टु बी ऑर नॉट टु बी?
असावे की असू नये?
वाचकहो, हा एकच प्रश्न सध्या आम्हांस सतावतो आहे. म्हणजे-
जगावे या दुनियेत लोकलच्या डब्याला लटकत, की सोडून द्यावा दांडय़ावरचा हात?
की अखेरची इच्छा म्हणून खावे तुरीचे वरण आणि कवटाळावे रोजचेच मरण?
छ्छा! काहीच्या बाही होतेय हे..
पण तुम्हांस सांगतो, आजकाल कशात लक्षच लागत नाही. कशात मन रमतच नाही. आता तिकडे दिल्लीत, इकडे नागपुरात एवढे अधिवेशन चाललेय. माणसाने कसे उत्साहाने फुरफुरले पाहिजे या काळात! आमचे मंत्रालयवासी पत्रकारूनारू पाहा, अधिवेशन म्हटले की कसे रंगात येतात! मग कोणी अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रिमंडळ विस्ताराच्या पुडय़ा सोडून देतात, कोणी खांदेपालटाच्या चर्चा घडवून आणतात. आमचे एक सुमित्र तर अधिवेशनाची तारीख जाहीर झाली रे झाली, की अधिवेशनाचे कर्टन रेझर लिहायला घेतात- की या अधिवेशनात शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, वाढती महागाई अशा विविध मुद्दय़ांवरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करीत कामकाज रोखून धरण्याची रणनीती विरोधकांनी आखली असून, सत्ताधारी पक्षानेही आक्रमकपणे आपल्यावरील टीकेला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सर्व विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचे ठरविले असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
त्यांस आम्ही विचारले, की कसे काय बोवा कळते तुम्हांस हे महिनाभर आधीच? तर त्यांनी गालातल्या गालात हसत आमचा गालगुच्चा घेत दोन्ही डोळे अस्से मिचकावले!
अशा या अधिवेशनकाळात माणसाने कसे प्रात:समयी उठून सर्व पेपरे वाचून हापिसात जाऊन त्यावर ‘चर्चा का अखिल भारतीय कार्यक्रम’ केला पाहिजे, की जीएसटी बिल पास होण्यातच कसे राष्ट्राचे हित सामावले आहे! आता आपल्यासारख्यांना काही दोन्ही हात हलवत वचावचा बोलता येत नाही, हे मान्य. पण लंच अवरात घरची पोळी आणि कॅन्टीनचा दाल तडका खाताना, ‘मोदी बघा आता कसा डाव टाकतील ते.. ठरलेच आहे तसे..’ वगैरे चर्चा करण्यास काय हरकत आहे? अशा चर्चेने अन्नपचन चांगले होते हा अनेकांचा अनुभव आहे.
पण आम्हांला त्यात लवमात्र रस
वाटत नाही.
बरे, तिकडे ती एवढी महत्त्वाची पॅरिस परिषद सुरू आहे. तिथे आमचे परमनेते केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाशजी जावडेकर यांनी चक्क अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांच्याशी चर्चा केली. आमची शतप्रतिशत खात्री आहे, की केरी आता लवकरच पुण्याला येणार!

‘अहो, पर्यावरणाचं काय घेऊन बसलात जगाच्या? एकदा आमच्या पर्वतीवर येऊन पाहा.. अस्सं पर्यावरण अख्ख्या जगात नाही,’ असे सांगितल्यावर कोण येणार नाही?
पण कोणी येवो अथवा जावो, आम्हाला त्याचे काही म्हटल्या काही वाटेनासे झाले आहे.
जीवनातील आनंदच हरपल्यासारखा झाला आहे!
कशामुळे झाले असावे हे? कशाने रितेपण आले असावे हे?
रुपया घसरल्याने असे होत असेल का? छे! आपल्यासाठी रुपया तसाही एकदाच वर जातो. छापा-काटा खेळताना. बाकी मग नित्याची घसरणच!
मग गेल्या दोन महिन्यांत तुरीचे वरण खाल्ले नाही म्हणून?
की राज्यात दुष्काळ आहे म्हणून?
तेही नाही! दुष्काळ तिकडे पेपरात! इथे आपण तर स्मार्ट सिटीत राहतो!
मग अरे, हे चाललेय तरी काय?
आयुष्याला असे गच्चपण आल्यासारखे का वाटते आहे?
धौतीयोग तर रोज न चुकता घेतो आम्ही!
एक मात्र नक्की, की परवा ती बातमी ऐकेपर्यंत आम्ही तसे बरे होतो. पक्के आठवतेय, की रात्री टीव्हीवर अर्णब गोस्वामीचा कार्यक्रम लावला तर आम्ही पटकन् च्यानेल बदलला. म्हणजे तोवर आम्ही चांगले शुद्धीत होतो. पण मग कोण्या वृत्तरंजन च्यानेलावर आम्ही ती बातमी ऐकली आणि अचानक रिते रिते वाटू लागले.
वाटणारच ना? सरूआत्या आता लग्न करून जाणार या हप्त्यात. ती तरी किती दिवस अशी टंगळमंगळ करीत घालवणार? तेव्हा घरातील एक मेंबर कमी होणार. दुसरा मेंबर अजून येतोच आहे. युगे अठ्ठावीस झाली त्याला; पण अजून त्याने टँहॅ म्हटलेले नाही. तशीही जान्हवी जरा विसराळूच! मागे एकदा नवऱ्याला विसरली होती. आता बाळाला विसरली असेल. पण आज ना उद्या येईलच तिला आठवण. पण आता त्याचा काय उपयोग?
वाचकहो, कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, लवकरच ही मालिका बंद होणार आहे!
आमच्या आयुष्याचा आधार तुटणार आहे!
जिच्यावर आम्ही आमच्या अनेक संध्याकाळी ओवाळून टाकल्या, जिच्यापुढे बसून असंख्य रात्रभोजने घेतली, ती मालिका संपणार आहे.
नियती, तुझे नाव शशिकला, हेच खरे!
आता हे दयाघना,
कोणत्या मालिकेत आम्ही गुंतवायचा जीव?
कोणाच्या सुखदु:खात जिरवायच्या आमच्या रोजमर्राच्या वेदना?
काढलेस आमच्या डोळ्यांवरचे हे चकचकीत पडदे
तर कोणत्या नजरेने गिळायचा हा अंधार?
छॅं! हेही काहीच्या बाही होतेय..
अगदी ‘काहीही हं’ म्हणण्याइतके काहीही!
पण काय करणार?
सारे काही विसरून रात्री सुखाने चार घास मुखी जावेत यासाठी तरी पंगतीला त्या रात्रभोजनसोबती मालिका हव्यातच ना देवा!
अप्पा बळवंत
balwantappa@gmail,com

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
balmaifal article, story for kids, water literacy, Water importance, do not waste water lesson, story cum lesson for water, save water, kids and water, marathi article, loksatta article,
बालमैफल : जलसाक्षरता
Ram Navmi 2024 Ram Raksha Stotra Reading Benefits in Marathi
Ram Navami 2024 : जाणून घ्या ‘रामरक्षा’ अन् भगवान शंकराचा ‘हा’ संबंध; पाहा, दररोज रामरक्षा स्तोत्र म्हटल्याचे फायदे
deepak kesarkar
माझ्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल नाही! शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण