scorecardresearch

Premium

भारतीय विरागिनींची प्रवासगाथा

विषय जरी क्लिष्ट असला, वाचताना येणारे संदर्भ जरी अपरिचित असले, तरी लेखिकेच्या मांडणीमुळे व शैलीमुळे ते वाचकाला निश्चितच गुंतवून ठेवतात.

book review bhartiya viragini book by author aruna dhere
‘भारतीय विरागिनी’ – अरुणा ढेरे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, पाने- ४६४, किंमत- २३२ रुपये.

डॉ. सुजाता शेणई

गौतम बुद्धांच्या काळापासून सतराव्या-अठराव्या शतकापर्यंतच्या कालखंडातील भारतीय विरागिनींच्या कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन आणि पारमार्थिक पातळीवरील जीवनविचार हा संशोधनाचा फार मोठा परिप्रेक्ष्य आहे. या परिप्रेक्ष्याला अभ्यासपूर्ण संशोधनाची मांडणी देऊन डॉ. अरुणा ढेरे यांचा ‘भारतीय विरागिनी’ हा ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे. या विरागिनींचे स्त्रीत्वाशी असलेले संवेदन आणि भारतीय भक्तिक्षेत्राशी निर्माण झालेले नाते यातून उकलत जाते.

indus valley civilization
यूपीएससी सूत्र : मूलभूत अधिकारांवरील निर्बंधांच्या योग्यायोग्यतेचा सिद्धांत अन् सिंधू लिपीवरील नवीन संशोधन, वाचा सविस्तर…
Indus Script on Seal
सिंधू लिपी नवीन संशोधनावरून पुन्हा खळबळ का? खरंच आहे का ही लिपी भारतीयांच्या लेखनकलेचा आद्यपुरावा?
upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : प्रकरण अभ्यास (भाग २)
Uposhan
मनोज जरांगे, अण्णा हजारेंचं उपोषण बेमुदत होतं की आमरण? दोन्ही शब्दांमधील फरक नेमका काय? जाणून घ्या

लौकिकातून पलीकडे पाऊल टाकणाऱ्या आणि लौकिक आयुष्याने निर्माण केलेल्या सर्व बंधनांपासून मुक्त होऊन परमार्थाची वाट धरणाऱ्या स्त्रियांना विरागिनी ही संज्ञा वापरली जाते. ही संज्ञा फक्त संत वा भक्त स्त्रियांपुरती मर्यादित नाही, म्हणूनच ती अधिक व्यापक होते. या विरागिनी समाजाच्या विविध थरांतून, वातावरणातून येतात. उच्चवर्णीय व्यापारी कुटुंबापासून ते गणिका, गृहत्याग किंवा वाळीत टाकलेल्या या कोणत्याही स्तरातील असतात. त्यांच्या चरित्रापासून ते वाङ्मयापर्यंत सखोल अभ्यास करून अरुणा ढेरे निष्कर्ष काढतात की, या विरागिनी आपापल्या बुद्धी शक्तीनुसार वाङ्मयपरंपरेशी भिडल्या आणि स्वत:चे स्वतंत्र विचार मांडण्याइतक्या सशक्त होत्या. काश्मीरची लल्लेश्वरी, रूपा भवानी, राजस्थानची मीरा, गुजरातची गौरीबाई आणि गंगासती, उत्तर व मध्य भारत आणि ओरिसातील चंद्रसखी, सहजोबाई, माधवी दास ते महाराष्ट्रातील महदाइसा, मुक्ताबाई, बहिणाबाई व अन्य तीसहून अधिक विरागिनींचा विचार यात केला आहे. प्रत्येकीचा कालखंड, तिची कौटुंबिक व सामाजिक परिस्थिती, तिने स्वीकारलेली बोली, रचलेल्या काव्यरचना, केलेला संघर्ष, दाखवलेला निर्धार आणि दिलेले योगदान याचा विस्तीर्ण पट या ग्रंथात वाचायला मिळतो. विषय जरी क्लिष्ट असला, वाचताना येणारे संदर्भ जरी अपरिचित असले, तरी लेखिकेच्या मांडणीमुळे व शैलीमुळे ते वाचकाला निश्चितच गुंतवून ठेवतात.

हेही वाचा >>> बहुआयामी कलाकाराचे चित्र-शब्द दर्शन

विरागिनींचा पारमार्थिक जीवनातील प्रवेश व त्यासाठी करावा लागणारा गृहत्याग ही सामाजिक स्तरावर सहज स्वीकारली जाणारी गोष्ट नव्हती. ते अवघड दिव्यच होते. यासाठी लागणाऱ्या असीम निग्रहाचा व धैर्याचा स्वीकार या विरागिनींनी कसा केला याचा मागोवा यात येतो. स्त्रीकेंद्रित अडसराच्या वर्तुळात स्त्रीत्व, स्त्रीदेह, स्त्रीचे समाजातील गौण स्थान, पुरुषसत्तेची मक्तेदारी, स्त्रीला गुरू लाभणे आणि गुरुपदापर्यंत पोचणे यासाठी या विरागिनींना फार मोठी किंमत मोजावी लागली. त्यांचा कौटुंबिक ते पारमार्थिक प्रवास लेखिकेने अतिशय आत्मीयतेने वर्णन केला आहे. विरागिनींनी भक्तिमार्ग स्वीकारून स्वत:ला व समाजाला काय दिले, हा संशोधनाचा गाभा म्हणता येईल. सामाजिक परिवर्तनाची अद्भुत किमया करणे म्हणजे असाधारण धाडसाची परीक्षाच होती. या परीक्षेला स्वत:लाच बसवताना करावा लागणारा अनेक पातळ्यांवरचा संघर्ष व त्यातून उत्तीर्ण झाल्यानंतर मिळणारा परमानंद या विरागिनींनी अनुभवला आहे. या अनुभवाचे यथोचित दर्शन या ग्रंथातून होते. या दर्शनात वाचक भारताच्या सर्व दिशांत फिरून येतो. तत्कालीन भारतीय कुटुंबरचना, आध्यात्मिक वातावरण, संप्रदायाचे अधिष्ठान, मठाधिपती व त्याचे माहात्म्य, पितृसत्ताक समाजव्यवस्थेत स्त्रियांचे स्थान, स्त्रीचे लग्नाचे वय, बालविवाह, विधवांची जीवनपद्धती इत्यादी अनेक घटकांवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे या ग्रंथातून प्रकाश पडतो.

हेही वाचा >>> गांधीजींच्या सहवासाचा अनुभव

अतिशय संशोधनपूर्ण केलेल्या या ग्रंथाच्या समारोपात लेखिका लिहिते, ‘स्त्रीचे जे मिथक शेकडो वर्षांच्या हातांनी घडत गेले होते, त्या मिथकात या विरागिनींनी आत्मानुभूतीचा नवा प्राण भरला आणि त्यामुळे निर्माण झालेल्या प्रचंड ऊर्जेच्या लोटात त्या मिथकांचा जुना साचा संपूर्ण वितळून गेला.’ तो कसा वितळत गेला हे मुळातून वाचणे गरजेचे आहे. संशोधक, अभ्यासक, वाचक यांच्यासाठी मध्ययुगीन कालखंडाची भारतीय विरागिनींची प्रवासगाथा  महत्त्वपूर्ण आहे.

‘भारतीय विरागिनी’ – अरुणा ढेरे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, पाने- ४६४, किंमत- २३२ रुपये.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Book review bhartiya viragini book by author aruna dhere zws

First published on: 15-10-2023 at 01:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×