शफी पठाण shafi.pathan@expressindia.com
‘वक्त के साथ ‘सदा’ बदले तअल्लुकम् कितने
तब गले मिलते थे, अब हाथ मिलाया न गया..’
या शेरसारखी अवस्था झालीये आज उर्दू आणि मराठीची! कधीकाळी किती एकरूप होत्या या दोन्ही भाषा! उर्दू जशी दिलदार, तशीच मराठीही ‘विश्वात्मके देवे’चे पसायदान मागणारी. कप्पेबंद, सनातनी चौकट मराठीला मान्य नव्हती. आणि उर्दू तर जणू सकल मानवजातीच्या आनंदनिधानासाठीच जन्मलेली. या दोन्ही भाषांमधला आंतरिक ऋणानुबंध पंथ आणि प्रदेशाच्या फारच पल्याडचा! कवी अनिलांची ‘दशपदी’ आठवा. ज्यात ते लिहितात- ‘दोन दिवस आराधनेत, दोन प्रतीक्षेत गेले’ किंवा नारायण सुव्र्याच्या कवितेतील ती ओळ- ‘दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दु:खात गेले..’ आता आठवून बघा बहादूरशाह जफर. हो, तोच तो- जो आपल्या गझलेत लिहितो,
‘उम्रे दराज माँग कर लाये थे चार दिन
दो आरजू में कट गए, दो इंतजार में..’
आता सांगा, काय फरक आहे.. कवी अनिल, सुर्वे आणि जफरच्या भावना अभिव्यक्तीत? मुळात भावना कधीच भाषेची मोताद नसते. त्यामुळे ‘आज्ञा’ म्हणा की ‘ईशाद’- कुठल्याही गोष्टीच्या आनंददायी प्रारंभाला अशा बिनडोक व्यत्ययांनी काहीच फरक पडत नाही. मराठी आणि उर्दूच्या बाबतीत तर तो पडायलाच नको. याचे कारण उर्दूचा लखलखता शिशमहल असो की मराठीचा अभिजात राजवाडा.. या दोघांचेही कूळ आणि मूळही एकच. या दोन्ही भाषा तशा एकमेकींच्या दूरच्या मावसबहिणी. भारतातील मराठीइतकीच उर्दूही अस्सल भारतीयच. कारण तिचा जन्मच मुळात भारतातला. मुस्लीम राज्यकर्ते जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांची मूळ भाषा फारसी होती. याच फारसीतून पुढे उर्दूने बाळसे धरले. पुढे पुढे तर तुर्की, फारसी, अरबी असा कुठलाच भेदभाव न करता उर्दूने ‘आपुलकी’ची भाषा शिकविणाऱ्या साऱ्याच भाषिक प्रवाहांना मोठय़ा आनंदाने आपल्या कुशीत सामावून घेतले. यातून उर्दूची झळाळी वाढली. भाषेच्या क्षितिजावर ती इतक्या वेगाने आणि तेजाने चकाकू लागली की जन्मदाती आई असलेली फारसीही पार झाकोळून गेली. उर्दूची घरंदाज ‘नजाकत’ कवी-लेखकांना खुणावू लागली. ती जशी पं. ब्रिजनारायण चकबस्त, आलमपुरी, सहाय फिराक, कृष्णचंदर, प्रेमचंद यांना साद घालू लागली, तशीच आपल्या मराठी मातीतील कवी माधव ज्युलियन, भाऊसाहेब पाटणकर, सुरेश भट यांनाही तिने लळा लावला. १९५० च्या दशकात माधव ज्युलियन यांनी उर्दूच्याच मूळ प्रेरणेतून मराठी गझलचे रोपटे रोवले.
‘मराठीस अन्याय कोठेहि झाला, स्वदेशीं विदेशीं कुणी गाजिलें
मराठी कसा मी न सन्ताप माझा धडाडे जरी तीव्र दुक्खानिलें?
मराठी जनांचेच वर्चस्व राहो स्वत:च्या महाराष्ट्र देशीं तरी-
प्रसादें तुझ्या कोणती व्यक्त आशा करू अन्य हे वन्द्य्य वागीश्वरी?’
असे मराठीतून रोखठोक लिहिणारे माधव ज्युलियन असोत की,
‘रगों में दौडम्ते फिरने के हम नहीं कमयल
जब आँख ही से न टपका तो फिर लहू क्या है..’
असा वस्तुनिष्ठ सवाल विचारणारा गालिब. यांची रचना भाषावार वेगळी भासत असली तरी तिच्यातले सार जवळपास सारखेच आहे. हा काही निव्वळ योगायोग नाही. उर्दू आणि मराठीच्या आंतरिक प्रेमातून ही एकरूपता आकारास आली आहे. मुक्त विचारांची, परिणामांना न घाबरणारी प्रेयसी आणि लाख संकटांशी लढूनही तिची प्रणयाराधना करणारा प्रियकर या माधव ज्युलियन यांच्या काव्यातील जोडीवर उर्दू गझलेचा प्रभाव स्पष्ट जाणवतो. माधव ज्युलियन हे फारसी-मराठी शब्दकोशाचे जनक असताना असा प्रभाव जाणवला नसता तरच नवल होते.
दुसरे उदाहरण भाऊसाहेब पाटणकरांचे!
‘आसवे इतुक्याचसाठी नाही कधीच मी गाळली
गाळायची होती अशी की नसतील कोणी गाळली
आसवांच्या या धनाला जाणून मी सांभाळले
आज या वृद्धापकाळी यांनी मला सांभाळीले..’
ही भाऊसाहेबांची मराठी गझल आणि..
‘कागजम् पे हमने भी जिंदगी लिख दी,
अश्क से सींच कर उनकी खुशी लिख दी!
दर्द जब हमने उबारा लफ्जों पे,
लोगों ने कहा वाह क्या गजल लिख दी!!’
ही उर्दूतली.. अश्रूंची आसक्ती हा या दोन गझलांमधला समान धागा आहे. हा धागा हिरवा की भगवा हेच भाऊसाहेब तपासत राहिले असते तर इतकी नक्षीदार शायरी मराठीत प्रसवलीच नसती.
तिसरे उदाहरण मराठी गझलेचे मुकूटमणी सुरेश भटांचे! माधव ज्युलियन यांनी लावलेल्या मराठी गझलेच्या रोपटय़ाला भटांनी आपल्या प्रतिभेचे खतपाणी घातले, तिच्या सभोवताली जाणीवपूर्वक उभारलेल्या प्रांतिक कुंपणांना अगदी ठरवून उद्ध्वस्त केले आणि तिला मराठी रसिकांच्या घरा-मनांत पोहोचवले. उर्दूच्या काफिया, रदीफ, मतल्याला मराठीच्या कोंदणात अतिशय कलाकुसरीने सजवण्याचे खरे श्रेय सुरेश भटांचेच. उर्दूवर जीवापाड प्रेम करणारा हा हाडाचा मराठी कवी. याच प्रेमातून भटांनी उर्दूचा सर्वंकष अभ्यास केला. गझलेचा ताणाबाना मराठीतही तितक्याच तन्मयतेने गुंफला. उर्दूच्या रंगात रंगलेले गझलेचे हे आरस्पानी संचित मराठी काव्यप्रेमींच्या सहज हातात पडावे, त्यांना ते सहजतेने उलगडता यावे यासाठी याच भटांनी कष्ट उपसून ‘गझलेची बाराखडी’ नावाची एक पुस्तिका लिहिली. मराठी वाचक व रसिक सगळ्यांनीच ही पुस्तिका वाचावी, संदर्भासाठी जवळ बाळगावी असे त्यांना वाटायचे. म्हणूनच ते ही पुस्तिका स्वत: पदरमोड करून पत्रासोबत पाठवायचे.
‘राहिले रे अजून श्वास किती
जीवना, ही तुझी मिजास किती..?’
असे जीवनाचे वास्तव मराठीत मांडणाऱ्या भटांना..
‘जिंदगी तू मुझे पहचान न पाई लेकिन
लोग कहते हैं कि मैं तेरा नुमाइंदा हूं..’
या अशा उर्दू शेरांनी प्रभावित केले होतेच. त्यांची मराठी गझलेची प्रेरणाच उर्दू होती. माधव ज्युलियन असतील, भाऊसाहेब पाटणकर असतील वा सुरेश भट असतील; यातील प्रत्येकच उर्दूप्रेमी मराठी कवींनी ‘ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, न मी एक पंथाचा..’ असे आवर्जून सांगणाऱ्या केशवसुतांचाच वारसा मराठी साहित्यात अगदी प्राणपणाने जपला. उगाच भाषिक वर्चस्ववादाच्या जंजाळात न अडकता उर्दूमध्ये जे जे काही वंदनीय, अभिनंदनीय आहे, ते- ते मराठीचा लौकिक सांभाळूनच मराठीत आणता यावे यासाठी त्यांनी आपली लेखणी झिजवली. हे जे ‘अमृताचे रोपटे’ या मंडळींनी मराठीत रोवले त्याची गोड फळे आजची काव्यप्रेमी तरुणाई मोठय़ा आनंदाने चाखत आहे. एखाद्या कथित संस्कृतीरक्षकाला यावर विश्वास बसत नसेल व त्याला याचे प्रमाणच हवे असेल तर त्याने ‘जश्न-ए-रेख्ता’च्या प्रेमात पडलेल्या मराठी तरुणांची संख्या नक्कीच मोजावी. ‘जश्न-ए-रेख्ता’ हा जगातील सर्वात मोठा उर्दू भाषेचा साहित्य महोत्सव दिल्लीत दरवर्षी रंगतो. दास्तान-गोई, नाटक, कव्वाली, गझल गायकी, उर्दू साहित्यावर सर्वंकष चर्चा, मुशायरा, बैतबाजी अशा एक ना अनेक साहित्य उपक्रमांचा झरा येथे सलग तीन दिवस नुसता खळाळत असतो. ‘‘उर्दू ही केवळ मुसलमानांचीच भाषा आहे व ते केवळ आपल्या धर्मप्रसारासाठीच तिचा वेगवेगळ्या मंचांवर उपयोग करीत असतात,’’ अशा विद्वेषी दाव्यांच्या पडताळणीत न अडकता उर्दूवर प्रेम करणारी मराठी तरुणाई या कार्यक्रमात मोठय़ा उत्साहाने सहभागी होत असते. ज्यांना प्रत्यक्ष पोहोचणे शक्य नसते ते ऑनलाइन या महोत्सवाशी जुळतात.
उर्दू ही प्रेमाची भाषा असल्यानेही असेल कदाचित- तरुणांना ती आजही आकर्षिक करीत असते. हे तेच मराठी तरुण आहेत, जे उर्दू न वाचता येणाऱ्या मराठी बांधवांपर्यंत तंत्रज्ञानाधारे आणि प्रसंगी देवनागरी आणि रोमन लिपीचा उपयोग करून उर्दूचे भाषावैभव पोहचवत आहेत. कोणतीही भाषा इतर भाषेतील शब्द स्वीकारते तेव्हा ती त्या भाषेला शरण जात नाही, तर ती स्वत:चे परिघ विस्तारत असते, यावर या तरुणाईचा गाढ विश्वास आहे. याच विश्वासाच्या बळावर ही तरुणाई भाषिक भेदभावाच्या काटेरी भिंतीवरही प्रेम आणि सौहार्दाची बाग फुलवण्यासाठी साद घालते आहे.. बघा, ती साद ऐकता आली तर!