स्वच्छ वाणी आणि स्पष्ट शब्दोच्चाराची वृत्तनिवेदिका, सहज अभिनयाचे लेणे असलेली अभिनेत्री, सेटवर प्रत्येकाची काळजी घेणारी निर्माती आणि ‘सवत माझी लाडकी’ या चित्रपटाची दिग्दर्शिका.. एका अर्थाने स्मिता तळवलकर हे चतुरस्र व्यक्तिमत्त्व होतं. आता ‘होतं’ म्हणणं हेदेखील कठीण झाले आहे. सततची सकारात्मक ऊर्जा, प्रचंड आत्मविश्वास, अचंबा वाटावा अशी धडाडी ही तिच्या व्यक्तिमत्त्वाची खास वैशिष्टय़े सांगता येतील. नव्या क्षेत्रात पाय रोवून उभे राहणे- एवढेच नव्हे तर त्यात स्वत:चे स्थान निर्माण करण्याच्या तिच्या हिमतीसाठी तिला सलाम करावाच लागेल. ‘स्पर्श’, ‘कथा’ आणि ‘चष्मेबद्दूर’ या चित्रपटांच्या माध्यमातून हिंदूी चित्रपटसृष्टीमध्ये सई परांजपे यांनी जे स्थान निर्माण केले, तोच पराक्रम मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्मिता तळवलकर हिने केला आहे.
स्मिताबरोबर ‘चौकट राजा’ चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. एवढेच नव्हे तर ‘चौकट राजा’मधील ‘नंदू’ ही माझ्या कारकीर्दीतील संस्मरणीय भूमिका ठरली. ही भूमिका मला मिळण्यासाठी स्मितानेच पुढाकार घेतला. त्याचबरोबरीने श्री. ज. जोशी यांच्या ‘यात्रा’ या कादंबरीवर आधारित ‘साळसूद’ या दूरदर्शन मालिकेमध्ये मी ‘भार्गव’ हा विकृत खलनायक रंगवला होता. ही माझी तिच्याबरोबर काम केलेली दुसरी आवडती भूमिका. एकाच वेळी सहकलाकार आणि निर्माती अशा दोन भूमिकांमध्ये स्मिता वावरत होती. निर्माती असण्याची जी दडपणे असतात, त्याचा परिणाम तिने भूमिकेवर कधी होऊ दिला नाही. दूरदर्शनवर ‘गजरा’ आणि ‘चिमणराव’साठी काम करायला जायचो तेव्हा स्मिता वृत्तनिवेदिका होती. त्यानंतर ती अभिनेत्री झाली. केवळ अभिनेत्री एवढय़ापुरताच तिचा प्रवास मर्यादित राहिला नाही; तर वयाच्या तिशीमध्ये ‘अस्मिता चित्र’ ही संस्था तिनं सुरू केली. या तिच्या सर्व प्रवासात सकारात्मक ऊर्जा स्पष्टपणे जाणवते. नेहमी सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडण्यामध्ये अग्रभागी असलेल्या स्मितामधील धमक आणि धडाडी या गुणांचा संसर्ग सर्वानाच व्हायचा.
‘चौकट राजा’मधील नंदू ही मतिमंद मुलाची व्यक्तिरेखा खरे तर परेश रावळ साकारणार होता. माझी भूमिका स्मिताच्या नवऱ्याची होती. ती नंतर दिलीप कुळकर्णी याने केली. माझ्या भूमिकेसाठीची तयारी झाली. कपडय़ांची मापे, रंगभूषा हे सारे निश्चित झाले होते.
कोल्हापूरला चित्रीकरण सुरू असताना अचानक एक दिवस स्मिताचा दूरध्वनी आला. नवरा-बायकोच्या सीनचे शूटिंग आधी असावे असे मला वाटले आणि मी लगेचच कोल्हापूरला गेलो. परेशला अडचण आल्याने नंदू कोणी करायचा, हा प्रश्न स्मितानेच सोडवला. दिग्दर्शक संजय सूरकरने ही भूमिका माझ्या गळी उतरवली. तयारीला वेळ नसल्याने भूमिका करणे माझ्या मनात नव्हते. पण ‘ही भूमिका तू केली नाहीस तर माझे आर्थिक नुकसान होईल,’ असे सांगत स्मिताने मला ‘इमोशनल ब्लॅकमेल’ केले. ही भूमिकाच नव्हे, तर या चित्रपटाचा संपूर्ण अनुभव मला आयुष्यात खूप काही देणारा ठरला. आधी ‘नातीगोती’ नाटकात मी मतिमंद मुलाच्या वडिलांची भूमिका केली होती. मुलाची व्यक्तिरेखा अतुल परचुरेने साकारली होती. पण हा मुलगा जन्मत: मतिमंद असतो. मात्र, ‘चौकट राजा’मधील नंदू वयाच्या आठव्या वर्षांपर्यंत हुशार मुलगा असतो. पावस येथे आंब्याच्या झाडावरून पडून झालेल्या अपघातामध्ये त्याला मतिमंदत्व येते. अशा मुलांचे आयुष्य कसे असते, हे मला माहीत नव्हते. स्मिताने मला, तू कामायनी संस्थेमध्ये जाऊन ये, असे सुचवले. त्यानुसार मी संस्थेला भेट दिली. त्यानंतर ‘परफॉर्मिग आर्ट’शी संबंधित असलेले मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विद्याधर वाटवे यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली. प्रत्यक्ष भूमिका वठवताना सोप्या दृश्यापासून सुरुवात करू या, असे मी स्मिता आणि संजय या दोघांनाही सुचवले. कोल्हापूरच्या शालिनी स्टुडिओमध्ये अजित दांडेकर याने चाळ उभी केली होती. त्या चाळीच्या पहिल्या मजल्यावरील घरामध्ये मी आणि आई (सुलभा देशपांडे) राहत होतो. माझ्या खोडय़ांमुळे आईने मला कोंडून ठेवले आहे. बाहेरून कुलूप लावले होते. मी खिडकीत बसून खाली पाहतो. चाळ आणि त्यासमोर असलेली सोसायटी यामध्ये मोकळे पटांगण असते. मुन्नी म्हणजे स्मिता तिच्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी स्कूलबसकडे घेऊन जाताना दिसताच खिडकीत बसलेला मी तिला ओळखून हाका मारतो. कॅमेरामन हरीश जोशी, संजय आणि स्मिता खाली होते. मी आकांताने मारलेल्या हाकांतून उमटलेला आर्त स्वर आणि मुद्राभिनय यातून मला माझा नंदू सापडला. स्मिताच्या डोळ्यांमध्ये पाणी होते. माझ्या आर्त हाकांनी स्मिताला निर्माती म्हणून दिलासा मिळाला आणि मला आत्मविश्वास.
कामायनी संस्थेतील मुलांबरोबर ‘असा कसा, असा कसा मी वेगळा वेगळा’ या गीताचे भरत नाटय़मंदिर येथे चित्रीकरण झाले. बदाम, इस्पिक आणि किल्वर एक्के ही मतिमंद मुले होती. त्यासाठी वेगवेगळ्या परवानग्या घेताना स्मिताचा अपरंपार उत्साह जाणवायचा. कलाकार म्हणून चित्रीकरणामध्ये नसली तरीही सेटवर व्यवस्थापनकुशल निर्माती म्हणून स्मिता आवर्जून उपस्थित असायची. आईच्या मृतदेहाला अग्नी देण्यासाठी अशोक सराफ मला स्मशानामध्ये घेऊन येतो. आधी रवींद्र नाटय़मंदिरच्या आवारात स्मशान उभे केले गेले. मग खऱ्या स्मशानामध्येच हे चित्रीकरण करण्याचे ठरले. दादरच्या स्मशानभूमीत मध्यरात्री हे शूटिंग करण्यात आले. आपल्याकडे महिला स्मशानामध्ये जात नाहीत. पण माझी आई म्हणजे सुलभा देशपांडे या तर मृतदेह म्हणून असणार होत्या. मी आणि अशोक दृश्यामध्ये असलो तरी स्मिता सुलभाताईंना सोबत म्हणून हजर होती.
आईच्या निधनानंतर नंदू पावसात भिजत चाळीतल्या घरी येतो आणि आईची साडी घेऊन रडतो. शालिनी स्टुडिओत जानेवारीच्या थंडीमध्ये हे शूटिंग करण्यात आले. अग्निशामक दलाच्या गाडीने पाऊस पाडण्यात आला. मी कुडकुडत पावसात भिजत येतो. माझ्यामागे दिलीप कुळकर्णी हादेखील असतो. त्याला माझ्याविषयी अनुकंपा वाटू लागते. वेगवेगळ्या अँगलमधून हे दृश्य चित्रित करताना कितीदा तरी पाऊस पाडला गेला. प्रत्येक शॉट झाल्यावर स्मिता आमच्यासाठी ब्लँकेट, घोंगडी घेऊन थांबलेली असायची. थंडीमध्ये ब्रँडी घेतली जाते. पण मी मद्य घेत नाही हे माहीत असल्याने मला थंडी बाधू नये म्हणून स्मिताने हळद घातलेले गरम दूध देण्याची व्यवस्था केली होती. सहकलाकारांची काळजी घेणे हा तर तिचा स्थायीभावच होता. अस्मिता चित्रच्या माध्यमातून तिने अनेक नवीन कलाकारांना संधी दिली. तिच्या ‘कळत-नकळत’ आणि ‘तू तिथं मी’ चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार लाभला. ‘चौकट राजा’ला राज्य सरकारचा सवरेत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान आणि अभिनयासाठी मला पारितोषिक मिळाले. स् िमताने आम्हा कलाकारांवर केवळ विश्वासच दाखवला असे नाही, तर आम्हालाही आत्मविश्वास दिला. तिच्या ‘साळसूद’ मालिकेमध्ये मी भार्गव हा विकृत खलनायक केला होता, तर ‘घरकूल’ आणि ‘रेशीमगाठी’ या मालिकांमध्येही मी काम केले.  
वृत्तनिवेदिका, अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका या स्मिताच्या जडणघडणीचा मी एक साक्षीदार आहे. तिचे आजारपण हा एक धक्काच होता. धैर्य दाखवून तिने यापूर्वी दोनदा या आजारपणातून बाहेर पडत कामाला सुरुवात केली होती. आतादेखील ती उभारीने काम करेल असे वाटत होते. नव्हे, मला तर आशाच होती. पण नियतीला ते मान्य नसावे. बघणाऱ्याला त्रास होऊ नये म्हणून स्मितानेच आपल्याला भेटण्यास मनाई केली होती. त्यामुळे तिची भेट होऊ शकली नाही, ही रुखरुख आहे. अभिनयाच्या पलीकडे जाऊन काही करू पाहणाऱ्यांसाठी स्मिताचा प्रवास प्रेरणादायीच नव्हे, तर ‘रोल मॉडेल’ आहे. एक कर्तृत्ववान स्त्री असाच मी तिचा गौरव करेन. वेगवेगळ्या विषयांवर दर्जेदार चित्रपट देणे हे स्मिताचे वैशिष्टय़ होते. कितीही चिंता असली तरी स्मिताच्या चेहऱ्यावर सतत स्मितहास्य असायचे. एका अर्थाने तिने ‘स्मिता’ हे नाव सार्थ केले असेच म्हणावे लागेल.
शब्दांकन : विद्याधर कुलकर्णी