– संजय ज . चांदेकर

अनेक डॉक्युमेण्ट्री फिल्म्स बहुतेक वेळेस वर्तमानकाळ मांडत असल्या तरी लवकरच त्यांचा विषय नजीकच्या भूतकाळात जाणार असतो. तरी भविष्यातील आपल्या जगण्याला, अस्तित्वाला त्या या दोन्ही काळांचा संदर्भ पुरवत असतात. ‘तेव्हा आणि आता आणि इथून पुढे’ या विचारचक्रालाही चालना देत असतात. समस्यांचे आकलन व्हायला आणि पुढे निराकरण व्हायला त्यांचा उपयोग एक प्रभावी साधन म्हणूनही होत असतो. एकप्रकारे डॉक्युमेण्ट्री म्हणजे भविष्यासाठीचा आटापिटा असतो…

Rashmi Joshi, cancer, support, Rashmi Joshi news,
रश्मी जोशी… कॅन्सरग्रस्तांसाठी आधारवड!
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
Use of plastic will be dangerous for agriculture
प्लास्टिकचा भस्मासूर शेतांना गिळंकृत करू पाहतोय…
Anna Sebastian Perayil, EY,
शहरबात… ॲनाच्या मृत्यूच्या निमित्ताने…
construction in natural drain in badlapur ignore by national green arbitration
बदलापुरातही नैसर्गिक नाल्यात बांधकाम; राष्ट्रीय हरित लवादाच्या भूमिकेनंतर बांधकामावर प्रश्नचिन्ह
girish kuber sitaram Yechury marathi news
अन्यथा: एकेक फोन गळावया…
gibbon monkey dance marathi news
विश्लेषण: गिबन माकड जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चक्क नृत्य करते? काय सांगते नवे संशोधन?
pune Kalyani group marathi news
मुखत्यारनाम्यासंबंधी आरोप निराधार; कल्याणी समूहाचे स्पष्टीकरण, कायदेशीर मार्गाने उत्तर देण्याचेही प्रतिपादन

मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेला चित्रपट म्हणजे मास्टर विनायक आणि आचार्य अत्र्यांचा ‘ब्रॅण्डीची बाटली’! हा सिनेमा मी साधारण ७१ साली इयत्ता पहिली-दुसरीत असताना फिल्म इन्स्टिट्यूटच्या थिएटरमध्ये पाहिला असल्याने अर्थातच कुठल्याच डॉक्युमेण्ट्री फिल्मचे शेपूट त्याच्या आधी लागलेले नव्हते. पण यानंतर मात्र जितके चित्रपट बाहेरच्या सिनेमागृहात पाहिले त्या सगळ्याच सिनेमांच्या आधी ‘काही तरी’ दाखवले जायचे, थिएटरात त्या वेळेस पूर्ण अंधार नसायचाच आणि प्रेक्षकांचीही ये-जा आणि काहीशी गडबडपण सुरू असायची; आणि बहुतेक कोणालाच जे काही दाखवले जायचे त्यात फारसा रस नसायचा. प्रेक्षागृहात मिट्ट काळोख झाल्यावर समजायचे की आता मात्र मुख्य चित्रपट सुरू होणार आणि प्रेक्षकांतसुद्धा एकदम ‘सन्नाटा’ पसरायचा. वडिलांना मात्र मुख्य सिनेमा सुरू व्हायच्या आधी दाखवल्या जाणाऱ्या छोट्या फिल्म्समध्ये रस असायचा. अशा वेळी त्यांच्याकडूनच पहिल्यांदा ‘डॉक्युमेण्ट्री’ हा शब्द ऐकला. त्यांना मात्र त्या पाहण्यात स्वारस्य असायचे! त्या वेळेस फिल्म्स डिव्हिजनच्याच डॉक्युमेण्ट्री दाखवल्या जायच्या आणि त्यातला तो भाई भगतांच्या टिपिकल कॉमेंटरीचा आवाज ऐकून ऐकून कुठलीही ‘डॉक्युमेण्ट्री’ म्हटले की ती अशीच असणार असा एक ठसा मनावर कोरला गेला होता. तेव्हा या प्रत्येक फिल्मच्या सुरुवातीलाच ‘फिल्म्स डिव्हिजन की भेंट’ अशी अक्षरे पडद्यावर उमटायची आणि तेव्हा रटाळ वाटलेल्या या फिल्म्सना ‘भेंट’ म्हणावे असे त्यात काय आकर्षक आहे असा प्रश्न तेव्हापण माझ्या बालमनाला पडत असे. तेव्हाची वृत्तचित्रे किंवा न्यूज रिल्स हेही तसे माहितीपटच, पण थेट आणि तुलनेने कलात्मक सर्जनशीलता वगैरे नसलेला प्रकार!

हेही वाचा – आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : जतन-सुविधेचा सोपा काळ..

माझ्याही मनातल्या या फिल्म्स डिव्हिजनच्या डॉक्युमेण्ट्रींच्या सरधोपट प्रतिमेला छेद मिळाला तो फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये मी नोकरीला लागल्यानंतर. जगातल्या अनेकविध चित्रप्रतिमांचं विश्वरूपदर्शन झाल्यावरच! त्यातही विशेषत: १९९९-२००० साली मी तिथेच विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतल्यानंतर जेव्हा अभ्यास म्हणून मी डॉक्युमेण्ट्रींकडे बघायला लागल्यावर.

आधी नोकरी करत असतानाच आजूबाजूला विद्यार्थ्यांचा उत्साही वावर पाहून मी एक मिनी डीव्ही कॅसेट कॅमेराही विकत घेऊन मिळेल तसं व मिळेल ते शूटिंग करण्याचा सपाटाच लावला होता. न जाणो ते क्षण, एखादा प्रसंग किंवा प्रवासातली निरीक्षणे, अनुभव निसटून जातील आणि आत्ता शूटिंग तरी करून ठेवू व पुढे निवांतपणे त्याला आकार देऊ असं काही तरी मनात होते. जणू काही मी झिगावर्तोव्ह आणि ‘मॅन विथ अ मूव्ही कॅमेरा’ झालो होतो. खरे तर तो उत्साहातून आलेला वेडेपणाच होता. कागद आणि पेन सगळ्यांच्याच जवळ असतं, पण म्हणून काही सगळेच चांगले लेखक होत नाहीत! त्यातच १९९८ सालीच इंडॉलॉजीमध्ये मास्टर्सही केलेले असल्याने अनेकविध विषय मला खुणावत होते; परंतु ऑफिसात माझ्या कामाचे स्वरूप निव्वळ तांत्रिक असल्याने प्रत्यक्षात एखादी फिल्म करायला मिळायची सुतराम शक्यता नव्हती. यातूनच एका अस्वस्थतेतून फिल्म इन्स्टिट्यूटला प्रवेश घेतला तेव्हाच मला पहिल्यांदा व्यवस्थित अशी डॉक्युमेण्ट्री बनवायची संधी मिळाली ती तिथल्या अभ्यासक्रमाचा वर्षान्त प्रकल्पाचा एक भाग म्हणून! या डॉक्युमेण्ट्रीसाठी विषय निवडायचे स्वातंत्र्य होते; परंतु फक्त दोन अडीच दिवसांत शूटिंग, फिल्मचा रन् टाइम फक्त बारा-तेरा मिनिटांचाच आणि तुटपुंजे मर्यादित बजेट. या अटींमध्ये सर्व काही करायचे याचा डोक्यात फारच गोंधळ व त्रास तेव्हा होत होता. मग माझ्याही आपुलकीचा विषय म्हणून विचारांती ‘सारंगी’ या वाद्याचे आज भारतीय संगीतात काय स्थान आहे किंवा काय स्थान उरले आहे, याचा शोध घ्यायचा हा विषय पक्का केला. फक्त बारा-तेरा मिनिटांचीच ही फिल्म करायची होती. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील विशेषत: ख्याल व उपशास्त्रीय गायनातील साथसंगतीचे अविभाज्य वाद्या म्हणून एके काळी निर्विवाद स्थान असलेल्या सारंगीला हार्मोनियमने बाहेर काढले होते. त्यामुळे साथसंगत करणारे आणि स्वतंत्र सारंगीवादन करणारे कलाकारही उत्तरोत्तर कमी कमी होत गेले होते.

हाच विषय पक्का करायचे कारण असे झाले की, पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या शहरात स्वरवाद्यांमध्ये सारंगीव्यतिरिक्त इतर सर्व प्रमुख वाद्यो शिकायची, शिकणाऱ्यांची व शिकवणाऱ्यांची तशी समृद्धी होती. जोडीला सिंथेसायझरसारख्या इतर वाद्यांना स्वाहा करू पाहणारे वाद्याही सर्वांवर स्वार होऊ बघत होते, पण सारंगीसारख्या वाद्याचा एकूणच मराठी सांस्कृतिक जगतात तसा फारच दुष्काळ होता. पुण्यात सारंगी वादकांच्या जुन्या पिढीतील फक्त एकमेव मधुकर खाडिलकर हे वयोवृद्ध कलाकार अजून हयात होते. त्यांच्याकडे सारंगी शिकायला किशोर दातारांसारखे एक-दोन जण यायचे, पण ते हौस म्हणून येत असत. जवळपास सर्वच भारतीय संगीतात साथसंगीतातल्या सारंगीची जागा तुलनेने सदोष वाद्या असूनही हार्मोनियमने कधीच पटकावली होती. राष्ट्रीय पातळीवरचे कलाकार पं. रामनारायण आता वृद्ध झाले होते. फक्त उस्ताद सुलतान खान आणि काही इतर हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच काही कलाकार होते. हे वाद्या शिकण्याकडे तरुण पिढी नक्की का वळत नाही हेपण शोधायचा प्रयत्न या ‘सारंगी-कथा आणि व्यथा’ या माहितीपटातून किंवा शोधपटातून मांडायचा प्रयत्न होता. दरबारात किंवा नबाबी थाटाच्या कथक नृत्याला सारंगीची साथ अविभाज्य असल्याने नृत्याचा फक्त एखाद-दुसऱ्या मिनिटाचाच तुकडा आवश्यक होता आणि यासाठीही नृत्य कलाकाराला आग्रह करणे हेच जरासे अवघड काम होते; परंतु सुश्री सोनाली चक्रवर्ती यांनी या फिल्मसाठी आवश्यक असलेला भाग फिल्मची गरज काय आहे हे समजून उत्तम सादर केला. बालगंधर्वांचे सारंगी साथीदार म्हणून नावाजलेले उस्ताद कादरबक्ष यांचे चिरंजीव उ. महंमद हुसेन खां तेव्हा हयात नव्हते, पण त्यांचे चिरंजीव फैयाज हुसेन खां यांच्याकडे व्हायोलीन पाश्चात्त्य पद्धतीने आणि सारंगीच्या अंगानेही वाजवण्याचे कसब होते. घराण्यात सारंगीची सशक्त परंपरा असूनही त्यांना सारंगी सोडून व्हायोलीनकडे वळावं लागलं होतं हा मुद्दापण त्यांनी डॉक्युमेण्ट्री फिल्मसाठी मुलाखत देताना अधोरेखित केला होता.

सारंगी वाद्याचा अवघडपणा, श्रोते आणि कलाकारांची बदललेली अभिरुची, सारंगीबरोबर येणारे जात आणि धर्म यांचे पदर, सारंगी आपल्याला डोईजड होईल म्हणून तिला बाजूला सारण्याची गायक व इतर कलाकारांची काही अंशी असलेली भीती, व्यावसायिक गणिते या गोष्टींना स्पर्श करत फिल्मची मांडणी करावी लागली. अनेकदा एखाद्या डॉक्युमेण्ट्री फिल्मची उपयोगिता त्या त्या काळापुरती मर्यादित किंवा प्रभावी ठरते. नंतर अनेक वेळेस त्याचा उपयोग एक तत्कालीन इतिहास म्हणून होतो. अर्थातच हे कोणत्या विषयावर आणि कोणत्या संदर्भात ती फिल्म केली आहे यावर ठरते. यामुळेच सारंगीविषयक ही फिल्म पुन्हा एकदाही जास्त विस्तृत स्वरूपात आजही केली तरी ती कालसुसंगत ठरेल.

या डॉक्युमेण्ट्रीच्या काही भागांचे कॅमेरामन म्हणून माझे सहाध्यायी असलेले आजचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि लेखक सचिन कुंडलकर यांनीही काम केले होते. आमची ही वर्षान्त प्रोजेक्ट म्हणून असलेली डॉक्युमेण्ट्री फिल्म तयार करायला काही मर्यादा, अटी व बंधनेही जरी असली तरी त्यांचा उपयोग वेळेच्या गणितात गोष्टी बसवण्यासाठी, उपलब्ध असलेली साधनसामग्री आणि टॅलेंट्सचा कमाल वापर करणे हे सर्व करायला होतो. ही कौशल्ये आत्मसात करणे व पुढेपण ती अंगी मुरवणे यातही आपला कस लागतो. ही सारंगीविषयक फिल्म करून झाल्यानंतर लवकरच आमचा एक वर्षाचा कोर्स संपणार होता. पण लगेचच एक सुवर्णसंधी चालून आली. बीबीसीवर निर्माता-दिग्दर्शक असलेले श्री. ह्यू पर्सेल यांचा तब्बल पाच आठवड्यांचा पूर्ण वेळचा फक्त डॉक्युमेण्ट्रीचा कोर्स हा आमच्या एक वर्षाच्या अभ्यासाचा विस्तार म्हणून सुरू झाला. आम्हाला म्हणजे जवळपास साठेक विद्यार्थ्यांना रोज १० वाजल्यापासून संध्याकाळी सहा पर्यंत पर्सेल जगातल्या विविध डॉक्युमेण्ट्रीज् दाखवायचे आणि अर्थातच त्यावर चर्चापण असायची. एक महिना पूर्ण झाल्यावर एक सुखद आश्चर्य आमच्यासमोर आले. आमचा हा वर्ग सुरू होता तेव्हा २००१ च्या २६ जानेवारीला भूज येथे अत्यंत विनाशकारी भूकंप होऊन गेलेला होता. आता एफटीआयआयला काही डॉक्युमेण्ट्रीज् भूजच्या भूकंपावर तयार करायला भारत सरकारने सांगितले होते. हे माहितीपट ह्यू पर्सेल यांच्या मेंटॉरशिपमध्ये करायचे होते आणि यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी सकारण अर्ज करणे आवश्यक होते. यासाठी मीपण अर्ज केला होता. एकूण पाच जणांची निवड केली होती. त्यात मी होतो.

माझे सहाध्यायी असलेले अनुराधा वैष्णव व दीपक आर्य हे ज्यूडी फ्रेटर या ब्रिटिश महिलेला डोळ्यासमोर ठेवून भूकंपानंतर भूकंपग्रस्त लोकांच्या उपजीविकेसाठी पारंपरिक वस्त्रप्रावरणांच्या व्यवसायात स्थानिक लोकसमुदायांना म्हणजे राबारी वगैरेंना घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांवर एक फिल्म करत होते. या ज्युडी फ्रेटर बाई कच्छी-गुजराती बोलत आणि तिथल्या स्थानिक बायकांसारखीच वेशभूषा करत. या फिल्ममध्ये माझी भूमिका लोकेशन साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून होती. तर दुसरी फिल्म केली होती ऑइंड्रिला हाजरा आणि सचिन गडांकुश या सहाध्यायांनी. ही फिल्म दुर्घटनेनंतर लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य या विषयावर केली होती आणि या फिल्ममध्येही माझी भूमिका मदतनीस आणि लोकेशन साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून मर्यादित होती. परंतु या दोन फिल्म्सव्यतिरिक्त तिसरी फिल्म होती ती मी स्वत:च दिग्दर्शित केलेली होती आणि कॅमेरामनसुद्धा मलाच स्वत:ला व्हावे लागले. कारण माझे दोन्ही कॅमेरामन सहाध्यायी त्या वेळेस त्यांच्याच फिल्म्समध्ये गुंतून पडले होते. तिसऱ्या माझ्या फिल्मचा विषय होता भूजच्या विनाशकारी भूकंपाचा तिथल्या बऱ्याचशा पारंपरिक आणि काही आधुनिक वास्तूंवर आणि लोकांच्या राहत्या घरांविषयीच्या दृष्टिकोनावर काय फरक पडला याबद्दल.

यामध्ये मी भूजच्या आल्फ्रेड हायस्कूल, प्राग महाल, आयने महाल, स्वामिनारायण मठ, राजघराण्यातील छत्र्या आणि अहमदाबादच्या शिखर व मानसी या बहुमजली इमारती यांचे झालेले मोठे नुकसान आणि विध्वंस यांचे चित्रीकरण करताना असे दिसून आले की, जुन्या प्रकारच्या बांधणीच्या ज्या इमारती आहेत ज्यात भारतीय लाकडी व मातीच्या बांधणीच्या आयने महालसारख्या आणि त्याखालोखाल ब्रिटिशकालीन त्या धाटणीच्या आल्फ्रेड हायस्कूल, प्राग महालसारख्या इमारती यांचे नुकसान जरी झाले असले तरी फारसा विध्वंस झाला नाही, पण आधुनिक बांधणीच्या अहमदाबादच्या शिखर, मानसीसारख्या बहुमजली इमारती आणि भूजमधल्यापण सिमेंट काँक्रीटच्या तीन-चार मजली इमारतींचे उद्ध्वस्त होणे आणि इमारतींच्या वरच्या मजल्यावर राहत असलेल्या लोकांच्या मनात वसत असलेली भीती व बसलेला मानसिक धक्का (ट्रॉमा) आणि भूकंपानंतर एक मजली घरात राहायला जायचा वाढता कल, पण लोकांची बहुमजली इमारतीत राहायची अनिच्छा आणि नाइलाज यावर ही फिल्म आधारलेली होती. या सर्व चित्रीकरणपूर्व आणि चित्रीकरणादरम्यान आमचे मार्गदर्शक ह्यू पर्सेल सरांची भावलेली गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांचे मेंटरिंग कसे असायला हवे याचा त्यांनी घालून दिलेला आदर्श! त्यांचा नेहमीच आग्रह असायचा की डॉक्युमेण्ट्री फिल्म असली तरीसुद्धा त्यात ‘स्टोरी किंवा स्टोरी एलेमेंट’ हे असायला पाहिजे.

अनेक वेळा डॉक्युमेण्ट्री आणि तिचे प्रेक्षक कोण हा विषय पूर्वी विनोदाचा होता आणि म्हणूनच तो कुतूहलाचा विषय होता; परंतु प्रत्येक डॉक्युमेण्ट्रीला तिचा असा प्रेक्षक असतोच. जसे की ग्रंथालय शास्त्रात असे म्हटले जाते की प्रत्येक पुस्तकाला वाचक असतो तसेच कोणत्याही डॉक्युमेण्ट्रीला त्या विषयात रस असणारा प्रेक्षक असतोच, फक्त या दोघांची एकत्र गाठ मात्र पडायला पाहिजे. परंतु आजच्या सोशल मीडिया आणि विविध डिजिटल मंचांच्या जमान्यात हा प्रश्न तसा बराच धूसर झालेला असला तरी माहितीच्या प्रचंड माऱ्यामुळे लक्षवेधी डॉक्युमेण्ट्री तयार करून ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान समोर आहे.

हेही वाचा – सीमेवरचा नाटककार..

आपल्या मराठीत डॉक्युमेण्ट्रीला थोडे अधिक प्रकारचे शब्द प्रचलित झालेले आहेत किंवा होत गेलेले आहेत. काही जण असे शब्द वापरतातही. फिल्मच्या विषयाप्रमाणे आणि ट्रीटमेंटप्रमाणे त्यांना माहितीपट, अनुबोधपट, बोधपट, वास्तवपट, शोधपट, प्रचारपट, प्रसारपट, शिक्षणपट/ शिक्षापट, सत्यदर्शनपट, सत्यपट, असे शब्द पण वापरले जातात; किंबहुना असे शब्द वापरावेतही! डॉक्युमेण्ट्रीतून सत्याचा शोध घेण्याचे चांगले प्रयत्नपण अनेकांनी केलेत तरी पण अनेकांतवादाप्रमाणेच सत्यालाही अनेक पैलू व पदर असल्याने अशा प्रकारच्या कोणत्याच फिल्मला आपणच अंतिम सत्य सांगितल्याचा दावा करता येणार नाही.

एखाद्या माहितीपटाची बीजे मनात कुठे तरी घुसून सुप्तावस्थेत दडलेली पण असतात. त्यांना प्रत्यक्षात धुमारे कधी फुटतील तेही बरेचदा नाही सांगता येत. विषयाला भिडायची प्रेरणा कधी कुठे केव्हा मिळेल ते सांगता येत नाही. यामुळे आणि इतरही अनेक कारणांनी ‘राहून गेलेले काही’ यावर काही सांगायचेच असेल तर भारतीय शास्त्रीय संगीतासंबंधीच्या काही पैलूंवर मी मध्यंतरी काम चालू केले होते. प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि ज्ञानपीठ पारितोषिकप्राप्त डॉ. यू. आर. अनंतमूर्तीं, संगीतज्ज्ञ डॉ. अशोक दा. रानडे यांच्या मुलाखतींचेही चित्रीकरण झाले होते. गंगूबाई हनगल यांचेही काही शूटिंग झाले होते; परंतु काही ना काही कारणाने त्या प्रोजेक्टला अंतिम मूर्त स्वरूप यायला अजून वेळ लागेल असे दिसतेय!

फिल्म इन्स्टिटयुटमध्ये एकूण ३५ वर्षे कार्यरत. टेलिव्हिजन अभियांत्रिकी विभागात अभियंता म्हणून काम. रेडिओ एफ.टी.आय.आयचे प्रभारी व केंद्र व्यवस्थापक म्हणून ११ वर्षांचा अनुभव. लघुपट आणि माहितीपटांचे महोत्सवांत प्रदर्शन.

sanjay.filminstitute@gmail.com