नरेश दधिच – nkd@iucaa.in

जागतिक ख्यातीचे शास्त्रज्ञ आणि मराठी विज्ञानकथेला ‘आधुनिक’ चेहरा देणारे साक्षेपी लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची येत्या मार्चमध्ये नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यानिमित्ताने डॉ. नारळीकरांच्या संशोधकीय कार्याचे आणि त्यांच्या ‘विज्ञानलेखक’ असण्याचे मर्म उलगडून सांगणारा लेख..

गुरुत्वाकर्षणाचा नवा सिद्धान्त मांडला गेल्याचं १९६४ साली लंडनमध्ये पार पडलेल्या रॉयल सोसायटीच्या बैठकीत जाहीर झालं. हा नवा सिद्धान्त केम्ब्रिज विद्यापीठातील दोन संशोधकांनी मांडला होता. पैकी एक होते- प्रसिद्ध संशोधक फ्रेड हॉएल, तर दुसरे जयंत नारळीकर. या सिद्धान्ताबद्दल, विशेषत: अवघ्या २६ व्या वर्षी तो मांडणाऱ्या नारळीकरांबद्दल जाणून घेण्यासाठी भारतीय वृत्तपत्रं आतुर झाली होती. या सिद्धान्ताने (अर्थात विश्वोत्पत्तीबाबतचा महास्फोट सिद्धान्त नारळीकरांना मान्य नसला, तरी!) जणू ‘महास्फोट’ (बिग बँग) घडावा तसा विज्ञानजगतात नारळीकरांचा प्रवेश झाला होता.

खरे तर अशा एखाद्या बातमीच्या प्रतीक्षेतच तेव्हा तरुण भारत देश होता. आपल्यापैकीच कोणीएक केम्ब्रिजमधील संशोधकांच्या खांद्याला खांदा भिडवत आहे; किंबहुना, त्या एकाची दृष्टी महान शास्त्रज्ञ आइनस्टाईनच्याही पल्याड पाहणारी आहे, ही तेव्हा भारतीय समाजाला निश्चितच सुखावणारी बाब होती. स्वाभाविकपणेच एका रात्रीत नारळीकरांचे नाव घरोघरी पोहोचले, अनेकांसाठी ते नायकपदी विराजमान झाले. परंतु त्याहून महत्त्वाचे म्हणजे स्वतंत्र भारतातील विज्ञानजगताचा ते चेहरा ठरले. मला आठवतं, १९६५ साली भारतदर्शन मोहीम काढत नारळीकरांनी ठिकठिकाणी व्याख्यानं दिली होती. पैकी एक अहमदाबादला झालं, त्यास मी उपस्थित होतो.

सरकारकडूनही नारळीकरांची त्वरेनं दखल घेतली गेली. १९६५ साली त्यांना ‘पद्मभूषण’नं गौरविण्यात आलं. तेव्हा त्यांचं वय होतं उणेपुरे सत्तावीस! पुढे २००४ साली ‘पद्मविभूषण’ सन्मानही त्यांना मिळाला.

केम्ब्रिजमध्ये शिकलेल्या नारळीकरांची विद्यार्थी म्हणूनही कामगिरी अत्युत्कृष्टच होती. तिथं १९६२ साली त्यांनी मानाचं स्मिथ प्राइझ पटकावलंच; शिवाय पाच वर्षांनी (१९६७) प्रसिद्ध अ‍ॅडम्स प्राइझही त्यांना जाहीर झालं. विशेष म्हणजे त्या वर्षी हे पारितोषिक नारळीकरांसह ज्यांना विभागून देण्यात आलं, त्या रॉजर पेनरोझ यांना यंदाचं भौतिकशास्त्राचं नोबेल मिळालं आहे!

नारळीकरांचा जन्म कोल्हापुरातला. त्यांचे वडील विष्णू नारळीकर हे बनारस हिंदू विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक होते. त्यामुळे नारळीकरांचं बालपण वाराणसीत गेलं. पदवीपर्यंतचं शिक्षणही त्यांनी बनारस विद्यापीठातच घेतलं आणि वडिलांप्रमाणेच उच्च शिक्षणासाठी ते टाटा पाठय़वृत्तीवर केम्ब्रिजमध्ये दाखल झाले. तिथं गणिताचा विशेष अभ्यासक्रम (मॅथ्स ट्रायपोस्) त्यांनी विक्रमी वेळात पूर्ण केला. तेव्हा फ्रेड हॉएल हे पीएच. डी.साठी सर्वाना हवेहवेसे मार्गदर्शक होते. त्यांनीच स्टीफन हॉकिंग, ब्रॅण्डन कार्टर, जॉर्ज एलिस यांच्यामधून नारळीकरांची निवड केली होती.

१९७२ साली नारळीकर भारतात परतले आणि मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत रुजू झाले. तिथं सैद्धान्तिक खगोलभौतिकी आणि विश्वोत्पत्तीशास्त्र यांतील संशोधन विभागाची पायाभरणी त्यांनी केली. १९८९ साली ते पुण्याला आले अन् ‘खगोलशास्त्र आणि खगोल-भौतिकीसाठीचे आंतरविद्यापीठीय केंद्र’ अर्थात ‘आयुका’ची उभारणी त्यांनी केली. नवोन्मेषशाली बुद्धिमत्तेला आवाहन करणारं आणि खगोलशास्त्र व खगोलभौतिकीतील संशोधनाकरिता विद्यार्थी संशोधकांसाठी उत्तम सुविधा पुरविणारं केंद्र म्हणून त्यांनी ‘आयुका’स नावारूपास आणलं. सर्वच निकषांवर मोजू जाता ही संस्था म्हणजे विज्ञान आणि आपल्या देशाच्या बौद्धिक संस्कृतीला नारळीकरांनी दिलेली महान देणगी ठरते.

गुरुत्वाकर्षणाबद्दलचा हॉएल-नारळीकर सिद्धान्त विश्वोत्पत्तीबाबत स्थिर विश्वावस्था (स्टेडी स्टेट) या मताचं समर्थन करणारा होता. परंतु त्यानंतर वर्षभरातच वैश्विक सूक्ष्मतरंगांच्या पृष्ठीय (सीएमबी) उत्सर्जनाचा शोध लागल्याने हॉएल-नारळीकर सिद्धान्त टिकू शकला नाही. परंतु या सिद्धान्ताव्यतिरिक्तही नारळीकरांनी बरीच महत्त्वाची संशोधनं मांडली. उदाहरणार्थ, हॉएल आणि नारळीकर यांनीच प्रथम हा तर्क केला की, आपल्या आकाशगंगेच्या किंवा एकूणच तारकापुंजांच्या केंद्रस्थानी प्रचंड वस्तुमानाचा (सुपरमॅसिव्ह) तारा असावा. त्यांनी हे मत शुद्ध खगोलभौतिकी दृष्टीतून मांडलं होतं. त्यांच्या मते, आपल्या सभोवतालच्या द्रव्याचं प्रसरण रोखण्यासाठी आणि आकाशगंगेसारखी रचना अस्तित्वात येण्यासाठी त्याच्या केंद्रस्थानी प्रचंड (सूर्याहून अब्जावधी पट) वस्तुमानाचा तारा असायला हवा. पुढे हॉएल-नारळीकर द्वयीच्या या तर्काचे समर्थन मार्टिन रीस, डोनाल्ड लिंडन-बेल यांसारख्या शास्त्रज्ञांनीही केले.

‘ब्लॅक होल’ अर्थात ‘कृष्णविवर’ ही संज्ञा तोवर घडलेली नव्हती. परंतु हॉएल-नारळीकर यांच्या तर्कानंतर, म्हणजे १९६७ साली न्यू यॉर्कमधल्या एका परिषदेत जॉन व्हीलर या शास्त्रज्ञानं ती पहिल्यांदा योजली. यंदाचं भौतिकशास्त्राचं नोबेल रॉजर पेनरोज यांच्यासह ज्यांना आणि ज्याकरिता विभागून देण्यात आलं, त्या अ‍ॅण्ड्रिया गेझ आणि राइनहार्ड गेण्झेल यांनी आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या- हॉएल आणि नारळीकर यांनी तर्क केलेल्या- त्या अतिप्रचंड वस्तुमानाबद्दल काही महत्त्वाची निरीक्षणं मांडली. त्यावरून हॉएल-नारळीकर द्वयीनी प्रतिपादलेला तो अतिप्रचंड वस्तुमानाचा तारा म्हणजे कृष्णविवरच आहे असं मानलं जातं.

नारळीकर यांचे गुरू सर फ्रेड हॉएल हे सर्जनशील बुद्धिमत्ता असलेलं व्यक्तिमत्त्व होतं. विज्ञानच नव्हे, तर विज्ञानाबद्दलच्या संवाद-संज्ञापनातही त्यांनी आपली सर्जनशीलता दाखवून दिली. हॉएल यांनी विज्ञानाविषयीचं कथात्म साहित्य पुरेशा गांभीर्यानं हाताळलं. त्यांची ‘द ब्लॅक क्लाऊड’ ही सर्वोत्तम विज्ञान-कादंबऱ्यांमध्ये गणली जाते. अशा हॉएल यांचे बुद्धिमान शिष्य असलेल्या जयंत नारळीकरांनी आपल्या गुरूच्या पावलावर पाऊल टाकले. नारळीकरांनीही विज्ञानकथात्म साहित्य लिहिलं. विज्ञानाविषयी, त्यातल्या संशोधनाविषयी जनसामान्यांशी संवाद साधणं, ही बांधिलकी त्यांनी त्याद्वारे नेहमीच जपली.

त्यामुळेच फलज्योतिषासारख्या थोतांडाविरोधात त्यांनी कायम आवाज मुखर केला. मागे विद्यापीठ अनुदान आयोगानं विज्ञानशाखेत ‘फलज्योतिष’ हा विषय घुसडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचा नारळीकरांनी खंबीरपणे निषेध केला होता. त्याही आधी फलज्योतिषाच्या दाव्यांना आव्हान देणारा शास्त्रीय विश्लेषणात्मक एक प्रयोग त्यांनी सुरू केला होता. विज्ञानाविषयीच्या अशा बांधिलकीमुळेच ते पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे देशाच्या कानाकोपऱ्यांत व्याख्यानांसाठी जात असतात. ‘आयुका’च्या विविध कार्यक्रमांत विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधत असतात. हे सारं पाहता वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवू पाहणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरूंचे ते ‘खरे अनुयायी’ ठरतात. त्यामुळेच विज्ञान आणि वैज्ञानिकता जनप्रिय केल्याबद्दल ‘कलिंगा पुरस्कार’ देऊन त्यांचा उचित गौरव झाला.

याच दृष्टीनं नारळीकरांनी मराठी विज्ञानकथात्म साहित्याची जोपासना केली. विज्ञानलेखकांचे मेळेही त्यांनी आयोजित केले. त्यांच्या जवळपास सर्वच विज्ञानविषयक पुस्तकांवर पुरस्कारांची मोहोर उमटली. आणि ‘चार नगरांतले माझे विश्व’ या त्यांच्या आत्मचरित्रासाठी तर साहित्य अकादमी पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्यांची बरीच पुस्तकं देशी-विदेशी भाषांत अनुवादित झालेली आहेत.

त्यांचं हे विविधांगी योगदान पाहता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून झालेली त्यांची निवड सार्थ ठरते. कदाचित असा सन्मान प्राप्त झालेले ते एकमेव शास्त्रज्ञ असतील. (अर्थात मागील काळातील महान शास्त्रज्ञ थोर विचारक असतच, पण ते उत्तमोत्तम पुस्तकंही लिहीत. उदाहरणार्थ- आइन्स्टाईन. त्यांचा ‘व्हाय सोश्ॉलिझम’ हा विचारप्रवृत्त करणारा निबंध मी अलीकडेच वाचला. तो त्यांनी ‘मंथली रिव्ह्य़ू’ या मासिकाच्या पहिल्या अंकासाठी लिहिला होता!)

‘आयुका’मध्ये त्यांच्याबरोबर जवळून काम करण्याची संधी मला मिळाली. संस्थेसाठी नियोजनापासून ठरलेल्या प्रत्येक गोष्टीत सहकाऱ्यांना सहभागी करून घेणे, सहभागित्वाची भावना त्यांच्यात रुजवणे यासाठी ते आग्रही असत. प्रत्येकाला स्वत:तल्या सर्वोत्तमतेचा ध्यास घ्यायला लावणं, कुठलीही गोष्ट सहकाऱ्यांकडून सवरेत्कृष्टच करून घेणं- तेही चेहऱ्यावर निखळ स्मित ठेवून- ही किमया नारळीकरांना साध्य झाली आहे. त्यामुळे ‘आयुका’ ही महत्त्वाची संशोधन संस्था म्हणून आकाराला आलीच; पण लोकशाहीनिष्ठ आणि सहभागी प्रशासनाचे ती उत्तम उदाहरणही आहे.

वाराणसीत बालपण गेलेल्या नारळीकरांच्या व्यक्तिमत्त्वात एकीकडे चिंतामुक्तता व प्रेमळपणा आणि दुसरीकडे महाराष्ट्रीय सरळ- साधेपणा व शिस्त यांचा मोहक मेळ साधलेला आहे. ते चांगले बॅडमिंटनपटू होते. ‘आयुका’त आल्यावर मात्र ते टेनिस खेळू लागले. सुरुवातीच्या काळात आम्ही रोज सकाळी टेनिसचा एक सेट तरी पूर्ण करत असू.

अगदी तरुण वयापासूनच त्यांची सर्व बाजूंनी अति स्तुती केली गेली; पण त्याचं ओझं त्यांनी स्वत:वर लादू दिलं नाही. ते सारं त्यांनी संयमानं, प्रतिष्ठापूर्वक हाताळलं आणि कायम नम्र व साधेपणानं राहिले. लहानग्यांप्रमाणेच मोठय़ांसाठीही ते कायम उत्तम मार्गदर्शक बनले. उदाहरण द्यायचे तर, अमलकुमार रायचौधुरी या कोलकात्याच्या प्रेसिडन्सी कॉलेजच्या प्राध्यापकांचं कार्य नारळीकरांनीच प्रकाशझोतात आणलं. या रायचौधुरी यांनी १९५३ मध्ये आइन्स्टाईनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धान्तानुसार सूक्ष्म कणांच्या संकलनाची उकल मांडणारं समीकरण रचलं. आता ते ‘रायचौधुरी समीकरण’ म्हणूनच ओळखलं जातं. परंतु रायचौधुरी यांनी इतकं महत्त्वाचं समीकरण देऊनही त्याबाबत भारतीय विज्ञानजगत त्याबद्दल नारळीकरांनी त्यांची ओळख करून देईपर्यंत अनभिज्ञच होतं.

सतत कामात व्यग्र राहूनही नारळीकर कायम शांत आणि स्थितप्रज्ञ असतात. कदाचित असंही म्हणता येईल की, मंगला नारळीकर यांच्यासारखी जीवनसाथी मिळाल्यानंच त्यांना हे शक्य झालं असावं!

(लेखक सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ म्हणून पुणे येथील ‘आयुका’ या संशोधन संस्थेत कार्यरत होते.)

अनुवाद : प्रसाद हावळे