|| अलका गोडे
ज्येष्ठ समाजसेविका निर्मला पुरंदरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या भगिनीने सांगितलेल्या त्यांच्या काही आठवणी..
निर्मला पुरंदरे म्हणजेच माझी मोठी बहीण कुमुद. तिला जाऊन नुकताच आठवडा होतो आहे. खरं तर तिच्या दुखण्याची सुरुवात सात-आठ वर्षांपूर्वीच झाली होती. हळूहळू हा आजार तिला कधीही उभं न राहू देण्याइतका जीवघेणा ठरला. तिच्यासाठी हा यातनामय प्रवास संपता संपत नव्हता. चेहऱ्यावर कसलीही वेदना न दाखवता हसतमुख राहण्याच्या तिच्या कसरतीने तिला पार दमवले. अखेर एका क्षणी सगळंच थांबलं आणि संपलंदेखील.
कुमुद आणि निर्मला दोन्ही एकच. माझ्यासाठी मात्र ही दोन्ही स्वतंत्र व्यक्तिमत्त्वं होती. कुमुदबद्दल लिहिणं सोपं असेल, पण निर्मला पुरंदरे मला पेलवणाऱ्या नाहीत, माझी तेवढी कुवतही नाही. या दोघींसमोरच मी वाढत होते आणि थोडीफार घडतही होते. माझ्या वयाच्या सात-आठ वर्षांनंतरची कुमुद मला समजायला लागली असेल, पण त्याआधीच्या अनेक गोष्टी मी ऐकतच मोठी झाले.
आमचं कुटुंब मोठं. आई, वडील, आम्ही पाच बहिणी आणि श्रीभाऊ, दिलीप हे दोन भाऊ. सातारा रोड येथे कूपर कंपनीमधे वडिलांची नोकरी होती. आम्ही सर्व तिथेच राहत होतो. सातारा रोड तसं खेडेगाव, त्यामुळे हळूहळू शिक्षण, नोकरी, लग्न अशा कारणांनी टप्प्याटप्प्याने आम्ही भावंडे पुण्यामध्ये डेरेदाखल होत होतो.
‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर आणि ‘राजहंस प्रकाशन’चे दिलीप माजगावकर माझे थोरले बंधू. महाविद्यालयीन शिक्षणासाठी श्रीभाऊ त्यावेळी एक खोली घेऊन पुण्यात राहत होता. याच काळात त्यांचा मित्र म्हणून बाबा पुरंदरे नामक व्यक्तीचा त्याच्या आयुष्यात प्रवेश झाला. हे व्यक्तिमत्त्व म्हणजेच आजचे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. त्यांच्यामधील गप्पा, चर्चा, वादविवाद, विनोद सगळंच सामाजिक बांधिलकीशी निगडित असे. तेव्हा आजूबाजूचं वातावरणदेखील संघ विचारांनी भारलेलं होतं. अंगात पांढरा शर्ट- खाकी चड्डी- डोक्यावर काळी टोपी, हातात काठी असे तरुण शिस्तीत संचलन करीत असत. स्वातंत्र्यवीर सावरकर हे या दोघांचं दैवत होतं. या दोघाही तरुणांच्या खोलीत नट-नटय़ांच्या फोटोऐवजी सावरकरांची भली मोठी तसबीर भिंतीवर लावलेली होती आणि हेच वेगळेपण या दोघांबद्दल पुढे समाजमनात अनेक अंगाने रुजत होतं. त्यांच्या या घट्ट मत्रीतूनच पुढे बाबासाहेबांबरोबर आमच्या कुमुदचा विवाह झाला. सुरुवातीला लग्नच करायचे नाही, सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून द्यायचे, या विचाराशी ठाम असलेल्या बाबासाहेबांनी कुमुदला प्रथमदर्शनीच होकार देऊन टाकला होता.(‘हीच का तुमची बहीण? मग केलं लग्न.’- इति बाबासाहेब) कारण कुमुद होतीच पसंत पडण्यासारखी. अशी कुमुदची ‘निर्मला पुरंदरे’ झाली. तिची सुरुवातीची काही र्वष सासर, माहेर, सणवार यातच निघून गेली. नंतर संसार वाढत गेला. यातही काही काळ गेलाच. संसाराच्या विवंचना होत्याच. त्यात आíथक कुचंबणा जरा जास्तच. सासर, माहेर दोन्ही घरे ध्येयवादाने भारलेली होती. ‘असेल त्यात भागवा’ हीच सवय घरच्यांना लागली होती. काटकसरीचं सोयरसुतक फारसं कोणालाही जाणवायचं नाही. आणि हेच बाळकडू कुमुदमध्येही भिनलं होतं. जशी मुलं मोठी होत होती, तसा मिळत असलेला थोडासा फावला वेळ कुमुदला अस्वस्थ करायचा. सामाजिक बांधिलकी, समाजऋण, समाज परिवर्तन याभोवती तिचं विचारचक्र फिरत असे. लहानसहान गोष्टींमधूनही ते प्रत्ययाला येत असे. याच भावनेतून ती हळूहळू शेजारच्या मुलांना जमवून त्यांचे संस्कारवर्ग घ्यायला लागली. गाणी, गोष्टी, उजळणी याबरोबर मुलांच्या आवडीनिवडी, त्यांचे हट्ट, त्यांच्या सवयी याबद्दल ती पालकांशी चर्चा करायची. तिचा पडच मुळात शिक्षिकेचा होता, असावा. मुलांना निसर्गाच्या जवळ जाता यावं यासाठी ती त्यांच्या सहली घेऊन जायची. कधी कधी आम्ही घरातली मुलंही तिच्या मदतीसाठी जायचो. कुमुद आम्हाला कधीही वरच्या पट्टीत बोललेली नाही किंवा साधी रागावलेलीही नाही. तरीसुद्धा तिचा वावरच असा असायचा की आम्हाला तिचा धाक वाटायचाच. ती येते आहे कळल्यावर आम्ही सावध व्हायचो. नखं वाढलेली तर नाहीत ना, जिना चढताना आवाज तर होत नाही ना, चपला भिरकावलेल्या नाहीत ना, कॉटवर धपकन् बसायचे नाही याची आम्ही काळजी घ्यायचो. तिचा असा अबोल धाक एका बाजूने आम्हाला घडवत होताच, तर दुसरीकडे कुमुदमधल्या निरपेक्ष आणि नि:स्वार्थी निर्मलेचा उदयही होत होता, तोही याच सुमारास.
आमची अजून एक थोरली, पण कुमुदपेक्षा धाकटी बहीण होती. निशा तिचं नाव. दिसायला गोरीपान. चेहरा एकदम गोल, अगदी गौरीसारखा. अंगावर जरीची साडी, कधी पाचवार, कधी नऊवार, कधी डोक्यात वेणी, कधी गजरा, अंगावर माफक ठसठशीत दागिने अशा राहणीची तिची आवड. पक्की देवभोळी. भरभरून देणारी आणि दुसऱ्यासाठी झटणारी. अर्थातच ती आमच्या आईची आणि आम्हा सर्वाचीही लाडकी होती. कुमुदचं सगळंच याच्या उलट. साधी राहणी, वेणीचा एक शेपटा, सुती साडी, हातात पुस्तकांचा गठ्ठा किंवा एखादी फाइल, जोडीला कागदपत्रांनी भरलेली खांद्यावरची जड पर्स (की झोळी?). असा हिचा बाळबोध थाट. ती आईला चिडवायची, ‘‘तुझी काय, निशी लाडकी, मी जाता-येता देवाला हात जोडत नाही ना! म्हणून मी बिघडलेली. माझं घराकडे लक्ष नाही असं तुझं म्हणणं.’’ असे लटके संवाद दोघींमध्ये घडत असत. ‘‘तुझं आपलं काहीतरीच,’’असं म्हणून आई सोडून द्यायची. बऱ्याच वेळा कुमुदचा पेपरमध्ये किंवा पुस्तकामध्ये फोटो येई. आई मला म्हणायची, ‘‘अलके बघ, कुमुदचा फोटो आलाय. हा बघ इथे उशीखालीच ठेवलाय.’’ त्या फोटोवरून हळुवार हात फिरवत आई तो किलकिल्या डोळ्यांनी बघत राहायची आणि त्यातच कुमुदची लंगडी तक्रार गुडूप होऊन जायची.
आमच्या कुमुदला संस्कारवर्गापुरतं मर्यादित राहायचं नव्हतं. समाजासाठी अजून काहीतरी भरीव काम तिला करायचं होतं. ती संधी शोधत होती. इकडे ‘माणूस’ अंकाने विचारी जनमानसात मूळ धरायला सुरुवात केली होती. सामाजिक अन्यायाला वाचा फोडणारं निर्भीड लिखाण ‘माणूस’मधून प्रसिद्ध होत असे. पुढील अंकाची उत्सुकतेनं वाट बघावी, असं स्थान ‘माणूस’ने निर्माण केलं होतं. आता कामही वाढत होतं. घरच्याच कुमुदला तिथे संपादकीय विभागात काम करण्याची संधी चालून आली. इथेच तिच्या शोधकामाला योग्य दिशा मिळाली असावी. या कार्यालयात विचारवंत, लेखक, प्रकाशक, राजकारणी, कलावंत यांची उठबस नित्याचीच झाली होती. बाबासाहेबांचे शिवचरित्रकथनाचे दौरे महाराष्ट्रभर संचारत होते. त्यांच्या भोवतीही जाणकार, शिवभक्त कार्यकत्रे यांची गर्दी वाढत होती, जनसंपर्क विस्तारत होता. खरं तर कुमुदच्या सामाजिक कामासाठीच जणू तिच्या आजूबाजूला पोषक वातावरण तयार होत होतं. ‘माणूस’मधली वर्दळ असो नाहीतर बाबासाहेबांचे चाहते असोत, निवडक व्यक्तींकडून कुमुद मार्गदर्शन मिळवत होती, चर्चा करत होती, खूप वाचत होती. यातूनच तिची नजर ग्रामीण भागावर स्थिरावली असावी. आता तिला तळमळीच्या सहकाऱ्यांची गरज होती. जे मिळाले ते तर कुमुदच्याही पुढे पन्नास पावलं चालणारे. या ऋषितुल्य मान्यवरांची ठळक नावे म्हणजे डॉ. अच्युतराव आपटे, सुमित्राबाई केरकर, चंपूताई कुलकर्णी आणि रावसाहेब बखले. या मंडळींनी अभ्यासपूर्वक खेडय़ातल्या वंचित महिलांचं रिकामपण हेरलं. डोक्यावर घागरी भरून मलोन्मल चालण्यातच त्यांची शक्ती खर्च होत होती. गृहकलह, दारू, भांडणं यातच त्यांचं अवसान संपायचं. गावातली शिकण्याच्या वयाची मुलं रानोमाळ भरकटत होती. ही मुलं पाटीपेन्सिलीत रमायला हवी होती आणि याच आघाडय़ांवर या मंडळींचं काम सुरू झालेलं. याच बायाबापडय़ांना बालवाडी चालवण्याचं प्रशिक्षण दिलं तर आपोआपच गावातली ऊर्जा गावाच्याच भवितव्यासाठी उपयोगात येईल. मंडळींनी वसा तर घेतलेलाच होता. ‘विद्यार्थी साहाय्यक समिती’ आणि नंतर ‘वनस्थळी’ या संस्थांच्या माध्यमातून यांचा उद्देश आकार घेऊ लागला. सरकारदरबारी रखडलेली कामे अधेमधे विघ्न आणत होती. गावातल्या समस्या निराळ्याच होत्या. कधी विरोध तर कधी अडथळे. कधी पुढे होणाऱ्या महिलांना घरातूनच मारपीट. आíथक प्रश्न आ वासून होताच. भरपूर कष्ट घ्यावे लागले, तरीपण स्वच्छ हेतू, प्रबळ इच्छाशक्ती, पारदर्शी काम आणि समाजपरिवर्तनाची कळकळ या सगळ्यांनी अडचणींवर मात केली.
आज जवळजवळ पंधरा हजार महिला प्रशिक्षित होऊन आपापल्या गावात बालवाडय़ा चालवत आहेत. गावपातळीवरून दहा जिल्ह्यंमध्ये हे काम पसरलेले आहे. सुरु वातीला झाडाचा पार, देवळाची ओटी, कधी झोपडी, कधी मोकळं शिवार अशा ठिकाणी हा ‘ज्ञानयज्ञ’ अथक मांडला जात होता. आज गावकऱ्यांच्या पुढाकाराने आणि दानशूर लोकसहभागातून बंदिस्त जागा मिळाल्या आहेत. खाली मान घालून वावरणाऱ्या महिला सभाधीट झाल्या आहेत. त्या माइकसमोर बेधडक बोलतात. आपल्या व्यथा मांडतात, चर्चा करतात, लिखाण करतात. ‘वनस्थळी’ मासिकाचे अंक बघितले तर याची प्रचीती येईल.
पायाभूत सुविधांचीच जिथे वानवा तिथे शहरी सुविधा तर दूरच. अशा परिस्थितीत या महिला कणखर बनून शिक्षणाचा प्रसार करत आहेत. निर्मला पुरंदरे त्यांच्यासाठी दैवत आहे. या हजारो महिलासाठी ‘ताई’ हा एकच शब्द व्यापून उरला आहे. कुमुदच्या ‘वनस्थळी’ केंद्राचा बोलबाला अगदी परदेशातही पोचला आहे. ही लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याची चूल पार इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स येथूनही फुंकली जात आहे. कुमुद तृप्त आहे. तिचं ध्येय साध्य झालं आहे. अंथरुणाला खिळलेली पाच-सात वर्षे अजून मिळाली असती तर बरे झाले असते, एवढीच खंत कदाचित तिच्या मनाला सलत असेल, पण तिचा हा वसा अनेक कला अवगत असलेली तिचीच मुलगी माधुरी पुरंदरे त्याच असोशीने पुढे चालवत आहे.
आज धनदांडगे आणि त्यांचे राजकुमार जेव्हा गाडय़ा उडवत पिकनिक / पाटर्य़ाना जातात, तेव्हा त्यांच्यासमोर तिने उन्हातानातून केलेली पायपीट आणि तिचा त्याग ताठ मानेने उभा राहतो. एका जिद्दीने तिने स्वत:ला समाजकार्यात झोकून दिले. मानमरातबही मिळाले. तरीही ती घरेलूच राहिली. बाबासाहेबांसारखं लोकविलक्षण व्यक्तिमत्त्व तिने तितक्याच सहजपणे पेललं. वास्तविक हा संसार पांढरपेशा चौकटीत मावणारा नव्हताच. दोघांच्याही आवडीनिवडी भिन्न. दोघेही स्वयंभू, स्वतंत्र विचाराने चालणारे. आपोआपच दोघांचेही जगण्याचे आणि जगवण्याचे आयाम भिन्न झाले. त्यांचे मार्ग समांतर असतील, पण अंतिम ध्येय, अंतिम साध्य मात्र समाजपरिवर्तन हेच राहील. त्याची परिणती म्हणून अनेक मानसन्मान, पुरस्कार / मानपत्रं त्या दोघांना शोधत त्यांच्यापर्यंत आले. अत्यंत मानाच्या अशा ‘पुण्यभूषण’ पुरस्काराने दोघेही स्वतंत्रपणे सन्मानित झाले, हा तर केवळ दुग्धशर्करा योगच म्हणायचा. कुमुद आणि बाबासाहेब जणू एकाच जागी वाढीला लागलेले दोन महावृक्षच आपापल्या स्वभावधर्माला अनुसरून फोफावतच राहिले. एकाचा गंध सुसाट भन्नाट तर दुसऱ्याचा ओल्या मातीत मुरलेला मंद दरवळ..