‘‘आई, ए आई, कुठे आहेस तू!’’ मिताली आईला शोधत होती.
‘‘अगं मिनू, इथे स्वयंपाकघरात आहे. काय हवंय तुला?’’
‘‘आई, मिनू नाही हं… मि…ता…ली! तू चैत्रगौरीचं हळदीकुंकू कधी करणार आहेस? येत्या शुक्रवारी का?’’ मिताली विचारू लागली. ‘‘शुक्रवारी नाही बाळा… मी शनिवारी करणार आहे. दुपारी जरा तयारी करता येईल. शुक्रवारी करायचं म्हणजे ऑफिसला निदान अर्धा दिवस सुट्टी घ्यावी लागेल ना!’’ आई थोडीशी वैतागूनच म्हणाली.
‘‘चालेल… मलाही वेळ मिळेल.’’ मिताली हसत म्हणाली.
‘‘तुला गं काय करायचं आहे विशेष?’’ आईनं आश्चर्यानं विचारलं.
‘‘एक गंमत आहे… या वेळी तुझ्या आणि माझ्या मैत्रिणींसाठी मी फिक्या जांभळ्या रंगाचं पन्हं बनविणार आहे!’’
‘‘काहीतरी प्रयोग करू नकोस हं माझ्या मैत्रिणींवर!’’ लटक्या रागानं आई म्हणाली.
‘‘कोणतेही रंग घालायचे नाहीत पन्ह्यामध्ये, आधी सांगून ठेवते.’’ आईनं तंबी दिली.
मिताली म्हणाली, ‘‘आई… मी असं करेन का? अगदी नैसर्गिक रंग वापरणार आहे. मी तसं जांभळ्या रंगाचं पन्हं बनवेन. मी स्वत: तुला पिऊन दाखवेन, मग तू पी. खात्री कर आणि मगच मैत्रिणींना दे. चालेल ना?’’
आई गालातल्या गालात हसत म्हणाली. ‘‘जसा हुकूम मिताली मॅडम!’’
दोन – तीन दिवस रोजच्या गडबडीत गेले. शेवटी शनिवार उजाडला. अर्थात मितालीच्या आईची तयारी त्याआधी दोन दिवस चालू होती. हरभरे भिजत घातले, ओटी भरण्याकरिता हवे होते ना! आदल्या दिवशी चण्याची डाळ भिजत घातली. आदल्या दिवशीच तिनं पन्हं तयार करून ठेवलं. अर्थात दाटसा गर तयार ठेवला. आयत्या वेळी हवं तेवढं बनवायचं. शनिवारी सकाळपासून मितालीच्या आईची धांदल उडाली. रोजचा स्वयंपाक आणि मग हळदी- कुंकवाची तयारी. थोड्या वेळानं मितालीची ही गडबड चालू झाली. तिनं आईच्या नकळत निळ्या रंगाचं पाणी बनवलं. आईला म्हणाली, ‘‘तुझं पन्हं तयार आहे ना, दे मला.’’
थोडंसं पन्हं ग्लासमध्ये घेऊन त्यात हे निळं पाणी घातलं. चमच्यानं चांगलं ढवळलं. एवढं सुंदर फिकट जांभळ्या रंगाचं पन्हं तयार झालं. तिनं थोडं छोट्या ग्लासमध्ये घेतलं आणि प्यायलं. आईला म्हणाली, ‘‘आता हे तू पी.’’
प्यायल्यावर आई म्हणाली, ‘‘हे तर पन्ह्यासारखंच लागतंय. म्हणजे चवीत बदल झालेला नाही. हे कसलं आहे निळ्या रंगाचं पाणी मिताली?’’
मिताली म्हणाली, ‘‘सर्व मैत्रिणी आल्या की सांगेन तेवढ्या वेळ हे गुपित मी असंच ठेवते. तुझी हरकत नाही ना?’’
‘‘काही हरकत नाही बाळा!’’ असं म्हणत आई कामाला लागली.
संध्याकाळी सगळ्या मैत्रिणी आल्या. सगळ्याजणी मितालीच्या आईला म्हणाल्या, ‘‘अगं केतकी, तू चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाला पन्ह्यावर फुली मारलीस? हे कोणतं सरबत बनवलंस?’’
केतकी म्हणाली, ‘‘अगं, आधी पिऊन तर बघा. आमच्या मितालीनं बनवलं आहे.’’
सगळ्याजणी आश्चर्यचकित झाल्या. ‘‘केतकी, हे तर पन्हंच आहे. मग हा जांभळा रंग कुठून आला? रंग घातलास की काय? अगं, हे खायचे रंग वापरायचे नसतात. आरोग्याला हानीकारक असतात.’’
एक ना दोन… सगळ्यांच्या टीका-टिप्पण्या चालू झाल्या. त्यावर केतकी म्हणाली ‘‘अगं मलाही तुम्हा सर्वांच्या आरोग्याची काळजी आहे. मिताली, सांग तू आता, काय केलंस ते?’’
मिताली सर्वांना उद्देशून म्हणाली, ‘‘मावशी, घाबरू नका. हा नैसर्गिक रंग आहे. गोकर्णच्या फुलांपासून निळा रंग मिळवला. आमच्याकडे गोकर्णाचा वेल आहे. मी त्याची बरीच फुलं साठवली. उन्हात वाळवली. आता पाणी उकळवून त्यात गरजेप्रमाणे थोडी फुलं टाकली. त्यांचा निळा रंग पाण्यात उतरला. पन्ह्यामध्ये साधं पाणी घालण्याऐवजी हे निळं पाणी घातलं. कैरी आंबट असते ना… त्यामुळे रंग बदलला.’’
सगळ्यांना मितालीचं एवढं कौतुक वाटलं. मिताली खूप चतुर होती. तिनं फुलांप्रमाणेच गोकर्णाच्या बियाही साठवून ठेवलेल्या होत्या. त्या तिनं आईला सर्वांना द्यायला सांगितल्या.
मितालीची आई खूप खूश झाली. ती मितालीला म्हणाली, ‘‘मिताली, या वर्षीचं हळदीकुंकू चांगलंच लक्षात राहील. नैसर्गिक रंग आणि बीजप्रसार… शाब्बास!
nandaharam2012@gmail.com