News Flash

विचित्र ऋतुंच्या पुनरागमे..

अर्थशून्य ठरू शकणाऱ्या या परिषदेवर जगभरातील पर्यावरणजागरूक मुलांच्या आंदोलनाचे प्रचंड दडपण असणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

अतुल देऊळगावकर 

स्पेनमधील माद्रिद येथे २ ते १५ डिसेंबर या कालावधीत संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक हवामान परिषद होत आहे. या परिषदेत पर्यावरणासंबंधात विधीनिषेधशून्य वर्तणूक करणाऱ्या जगभरातील राष्ट्रप्रमुखांच्या आडमुठय़ा भूमिकेला तीव्र विरोध होईल, हे नक्की. परंतु त्यातून काही भरीव फलनिष्पत्ती होईल ही शक्यता कमीच आहे. अर्थशून्य ठरू शकणाऱ्या या परिषदेवर जगभरातील पर्यावरणजागरूक मुलांच्या आंदोलनाचे प्रचंड दडपण असणार आहे.

‘मुलांच्या रोजच्या आयुष्यात आपण किती बदल घडवला आहे यावरून इतिहास आपले मूल्यमापन करणार आहे.’ – नेल्सन मंडेला

विदुषी दुर्गाबाई भागवत आणि पं. कुमार गंधर्व यांनी एकाच काळात आपल्याला विलोभनीय ऋतुदर्शन घडवलं होतं. त्याची षष्टय़ब्दीपूर्ती होत असताना बेसूर झालेले ऋतुचक्र आपल्याला हताश करीत आहे. अगम्य व अनाकलनीय ऋतू पाहून दिङ्मूढ व्हावे आणि पुढच्या क्षणी त्याचे अतिरेकी रूप पाहून भीतीने गाळण उडावी अशी ऋतूंची दहशत आज जगभर पसरली आहे. २०१९ मधील हवामान संकटांचा ‘ऋतुसंहार’ अनुभवून समस्त जग हादरून गेले आहे. ‘हवामानबदल’ मागे पडून आता ‘हवामान आणीबाणी’ ही संज्ञा सर्रास रूढ झाली आहे. या संज्ञेचा वापर या वर्षांत शंभर पटीने वाढल्यामुळे ऑक्सफर्ड शब्दकोशाने २०१९ सालचा शब्दप्रयोग ‘हवामान आणीबाणी’ हा असल्याचे घोषित केले आहे.

२०१९ च्या आरंभी हिवाळ्यात राजस्थानमध्ये – १.१० सेल्सियसचा गारठा होता. महाबळेश्वरच्या वेण्णा सरोवराचे पाणी १०  सेल्सियसमध्ये गोठून गेले. पुणे, मुंबई ते विदर्भ, मराठवाडा सर्वत्र शीतलहरीमुळे तेथील तापमान नेहमीच्या सरासरीपेक्षा ६ ते ७० सेल्सियसने घसरले. या पावसाळ्यात अवर्षण व अतिवृष्टी, ठिकठिकाणी पूर यामुळे लोक मेटाकुटीला आले. जुलै-ऑगस्टमध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगलीत पाऊस कहर करत होता, त्याचवेळी मराठवाडा मात्र कोरडाठाक होता. ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीत अंदाजे एक लाख हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. त्यात महाराष्ट्रातील मालमत्ता व पिकांची सुमारे १.५ लाख कोटींची, तर देशातील २.५ लाख कोटींची हानी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरवर्षी पुरामुळे होणाऱ्या हानीमध्ये अब्जावधींची वाढ होत आहे. २०१९ च्या उन्हाळ्यातील ३ ते ४० सेल्सियसची वाढ पाहून केरळमधील भारतीय हवामान विभागाचे संचालक जी. संतोष हेसुद्धा चक्रावून गेले. जवळपासच्या ग्रामीण भागांच्या मानाने शहरांमध्ये ४ ते ५० सेल्सियसने तापमान अधिक जाणवते. शहरांमधील झाडी व तलाव कमी होणे, काँक्रिटीकरण वाढणे, प्रदूषण यामुळे शहरांत उष्णता टिकून राहते. या प्रक्रियेला ‘शहरातील उष्णतेच्या बेटाचा परिणाम’ (हीट आयलँड इफेक्ट) असे संबोधले जाते. तसंच वाढत्या तापमानामुळे अतिनील किरणांची (अल्ट्रा व्हायोलेट रेज) तीव्रता वाढू लागली आहे. उन्हाळ्यातील हा उष्णतेचा वणवा ५ ते ४० दिवस होरपळवत राहू शकतो. २०१९ च्या उन्हाळ्यात परभणी व चंद्रपूर येथे ४७ अंश, दिल्लीमध्ये ४८ अंश, अलाहाबादला ४८.९ अंश, तर चुरू (राजस्थान) येथे ५०.८ अंश सेल्सियसपर्यंत पारा चढला होता. ४५ अंश सेल्सियस तापमान तर सर्रास कुठेही जाणवत होते. पाकिस्तान, कुवेत व दुबई या वाळवंटी देशांत ५४ अंश सेल्सियसने काय अवस्था झाली असेल याची कल्पना करता येते. इंग्लंडच्या हवामान विभागाचे वैज्ञानिक निकोलस ख्रिसडिस यांनी इशारा दिला आहे की, ‘मागील शतकात तीव्र उष्णतेची लाट ही एक हजार वर्षांत एक अशी अतिशय दुर्मीळ बाब असे. २००३ पासून तिची वारंवारिता वाढत चालली आहे. २०३० नंतर उष्णतेची लाट ही नियमित असेल. यापुढे ६० अंश सेल्सियस तापमानाची तयारी आपल्याला ठेवावी लागेल.’

चक्रीवादळांचा वाढता वेग, त्यांची वारंवारिता व व्याप्ती धडकी भरवणारी आहे. एकंदरीत कुठलाच ऋतू व कुठलेही ठिकाण आता निर्धोक राहिलेले नाही. कधी, कुठे, कोणती आपत्ती काळरात्र घेऊन येईल याचा नेम नाही अशी धास्ती सर्वाना वाटते आहे. दुसरीकडे ‘हवामानबदलाचा सर्वाधिक धोका लहान मुलांनाच आहे’ असे जागतिक आरोग्य संघटना आकडेवारीनिशी वारंवार दाखवून देत आहे.

कैक वर्षांपासून वैज्ञानिक म्हणत.. ‘एखादी घटना सुटी पाहून तिला हवामानबदलाशी जोडता येणार नाही. काही वर्षांचा कल (ट्रेंड) लक्षात घेऊन निष्कर्ष काढावे.’ मागील दहा वर्षांत संगणक व सदृशीकरण (सिम्युलेशन) यामुळे घटनांचे मूळ शोधण्यात (अ‍ॅट्रिब्युशन) खूप प्रगती झाली आहे. जगातील हवामानशास्त्रज्ञ एकत्र येऊन जगातील हवामानविषयक घटनांचा सखोल अभ्यास व विश्लेषण करतात. त्यांनी स्थापलेल्या ‘वर्ल्ड वेदर अ‍ॅट्रिब्युशन’ या संस्थेने ‘वाढते कर्ब उत्सर्जन हेच २०१८ ची उष्णतेची लाट तसेच २०१७ मधील अमेरिकेतील हार्वे चक्रीवादळ यामागील कारण आहे, कर्ब उत्सर्जन आणि हवामानबदल यांचा थेट संबंध आहे,’ असे ठामपणे सांगितले आहे. वृत्तमूळ विज्ञानाच्या (अ‍ॅट्रिब्युशन सायन्स) प्रगतीमुळे व त्यातील संशोधनामुळे हवामानबदल हेच अवर्षण, अतिवृष्टी, ढगफुटी, चक्रीवादळ या घटनांमागील कारण आहे हे सिद्ध होत आहे. म्हणूनच वैज्ञानिक ‘भविष्य यापेक्षाही भयंकर आहे. सागरकिनाऱ्यांवरील भूभागांना जलसमाधी मिळण्याचा काळ समोर उभा आहे..’ अशा हाका देत आहेत. तरीही कोणतेही सरकार त्यांना यित्कचित किंमत न देता कर्ब उत्सर्जन आहे तसंच चालू ठेवत आलेले आहेत. याबद्दलच जगातील मुले संताप व्यक्त करीत आहेत. २०१८ व २०१९ स्मरणात राहील ते जगातील मुलांच्या सक्रियतेमुळे! जगभरातील मुलांच्या सक्रियतेमुळे ‘पर्यावरण संकट’ हा विषय अक्षरश: ऐरणीवर आला आहे. आजवर जगभरातील हवामान शास्त्रज्ञ खूप झटत असूनही त्यांच्या प्रयत्नांना यश येत नव्हते. पर्यावरण हा विषयच कुणाला आपला वा जवळचा वाटत नव्हता. आता मात्र मेट्रो की आरे?, पाणथळ जागांवरील अतिक्रमण, आपत्तींची पेरणी व महापूर असे विषय सातत्याने चर्चेत येत आहेत. मुलांना, ‘निसर्ग धोक्यात आला आहे. त्यामुळे आपले भवितव्यच टांगणीला लागले आहे’ ही जाणीव झाली आहे. जगातील मुलांचा त्यांच्या सरकारवर व नेत्यांवर अजिबात विश्वास नाही. भारत, पाकिस्तान, ब्राझील, नॉर्वे, नेदरलँड, बेल्जियम, आर्यलड, कॅनडा अशा १०० देशांतील मुलांनी यासंबंधात न्यायालयांत खटले दाखल केले आहेत. त्यांच्या सर्व अपेक्षा व आशा आता न्यायालयावरच टिकून आहेत.

गणितज्ञ व हवामान शास्त्रज्ञ एडवर्ड लॉरेन्झ यांनी १९६३ साली ‘फुलपाखराने एका ठिकाणी पंख फडफडवले तर जगाच्या दुसऱ्या टोकाला चक्रीवादळ येऊ शकतं’ असा सिद्धांत मांडला होता. स्वीडनमधील एक चिमुकली मुलगी ‘हवामानासाठी शाळा बंद’ असं लिहून त्यांच्या संसदेबाहेर धरणे देऊन बसली तो दिवस होता- २० ऑगस्ट २०१८! केवळ १३ महिन्यांत- म्हणजे २० सप्टेंबर  २०१९ रोजी तिच्या साथीला जगातील सात खंडांतील १६३ देशांत ५००० ठिकाणी सुमारे ८० लाखांहून अधिक मुलांनी जागतिक बंद यशस्वी करून दाखवला. विलक्षण, अद्भुत, अभूतपूर्व अशा कुठल्याही विशेषणांत न सामावणारी ही घटना आहे. पालक, बहीण वा मैत्रीण कोणीही सोबतीला येण्यास तयार नाही, तिकडे शाळा चुकवणे हा गुन्हा असल्यामुळे शिक्षा होऊ शकते, अशी स्थिती असतानाही नवव्या इयत्तेत शिकणाऱ्या ग्रेटा थुनबर्गने आपल्या देशाच्या संसदेबाहेर ठाण मांडून बसण्याचं धाडस केलं होतं. त्यानंतर मिळालेल्या पाठिंब्यामुळे ती मुलांचे ‘हवामानासाठी शाळा बंद आंदोलन’ सुरू करते आणि पाहता पाहता हे आंदोलन जगभर पसरतं. छोटय़ा मुलीच्या या एका छोटय़ा कृतीमुळे लक्षावधी मुलांना व तरुणांना स्फूर्ती मिळाली आणि भवितव्याच्या धास्तीने हादरलेली शाळकरी मुले आणि तरुण लाखोंच्या संख्येने हवामानविरोधी लढय़ात उतरू लागले. त्यांना जगातील आघाडीचे शास्त्रज्ञ पाठिंबा देऊ लागले. ही मुले ‘आमचं नाही, विज्ञानाचं ऐका आणि कर्ब उत्सर्जन थांबवून जगाला वाचवा,’ असं त्यांच्या नेत्यांना सांगू लागली तेव्हा लॉरेन्झ यांचा सिद्धांत नव्याने सिद्ध झाल्याची खात्री पटते.

२०१९ मधील बालकांचे आंदोलन व त्याला मिळत असलेले पाठबळ यामुळे अनेक नवनवीन सर्जनशील कल्पना बहरू लागल्या. प्रदूषकांना प्रदूषण वाढविण्यासाठी नवे मार्ग दिसू लागले तसेच संशोधकांना प्रदूषकशाही उघडकीस आणण्यासाठी नवीन दिशा दिसून लागल्या. मुलांचा ‘भविष्यासाठी शुक्रवार’ हा निर्धार ऐकून जर्मनी, ऑस्ट्रिया व स्वित्र्झलड या देशांमधील वैज्ञानिकांनी ‘भविष्यासाठी वैज्ञानिक’, तर कलावंतांनी ‘भविष्यासाठी कलावंत’ असे गट स्थापन केले आहेत. या आंदोलनात शिक्षक, प्राध्यापक व कामगारसुद्धा मुलांसोबत उतरले आहेत. जगात प्रदूषण करणाऱ्या कोळसा व तेल कंपन्यांचे उत्पादन भरघोस व्हावे याकरता तंत्रज्ञान पुरविण्यासाठी ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘गूगल’, ‘अ‍ॅमेझॉन’ या कंपन्यांचे करार झाले आहेत. त्यावरून या कंपन्यांमधील कर्मचारी त्यांच्या व्यवस्थापनाच्या विरोधात उभे ठाकले. परिणामी ‘अ‍ॅमेझॉन’चे मुख्याधिकारी जेफ बेझोस यांनी जागतिक बंदच्या एक दिवस आधी ‘हवामान रक्षणासाठी वचनबद्ध’ असल्याचे जाहीर केले. त्यांनी वृक्ष लागवड व संवर्धन यासाठी दहा कोटी डॉलर देणगीची घोषणा केली. तरीही ‘अ‍ॅमेझॉन’चे १५०० कर्मचारी, ‘गूगल’ व ‘ट्विटर’चे कर्मचारी मुलांना साथ देण्यासाठी बंदमध्ये सहभागी झाले होते. काही कल्पक मुलांनी ‘नको ते अ‍ॅमेझॉन जळत आहे’ असा फलक रंगवून या आंदोलनात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

२४  सप्टेंबर २०१९ रोजी जगातील बालकांच्या वतीने १६ बालकांनी संयुक्त राष्ट्रसंघाकडे धाव घेतली. २० नोव्हेंबर १९८९ ला न्यूयॉर्कमधील परिषदेमध्ये १४० राष्ट्रांनी बालकांचे हक्क मंजूर केले होते. त्यानुसार जगातील प्रत्येक बालकास कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक हक्क मिळाले पाहिजेत, यासंबंधात कुठल्याही बालकाची तक्रार आल्यास तिचे निवारण करण्यासाठी तटस्थ तज्ज्ञांच्या विशेष समितीने संबंधित राष्ट्रामध्ये जाऊन चौकशी करावी असे त्यात नमूद करण्यात आले आहे. ३० वर्षांपूर्वी बहाल करण्यात आलेल्या या हक्कांची जाणीव १६ बालकांनी करून दिली. पाच खंडांतील १२ राष्ट्रांतून हवामानबदलाचे चटके सहन करणारी ही बालके संपूर्ण जगातील बालकांचे प्रतिनिधित्व करीत होती. ८ ते १७ वर्षे वयोगटातील या पथकात डेहराडूनमधील ११ वर्षांची रिधिमा पांडे, अमेरिकेची अलेक्झांड्रिया व्हिलसेनॉर, मार्शल बेटाचा रॅन्टॉन अ‍ॅन्जैन ही बालके होती. ‘भविष्यासाठी शुक्रवार’ या जागतिक आंदोलनातील मुलांचा पुढाकार वाढत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेष शिखर परिषदेत जगातील नेत्यांना पाहून ग्रेटा संतापून म्हणाली, ‘आमच्या नजरा तुमच्यावर रोखलेल्या आहेत.’ तिचा पारा चढतच गेला आणि ती गरजली, ‘मी इथे असणेच चुकीचे आहे. मी समुद्राच्या पलीकडे शाळेत असायला पाहिजे. तुम्ही आम्हा तरुणांना आशा दाखवता? तुमची हिंमत होतेच कशी? तुम्ही माझं बालपण, माझी स्वप्नं हिरावून घेतली आहेत. तरीही मी नशीबवान आहे. मात्र, असंख्य लोकांना अनंत यातना सहन कराव्या लागत आहेत. कित्येक लोक मरत आहेत. संपूर्ण पर्यावरणीय यंत्रणा (इकोसिस्टम) कोसळून पडत आहे.’ भावनोत्कटतेने तिचा आवाज कंप पावू लागला.. ‘मानवजात व जीवसृष्टी लुप्त होण्याच्या मार्गावर असताना तुम्ही पसा व सर्वकाळ होणाऱ्या आर्थिक विकासाच्या परीकथा सांगत बसता. तुमची हिंमत होतेच कशी?’ ग्रेटाची तोफ धडधडतच होती, ‘तुम्हाला तातडी व आणीबाणी समजते असं तुम्ही म्हणता. माझा त्यावर अजिबात विश्वास नाही. तीस वर्षांपेक्षा अधिक काळ झाला असेल, विज्ञान हे तेव्हापासूनच स्फटिकासारखं स्वच्छपणे सारं काही सांगत आहे. तुम्ही त्याकडे सातत्यानं ढुंकूनही न पाहण्याचंच काम केलं. कित्येक पावलं उचलता आली असती; परंतु काहीही न करता तुम्ही खूप काही करत असल्याचं सांगत आलात. तुम्हाला परिस्थिती समजूनही तुम्ही कृती करत नाही आहात. हे दुष्टपणाचे ठरेल. आणि त्यावर विश्वास ठेवायला मी तयार नाही. येत्या दहा वर्षांत कर्ब उत्सर्जन निम्म्याने कमी केलं तर जगाची तापमानवाढ ही १.५ अंश सेल्सियसने होण्याची शक्यता ५० टक्के आहे. त्यामुळे होणारे परिणाम हे अपरिवर्तनीय व मानवी नियंत्रणापलीकडचे असतील. वाचण्याची शक्यताच ५० टक्के- हे तुम्हाला स्वीकारार्ह असेल, परंतु आम्हाला हे अजिबात मान्य नाही. तुम्ही पोक्त व पक्व नाही आहात. तुम्ही आम्हाला फसवत आहात आणि आता तुमची फसवणूक तरुणांच्या लक्षात येऊ लागली आहे. आम्ही हे सहन करणार नाही. पुढील सर्व पिढय़ांच्या नजरा तुमच्यावर रोखलेल्या आहेत. तुम्ही आताही आमची फसवणूक करणंच निवडणार असाल तर आम्ही तुम्हाला माफ करणार नाही. यापुढे आम्ही हे प्रकार चालू देणार नाही. आता आणि इथेच सोक्षमोक्ष लागला पाहिजे. जग जागं झालं आहे आणि बदल होत आहे.. तुम्हाला आवडो किंवा न आवडो. धन्यवाद.’

ग्रेटाने अवघ्या ४९५ शब्दांत व्यक्त केलेल्या या वक्तव्याचा संपूर्ण जगावर विलक्षण परिणाम झाला. कोटय़वधी लोकांनी तिचे भाषण ऐकले व इतरांना पाठवले. तिच्या या छोटेखानी व्याख्यानाची जगातील अग्रगण्य दैनिकांनी अग्रलेखांतून दखल घेतली.

संयुक्त राष्ट्रसंघातील संबोधनातून सत्तेच्या संघर्षांतील महत्त्वाचा मुद्दा  हवामानबदल हाच आहे, हे जगाला दाखवून देण्याची लक्षणीय कामगिरी ग्रेटाने केली. तिने तिथे जमलेल्या सत्तांना थेट आव्हान दिले. तिने सोप्या शब्दांत हवामानबदलावर कृती करण्याची मागणी करणारे ‘आम्ही’ आणि त्यास नकार देणारे ‘तुम्ही’ अशी मांडणी केली. प्रदूषणकत्रे आणि प्रदूषणग्रस्त, पर्यावरणमस्त व पर्यावरणत्रस्त ही सीमारेषा तयार केली. त्यातून तिने कोटय़वधी लोकांच्या भावना पोहोचवत जगभरातील सत्तांना आव्हान दिले आणि जनसामान्यांमध्ये चेतना निर्माण केली.  ‘आपलं घर जळत आहे’ ही मुलांची हाक आता अनेक संवेदनशील मनांना भिडत आहे. त्यातून युरोप, अमेरिका, इंग्लंडमध्ये प्रदूषण रोखण्याच्या असंख्य नव्या कल्पना निघत आहेत. ‘द गार्डियन’च्या प्रमुख संपादक कॅथरिन विनर यांनी विशेष अग्रलेखातून ‘गार्डियनची शपथ’ जाहीर केली. त्यात- ‘‘या काळावरील सर्वात भयंकर संकट हे हवामानाचे आहे. मानवजात व पृथ्वी वाचवण्यासाठी शासन, उद्योग व व्यक्ती या सर्वानीच कर्ब उत्सर्जन कमी करणे निकडीचे आहे. आज आम्ही शपथपूर्वक सांगू इच्छितो- वैज्ञानिक सत्यांवर आधारलेली आमची पर्यावरण पत्रकारिता आम्ही अधिकाधिक सखोल व व्यापक करू. आमचे वार्ताहर, लेखक व संपादक जगभर हिंडून हवामानबदलाची कारणे व व्याप्ती वाचकांपर्यंत पोहोचवतील. १८० राष्ट्रांतील चोखंदळ वाचकांनी ‘द गार्डियन’च्या या कार्यास आर्थिक पाठबळही दिले आहे. त्या बळावरच आम्हाला विशेष वार्ताकन व शोधपत्रकारिता शक्य होत आहे. त्यामुळेच आम्ही जगातील प्रदूषक कंपन्यांच्या कारवाया जाहीर केल्या आहेत. ग्रेटा थुनबर्ग म्हणते त्याप्रमाणे हा इतिहासातील अतिशय बिकट व महत्त्वपूर्ण काळ असल्यामुळे आपण डोळ्यात तेल घालून जागे राहणे आवश्यक आहे. मला हे पूर्णपणे मान्य आहे. हवामानाची आणीबाणी असलेल्या काळात स्वतंत्र, निष्पक्ष व निर्भीड पत्रकारिता आवश्यक आहे. ही भूमिका आम्ही चोख पार पाडत राहू.’’

सहसा पर्यावरणविषयक बातम्या वा लेख हे केवळ आपत्ती वा परिषदेच्या निमित्ताने असे प्रासंगिक असत. मागील वर्षांत बी. बी. सी, द इंडिपेंडंट, न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, लॉसएंजेलीस टाइम्स या आघाडीच्या वृत्तपत्रांनी मुलांच्या आंदोलनांना भरभरून पाठिंबा दिला आणि हवामानबदलविषयक बातम्या व विश्लेषणास प्राधान्य देणे सुरू केले आहे.

या काळातच अमेरिकेतील ‘क्लायमेट अकौंटेबिलिटी इन्स्टिटय़ूट’ने जगातील प्रदूषणाचे सखोल संशोधन केले. रिचर्ड हीडी हे या स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख संशोधक दहा वर्षांपासून कर्ब उत्सर्जनाचा सखोल मागोवा घेत असल्यामुळे त्यांना ‘कार्बन लेखापाल’ अशी उपाधी लाभली आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या ‘प्रदूषकांचा प्रकल्प’ या अहवालाने जगभर प्रचंड खळबळ उडवून दिली आहे.

१९६५ सालीच जीवाश्म इंधन (कोळसा व तेल) जाळण्याचा जगाच्या तापमानावर काय परिणाम होईल याचा पर्यावरणीय अहवाल अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांच्याकडे त्यांनी सादर केला होता. ‘प्रदूषकांचा प्रकल्प’ अहवालात ‘१९६५ ते २०१७ या काळात जगातील २० प्रमुख कंपन्यांमुळे कर्ब-वायू व मिथेन यांची ४८० अब्ज टनांनी भर पडली. जगातील प्रदूषणाच्या ३५ टक्के वाटा हा कोळसा, तेल व वायू उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचा आहे. राजकीय नेते व या कंपन्यांचे मालक यांना प्रदूषणामुळे होणाऱ्या हानीची पूर्ण माहिती होती. तरीही केवळ नफ्यासाठी ते संगनमताने कर्ब उत्सर्जन वाढवत राहिले’ असे म्हटले आहे. रिचर्ड हीडी म्हणतात, ‘कर्ब उत्सर्जनामुळे तापमानवाढ व हवामानबदल होणार आहे याची स्पष्ट कल्पना ‘अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिटय़ूट’ला होती. त्यांना कर्ब उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न करता येणे शक्य होते; परंतु त्यांनी नफा वाढवण्यासाठी जीवाश्म इंधनांचे उत्पादन वाढवत नेले. जागतिक तापमानवाढीच्या निम्मी वाढ ही ९० कंपन्यांनी केलेल्या कर्ब व मिथेन वायूंच्या उत्सर्जनामुळे झाली आहे. हवामानबदलास या कंपन्याच जबाबदार आहेत. या कंपन्यांमुळेच अनेक वर्षे कर्ब उत्सर्ग रोखण्याची उद्दिष्टे व सर्व योजना अयशस्वी होत आहेत. कर्ब उत्सर्जनास सामान्य माणसांना जबाबदार ठरवण्याचे कारस्थान या कंपन्यांचेच आहे. या गुन्हेगार कंपन्यांनीच वास्तवावर असत्यांचे धूम्रावरण (स्मोकस्क्रीन) निर्माण केले होते. या अहवालामुळे प्रखर सत्य समोर आले आहे.’’ विख्यात हवामान शास्त्रज्ञ मायकेल मान म्हणतात, ‘‘नफ्यांचे विक्रम करण्यासाठी मूठभर कंपन्यांच्या टोळीने ७५० कोटी जनतेला वेठीस धरले आहे. त्यामुळे हा ग्रह नासून गेला असून हवामान आणीबाणी आली आहे. यापुढे प्रदूषकांच्या या कृत्यांना आळा बसवला नाही तर ते आपले भव्य अपयश असेल.’’

सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्यात अनेक कंपन्यांची नावे सहजगत्या येत असतात. प्रदूषक कंपन्यांची नावेदेखील अशी अगदी घरगुती झाली आहेत. या कंपन्याच पर्यावरणस्नेही व पर्यावरण जबाबदार असल्याचा देखावा निर्माण करण्यासाठी आणि त्याचवेळी हवामानबदल रोखण्यासाठीच्या योजना थांबविण्यासाठी दरवर्षी अब्जावधी रुपये खर्ची पाडत असतात. जागतिक हवामान परिषदेत राष्ट्रांच्या कर्ब उत्सर्जनाविषयी चर्चा होत असते. प्रत्यक्ष कर्ब उत्सर्जन हे सामान्य जनता वा कंपन्यांकडून होत असले तरी त्यास जीवाश्म इंधन कंपन्याच जबाबदार आहेत. जागतिक परिषदेमधील चर्चेचा केंद्रिबदू हा सामान्य जनतेकडून वैयक्तिक कंपन्या असा होऊन जीवाश्म इंधन कंपन्यांना प्रदूषणास जबाबदार धरले जावे याकरता ‘क्लायमेट अकौंटेबिलिटी इन्स्टिटय़ूट’, स्वयंसेवी संघटना आणि वैज्ञानिक कसून प्रयत्न करीत आहेत.

वैज्ञानिकांनी प्रदूषकांच्या कृष्णकृत्यांची जंत्री देण्यास सुरुवात केल्याने समाजाच्या सर्व स्तरांत त्याचे पडसाद उमटू लागले. यात कलावंत अग्रभागी होते. प्रदूषण करणाऱ्या कंपन्या अतिशय सढळ हाताने संगीताचे जलसे, चित्रप्रदर्शने, नाटक व चित्रपटांचे उत्सव यांना देणग्या देतात. त्यांचे प्रायोजकत्व स्वीकारतात. ‘बी. पी.’ ही पेट्रोलियम कंपनी रॉयल शेक्सपीअर कंपनीला अनेक वर्षांपासून आर्थिक साहाय्य करीत असे. रॉयल शेक्सपीअर कंपनीच्या कार्यकारी संचालक कॅथरीन मेलॉन यांनी ‘आम्ही व तरुण यांमधील बी. पी.चे प्रायोजकत्व हा अडथळा असल्याचे तरुण स्पष्टपणे सांगत आहेत. तरुणांच्या मागण्या व आकांक्षांकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. हवामान संकटांच्या काळात बी. पी.चे प्रायोजकत्व रद्द करणे आवश्यकच आहे,’ असे सांगितले. पाठोपाठ ‘नॅशनल थिएटर’ने त्यांचे ‘शेल’ कंपनीचे दीर्घकालीन आर्थिक पाठबळ नाकारले. नॅशनल थिएटरचे कलावंत बालकांच्या आंदोलनास पाठिंबा व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर आले. प्रदूषकांच्या प्रतिष्ठेला हादरे बसू लागले. त्यांना अस्पृश्यासारखी वागणूक मिळू लागली आहे.

या पाश्र्वभूमीवर स्पेनमधील माद्रिद येथे २ ते १५ डिसेंबर या कालावधीत संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक हवामान परिषद (कॉन्फरन्स ऑफ पार्टीज २५) होत आहे. पूर्वनियोजनानुसार ही परिषद ब्राझीलमध्ये भरवली जाणार होती; परंतु अध्यक्ष जैर बाल्सॅनेरो यांनी आर्थिक तणावांमुळे नकार दिला. नंतर ती चिलीची राजधानी सॅनटिएगो येथे भरवली जाणार होती; परंतु जनतेचा चिली सरकारच्या विरोधातील क्रोध कमी होत नसल्यामुळे चिलीनेही माघार घेतली. अ‍ॅमेझॉन, कॅलिफोर्नियामधील अरण्य-वणव्यांवर घनघोर चर्चा होऊ घातलेल्या या परिषदेत २०५० पर्यंत कर्ब उत्सर्जन शून्य करण्याचा कृती आराखडा करण्यासाठी सर्व राष्ट्रप्रमुखांवर  दबाव असेल. बुडण्याच्या जवळ आलेली बेटे पुन्हा आक्रंदन करतील. गरीब देश भरपाईचा हट्ट धरतील. दुसरीकडे ‘शून्य कर्ब उत्सर्जन मोहिमेचे युरोपीय महासंघाने नेतृत्व करावे’ यासाठी जर्मनी प्रयत्न करीत आहे. परिषदेत कर्ब उत्सर्जनास जबाबदार तेल कंपन्यांवर थेट हल्ले चढवून भरघोस भरपाई मागितली जाईल. प्रदूषकांना कार्बन कर लागू करण्यासाठी आग्रह धरला जाईल. मागील महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘‘जगातील प्रदूषणास चीन, रशिया व भारत हेच जबाबदार आहेत!’’ असा आरोप करून ‘पॅरिस करारातून अमेरिका बाहेर पडत आहे’ अशी घोषणा केली आहे. प्रदूषण हेच भूषण मानणाऱ्या ट्रम्प यांच्या साथीला ब्राझील, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांसारखे देश आहेत. अर्थशून्य होऊ शकणाऱ्या याही परिषदेवर मुलांच्या आंदोलनाचे प्रचंड दडपण असणार आहे. ग्रेटा जहाजाने प्रवास करीत अमेरिकेहून स्पेनला पोहोचली आहे. त्यावेळी पुन्हा एकदा जगभरातील लाखो मुले विद्यालय बंद ठेवणार आहेत. आता मुलांच्या साथीला समाजातील अनेक घटक आले असून त्यांची व्यूहरचनादेखील वेगळी असणार आहे.

‘विचित्र ऋतुंच्या पुनरागमे’ (कवी बा. सी. मर्ढेकरांची क्षमा मागून) सगळे हतबल झाले असले तरीही मुलांच्या कृतिवादामुळे  ‘एकेक पान जुळवाया’ ही प्रक्रिया आकार घेत आहे. जग चालवणाऱ्या प्रदूषकशाहीच्या विरोधातील हा लढा अतिशय कठीण आहे. तरीही त्यासाठी राजी होणाऱ्या लोकांमध्ये वाढ होत आहे. एका तरंगामुळे अनेक तरंग पसरत आहेत. त्यामुळे ‘हवामानबदल ही आपण हरत चाललेली स्पर्धा आहे; परंतु आपण ती जिंकूही शकतो..’ ही निर्माण झालेली आशा घेऊनच २०२० चे स्वागत करावे लागेल.

धनाढय़ांची खाण व घाण

जगातील सर्वाधिक धनवंतांच्या यादीतील दुसऱ्या क्रमांकाचे कुबेर व ‘मायक्रोसॉफ्ट’चे मालक बिल गेट्स यांनी २०१७ साली त्यांच्या खासगी विमानाच्या ५९ फेऱ्यांतून ३,१२,००० कि. मी. प्रवास केला. त्यातून १६०० टन कार्बन डाय-ऑक्साइड हवेत सोडला गेला. (जगातील विमानप्रवास करणाऱ्यांचे कर्ब उत्सर्जन हे दरवर्षी पाच टन एवढे आहे.) हवाईप्रवासाचे विश्लेषक ब्रायन फॉले म्हणतात, ‘‘जगातील अतिश्रीमंतांच्या प्रवासामुळे सुमारे दहापट अधिक कर्ब उत्सर्जन होते. काही विमानांमुळे ते ४० पट होते. परंतु लक्ष्मीपुत्रांना त्याची अजिबात फिकीर नाही.’’  २०१९ साली जगातील लक्ष्मीधरांनी ६९० नवीन विमाने खरेदी करण्याची आज्ञापत्रे दिली आहेत. ती पूर्ण करण्यास २०२२ साल उजाडणार आहे. तेव्हा आकाशातील खासगी विमानांची संख्या ७६०० इतकी होणार आहे. कॅनडामधील ‘बोम्बार्डियर’ या विमानांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने ‘ग्लोबल ७५००’ नामे जगातील सर्वात मोठे विमान तयार केले आहे. कोणत्याही सम्राटास जमिनीवर लाभणारी सर्व सुखे आकाशात देणारा हा भव्य हवाई महाल आहे. चार भलीमोठी दालने, राजेशाही पलंग मावू शकेल असे शयनगृह, इच्छित पदार्थ तत्काळ हजर करून देणारा सुसज्ज मुदपाकखाना असा शाही बेत आहे. असा ‘उडता महाल ‘मिरवण्यासाठी ‘कोण आधी?’ याची स्पर्धा सुरू झाली आहे.

atul.deulgaonkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2019 4:13 am

Web Title: world climate conference environmental childrens movement abn 97
Next Stories
1 जगणे.. जपणे.. : आमु वाघान् पिला रं आमु आदिवासी..
2 पर्यावरणाचे अर्थकारण समजून घ्यायला हवे!
3 दखल : अनोख्या वारीची कथा
Just Now!
X