अपनी कहानी छोड जा..

‘‘.. तुम्ही गेलात तेव्हा ५६ वर्षांचे होतात. मला वाटत होतं, मीही तेवढय़ा वर्षांचा झाल्यावर मरेन.

मृत्यूच्या डोळ्यांत डोळे खुपसून त्याला निडरपणे भिडणारे जयंत पवार हे एक अत्यंत तरल, संवेदनशील आणि सार्वकालिक लेखक होते. त्यांच्या जाण्याने आपण किती आणि काय काय गमावले याचा हिशेब येणाऱ्या दिवसांत जो-तो आपापल्या परीने मांडत राहीलच. तथापि काळावर आपली अमीट मुद्रा उमटवणारा हा लेखक कालातीत होता, हे निर्विवाद.

आसाराम लोमटे

‘‘.. तुम्ही गेलात तेव्हा ५६ वर्षांचे होतात. मला वाटत होतं, मीही तेवढय़ा वर्षांचा झाल्यावर मरेन. पण असं झालं नाही. मी थोडा पुढे निघून आलो. तुमच्यासोबतची १७ वर्षे आणि तुमच्या अभावातली ४३ वर्षे असा मी तुमच्या सोबतीने चालतो आहे. तुम्ही थकला होता, तसा मीही थकलो आहे..’’ स्वत:च्या वडिलांविषयी प्राणांतिक उत्कट असा स्मरणलेख गेल्या वर्षी जयंत पवारांनी लिहिला होता.. त्यातलं हे अवतरण आहे. ‘मोरी नींद नसानी होय’ या नव्या कथासंग्रहाच्या शेवटी हा लेख आहे. तो वाचताना जराही विचलित न होता डोळे अक्षरांवरून आवेगाने धावत असतात. कितीदा तरी आपल्याच श्वासांची थरथर जाणवते. लेखक मात्र कुठेही भावविवश होत नाही. तो आपल्याला खेचत राहतो. ही ताकद जयंत पवारांच्या भाषेतच होती. हा लेखक सतत धारेवर चालत राहिला.

कथा या वाङ्मयप्रकाराकडे अतिशय डोळस आणि जबाबदारीने पाहत त्यांनी नवनव्या कथनशक्यता शोधल्या. या वाङ्मयप्रकाराचे सामथ्र्य आणि मर्यादा जोखल्या. कथा हा खास भारतीय वाङ्मयप्रकार आहे. डोळ्यांना न दिसणाऱ्या वास्तवापेक्षाही एक वेगळी दुनिया असते आणि तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, हा ध्यास या लेखकाने कायम घेतला होता. प्रत्यक्षातल्या वास्तवाचं आकलन करून घेण्यात अनेक अडथळे येत आहेत, अशावेळी अद्भुताच्या आधारे गोष्टी रचण्याचा मार्ग या लेखकाने धुंडाळला आणि त्यात नित्य नव्या शक्यता आजमावून पाहिल्या. प्राचीन भारतीय, जुन्या मिथकांचा आधार घेत हा लेखक आपल्या शोषणव्यवस्थांची चिकित्सा करीत राहिला. त्यांच्या कथा जर बारकाईने वाचल्या तर या मिथकांच्या निर्मितीत एक जाणीवपूर्वकता असल्याचं लक्षात येईल. मिथकांच्या मुळापर्यंत जाऊन, त्यांची फोड करून नव्या मूल्यांचा पुरस्कार करणं आणि शोषक व्यवस्थांचा सांगाडा खिळखिळा करणं हा त्यामागचा अर्थ आहे.

‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’, ‘वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा’, ‘लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी’, ‘मोरी नींद नसानी होय’ या चार कथासंग्रहांच्या माध्यमातून त्यांनी अनोखे कथाविश्व मराठीत निर्माण केले. यात ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य’सारखी जवळपास ४५ पानांची दीर्घकथाही आहे आणि ‘लेखकाचा मृत्यू..’ या संग्रहात छोटा पैस असलेल्या तरल अशा कथाही आहेत. ज्यात मानवाखेरीज निसर्ग, पशुपक्षी, प्राणी यांचं जग आहे. मात्र, त्या लघुकथा नसून गोष्टी आहेत असे पवारांचे ठाम मत होते. आपल्याकडचे लघुकथेचे आधीचे चटपटीत, मनोरंजक रूप पाहता ते रास्तच म्हणता येईल.

मुंबईतला गिरण्यांचा प्रदीर्घ संप, या संपाने उखडलेले कामगारांचे जग, गिरण्यांच्या जागी उभे राहिलेले चकचकीत मॉल, टोलेजंग इमारती, स्वप्नांची राख झाल्यानंतर काहींचा गुन्हेगारी जगतात झालेला शिरकाव, जागतिकीकरणानंतर मध्यमवर्गीयांच्या बदललेल्या धारणा, तंत्रज्ञानाच्या सर्वसंचारी शिरकावाने मानवी जगण्याला वेढलेली परात्मता, अतिरेकी व्यक्तिवादातून फोफावलेल्या विवेकहीन आकांक्षा, जातीय-धार्मिक दंगे, हिंसेवर उतरलेले प्रक्षुब्ध तरुण, सांस्कृतिक बहुविधतेला नाकारून एकखांबी इमला रचण्याचे सुरू झालेले उद्योग.. अशा असंख्य गोष्टींनी गेल्या वीस वर्षांतील काळ आव्हानात्मक बनला. या सबंध काळाचे कलात्म विच्छेदन करणारा सर्वश्रेष्ठ लेखक म्हणून जयंत पवार यांचे स्थान नि:संशय थोर आहे. विस्थापित गिरणी कामगार, परप्रांतीय मजूर, मुंबईतल्या कष्टकऱ्यांचं जग त्यांच्या अनेक कथांमधून अवतरतं. ‘एका रोमहर्षक लढय़ाचा गाळीव इतिहास’ ही कथा गिरणी कामगारांच्या संघर्षांतील अदृश्य बिंदूंना जोडते. ‘वरनभातलोन्चा..’ या कथेतही एक अजस्र असा जबडा आहे, ज्यात असंख्य माणसं पाहता पाहता अदृश्य होतात. त्यांचं अस्तित्व पुसून जातं. ज्यांच्या आयुष्याला झळाळी मिळते, त्यांचा इतिहास होतो. पण सर्वसामान्य माणसाचं काय होतं याचे तपशील मात्र कुठेच मिळत नाहीत. अशा माणसांच्या जगण्याचा संघर्ष ही कथा मांडते. जागतिकीकरणाआधीचा कनिष्ठ मध्यमवर्ग आणि नंतरचा मध्यमवर्ग या घटकांचे पवारांच्या कथेत विशेष स्थान आहे. म्हणून ही कथा केवळ काही व्यक्तींची बनत नाही, ती एका वर्गाची होते. या कथा सलग वाचल्या तरी त्यातून पवारांचं वर्गभान दिसून येतं.

त्यांनी एके ठिकाणी नोंदवून ठेवलंय, ‘कथालेखकाला वेगळा स्वाध्याय करावा लागतोच. तो पक्ष्याचा फक्त डोळाच पाहू शकणाऱ्या अर्जुनासारखा असतो. कादंबरीकाराला डोळा, पक्षी, पान, फांद्या, झाड, परिसर असं सर्वच पहावं लागतं.’ हे भान त्यांच्यात अफाट होतं. म्हणूनच या वाङ्मय- प्रकारातली निर्विवाद मातब्बरी त्यांनी सिद्ध केली. कथेचं काल्पनिकतेशी असलेलं नातं आणखी घट्ट करत अद्भुतालाही त्यांनी सत्याचा स्पर्श घडवला. त्यांच्या काही कथांची सुरुवात एखादी पुराणकथा सांगितल्याप्रमाणे होते. मात्र, ही कथा पाहता पाहता अवघे वर्तमान कवेत घेते.

‘पृथ्वीवरील हिंदुस्थान नामक देशी महाराष्ट्र नामक राज्यातील मुंबापुरी नगरीच्या केंद्रभागी लालबाग नामक प्रदेशात आल्हादक वातावरण पसरले आहे.’(‘तुझीच सेवा करू काय जाणे’)

‘पृथ्वीवर लोक घाबरले होते. सर्वत्र हाहाकार माजला होता. प्रत्येक जण आकाशाकडे हात करून जगन्नियंत्या बापाला विनवणी करत होता.’ (‘जेहत्ते कालाचे ठायी’)

यासह अनेक कथांमध्ये कितीतरी पुराणकथा, मिथकं, देवादिकांच्या गोष्टी असा ऐवज येत राहतो. थेट वर्तमानाला भिडताना एखाद्या तरफेसारखा या बाबींचा ते उपयोग करतात. ‘जेहत्ते कालाचे ठायी’ ही कथा एकाच वेळी पुराण आणि आजचा काळ यावर हिंदकळत राहते. या संपूर्ण कथेचे निवेदन भन्नाट आहे. कल्पित आणि सत्य यांतले अंतरच हरवून जावे असे कथाशिल्प ‘टेंगशेंच्या स्वप्नात ट्रेन’मध्ये साकारले आहे. ‘ती वर्तमानात छापून आलेली बातमी होती, की टेंगशे राहतात त्या इमारतीत घडलेली घटना होती, की त्यांनी पिक्चर पाहिला त्यातले दृश्य होतं, की कोणी बोललं ते त्यांनी ऐकलं होतं ते काही टेंगशेंना आठवत नाही..’ हे या कथेचं निवेदनच काळाची अतार्किकता, अनिश्चितता स्पष्ट करणारं आहे. ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य’ या कथेची रचना, प्रसंग सारंच विलक्षण आहे. ‘छटाकभर रात्र तुकडा तुकडा चंद्र’ या कथेतलं निवेदन रहस्यकथेच्या अंगाने उलगडत जातं.

पवारांच्या कथेतील व्यक्तिरेखा सहजासहजी वाचकांच्या मनातून जात नाहीत. त्या जबरदस्त अशी पकड घेतात. या पात्रांच्या आयुष्यातील नाटय़ वाचकांच्याही मनावर गारुड करतं. ‘मोरी नींद नसानी होय’ ही त्यांची अशीच एक अप्रतिम कथा आहे. उत्तर प्रदेशातल्या कुठल्याशा छांगापट्टीनजीकच्या जमालपूर या टीचभर गावातून मुंबईत दाखल झालेला किसोर. डोळ्यातून पाझरणारे अपार कुतूहल आणि हसताना गालावर पडणारी खळी घेऊन मुंबईत येऊन आदळलेल्या या कोवळ्या पोराला रेल्वे प्लॅटफॉर्मवरच्या एका ठेल्यावर वेठबिगारी करावी लागते. त्याला जीवन समजून सांगणारा एक विक्षिप्त गुरुजी आहे. नशेची तार लागल्यानंतर हा गुरुजी अनेक अतार्किक गोष्टी सांगत राहतो. जो गुरुजी किसोरला सुरुवातीला आधार वाटतो त्याच्यापासूनच स्वत:ला सोडविण्यासाठी तो शेवटी धडपडू लागतो. किसोरला त्याचा गाव, आई, बहीण सगळं काही आठवू लागतं. या स्थित्यंतराला कारणीभूत ठरणाऱ्या बऱ्याच गोष्टी मधल्या काळात घडतात. किसोरचे सर्व संवाद उत्तर प्रदेशातल्या एखाद्या खेडय़ातल्या बोलीत आहेत. विस्थापित गिरणी कामगारांचे उद्ध्वस्त जग मुखर करणाऱ्या या लेखकाला परप्रांतीय मजुरांची वेदनाही कळते, याचे कारण कथांच्या रचनेतील वैविध्याच्या बुडाशी असलेला व्यापक सहानुभाव आहे. अर्थात प्रत्यक्ष लिहिताना या करुणेचा संयत असाच वापर करायला हवा, त्यासाठी लेखकाने निष्ठुर आणि निर्दयी असलं पाहिजे याचं पक्कं भान पवारांना होतं. आपल्याला जाणवलेलं सत्य मांडण्यासाठी प्रसंगी स्वत:लाच नख लावायची लेखकाची तयारी असली पाहिजे. त्याने या तटस्थतेने आणि निर्ममतेने लिहिलं तरच वाचकाच्या मनात करुणा निर्माण होऊ शकते, असं आग्रही प्रतिपादन पवारांनी केलं आहे. आणि त्यांच्या सर्वच लेखनात याचा प्रत्यय येतो.

एखाद्या लेखकाच्या लेखनातून कोणती मूल्ये प्रसृत होतात याचा शोध घेण्यापेक्षा त्याने अमुकतमुक घटनेत दोन ओळीची दिलेली प्रतिक्रिया म्हणजे त्याची ‘भूमिका’ एवढे भूमिकेचे सवंगीकरण होण्याच्या काळात भूमिका ही केवळ मिरवण्याची गोष्ट नाही, तर ते लेखकाचे प्राणतत्त्व आहे अशी लख्ख जाणीव जयंत पवारांनी कायम बाळगली. भोवतालाकडे पाहण्याची त्यांची खास अशी चिकित्सक दृष्टी होती. शोषण व्यवस्थांविषयी सारेच बोलतात, पण यासंदर्भात त्यांनी तेराव्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून मांडलेला विचार अंतर्मुख करणारा आहे. ‘निर्बलांचं शोषण करणारी एक व्यवस्था नक्कीच आहे. एका मोठय़ा पातळीवर ती अव्याहत काम करत असते. तिचा शोध आपण घेतलाच पाहिजे. पण त्यातही एक सत्य हे आहे की, ही शोषणव्यवस्था शोषितांमधूनच नवे शोषक तयार करीत असते, या शोषकांची साखळी तयार करते.’ कठोर परिशीलन करणारा लेखकच हे सत्य सांगू शकतो. ‘कोमसाप’ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना- ‘राजसत्ता आणि धर्मसत्ता हे संयुग सर्वाधिक घातक आहे..’ हे त्यांनी ठासून सांगितले. नयनतारा सहगल यांच्या निमित्ताने झालेल्या ‘चला, एकत्र येऊ या’ या कार्यक्रमात त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत विचार मांडला. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई म्हणजे आपापले हितसंबंध डिवचले गेल्यानंतर ठोकायची बोंब नसून प्रत्येक व्यक्तीच्या आविष्काराचं मूल्य जपण्यासाठी परजलेलं ते एक हत्यार आहे..’ हे त्यांनी निक्षून सांगितलं.

तोळामासा दु:खाने भोवंडून जाणारी असंख्य माणसं आपण अवतीभवती पाहतो. हा लेखक तर गेल्या अनेक वर्षांपासून साक्षात् मृत्यूशी झुंज देत होता आणि तशाही स्थितीत तो जीवाच्या कराराने अक्षर असं काही सांगू पाहत होता. बोलणं जवळपास बंद झाल्यानंतर ई-मेल, मेसेजच्या माध्यमातून त्याचा संवाद सुरू होता. स्वत:च्या आसपास मृत्यू घोटाळत असताना, आयुष्यातल्या या टोकावर उभं असताना कागदावर उमटणाऱ्या उच्चारापाठीमागचं एवढं जोरकस बळ कुठून येत असेल, या कल्पनेनंही थरारून जायला होतं. या पद्धतीने व्यक्त होणं हे अपूर्व आहे.. त्यांच्याच एखाद्या कथेसारखं अद्भुत !

पुन्हा पुन्हा त्यांचा वडिलांवरचा स्मरणलेख व्याकूळ करतो. त्यात मृत्यूसंबंधी चिंतन होतं, पण मृत्यूची भीती नव्हती. विकलता नव्हती. कोसळणं नव्हतं. अटळ असा स्वीकार होता. त्यातून येणारा ठामपणा होता. कोणताही दुभंग उरलेला नाही. मनातली खळबळ शांत होत गाळ खाली बसावा तशी सगळी अवस्था. या लेखाच्या शेवटच्या ओळी अशा.. ‘त्या हवेत तुम्ही असता. त्यातून तुमच्याकडे मी बघत असतो. तुम्ही झोपलेले असता आणि तुमच्या छातीवर विठ्ठल डोकं टेकून पहुडलेला असतो. मी कितीतरी वेळ तुमच्याकडे बघत बसतो, बोलत राहतो आणि मग सावकाश डोळे मिटू लागतात. मी पुन्हा झोपी जातो. या विश्वासाने, की पुंडलिकाने जसं वीट फेकून पांडुरंगाला दारात उभं केलं तसं तुम्ही कधीतरी विठ्ठलाला म्हणाल- आता जरा दूर हो. माझ्या लेकराला झोप येतेय. त्याला झोपू दे माझ्याजवळ. आणि मी तुमच्या छातीवर डोकं ठेवीन.’ इथे हा लेख संपतो. एका अर्थाने ही चरित्रकथाच आहे.. ज्यातून जयंत पवारांच्या व्यक्तिमत्त्वाची झालेली घडण कळते. वडिलांकडे असलेलं संतसाहित्य, पुराणकथांचं भांडार, त्याची पारायणं, निरूपण, पठण या सगळ्या गोष्टी आकळणारं कळतं वय,  कुटुंबातील सावत्र आई, भाऊ, बहीण यांच्याशी असलेली नाती जपताना, निभावताना होणारी घालमेल, विठ्ठलभक्तीत आकंठ बुडालेले वडील, स्वत:च्या मृत्यूची चाहूल लागल्यानंतर आपल्या मुलाला ‘बापू, कधीही काहीही होईल, तू तयार राहा..’ अशी वडिलांनी करून दिलेली स्पष्ट जाणीव.. हे सारंच आरपार भेदून जाणारं आहे.

अलीकडेच आलेल्या ‘लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी’ या कथासंग्रहाची अर्पणपत्रिका- ‘माझ्यातून उगवलेले हे शब्द तुझी सख्खी भावंडं आहेत. त्यांना जप. त्यांच्यावर माया कर..’ अशी आहे. सई या लेकीसाठी त्यांनी लिहिलेल्या या ओळी आहेत. या शब्दांतही हाच अटळ स्वीकार आहे. आणि ‘मोरी नींद नसानी होय’ या कथासंग्रहाच्या सुरुवातीला ‘बोल ये थोडा वक्त है, जिस्म ओ जबां की मौत से पहले’ हे फैज अहमद यांचे शब्द..

‘लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी’ या कथासंग्रहाच्या सुरुवातीला कवी-गीतकार शैलेंद्र यांच्या ओळी आहेत..

‘गंगा और जमुना की गहिरी है धार

आगे या पीछे सबको जाना है पार

अपनी कहानी छोड जा

कुछ तो निशानी छोड जा..’

अवघे पन्नास वर्षांचे आयुष्य लाभलेले हिंदीतील श्रेष्ठ कथाकार रघुनंदन त्रिवेदी यांच्या निधनानंतर नामवंत कथाकार उदयप्रकाश म्हणाले होते, ‘रघुनंदन असे नाहीसे झाले, जसं एखाद्या दिवशी एखादा पक्षी किंवा एखादं फुलपाखरू नाहीसं व्हावं. थोडंफार अशा तऱ्हेने, की जसा एखादा पवित्र, कोमल जीव समुद्राच्या किनाऱ्यावर वाळूत एक सुंदर शंख मागे ठेवून अज्ञात ठिकाणी निघून जावा..’ याची यावेळी प्रकर्षांने आठवण झाली. जयंत पवार हे अत्यंत श्रेष्ठ दर्जाची कथा मागे ठेवून गेले आहेत. या कथेची मुद्रा अजोड आणि अमीट आहे.

aasaramlomte@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Aasaram lomte storybooks ssh

ताज्या बातम्या