डॉ. विजय केळकर सरांची तुलना एखाद्या संस्थेशी केलेली ऐकली आणि अनेकांबाबत माझी जी भावना आहे ती पुन्हा उफाळून आली. ती भावना म्हणजे महाराष्ट्र सद्या:स्थितीत अत्यंत महत्त्वाच्या, व्यापक, अनेकांगी दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तीस ‘वाया’ घालवतोय. त्यांचा चांगला वापर करून घेत नाहीये. अलीकडे बुद्धिमानांकडे दुर्लक्ष करून सवंग-सुमारांना डोक्यावर घेण्याचा काळ आहे. त्यामुळेही असेल…

वैयक्तिक आयुष्यात ‘गुरू बिन कैसे गुन गावे…’ छापाची भजनवृत्ती दाखवणं मला कसंनुसं वाटतं. ‘गुरुचरणी लीन होणं’ वगैरे भाषा आणि ती करणारे झेपणं जरा अवघडच. हे असं उगाच गुरूवगैरेच्या खांद्यावर सतत माना टाकणारी ही मोठ्या वयाची माणसं आणि कडेवर घेतल्यावर डुगडुगणारी, मान न धरू शकणारी तान्ही बाळं दोन्ही सारखीच वाटतात मला. पण तरी हेही लक्षात येत असतं काही जणांच्या बाबत की ते किती आपल्याला छान शिकवून जातायत. अधिकृत, औपचारिक अंगाने अशी माणसं आपले गुरू नसतीलही, त्यांचं शिष्यत्व मिरवण्याची आपली प्राज्ञा नसेलही… पण तरीही या अशा काही माणसांमुळे आपल्याला शहाणं व्हायला मदत होत असते. या अशांमुळे आपली नजर स्वच्छ होत असते.

डॉ. विजय केळकर ‘सर’ हे माझ्यासाठी असे आहेत. खरं तर ते जेव्हा सरकारी सेवेत होते तेव्हा मी त्या विषयाची बातमीदारी करत नव्हतो. त्यांना कधी भेटलेलो नव्हतो. त्यांची मुलाखत वगैरे घेण्याचा प्रश्नच नव्हता. ते राजीव गांधी ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारांत काही महत हुद्द्यांवर होते. पण तेव्हा कधी त्यांचा संबंध आला नव्हता. पुढे वित्त आयोगाचे प्रमुख होते तेव्हाही केवळ त्यांच्याविषयी वाचून होतो. त्यांचं मोठेपण कोणाकोणाकडून कानावर यायचं. पण त्यांची ओळख तशी अलीकडची. तरी पंचवीसेक वर्षं झाली असतील. अशी ओळख होण्याआधी एका वेगळ्याच कारणानं डॉ. विजय केळकर ‘आयुष्यात’ आले.

एका माध्यम समूहाचे मालक त्यांच्या वर्तमानपत्रासाठी संपादकाच्या शोधात होते. मला काही ते माहीत असायचं कारण नव्हतं. शिवाय मी काही ‘लिंक्डीन’ वगैरे काय म्हणतात तिथंही नाही. तर त्यांनी एकदा भेटायला बोलावलं. ती व्यक्ती खूपच मोठी. त्यामुळे मी भेटीला न जायचं काही कारणच नव्हतं. गेलो. आगतस्वागत झाल्यावर ते म्हणाले, ‘‘…तुमचं नाव मला डॉ. केळकरांनी सुचवलं.’’ असं काही झालं की काय करायचं याचा जरा गोंधळच होतो. एक तर तोपर्यंत मी कधी डॉ. केळकरांना भेटलो नव्हतो. दुसरं म्हणजे समोरची व्यक्ती सांगतीये तशी शिफारस त्यांनी खरोखरच केली होती किंवा काय, हे कळायला काही मार्ग नव्हता. मी कसंनुसं हसून प्रसंग साजरा केला. नंतर अनेकदा डॉ. केळकरांच्या भेटी झाल्या. पण कधी त्यांना ‘त्या’ प्रसंगाबद्दल विचारावं वाटलं नाही. तसं करणं असभ्यपणाचं वाटलं.

अगदी अलीकडे एका आंतरराष्ट्रीय वृत्तसेवेच्या प्रमुखाचा फोन आला. त्यांना वेगवेगळ्या राज्यांत, त्यामुळे अर्थातच वेगवेगळ्या भाषांत स्थानिक वर्तमानपत्रांत विख्यात अभ्यासकांचं लिखाण यावं अशी इच्छा होती. त्याला डॉ. केळकरांनी महाराष्ट्रासाठी माझ्याशी संपर्क करायला सांगितला. मला हे माहीत नव्हतं. जेव्हा त्याला विचारलं, ‘‘बाबा रे, माझ्यापर्यंत कसं काय पोचलास?’’ तो म्हणाला, ‘‘डॉ. केळकरांसारखी व्यक्ती सांगत असेल तर आणखी चौकशी करण्यात कशाला वेळ घालवायचा? …वुई कन्सिडर हिम अॅज अॅन इन्स्टिट्यूशन…’’ तो असं म्हणाला आणि मला वरचा प्रसंग आठवला.

त्यानं केळकर सरांची तुलना एखाद्या संस्थेशी केलेली ऐकली आणि अनेकांबाबत माझी जी भावना आहे ती पुन्हा एकदा इथं उफाळून आली. ती भावना म्हणजे महाराष्ट्र सद्या:स्थितीत अत्यंत महत्त्वाच्या, व्यापक, अनेकांगी दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तीस ‘वाया’ घालवतोय. त्यांचा चांगला वापर करून घेत नाहीये. अलीकडे बुद्धिमानांकडे दुर्लक्ष करून सवंग-सुमारांना डोक्यावर घेण्याचा काळ आहे. त्यामुळेही असेल… स्टेट बँकेचे माजी प्रमुख मनोहर भिडे यांच्याप्रमाणे डॉ. केळकर सरही आता बहुतांश पुण्याला असतात. पुण्यात त्यांनी ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’ वगैरे सुरू केलंय. पण त्यांचा या वयातला उत्साह आणि आवाका लक्षात घेतला तर त्यांच्याकडून खरं तर बरंच काही काढून घेणं अजूनही राहिलंय. काय काय केलंय केळकर सरांनी आयुष्यात?

ते काही मूळचे सरकारी बाबू नाहीत. म्हणजे ‘आयएएस’ वगैरे नाहीत. मुळात ते शिक्षणाने अभियंते. मग अमेरिकेत अर्थशास्त्राचा अभ्यास. त्यातही तिथं त्यांचे मार्गदर्शक होते ते प्रिन्स्टन विद्यापीठातले डॉ. अविनाश दीक्षित. (त्यांच्यावर ‘प्रिन्स्टनचा प्रज्ञावंत’- असा लेख ‘लोकरंग’मध्ये (९ ऑक्टोबर २०१६) मी लिहिला होता.) तिथून मग केळकर सर थेट सरकारी सेवेत आले. आणि इथं बरंच काही केलं त्यांनी. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अॅण्ड पॉलिसी (एनआयपीएफपी) या विख्यात संस्थेचे ते अध्यक्ष होते, पायाभूत सोयीसुविधा उभारण्यातल्या ‘पीपीपी’ प्रारूप अभ्यास समिती त्यांच्या अध्यक्षतेखाली होती.

केंद्र-राज्यांत निधीवाटप निश्चित करणाऱ्या वित्त आयोगाचे ते प्रमुख होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कार्यकारी संचालक, केंद्रीय अर्थ खात्याचे मुख्य सचिव, केंद्रीय पेट्रोलियम खात्याचे सचिव, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सचिव इत्यादी इत्यादी. शिवाय संयुक्त राष्ट्रांच्या जिनिव्हा कार्यालयातल्या काही महत्त्वाच्या पदांचा अनुभव आहेच गाठीशी. सध्याच्या पंतप्रधानांचे एक सचिव अलीकडेच निवृत्त झाले. त्यांची उमेदवारी केळकर सरांच्या काळातली. यावरनं त्यांची ज्येष्ठता लक्षात येईल. आणि या सगळ्यांच्या पलीकडे दोन महत्त्वाचे परिचय.

पहिला म्हणजे मूळच्या निरोगी, सुदृढ, बाळसेदार अशा ‘जीएसटी’चे जनक ते. पंतप्रधानपदी असताना मनमोहन सिंग यांनी ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी केळकर सरांकडे सोपवली होती. आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचं प्रादेशिक असमतोलाचं भिजत घोंगडं वाळवायचं कामही त्यांच्याकडे दिलं होतं. पण केळकर सरांनी प्रस्तावित केलेला ‘जीएसटी’ प्रत्यक्षात येईपर्यंत इतका वेडाबिद्रा झाला की नंतर हे ‘दिव्यांग’ बाळ पितृवत केळकर सरांनाही ओळखता आलं नसेल. त्या वेळी ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावर आणि वन-ऑन-वन असं बोलून मी हा विषय त्यांच्याकडून समजून घेतला होता.

‘लोकसत्ता’च्या कार्यक्रमात तर त्यांनी ‘जीएसटी’चं वर्णन ‘लाख दुखोंकी एक दवा’ असं केलं होतं. पण प्रत्यक्षात आला तो जीएसटी भलताच निघाला. मला वाटलं, सर त्यावर काही बोलतील. तसं बोलले तर काय ही ‘बातमी’ दिसू लागली. म्हणून त्याच दिवशी म्हणजे लगेच १ जुलै (२०१७) या दिवशी त्यांना फोन केला. म्हटलं, ‘‘सर, हे काय झालं?’’ त्यांनीच उलट विचारलं, ‘‘काय झालं?’’ ‘‘जीएसटी आजपासनं अमलात येतोय… तो पाहिलात का…?’’ त्यावर ‘छान आहे’ म्हणाले. मी इतक्या विविध कोनांतनं त्यांना विचारायचा प्रयत्न केला. पण सर काहीही बोलायला तयार नाहीत. इतकंच काय. जीएसटी अमलात आल्या दिवसापासनं आजतागायत पन्नासेक वेळा त्यात सुधारणा केल्या गेल्यात. तरीही या कराचं व्यंग अजूनही जाता जात नाही. पण केळकर सरांनी एका शब्दानं त्यावर कधी जाहीर नाराजी वगैरे व्यक्त करून बातमीचा विषय होण्याचा प्रयत्नही केलेला नाही.

हे बहुधा त्या निरोगी वातावरणात वाढत मोठ्या झालेल्या पिढीचंच वैशिष्ट्य असावं. या मंडळींचा गाभा अगदी पक्का असतो. आपलं काम काय, मूळ उद्दिष्ट काय, आपल्याला जायचंय कुठे… याबाबत त्यांचा दृष्टिकोन एकदम स्वच्छ आणि मुख्य म्हणजे अनेक सरकारांमध्ये काम केल्यानंतर उगाच सनसनाटी निर्माण करण्यापेक्षा मुंगीइतकं का असेना… पण सतत ही माणसं पुढे पुढे जात असतात. आपल्याबरोबर देशालाही नेतात. आपलं जे आणि जितकं काही बरं चाललेलं आहे ते अशा काही मूठभरांमुळे. बाकी सगळा आनंदच म्हणायचा. त्यामुळे विजय तेंडुलकरांच्या ‘हे सारे कोठून येते’ या प्रश्नाप्रमाणे केळकर सरांना आवर्जून विचारायचा प्रश्न म्हणजे… हे सारे होते कसे? त्याचं उत्तर ऐकायचं म्हणजे सरांसमोर विद्यार्थी म्हणून बसायचं आणि समजून घ्यायचं. तसं केलं की लक्षात येतं ते असं की प्रशासन चालतं कसं, कसं चालायला हवं, जे वाटतं तसं का होत नाही… वगैरे वगैरे मुद्द्यांवर सरांना ऐकणं म्हणजे राग भूप किंवा कल्याण ‘थाटा’चे विविध प्रकार ऐकण्याइतकं सुरेल आणि रसाळ. ती संधी मी कधीही सोडली नाही.

सर मुंबईत आले की त्यांच्या इथल्या घरी. पुण्यात. एकदा तर दिल्लीत. आणि खरं तर मिळेल तिथं. त्यांनी आणि प्रा. अजय शहा यांनी मग पुस्तक लिहिलं. ‘इन सर्व्हिस ऑफ रिपब्लिक’. त्या निमित्तानं त्यांची त्या वेळी मुलाखत घेतली. एखाद्या प्रबंधात किंवा महिनाभराच्या व्याख्यान मालिकेत काय कळणार नाही ते सरांबरोबरच्या तासादोन तासांच्या गप्पांतनं कळतं. काही गोष्टी मग खूप ओळखीच्या वाटू लागतात.

सांस्कृतिक क्रांतीच्या काळात चीनमध्ये माओ यांचं व्यक्तिमाहात्म्य भयंकर वाढलं होतं. इतकं की चिनी जनतेनं विचार करणंच थांबवलं. अगदी मध्यमवर्गानंही. सगळे म्हणू लागले ‘माओंसारखा महान नेता या देशात आजतागायत कधी झालेला नाही,’ असं. अर्थातच माओंची प्रचार यंत्रणा उच्च दर्जाची. या यंत्रणेनं देशभर विश्वास निर्माण केला… माओ सर्व प्रश्न चुटकीसरशी सोडवू शकतात… वगैरे! या माओंनी एक दिवस फर्मान काढलं- ‘चिमण्या मारा!’ त्या वेळी चीनमध्ये इतक्या चिमण्या वाढल्या होत्या की त्या पिकंच्या पिकं कुरतडायच्या. माओंनी आदेश दिल्याबरोबर लाखो चिनी नागरिकांनी तसं केलं. कोणालाही प्रश्न पडला नाही हे असं चिमण्या मारणं योग्य आहे का? पण चिमण्या मेल्यामुळे किड्या-अळ्यांचं प्रमाण इतकं वाढलं की त्यामुळे या किड्या-अळ्यांनी चिमण्यांपेक्षा अधिक धान्य फस्त केलं. म्हणजे प्रश्न असा की, सरकार चालवणाऱ्यानं स्वत:ला काय वाटतं ते करावं की काही तज्ज्ञांचा वगैरे सल्ला घ्यावा?

यावर त्यांनी या पुस्तकात विस्तृतपणे लिहिलंय… ‘‘कोणालाच धोरण-धक्के आवडत नाहीत. मग सर्वसामान्य जनता असो वा गुंतवणूकदार वा उद्याोगपती. तेव्हा आदर्श व्यवस्थेत जनतेला धोरण आखणीत सहभागी करून घेणं उत्तम…’’ सर म्हणतात. ही अशी साधी गोष्ट. पण ती का होत नाही : यावर सर खरं वास्तववादी उत्तर देतात. ‘कशी होईल ती? System maximises it’s self interest first.’ म्हणजे व्यवस्था आपले हितसंबंध पहिले पदरात पाडून घेते. यात बदल करायचा तर प्रथम व्यवस्था सुधारावी लागते.

व्यवस्थेत बदल करायचा तर व्यवस्थेच्या प्रमुखाला तसं वाटायला हवं. त्याला त्याची तयारी हवी. केळकर सरांना अनेक पंतप्रधानांचा अनुभव आहे. म्हणून त्यांना विचारलं अशी तयारी असलेले/ दाखवलेले पंतप्रधान कोण? त्यावर त्याचं उत्तर : ‘‘राजीव गांधी, नरसिंह राव, मनमोहन सिंग आणि अटलबिहारी वाजपेयी.’’ यातल्या वाजपेयींचा किस्सा सांगतो. अणुचाचण्यांनंतर ते अमेरिकेला आले होते. मी त्या वेळेस वॉशिंग्टनला होतो. वाजपेयींना कळल्यावर त्यांनी भेटायला बोलावलं. गेलो. वाजपेयी म्हणाले, ‘‘केलकरजी, हम रिस्पॉन्सिबल न्यूक्लिअर कंट्री हो गए है.’’ मी त्यांचं अभिनंदन केलं आणि विचारलं, ‘‘आता आपण फिस्कली रिस्पॉन्सिबल कधी होणार?’’ त्यांना पहिल्यांदा कळलं नाही, मला काय म्हणायचंय ते. पण त्यांनी मुद्दा समजावून घेतला आणि दिल्लीत गेल्यावर त्याप्रमाणे कृती केली.

‘‘वस्तू-सेवा कराचा पहिला साद्यांत अहवाल त्यांनाच सादर केला होता आम्ही. राजीव गांधी यांनी ज्या काही समित्या नेमल्या त्यातून आपला भांडवली बाजार आमूलाग्र सुधारला. पंतप्रधानपदी नेमले गेल्यावर मनमोहन सिंग यांनी तर स्वत: जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ असूनही रंगराजन यांना सल्लागार नेमलं. कारण त्यांच्या लक्षात आलं की पंतप्रधानपदाकडे बाकी जबाबदाऱ्या बऱ्याच असतात. हे सगळे नेते सूचनांचं स्वागत करत. सुधारणा ही गुपचूप करायची गोष्ट नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. धक्कातंत्राने सुधारणा होत नाहीत. या सगळ्यांना हे माहीत होतं.’’ सर म्हणाले होते. त्यांचं ते पुस्तक भारी आहे. ‘‘लोकशाहीत दुष्ट लोक मूर्खाशी खोटं बोलतात.’’ किंवा ‘‘सहमती घडवून आणणं ही कला आहे.’’ आणि ‘‘हुकूमशाही वृत्तीचे नेते सहमती टाळतात, त्यांना ते आवडत नाही…’’ अशी काही वचनं त्यात आहेत.

माझ्या दृष्टीने सरांशी असलेल्या सहवासातला (आतापर्यंतचा) सर्वात आनंदी क्षण म्हणजे सर, डॅनियल एर्गिन यांच्या मांडीला मांडी लावून दिल्लीला आंतरराष्ट्रीय परिषदेत एका व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली; तो.

डॅनियल एर्गिन याचं ‘द प्राइझ’ हे खनिज तेलात रस असणाऱ्यांचं बायबल/ गीता/ कुराण. ते म्हणजे तेल क्षेत्राचे महामहोपाध्याय. अमेरिकेतल्या मॅसेच्युसेट्समधल्या, म्हणजे जगद्विख्यात एमआयटी, केंब्रिज इन्स्टिट्यूटमध्ये ते जवळपास पन्नासेक वर्षं तेलाचा अभ्यास करतात. जगातल्या अनेक देशप्रमुखांचे ते तेल सल्लागार आहेत. त्यांना कधी तरी भेटायला हवं, असं सतत वाटत होतं. ज्यानं आयुष्यभर तेल या एकाच विषयाचा ध्यास घेतला, त्याच विषयावर कमालीचं प्रभुत्व कमावलं अशा एर्गिन यांना भेटावं, चर्चा करावी अशी फार दिवसांची इच्छा होती. तर २०१७ च्या ऑगस्टअखेरीस अमेरिकेतनं एक ई-मेल आला. तो होता दुसऱ्याच कोणाचा. पण त्याच्या शेवटी लिहिलेलं होतं- ‘‘ऑन बिहाफ ऑफ डॅनियल एर्गिन.’’ मला बसलेला सुखद धक्काही सहवेना.

विषय होता दिल्लीत भरणाऱ्या ‘सेराविक’ या ऊर्जा परिषदेसाठी निमंत्रण देणारा. केंब्रिज एनर्जी या विख्यात संस्थेतर्फे या ऊर्जा परिषदा भरवल्या जातात. त्यांचं लघुरूप म्हणजे सेराविक. इतिहासात पहिल्यांदा ही परिषद दिल्लीत भरणार होती. तिथं वक्ता म्हणून मला ते बोलवत होते. चर्चासत्रात डॅनियल एर्गिन यांच्यासमोर सहभागी होता येणार ही कल्पनाच धन्य धन्य वाटवणारी होती. पण मोठं दडपण असं की मी ज्या परिसंवादात असणार होतो त्यातले अन्य वक्ते होते डॉ. विजय केळकर आणि डॉ. किरीट पारीख. दोघेही ऊर्जा क्षेत्रातले तज्ज्ञ.

किती तरी दिवस मला हे खरंच वाटत नव्हतं. एका मराठी लेखकाला एका आंतरराष्ट्रीय परिषदेत वक्ता म्हणून निमंत्रण येणं हेच अप्रूप होतं. ऑक्टोबर ७, २०१७. मी दुपारीच दिल्लीत दाखल झालो. हॉटेलमध्ये ‘चेक इन’ केलं. संध्याकाळी निघालो तर लिफ्टमध्ये एक व्यक्ती शिरली. चेहरा पुस्तकात पाहिलेला वाटला.

मी विचारलं, ‘‘मि. एर्गिन?’’

‘‘येस…’’

लगेच या भेटीची कशी वाट पाहात होतो… वगैरे वगैरे माझा धबधबा सुरू झाला… त्यांच्याबरोबरच लिफ्टमधून बाहेर आलो तर समोर डॉ. केळकर. त्यांना बघून हॅलो विजय… म्हणत एर्गिन इतके आनंदले की, ते बघून मलाच आनंद झाला. एर्गिन हे डॉ. केळकर यांना चांगले ओळखतात याचा. मग केळकरांनी माझी तेलभक्ती एर्गिन यांच्या कानावर घातली. ते ऐकून एर्गिन यांनी माझ्या हातातली त्यांच्या पुस्तकाची प्रत मागून घेतली. लिहिलं : ‘‘तेलअभ्यासाची तुझी तहान अशीच वाढो आणि ती पूर्ण होवो.’’ असो.

आजही एखादा विषय अडला तर केळकर सर आधाराला असतात. स्वत:ही ते बरंच काही करत असतात. वाचतात. लिहितात. काय वाचायला हवं ते सांगतात. लिंक्स, लेख पाठवतात. अथक काम करत राहणं यातच ‘विजय’ असावा बहुधा…!