिकेची सर्वागसुंदर संकल्पना आहे. या कल्पनेनं अ‍ॅन्सेल अ‍ॅडम्ससारख्या जगप्रसिद्ध छायाचित्रकाराला वेड लावलं आणि त्यानं आपलं बहुतेक आयुष्य योसेमिटीला वाहिलं. लिंकन, हॅरिसन, रुझवेल्ट हे तीन अध्यक्ष आणि म्यूर, अ‍ॅडम्ससारख्या स्वप्न-शिल्पकारांच्या प्रयत्नांतून सर्वसामान्य माणसांसाठी उलगडलेलं हे भव्य, सुंदर, जिवंत, सदाबहार महावस्त्र!

अशा कित्येक आठवणी योसेमिटीच्या निसर्गाशी कायमचं नातं निर्माण करून गेल्या आहेत. यंदा त्याचा १२५ वा वाढदिवस. गेल्या वर्षी लिंकनने त्यास मान्यता दिल्याचं दीडशेवं र्वष होतं.

यापूर्वीही कितीतरी वेळा इथे येण्याचं भाग्य लाभलं. किती रानफुलं पाहिली. किती सुंदर जागी ट्रेकिंग केलं. आप्तांबरोबर ‘हाफ डोम’च्या साक्षीनं छायाचित्रे काढली. मित्रांबरोबर ग्लेशियर पॉइंटवर अंगतपंगत केली. कित्येकदा ‘मिरर लेक’मध्ये उमटलेली पर्वतांची प्रतिबिंबं पाहिली. अनेकदा आकाशात उमटलेल्या सप्तर्षीचं दर्शन घेतलं. आणि ‘एकच तारा समोर’ असं ध्रुवदर्शन करताना कुसुमाग्रज आठवले. समोरचा तीन-ताली योसेमिटी धबधबा पाहताना ही आठवणींची स्वरधून मनात पुन्हा उमटते आहे. ‘तुझ्या स्वरमेळात माझ्याही क्षीण सुराची एक तान’ असं म्हणणाऱ्या रवींद्रनाथांची कविता आठवते आहे.

vidyahardikar@gmail.com

 

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2015 1:25 am

Web Title: the nature song
Next Stories
1 अरबी नृत्याचा ब्लेन्ड
2 पॅरिसचा लेखक-कट्टा
3 केल्याने होत आहे रे..
Just Now!
X