प्रवीण दशरथ बांदेकर

गेल्या महिन्यात मालवणी बोलीतला ‘भेरा’ नावाचा सिनेमा पाहत होतो. करोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणातल्या समुद्रकाठच्या डोंगरकुशीत अगदी दुर्गम भागात लपलेल्या, पण अतिशय निसर्गसंपन्न गावात घडणारी गोष्ट. रोगाच्या भीतीमुळे संवेदना, माणुसकी हरवून बसलेली माणसं पाहताना मनात येत होतं, ही काही फक्त करोनामुळेच सैरभैर झालेल्या आमच्या गावांची गोष्ट नाहीये. करोना फक्त निमित्तमात्र. मामाच्या घरी आश्रितासारखा राहणाऱ्या यातल्या अनाथ नायकाचं ‘मामाचं गाव’ हरवायला खरं तर करोनाच्या आधीच सुरुवात झाली होती… नक्की कधीपासून बरं? गाववाल्यांना अंधारात ठेवून हे हिरवेगार डोंगर मायनिंगसाठी विकले गेले तेव्हापासून; की त्या अमक्या तमक्या राजकीय नेत्याने अट्टहासानं तो प्रदूषणकारी औष्णिक प्रकल्प आमच्या माथी मारला तेव्हापासून? विकासाची स्वप्नं दाखवून आमच्या नद्या, खाड्या, खाजणं बुजवल्या जाऊ लागल्या होत्या तीच सुरुवात म्हणायची. की महामार्गासाठी, कोकण रेल्वेसाठी लाखो झाडं तोडली जात होती, डोंगर सपाट होत होते, नद्या नि वहाळांचे मार्ग बदलवले जात होते, तोच ‘टर्निंग पॉइंट’ समजायचा? काहीही असो, पण आपल्या डोळ्यांदेखत मामाचं गाव हरवत जाण्याची सुरुवात गेल्या दोनतीन दशकांपासूनच खऱ्या अर्थाने झाली आहे, हे मात्र नक्की.

कसं होतं माझ्या किंवा कोकणात आजोळ असलेल्या कुणाच्याही मामाचं गाव? स्वप्नात दिसणाऱ्या स्वर्गासारखं की सिनेमात दिसणाऱ्या स्वप्नवत रोमँटिक गावासारखं?

आडवातिडवा पसरलेला डोंगर. हिरव्यागर्द झाडावेलींनी गच्च भरलेला. पायथ्याशी डोंगराला विळखा घालून वाहणारी नदी. नदीच्या काठानं माडपोफळी आणि भातांची खाचरं, कुणगे. शेतातच मिसळून जात डोंगरापर्यंत मागे मागे जात डोंगरातच हरवून गेलेली बारक्याबारक्या कौलारू किंवा झावळ्यांच्या घरांची शे-दीडशे उंबऱ्यांची वस्ती. कोकणातल्या कुठल्याही गावात साधारणत: दिसणारं हे दृश्य. नदी नसेल तर समुद्र असतो, खाजणं असतात, वहाळ आणि टेकड्या असतात, घळणी आणि दऱ्या असतात; आणि मुख्य म्हणजे अनिर्बंध, वेडीवाकडी वाढलेली भरपूर झाडंपेडं असतात. कोकणी माणसं कैक पिढ्यांपासून या अशा वाड्यावस्त्यांतून त्यांच्या राखणदार देव-देवचार-चाळेगत-वेताळ आणि भुताखेतांसहित नांदत आली आहेत.

सगळ्या अभावांसकट, गैरसोयींसकट, चक्रीवादळे, महापूर, त्सुनामी अशा अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड देत, वाडवडिलांनी लावलेल्या झाडापेडांमध्ये, जपलेल्या राखणदार निसर्गामध्ये देवत्व पाहत आणि मनोभावे त्याला शरण जात गुण्यागोविंदाने जगत आहेत. मालवणी, चिपलुनीसारख्या आपल्या वैशिष्ट्यपूर्ण बोली, त्यांतल्या इरसाल शिव्या आणि चपखल म्हणी, भात-मासे-घावन-वडेसागुती अशी जिभेवर रेंगाळणारी चविष्ट खाद्यसंस्कृती, दशावतार, नमन-खेळेंसारख्या लोककला, बारापाचाची देवदेवस्की आणि ग्रामदेवतांच्या जत्राउत्सव, दर्याची गाज आणि धो धो कोसळणारा पाऊस हे सगळं संचित इथल्या माणसांनी आपापल्या परीनं टिकवलं, पुढे नेलं.

अगदी कालपरवापर्यंत हे चित्र असंच होतं. स्वप्नातलं वाटावं असं कोकणातल्या आपल्या मामाचं गाव चाकरमानी पोरांना खुणावत असायचं. पन्नाससाठ वर्षांपूर्वीपर्यंत बोटीचा, तुमची शारीरिक आणि मानसिक परीक्षा बघणारा प्रवास करून मामाचं गाव गाठावं लागत असे. पुढे लाल मातीच्या रस्त्यांवरून धावणाऱ्या एसट्या आल्या. डांबरी सडका झाल्या तरी फारसा फरक नव्हता पडलेला. रात्रभराचा दमछाक करणारा, हाडं खिळखिळी करणारा प्रवास करून कोकणातलं गाव गाठावं लागत होतं. कधी कधी तर एसटीतून उतरल्यावर पुन्हा बैलगाडीतून, होडीतून प्रवास करून खूप आत डोंगराच्या कुशीत कुठेतरी लपलेल्या गावात जावं लागायचं. पण नदीच्या पाण्यात डुंबताना, ताज्या ताज्या शहाळ्यांचं पाणी पिताना, चुलीवरच्या गरमागरम आंबोळ्या, ओल्या खोबऱ्याची उसळ खाताना सगळा शीण नाहीसा होणार आहे, याचीही मनोमन खात्री सगळ्या भाचे मंडळींना असायची.

… पण कसं बिघडत गेलं सगळं? विकासाच्या नावाने अवतरलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी डोंगर कापले गेले, नैसर्गिक जलस्राोत नाहीसे झाले, नद्या आटत गेल्या. कोकणातले भूमिपूत्र प्रामुख्याने ज्या नारळ-काजू-आंब्यांची बागायती शेती नि समुद्रातल्या मच्छीमारीवर जगत होते. पण आता कधी एन्रॉन प्रकल्प, कधी जैतापूर-माडबनची अणुभट्टी, कधी बारसूची रिफायनरी, कधी कळण्याचं मायनिंग… प्रत्येक ठिकाणी पारंपरिक शेतकरी आणि मच्छीमारांच्या रोजीरोटीवर टाच येत होती. वेगवेगळ्या प्रकल्पांमधून समुद्रात सोडण्यात येणारे उष्ण पाणी, रासायने, हवेत पसरणारे विषारी वायू यांचा जलचर, मत्स्यबीजे, प्रवाळ, किनारपट्टीवरील बागायती शेती, पशुपक्षी यांच्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा विचार कुठेच नव्हता. त्याहीपेक्षा आमच्या मामाची गावं ज्या संपन्न निसर्गासाठी वाखाणली जात होती, त्या निसर्गालाच ओरबाडलं जाऊ लागलं होतं.

रेल्वे किंवा महामार्गाला तर कुणाचा काही विरोध असण्याचं काहीच कारण नव्हतं. पण विकासप्रक्रियेत आवश्यक असलेली दळवळणाची आधुनिक जगाची सोय पाहताना जी लाखो झाडं नष्ट झाली, खाड्या बुजवल्या गेल्या, डोंगर पोखरले गेले, त्यामुळे झालेल्या पर्यावरणाच्या हानीचं काय? ती भरून काढण्यासाठी काय उपाययोजना केली आम्ही? दुसरीकडे पर्यटकांची पसंती गोव्यानंतर कोकणाला मिळू लागताच हॉटेलसंस्कृती फोफावू लागली. त्यापाठोपाठ अपरिहार्यपणे येणारे परप्रांतीयांचे लोंढे, गुन्हेगारी, सांस्कृतिक आक्रमणे या सगळ्यामुळे कोकणचा चेहरामोहराचा पालटू लागला होता. थोडक्यात, एकीकडे आधुनिक जगण्याचं स्वप्न तर दुसरीकडे बागायती आणि मच्छीमारीसारखे पारंपरिक व्यवसाय आणि कालपरवापर्यंत ज्यांच्या अंगाखांद्यावर बागडलो ते हिरवेगार डोंगर, नद्या, जंगलझाडी नष्ट होण्याची भीती… अशा पेचात कोकणी माणूस गेल्या काही वर्षांपासून सापडला आहे.

मामाचं गाव हरवत जाण्यामागे खरं तर, कोकणी माणसाची ही बदललेली मानसिकताच जास्त करून कारणीभूत आहे. निवडणुकीच्या काळात भ्रष्ट व्यवहारातून जमवलेल्या थैल्या मोकळ्या करून मते विकत घेणारे राजकारणी आम्हाला आमचे तारणहार विकासपुरुष वाटू लागले आहेत. काळासोबत बदलत जाणं अपरिहार्य असलं तरी बदल आणि आधुनिकीकरणाच्या नावाखाली चोरपावलांनी शिरणारी, आपलं आजवरचं शांत, समाधानी, अल्पसंतुष्ट जगणं कुरतडणारी आणि मूल्ये, संस्कृती, नैतिकता अशा सगळ्याला कीड लावणारी नवी व्यवस्था या निमित्ताने रुजू लागली आहे. या व्यवस्थेला जगाच्या बाजारपेठेतून फोफावत जाणारं चंगळवादी जगणं मानवतं आहे. या व्यवस्थेत सामावून गेलेल्यांना मामाच्या गावाचं सांस्कृतिक वेगळेपण असलेली मालवणी बोली, नारळाची चुनकापं किंवा जत्रेतलं खाजं आणि शेवाचे लाडू, डोंगरातले रतांबे, करवंदं, गणपतीपुढची भजनं आणि फुगड्या, नागपंचमीच्या पातोळ्या, असं सगळंच ‘आउटडेटेड’ वाटू लागलं आहे, हे मान्यच केलं पाहिजे.

गुरांच्या मागे धावत लंगोटीत वावरणारे गाववाले धोतराचा काष्टा टाकून आधुनिक पोशाखात वावरू लागले. चाकरमान्यांच्या मनिऑर्डवर जगणाऱ्या कोकणी माणसाचे हे दिवस कधीच इतिहासजमा झाले. ‘आवशीक रे खाव मेल्या’, म्हणत दशावतारातल्या संकासुरासारखा पिरंगणाऱ्या कोकणी माणसाच्या तोंडची भाषाही ‘एक पण ट्रेन भेटली नाय, आयच्या गावात’, अशी ‘स्लँग’ वापरत बदलत गेली. साहजिकच, मोबाइलसाठी रेंज मिळाली नाही तर बीएसएनएलच्या साहेबाची कॉलर पकडून, ‘जास्त आवाज केलास तर तुकाच डिलीट करून टाकीन’ म्हणणारे गावगुंड पुढारी आता मामाच्या गावातले हिरो ठरले आहेत. कालपरवापर्यंत वेतोबा-रवळनाथाच्या कौलाप्रमाणे निर्णय घेत एकोप्यानं जगणाऱ्या गावात आता एकेका घरात चार वेगवेगळ्या रंगांचे झेंडे नाचवणारे कार्यकर्ते तयार झाले आहेत. भाच्यांनी ठरवायचं, कुठल्या मामाकडे जायचं ते.

मुंबईहून सुट्टी घालवायला मामाच्या गावात आलेली पोरं आजकाल आटलेल्या नदीपेक्षा नि भुंड्या डोंगरातल्या भटकंतीपेक्षा मोबाइलमधल्या रील्समध्येच जास्त रमतात. जे मुंबईत जगतात तेच गावातही जगू पाहतात. आईवडील, आजोबाआजी वगैरे ‘आमच्या वेळी असं होतं’, ‘नदीला असे पूर यायचे’, ‘डोंगरात असे टोपली टोपली वेगवेगळ्या चवींचे आंबे मिळायचे’, अशा भूतकालीन स्मरणरंजनात दंगून गेलेले असतात. नव्या पिढीला त्यांच्या या गजाली ऐकण्यात काडीचाही रस उरलेला नसतो. त्यापेक्षा, या करवंदा-जांभळांपासून, फणसांपासून वाइन का नाही बनवत हे लोक, वगैरे चर्चांमध्ये त्यांना जास्त रस वाटतो.

शेकडो वर्षांत नदीतून किती पाणी वाहून गेलं. कितीदा घनघोर पाऊस कोसळला, पूर आले, घळणी कोसळल्या. झाडंपेडं वाहून गेली. किती पिढ्या नदीकाठी नांदल्या, मातीत मिसळल्या… तरीही, सपाट झालेल्या डोंगरातून अजूनही तोच सूर्य उगवतो आहे, सुकलेल्या नदीच्या पात्रात बुडून जातो आहे. नदीकाठच्या, डोंगराच्या पायथ्याच्या या हरवलेल्या मामाच्या गावाचा शोध घेताना गळ्यात मात्र उगाचच गहिवर दाटून येतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

pravinbandekar1969 @gmail.com