नवीन टीव्ही घेतला. जुना नीट चालत होता. पण शेजारणीनं घेतला म्हणून आम्ही एल-ई-डी आणि एच-डी या अगम्य पदव्या प्राप्त केलेला टीव्ही आणला. बिनडोक मालिकाच पाहायच्या तर डबल ग्रॅज्युएट टीव्हीची गरजच काय मुळी? महिन्याभरातच नूतन खेळणं मौनात गेलं. दुकानदारानं कानावर हात ठेवले आणि तक्रार नोंदवण्यासाठीचा टेलिफोन नंबर दिला. मी तो नंबर फिरवला. प्रेस वन फॉर इंग्लिश, िहदी के लिये दो दबाए, मराठीसाठी तीन दाबा अशा संगणकीय सव्यापसव्यातून पार पडल्यावर मला अगम्य संगीत आणि असंबद्ध जाहिराती ऐकवल्या गेल्या. मध्येमध्ये मी रांगेत ५७ क्रमांकावर असून सुमारे २९ मिनिटे आणि २३ सेकंदांमध्ये माझी दखल घेतली जाईल अशा गोड बातम्याही दिल्या गेल्या. मी चिकाटी सोडली नाही. शेवटी एकदाचा जित्याजागत्या ललनेचा आवाज आला. मी त्या टीव्ही कंपनीच्या रिसेप्शनिस्टला रागीट स्वरात दरडावलं, ‘‘तुमच्या कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्याला लाइन द्या.’’
कंटाळलेल्या स्वरात ती पुटपुटली, ‘‘काय काम आहे, ते मला सांगा.’’
‘‘तुमच्या कंपनीनं बनवलेला टीव्ही मोडलाय. तो बदलून द्या. लग्गेच!’’
‘‘आमची कंपनी टीव्ही बनवत नाही.’’
‘‘असं कसं? हाच नंबर दुकानदारानं दिला.’’ मी नंबर वाचून दाखवला.
‘‘नंबर बरोबर आहे. त्या कंपनीनं ‘आफ्टर सेल्स सíव्हस’च्या कामाचं आमच्या फर्मकडे आउटसोìसग केलंय. हे आमचं कॉल सेंटर आहे. तुमचं नाव, पत्ता सांगा.’’
माझे आणि टीव्हीचे अगणित तपशील घेऊन तिनं एक लांबलचक आकडा परवचा म्हणतात तसा घडाघडा माझ्या कानात ओतला आणि येत्या ४८ तासांत कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं.
७२ तासांनंतर मी त्या आकडय़ाचा आधार घेऊन तक्रारीसंबंधीची तक्रार केली. तेव्हा समजलं की खुद्द दुरुस्तीचं काम एका तिसऱ्याच व्यावसायिकाला दिलं गेलंय. त्यानं शहराच्या निरनिराळ्या विभागातल्या छोटय़ा छोटय़ा टपऱ्यांमधल्या मेकॅनिकांना कमिशन बेसिसवर नेमलंय. त्यापकी एक देवदूत त्याच्या सवडीनुसार आमच्याकडे येऊ घातलाय.
तीन-चार टप्प्यांत होत असलेलं हे आउटसोìसगचं आउटसोìसग पाहून मी चक्रावून गेलो. म्हणजे या खो-खोच्या खेळात आमच्या टीव्हीच्या ख्यालीखुशालीची जबाबदारी नक्की कोणाची?
माझ्या एका सन्मित्राच्या घरी वॉटर फिल्टरचा विक्रेता आला. नवीन विकत घेतलात तर कंपनी एक हजार रुपयांना जुना घेईल असं त्यानं वचन दिलं. पण नव्याची होम डिलिव्हरी करायला आलेला माणूस जुना वॉटर फिल्टर घ्यायला तयार झाला नाही. चौकशीअंती समजलं की, ते दोघेही कंपनीचे पगारी नोकर नव्हते. मूळ कंपनीनं विक्रीचं काम एका फर्मला आउटसोर्स केलं होतं आणि डिलिव्हरीचं काम दुसऱ्या फर्मकडे सोपवलं होतं. विक्रीवाल्या फर्मनं कमिशन बेसिसवर विक्रेते नेमले होते. नूतन बकऱ्याकडून चेक मिळवला की, त्यांचं काम संपलं. सन्मित्रानं आता तोंडी वचनाच्या पूर्ततेसाठी नक्की कोणाचा कान पकडायचा?  
हल्ली आपल्या घरातल्या सर्व जीवनोपयोगी उपकरणांच्या बाबतीत हीच समस्या भेडसावायला लागलीय. तसं पाहू गेलं तर आउटसोìसग हा काही नवीन शोध नाही. ते पूर्वीही होत होतंच की. गार्डिनग, कॅन्टीन, सिक्युरिटी, क्लीिनग, ट्रान्सपोर्ट अशी कामं कंपनीचा मासिक पगारी नोकरवर्ग न नेमता परस्पर कंत्राट पद्धतीने करून घेतली जायची. पण दर १० -१५ वर्षांनी व्यवस्थापकीय संज्ञांचं नव्यानं बारसं करण्याची प्रथा असल्यानं सध्या या प्रकाराला आउटसोìसग हे हायफाय लेबल लागलंय.
हल्लीच एका व्यवस्थापन शिक्षणसंस्थेच्या एका विद्यार्थ्यांनं बनवलेला होम अप्लायन्सचा अफलातून बिझनेस प्लॅन पाहिला. थक्क झालो. प्लॅननुसार गुंतवणूक पाच कोटी रुपये. विक्री : पहिल्या वर्षी शंभर कोटी रुपये, पाचव्या वर्षी नऊशे कोटी. निव्वळ नफा दहा कोटी रुपयांपासून सुरुवात करून पाचव्या वर्षी अडीचशे कोटी रुपये. पाच कोटींच्या गुंतवणुकीवर अडीचशे कोटी म्हणजे पाच हजार टक्के नफा. माझं मस्तक गरगरलं.
तोंडी परीक्षेच्या वेळी मी विचारलं, ‘‘कारखाने किती आणि कुठे?’’
उत्तर आलं, ‘‘कारखाना प्लॅनमध्ये नाही.’’
‘‘मग उत्पादन कसं करणार?’’
‘‘उत्पादनाचं आउटसोìसग करणार.’’
‘‘कोणाकडे?’’
‘‘अर्थातच चीनकडे.’’
‘‘का? भारतातले तंत्रज्ञ गायब झाले?’’
‘‘त्यांचा काय उपयोग? चीनच्या भावात बनवू शकणार आहोत का आपण? पुढे-मागे चीनचाही भाव वाढला तर त्यांना झटक्यात कॅन्सल करून व्हिएतनाम, फिलिपाइन्स, कंबोडिया वगरेंचा फटाफट विचार करू.’’
‘‘मार्केटिंग आणि सेल्ससाठी किती लोक नेमणार, याचा उल्लेखच नाही.’’
‘‘कारण आम्ही मार्केटिंग आणि सेल्स टीम नेमणारच नाही.’’
‘‘मग ही उत्पादनं विकणार कोण?’’
‘‘अॅड एजन्सी जाहिराती बनवेल. मार्केटिंग एजन्सी विक्री करेल.’’
‘‘पर्सोनेल आणि ट्रेिनग विभागही नाही. तेपण आउटसोìसग करणार?’’
‘‘नाही. माणसंच नाहीत तर ह्य़ूमन रिसोस्रेस डिव्हलपमेंटची गरजच काय?’’
‘‘म्हणजे तुझ्या कंपनीत एकूण कर्मचारी किती?’’
‘‘दहापेक्षा कमी. पेपरलेस कंपनी. मी मॅनेजिंग डिरेक्टर. नंतर चीफ सेल्स को-ऑíडनेटर. तो भारतभर एजंट नेमेल आणि त्यांच्यामार्फत वितरणाची तगडी साखळी बनवेल. त्यानंतर चीफ प्रॉडक्शन को-ऑíडनेटर. तो जगातल्या निरनिराळ्या देशांत काँट्रॅक्ट मॅन्युफॅक्चर्स नेमेल आणि त्यांच्या कामावर देखरेख ठेवेल.’’
‘‘एकटय़ानं? सुपरमॅन नेमणार आहेस की काय?’’
‘‘नाही. प्रत्येक को-ऑíडनेटरला एक-दोन ताजे तडफदार एमबीए एक्झिक्युटिव्ह असिस्टंट असतील. मग, चीफ फायनान्स ऑफिसर. तो एक-दोन साहाय्यकांच्या मदतीनं अकाउण्ट्स, ऑडिट, लीगल, सेक्रेटेरिअल आणि बँकिंग बघेल. सगळ्यांनी दर दिवशी ऑफिसात आलंच पाहिजे असं बंधन नसेल. त्यामुळे जाण्यायेण्याचा वेळ वाचेल. आपापल्या घरी बसून ते इंटरनेटद्वारे कामांचा फडशा पाडतील. गरज पडेल तेव्हा व्हिडिओ कॉन्फरिन्सग करतील. त्यामुळे उपनगरातल्या छोटय़ाशा जागेत कंपनीचं रजिस्टर्ड ऑफिस असेल.’’
‘‘कहरच झाला. असली कसली कंपनी?’’
‘‘भविष्यकाळातली कंपनी आहे सर ही. आता जुन्या पद्धतीनं धंदा करून निभाव नाही लागायचा.’’
‘‘अरे पण तुम्ही स्वत: काहीच करणार नाही आहात. त्याचं काय?’’
‘‘काहीच कसं नाही? आम्ही ब्रॅण्ड मॅनेजमेंट करणार. शेवटी प्रॉडक्टला नाव आमचंच लागणार ना?’’
‘‘नशीब त्या प्रॉडक्टचं!’’
‘‘हे युग हायस्पीड इंटरनेट आणि ग्लोबल आउटसोìसगचंच असणार आहे सर. प्रॉडक्टचं उत्पादन करणं आणि दुखणीखुपणी निस्तरणं ही कटकटीची कामं आपणच करायचे दिवस इतिहासजमा झाले.’’
हे मात्र खरं. आता तर गर्भाशयाचंही आउटसोìसग केलं जातंय. स्वत:च्या हाडामांसाचे अंकुर जिथं परस्पर तिऱ्हाईताच्या उदरात वाढवून घेण्याची फॅशन बोकाळतेय, तिथं निर्जीव उपकरणांना कोण स्वहस्ते जन्म द्यायला बसलंय?

Realme P1 Realme P1 Pro martphones will be available for purchase with Bank offers discounts and more
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्ट; रिअलमीच्या ‘या’ बजेट फ्रेंडली फोनची आज पहिली विक्री, जाणून घ्या आकर्षक सवलती
WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Candidates Chess Tournament R Pragyanand success in defeating Alireza Firooza sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: प्रज्ञानंदने फिरूझाला रोखले! गुकेश-विदित, हम्पी-वैशालीमध्ये पहिल्या फेरीत बरोबरी
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबईकर शशांक ठरतोय पंजाब किंग्जचा तारणहार, जाणून घ्या त्याची आजवरची वाटचाल