अभिजीत ताम्हणे abhijeet.tamhane@expressindia.com

राणीबागेतील डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाला यंदा दीडशे वर्षे होत आहेत, तर फोर्टमधील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाची शंभरी साजरी होत आहे. या दोन्ही संग्रहालयांचा इतिहास हा मुंबई आणि भारताच्या घडणीचाही इतिहास आहे. या वास्तूंच्या प्रदीर्घ अस्तित्वानिमित्ताने..

virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
Statue, Shivaji Maharaj, Assam,
आसाममध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा, चीनच्या सीमेवर २१ पॅरा स्पेशल फोर्समध्ये अनावरण, साताऱ्यातील सुपुत्राचा पुढाकार
Five thousand prisoners who were released on parole during the Corona period are outside the prison
करोनाकाळात ‘पॅरोल’वर सुटलेले पाच हजार कैदी कारागृहाबाहेरच
map
भूगोलाचा इतिहास: तो प्रवास अद्भूत होता!

मुंबईच्या राणीबागेतल्या भाऊ दाजी लाड संग्रहालयाची १५० र्वषे, तर गेटवे ऑफ इंडियापासून चालत जाता येईल इतक्या जवळच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’ची (आधीचं नाव ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम’) १०० वर्ष  असे योग २०२२ मध्ये येण्याच्या आधीच करोना टाळेबंदीचा काळ सुरू झाला. मग ‘आता संग्रहालयांनीही बदलायला हवं’ वगैरे सूर लावणारे वेबिनार दीडेक वर्षांपूर्वी झाले. आता पुन्हा संग्रहालयं सुरू झालीत. माणसं येताहेत. डिजिटल-बिजिटल कितीही वाढलं तरी प्रत्यक्ष जाऊन काहीतरी पाहण्यातून जो अनुभव येतो, त्याचं महत्त्व शाबूत आहे. ते का आणि कशामुळे? यामागची कारणं म्युझियमशी संबंधित असतातही; पण आधी ही कारणं आपल्यामध्येच असतात. पडद्यावर पाहिलेल्या अनुभवानं जर लोक सुखावत असते तर ‘कश्मीर की कली’ आणि तत्सम कैक हिंदी सिनेमे पाहिल्यावरही  लोक काश्मीरला कशाला गेले असते? प्रत्यक्ष संग्रहालयात जाऊन काहीतरी पाहण्यामागे ‘आपल्या आतमध्ये असलेली कारणं’ कोणती, याचा शोध इथं घेऊ. त्या शोधाची सुरुवात जरी स्वत:पासून असली तरी जास्तीत जास्त लोकांना जो अनुभव येतो, येईल, यावा अशाच अनुभवाची मांडणी करण्याचा प्रयत्न इथं केला आहे.

पॅरिसच्या जगप्रसिद्ध आणि २२९ वर्ष जुन्या लूव्र संग्रहालयात पहिल्यांदा गेलो १९९५ च्या ऑक्टोबरात. तिकीट वगैरे काढलं आणि आत जाता जाताच ‘मोनालिसासाठी इथे वळा’ अशा पाटय़ा दिसू लागल्या. अजून प्रत्यक्ष संग्रहालयाची दालनं सुरू होण्यापूर्वीच तसल्या दोन पाटय़ा दिसल्यावर वैतागलोच. ‘ज्या संग्रहालयात बोतिचेल्लीचं ‘व्हीनसचा जन्म’ आहे, मोनेचं ‘हिरवळीवरील भोजन’ हे चित्र आहे, तिथं फक्त मोनालिसाचे देव्हारे का माजवताहेत? की धंदा करताहेत मोनालिसाच्या नावानं?’ असं काहीबाही वाटू लागलं. डोक्यात असा संताप असताना पायांनी मात्र मोनालिसाचीच वाट धरल्याचं लक्षात आलं तेव्हा थरथरू लागलो आणि त्या संगमरवरी जिन्यातच मट्कन बसलो. ‘का होतंय हे? जे चित्र आपल्याला इयत्ता आठवीत असल्यापासून माहीत आहे, ज्याच्या अनेक प्रती पाहिल्यात, तेच कशाला पाहायचंय?’ असे प्रश्न स्वत:ला विचारण्यासाठी ती बसकण आवश्यक होती.

‘प्रत्यक्ष अनुभवाची आस’ हे या प्रश्नांचं उत्तर त्याक्षणी तरी हेलावून टाकणारं होतं. डोळ्यांच्या कडांना आलेलं पाणी पुसतच त्या जिन्यावरून उठलो. ‘हिरवळीवरील भोजन’ पाहिलंच, पण सहजपणे जिथं जाता आलं ती मोनालिसा आधी पाहिली.

नंतर पुन्हा २०१३ साली लूव्रमध्ये गेलो तेव्हा सुरुवातीलाच तिथं असलेलं ‘व्हीनस डि’मिलो’ हे जगप्रसिद्ध शिल्प पाठमोऱ्या अवस्थेत आणि जणू चिंध्यांच्या ढिगाऱ्यात ही व्हीनस शिरते आहे असं दृश्य दिसलं. असलं काहीतरी पाहिल्यावर काय करायचं हे तोवर- मुंबईतल्या संग्रहालयांच्या अनुभवामुळे- माहीत झालेलं होतं. ‘हे हल्लीच्या कोणत्या तरी दृश्यकलावंताचंच काम आहे.. कोण तो?’ हे बघण्यासाठी फक्त लगतची पाटी वाचावी लागली. ते होतं इटालियन दृश्यकलावंत पिस्टोलेटो यांनी १९६७ पासूनच कुठे ना कुठे प्रदर्शित केलेलं काम! व्हीनसला ‘चिंध्यांची देवी’च करून टाकलं होतं संकल्पनात्मक कलेतल्या या इटालियन दादा माणसानं.. तरी बरं की, ही प्रतिकृती होती. पण ‘खरी’ ‘व्हीनस डि’मिलो जिथं आहे तिथंच हे होण्याचा धक्का आधी डोळ्यांपुरता असला तरी नंतर तो नैतिक, तात्त्विकसुद्धा असतो..  संग्रहालयातल्या वस्तूंबद्दल आपली काहीएक ‘पावित्र्य’ वगैरे कल्पना असते, तिलासुद्धा हा धक्का असतो.

असाच धक्का जितीश कलाटनं आपल्या मुंबईच्या भाऊ दाजी लाड संग्रहालयात २०१० सालच्या फेब्रुवारीत दिला होता. राणीच्या बागेतलं हे संग्रहालय ‘मुंबईविषयीचं संग्रहालय’ म्हणून महत्त्वाचं आहे. सात बेटांपासूनच्या मुंबईचे बदलते नकाशे (तेही उठावाचे- म्हणजे त्रिमित!) इथं आहेत. मुंबईतल्या ‘अठरापगड’ लोकांचे पगडय़ांसकट प्रातिनिधिक पुतळे आहेत आणि ब्रिटिशांच्या वसाहतवादी दृष्टिकोनातून बनवले गेलेले, पण आजच्या मुलांना ‘असे जगत होतो आपण’ अशी माहिती देण्यासाठी खूप उपयोगी पडणारे छानसे छोटे छोटे देखावेही आहेत. ‘कुरघोडी’, ‘पाणी शेंदणे’ अशा मराठी शब्दांचे अर्थ या देखाव्यांमुळे जिवंत होतात! तर जितीश कलाटनं २०१० मध्ये त्याला याच संग्रहालयात प्रदर्शनाची संधी मिळाली तेव्हा काय केलं? त्यानं त्याच्या बऱ्याच कलाकृती मांडल्याच, पण त्या देखाव्यांप्रमाणेच छोटय़ा छोटय़ा पुतळ्यांचा वापर करून एक नवाच देखावा घडवला. त्याचं चित्र या मजकुरासोबत असल्यामुळे हा दगडफेकीचा देखावा होता, हे लक्षात आलंच असेल. पण ‘अँगर अ‍ॅट द स्पीड ऑफ फ्राइट’ (भीतीच्या वेगाने येणारा संताप) या नावानं पुढे ती कलाकृती अन्यत्रही प्रदर्शित झाली. १९९२ सालची मुंबई दंगल हा जितीशप्रमाणेच अनेकांच्या अनुभवांचा भाग. ‘तुरळक दगडफेकीचे प्रकार’ तर भारतीय निमशहरांमध्ये आजही नेहमीचेच. जुन्या काळच्या जगण्यातले ‘नेहमीचे अनुभव’ मांडणाऱ्या देखाव्यांमध्ये जितीशनं त्याची कलाकृती घुसवली असं काहीच इथं झालं नव्हतं. उलट, त्या जगण्याला त्यानं त्याच्या जगण्याची जोड दिली होती!

जितीशला भाऊ दाजी लाड संग्रहालयातल्या त्या वैशिष्टय़पूर्ण देखाव्यांपासूनच स्फूर्ती मिळाली होती; पण शकुंतला कुलकर्णी यांची गोष्ट आणखी वेगळी. वेतापासून (बांबूचा प्रकार) बनवलेले शोभिवंत, स्त्रण दिसणारे; पण जणू चिलखतासारखे भासणारेपोशाख ही त्यांची कलाकृती. स्त्रीचं नटणं, तिचं ‘संरक्षण’ आणि ‘नटणं/ इतरांचं भय असणं’ याचा स्त्रीभोवती असणारा िपजरा अशा कल्पना या कलाकृतीमागे होत्या. पण ही कलाकृती छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात प्रदर्शित करण्याचं निमंत्रण त्यांना २०१२ मध्ये मिळालं तेव्हा त्यांनी अट घातली- ‘या संग्रहालयातली शस्त्रं, चिलखतं, इथले अलंकार अशा वस्तू जिथं आहेत तिथंच माझ्या या कलाकृती दाखवायच्या.’ ही अपेक्षा काही अंशी पूर्णही झाली. मग त्या प्रदर्शनापुरती पुरुषी चिलखतंसुद्धा तकलादू वाटू लागली होती!

समकालीन म्हणजे हल्लीच्या दृश्यकलावंतांना वस्तुसंग्रहालयांनी खास निमंत्रण देणं हा प्रकार आपल्याकडे दशकभराहूनही जुना आहे. नव्या-जुन्याचं हे एकत्रिकरण पाहताना येणारे अनुभव मात्र नेहमीच नवेकोरे असतात.

शिवाय काही वेळा असं होतं की, दृश्यं जुनीच जरी असली तरी त्यांचा अनुभव आजचा असतो. नवा असतो. हे आज संग्रहालयं अगदी आवर्जून करतात. म्हणजे काय?

‘आई, हिनं मला चिमटा काढला’ अशी धाकटीची तात्काळ तक्रार करणारी ताई प्रौढ होते, दोघी बहिणी माहेरी भेटतात तेव्हा चिमटे काढण्याची आठवण हसत हसत काढतात आणि भगिनीभाव वाढतो. नातं मुरतं. आपलं इतिहासाशी असलेलं नातं असंच मुरवण्याचा चंग जणू संग्रहालयांनी बांधलाय. त्यात ‘भाऊ दाजी लाड संग्रहालय’ आणि ‘ छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय’ ही मुंबईची संग्रहालयं आहेतच, पण जगभरातलीच संग्रहालयं सध्या हे करताहेत. बरं, फक्त हल्लीच्या चित्रकारांना निमंत्रणं देऊनच हे घडतंय असंही नाही. या संग्रहालयांनी आपल्याकडे येणारा प्रेक्षक ‘आजचा’ आहे हे पुरेपूर ओळखलंय. त्यामुळे उद्या हस्तिदंती वस्तूंचं विशेष प्रदर्शन जरी लावलं तरी हस्तिदंताचा चोरटा व्यापार, त्यावरली बंदी आणि म्हणून अमुक सालची कलाकृती ही अखेरच्या उपलब्ध कलाकृतींपैकी असणं- याचीसुद्धा माहिती देतील आजची संग्रहालयं. किंवा बुद्धप्रतिमांचं प्रदर्शन लावलं तर गांधार शैलीतल्या बुद्धशिल्पांशेजारी जपानपासून ते तथाकथित ‘बुद्धावतारा’पर्यंतच्या प्रतिमाही असू शकतील. त्यातून बुद्धाइतका माणसाचा ‘आपलंसं’ करून घेण्याचा स्वभावसुद्धा दिसेल.  छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये आता तर वस्त्रदालन, नाण्यांचं दालन अशा दालनांनंतर पहिल्या मजल्यावरची तीन दालनं (क्युरेटर्स गॅलरी, प्रेमचंद रायचंद गॅलरी आणि जहांगीर निकल्सन गॅलरी) बदलत्या प्रदर्शनांसाठीच राखीव असतात. यापैकी प्रेमचंद रायचंद गॅलरी २००६ साली उघडली. पहिलंच प्रदर्शन होतं- मुंबईचा व्यापारविकास कसा होत गेला याविषयीचं. त्यामध्ये ‘प्रेमचंद रायचंद हेही अफूचा व्यापार करीत. हे त्यांचे चीनहून अफू आणून युरोपात विकणारे जहाज’ अशा वर्णनाशेजारची दृश्यं पाहून इतिहासाच्या डोळ्याला डोळा भिडवल्याचा अनुभव आला होता!

 छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय हे एकंदर २६ दालनांचं आहे. त्यामानानं भाऊ दाजी लाड संग्रहालय लहानच. पण त्याच्या कार्यकारी संचालक तस्नीम मेहता यांनी मागच्या जागेत मोठं सांस्कृतिक केंद्र उभारण्याचा बेत आखला आहे. जगभरच्या वास्तुरचनाकारांची एक स्पर्धाही झाली होती त्यासाठी. पण त्याला जबर विरोध असल्यानं ते बारगळतंय. ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय वाढणार कसं?’ ‘आम्ही आकारानं नाही वाढणार, गुणवत्तेनंच वाढावं लागेल..’ असं या संग्रहालयाचे संचालक सव्यसाची मुखर्जी नेहमी सांगत असतात. ‘शंभराव्या वर्षी आम्ही पुढल्या १०० वर्षांचा विचार करतो आहोत. हे संग्रहालय ‘सरकारी’ नाही, ते मुंबईच्या लोकांनी उभारलंय. या इतिहासाची जाणीव ठेवून आम्ही सार्वजनिक पािठबा वाढवत राहू. निसर्गइतिहासापासून ते डच चित्रकला आणि चिनी कलावस्तू असं वैविध्य जपणारं संग्रहालय तर हे आहेच; त्या वैविध्याचीही बूज राखू. आणि मुख्य म्हणजे ‘विचारांचं आणि संकल्पनांचं ठिकाण’ होण्याचा प्रयत्न आम्ही करू..’ असं या संग्रहालयानं ठरवल्याची माहिती इथल्या संपर्क प्रमुख जयती राय यांनी दिली. आहे तोच परिसर अधिकाधिक पर्यावरणनिष्ठ करणं, आतल्या संशोधन सोयी वाढवणं आणि जगभरच्या संशोधक तसंच संग्रहालयांशी सहयोग करणं याचा वेग शंभरीनंतर वाढेल, असं त्या म्हणाल्या. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचं तिकीट कमी. शिवाय सतत इंग्रजी-मराठी कार्यक्रम इथं होत असतात. त्यामुळे इथं येणाऱ्यांत मुंबईकर अधिक असतात.  छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात मात्र बस भरून मुंबई पाहायला येणारेच अधिक दिसतात. हेही चित्र हळूहळू बदलेल. मुंबईकर आणि पर्यटक दोन्ही ठिकाणी जाऊ लागतील. पण इथं काहीतरी नवनवीन घडतंय याची कल्पना त्यांना आली तर! संग्रहालय जरी एकदाच पाहिलं तरी त्यातलं काहीतरी लक्षात राहतं जन्मभर.. हा अनुभव वारंवार आला तर मजाच. पण त्यासाठी आपण आपला किरकिरेपणा कमी करायला हवा. ‘गूगलवर सगळं पाहता येणार हो..’ वगैरे ठीकच. (भाऊ दाजी लाड संग्रहालय हे ‘गूगल म्युझियम्स’वर आजही पाहता येतंच.) मात्र आपण कुठेतरी, कशाच्या तरी आत जाऊन काहीतरी पाहणं आणि त्याहीपेक्षा आपल्याला अनपेक्षित असं काहीतरी- दृश्य किंवा विचार- आपल्याला ‘दिसणं’ याचं महत्त्व मान्यच करायला हवं.