अरविंद वैद्य लिखित ‘नंदादीप- आठवणीतल्या साठवणी’ हे पुस्तक नंदादीप शाळा, शाळेभोवतालचा परिसर, शिक्षक, कर्मचारी वर्ग, विद्यार्थी, पालकवर्ग, शाळेतील अभ्यासपूरक उपक्रम, शाळेला नावारूपास आणण्यासाठी केलेली धडपड, कष्ट याबद्दलचे एक प्रामाणिक भाष्य आहे. या पुस्तकातील लेख १५ वर्षांपूर्वी पुण्याच्या ‘पालकनीती’ या मासिकात लेखमालेच्या स्वरूपात प्रसिद्ध झाले होते. १५ वर्षांत शिक्षणक्षेत्रात बराच फरक झाला. तो लक्षात घेऊन या लेखांमध्ये भर घालावी असे वैद्य यांनी ठरवले. त्यामधून हे पुस्तक आकाराला आले, असे वैद्य यांच्या प्रस्तावनेमधून लक्षात येते.
या पुस्तकाचे स्वरूप काहीसे आत्मकथनपर आहे. नंदादीप या शाळेच्या मुख्याध्यापक पदावर अरविंद वैद्य १९७४ ते १९८९ अशी पंधरा वर्षे कार्यरत होते. त्यांनी जेव्हा मुख्याध्यापक पदाची जबाबदारी स्वीकारली त्या वेळी शाळेची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. अनेक समस्या होत्या, आर्थिक अडचणी होत्या. या सर्वावर मात करण्याचा प्रयत्न करीत शाळा सुधारण्यासाठी, शाळेला नावारूपाला आणण्यासाठी केलेल्या धडपडीचे प्रामाणिक निवेदन पुस्तकभर आढळते. अरविंद वैद्य यांनी शाळा नावारूपाला आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले, ते करताना त्यांना जे अनुभव आले, जी माणसे भेटली त्या सर्वाविषयीचे वर्णन या पुस्तकात दिसून येते. त्याकडे आज बघताना त्या अनुभवांबद्दल, प्रसंगांबद्दल, प्रयत्नांबद्दल जे काही जाणवते, वाटते त्याचे परखड विवेचनदेखील त्यांनी केले आहे.
‘शिक्षणाचा आत्मा’, ‘परिवर्तनाचे आव्हान’, ‘करवतीची आपली बाजू’, ‘मला भेटलेले शासकीय अधिकारी’, ‘मला भेटलेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी’, ‘मला भेटलेले पालक’, ‘नंदादीप विद्यालयातील अभ्यासपूरक उपक्रम’ ही लेखांची शीर्षके पाहिली तरी आठवणीतील विविधता लक्षात येते. मुख्याध्यापक पदाच्या वाटचालीतील अनेक प्रसंग आणि आठवणी या लेखांमधून आपल्यासमोर येतात.
सुरुवातीला प्रसंगाचे निवेदन, त्यानंतर त्या प्रसंगी मुख्याध्यापक म्हणून स्वत: घेतलेला निर्णय आणि त्याचा झालेला परिणाम नोंदवणे आणि त्यानंतर आज मागे वळून बघताना त्या निर्णयाबद्दल काय वाटते याविषयी परखड विवेचन आणि तसे करताना हा सर्व अनुभव शिक्षण प्रक्रियेशी जोडून घेणे असे साधारणपणे या लेखनाचे स्वरूप दिसते.
बिकट परिस्थितीतून वाट काढत अरविंद वैद्य यांनी पहिल्या एक-दोन वर्षांतच ही शाळा नावारूपाला आणली. असे असूनही याविषयीचा कोणताही अहंकार त्यांच्या लेखनात आढळत नाही. वेगवेगळ्या प्रसंगी त्यांनी जे निर्णय घेतले त्याचे कुठल्याही प्रकारे त्यांनी समर्थन केलेले नाही. याउलट ‘शिक्षक म्हणून फारसा अनुभव नसताना २७-२८ व्या वर्षी मी जे काही केले ते त्या त्या वेळी समोर आलेल्या प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी केले’, अशी प्रामाणिक नोंद वैद्य करतात.
यातील काही लेख विद्यार्थ्यांविषयीचे, काही शिक्षक व पालक यांच्र्याविषयीचे तर काही अन्य व्यक्र्तींविषयीचे आहेत.
‘परिवर्तनाचे आव्हान’, ‘मी फोडलेला एक यशस्वी संप’, ‘नंदादीपमधील देव, भुते आणि मी’, ‘मी हाताळलेली नंदादीपमधील प्रेमप्रकरणे’, ‘ज्ञानेश्वर आणि पखालीचा रेडा’ या लेखांमधून त्यांनी विद्यार्थ्यांचे विशिष्ट वयांशी संबंधित वर्तन, त्यामागील मानसिक समस्या, बेशिस्त वागणे, त्यातून निर्माण होणारे विविध प्रश्न अशा अनेक विषयांची चर्चा केली आहे.
मुलांच्या बेशिस्त वर्तनासंबंधात आणि त्यांना शिक्षा देण्यासंदर्भात ते म्हणतात- ‘बालमानसशास्त्राचे नियम सरसकट सर्व मुलांना लावणे चूक आहे. शारीरिक शिक्षेलाही एक निश्चित स्थान आहे. विद्यार्थ्यांच्या सर्व चुका समान मापाने मोजायच्या नसतात. स्वत:चे नुकसान ज्यामुळे होते त्याला चूक म्हणता येते, पण जाणीवपूर्वक इजा पोहोचविण्याची कृती हा गुन्हा मानला पाहिजे.’
‘परिवर्तनाचे आव्हान’, ‘मी फोडलेला यशस्वी संप’ आणि ‘करवतीची आपली बाजू’ हे लेख मुलांचे बेशिस्त वर्तन व ते सुधारण्यासाठी वैद्य यांनी केलेले सकारात्मक कल्पक प्रयत्न यांची उदाहरणे आहेत. शाळेतील शिक्षिकेच्या संदर्भात बेशिस्त वर्तन करणाऱ्या मुलांना ते शाळेतून कमी करतात, पण त्याच वेळी दुसऱ्या शाळेत त्यांना प्रवेश मिळेल याचीदेखील तजवीज करतात. ‘मला त्यांना सुधारायचे होते. अद्दल घडविणे हा काही माझा उद्देश नव्हता,’ असे स्पष्टीकरण ‘परिवर्तनाचे आव्हान’ या लेखात दिले आहे.
‘नंदादीपमधील देव, भुते आणि मी,’ या लेखात मुलांच्या विचित्र वागण्यासंबंधीचे काही प्रसंग आहेत. एका मुलाला तीन डोळेवाला माणूस त्रास देत असे, एका मुलीच्या अंगात येत असे, तर एका मुलाला काम करताना अचानक उन्माद आला. या प्रसंगी वैद्य यांनी कधी धमकावून, माराचा धाक दाखवून, तर कधी डॉक्टरी उपाय करून त्या त्या वेळी मार्ग काढला. आज या प्रसंगांकडे बघताना त्यांना असे वाटते की, आपण ही प्रकरणे हड्डेलहप्पीपणे हाताळली आणि ती तेवढय़ापुरती दबली गेली. परंतु ते योग्य नव्हते. विचित्र वागणाऱ्यांना झोडले की ती वठणीवर येतात, असे त्या वेळी त्यांना वाटत असे. पण स्वत:च्या वागण्याचे समर्थन न करता हे प्रसंग हाताळण्याची आपली पद्धत चुकीची होती असे वैद्य प्रांजळपणे कबूल करतात. मुलांच्या मानसिक समस्यांसंदर्भात पालक व शिक्षक यांनी मुलांना समजून घेऊन त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. ‘माझ्या वर्गातली मुले ही माझी आहेत’ अशीच भावना प्रत्येक शिक्षकाची असली पाहिजे, असे वैद्य यांना वाटते. प्रत्येक शाळेत मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशक यांची आवश्यकता आहे, असेही त्यांनी आग्रहाने नोंदवले आहे.
‘मी हाताळलेली प्रेमप्रकरणे’ या लेखात वयात येणाऱ्या मुलामुलींना समजून घेऊन, किशोरवयात भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल तयार होणाऱ्या आकर्षणाचे, कुतूहलाचे स्वरूप लक्षात घेऊन हाताळलेल्या प्रकरणांचा उल्लेख आहे. या लेखाच्या शेवटी वैद्य यांनी केलेली एक टिप्पणी अतिशय महत्त्वपूर्ण व शालेय जीवनात गरजेची आहे- ‘शाळेतील शिक्षकांनी जबाबदारीने अशी प्रकरणे हाताळली पाहिजेत. या संदर्भात लैंगिक शिक्षण, खुल्या मोकळ्या चर्चाची गरज आहे’ असे त्यांचे म्हणणे आहे. ‘आपल्या समाजात आईवडील खूप आहेत, पण पालक कमी आहेत. तिथे शिक्षकालाच पालक व्हावे लागते,’ असे म्हणताना वैद्य शिक्षकांना सहजपणे अधिक जबाबदारीची जाणीव करून देतात.
त्यांना भेटलेले, त्यांच्या संपर्कात आलेले शासकीय अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, पालकवर्ग यांच्याविषयी वैद्य यांनी आत्मीयतेने आणि तितक्याच परखडपणे लिहिले आहे. आपण शाळेला नावारूपाला आणू शकलो याचे श्रेय त्यांनी आपल्या या सर्व सहकाऱ्यांना दिले आहे.
शेवटचा लेख ‘अभ्यासपूरक उपक्रम’ असा आहे. या लेखात सुरुवातीला वैद्य यांनी केलेले भाष्य महत्त्वाचे आहे- ‘गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा व शाळांच्या दर्जाबाबतच्या भ्रामक कल्पना यामुळे हे महत्त्वाचे उपक्रम दुर्लक्षित होत आहेत. अभ्यासपूरक उपक्रम हे खरे तर कुमारवयीन वयातील अतिरिक्त ऊर्जा, सृजनशील पद्धतीने प्रवाही करण्यासाठी व निकोप वाढीसाठी महत्त्वाचे आहेत.’ या लेखामध्ये नंदादीप शाळेतील अनेक उपक्रमांचे वर्णन आढळते. या उपक्रमांचे स्वरूप पाहिले असता वैद्य यांची मुख्याध्यापक म्हणून असलेली कल्पकता व मुलांच्या सर्वागीण विकासासाठी असलेली जागरूकता लक्षात येते. शाळेतील उपक्रमांचे मूल्यमापन करताना शाळा व विद्यार्थी यांचा दर्जा ठरवताना आजही ‘हेड’चाच विचार प्रामुख्याने केला जातो याची त्यांना चिंता वाटते.
‘गणित-विज्ञान-समाजशास्त्र आणि भाषा या विषयांचे महत्त्व मी मान्य करतो, पण जीवन जगायला फक्त एवढेच विषय लागतात असे नाही. हे विषय ज्यांना येत नाहीत ते जीवनाच्या दृष्टीने बाद होतात असे नाही.’ किंवा ‘श्रमप्रतिष्ठा, ज्ञानाचे उपयोजन इ. गोष्टी भाषणात आणि पाठय़क्रमातच राहतात. त्यामुळे शिक्षणातील आत्माच आपण हरवून बसतो, असे मला वाटते’, यांसारखी स्पष्ट मते वैद्य यांची शिक्षणाबद्दलची व्यापक भूमिका दर्शविणारी आहेत. या भूमिकेतून प्रत्येक लेखाच्या शेवटी वैद्य यांनी केलेली टीका, टिप्पणी आजच्या शिक्षणपद्धतीच्या संदर्भात महत्त्वाची ठरते. शिक्षणव्यवस्थेत झालेल्या बदलांचा आलेखदेखील या लेखांमधून लक्षात येतो. या दृष्टीने शिक्षक, पालक, शाळेशी संबंधित सर्व व्यक्तींनी वाचावे असे या पुस्तकाचे स्वरूप बनले आहे.
या पुस्तकामधून अरविंद वैद्य यांचा आत्मविश्वास, स्पष्टवक्तेपणा, सकारात्मक व्यावहारिक दृष्टिकोन, मेहनती स्वभाव, करारीपणा, सच्चेपणा दिसून येतो. शिक्षणपद्धती, विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, मानसिकता, विद्यादान, प्रामाणिकपणा, सच्चेपणा या मूल्यांची शिक्षण क्षेत्रात असलेली गरज अशा विविध मुद्दय़ांचे नेमक्या शब्दांत प्रांजळपणे केलेले भाष्य कधी हळवे बनवणारे, तर कधी स्मितरेषा उमटवणारे, सकारात्मक विचार करायला भाग पाडणारे आणि म्हणूनच हृदयाला भिडणारे आहे.
‘नंदादीप- आठवणीतल्या साठवणी’ – अरविंद वैद्य,
नंदादीपीय-माजी विद्यार्थी व माजी शिक्षक संघटना, मुंबई,
पृष्ठे – १६०, मूल्य – १०० रुपये.