दैनंदिनीच्या पोटात अनेक रहस्ये दडलेली असतात. त्यातले संदर्भ, टिपणं, नोंदी यांना कालपरत्वे एक ऐतिहासिक महत्त्व लाभतं. वरवर निर्थक वाटणारे तपशील हासुद्धा एक पूरक इतिहास असतो- तत्कालीन संस्कृतीचे दस्तावेज म्हणून! गोविंद बाबाजी जोशी यांच्या ‘गेल्या तीस वर्षांपूर्वीचे लोक व त्यांच्या समजुती’ अथवा ‘माझे प्रवासाची हकिकत’ (रोजनिशी- १८९६) या प्रवासवर्णनात प्रथमच रोजनिशी पद्धतीचा वापर केला गेला. याशिवाय तुम्हाला सहज आठवेल तो गोडसे गुरुजींचा १८५७ साली घडलेला ‘माझा प्रवास’.. मूळ स्मरणनोंदी मोडी लिपीतल्या. चि. वि. वैद्य यांनी त्या १९०७ साली संपादित करून प्रकाशित केल्या. १९१० ते १९१३ या काळातील जर्मनीच्या वास्तव्यातील डॉ. दा. पा. गुणे यांचा पत्रव्यवहार ‘माझा युरोपातील प्रवास’ या नावाने प्रसिद्ध आहे. न. चिं. केळकर यांची ‘विलायतची पत्रे’, इरावती कर्वे यांचे ‘परिपूर्ती’मधील परदेशातील अनुभव, बेडेकरांचं ‘रणांगण’ ही काही वेचक उदाहरणे. आणि अगदी आवर्जून आठवतं ते काणेकरांचं ‘धुक्यातून लाल ताऱ्याकडे’! अर्वाचीन मराठी साहित्यातील आरंभीची प्रवासवर्णने माहितीपर आणि वृत्तान्तवजा आहेत. कालपरत्वे लेखकाची शैली, साहित्यिक व्यक्तिमत्त्व आणि प्रवासाचे आयाम यांच्या परस्परांवर होणाऱ्या क्रिया-प्रतिक्रिया यांद्वारा वस्तुनिष्ठतेकडून आत्मनिष्ठेकडे असा या ललित वाङ्मयप्रकाराचा प्रवास झालेला आहे. या पाश्र्वभूमीवर आपल्यासमोर आलं आहे ते ‘जर्मन रहिवास’ हे पुस्तक.

९३ वर्षांपूर्वी- १९२२ साली खानदेशातल्या गरीब, शेतकरी कुटुंबातल्या तीन मुलांनी डोळ्यांत स्वप्ने रेखून एक गरुडभरारी घेतली. जळगाव जिल्ह्यतील भालोद या गावी राहणारे तुकाराम गणू चौधरी हे १९२२ साली आपल्या दोन मित्रांबरोबर जर्मनीमध्ये तंत्रज्ञानातले उच्च शिक्षण घेण्यासाठी समुद्रमाग्रे जर्मनीस गेले. वस्त्रनिर्मितीविषयक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेऊन ते १९२५ साली मायदेशी परतले. साडेतीन वर्षांच्या या काळात तिथे आलेले अनुभव आणि आठवणी या कविहृदयाच्या तरुणानं आपल्या डायरीमध्ये नोंदवून ठेवल्या होत्या. पहिल्या महायुद्धानंतर परदेशी शिक्षणासाठी गेलेल्या ग्रामीण भागातील तरुणाचे भावविश्व या पुस्तकातून उलगडतं. जर्मन भाषेत त्यांनी लिहिलेल्या कवनांवर स्वच्छंदवादाचा प्रभाव स्पष्ट जाणवतो. त्या भाषेवरचे त्यांचे प्रभुत्व पाहून अचंबा वाटतो. या नोंदी त्यांच्या कुटुंबीयांनी दोन पिढय़ा मोठय़ा अगत्यानं आणि श्रद्धेनं जपून ठेवल्या होत्या. आणि आता तिसऱ्या पिढीनं हे आत्मकथन प्रकाशात आणलं आहे. या हस्तलिखितावर संपादकीय संस्कार केले आहेत- ज्ञानपीठ पुरस्कारविजेते साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी.

१९२२ ते १९२५.. सगळ्या जगासाठीच हा मोठय़ा धामधुमीचा ऐतिहासिक कालखंड. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीच्या मार्कचं अभूतपूर्व अवमूल्यन झालं होतं. चलनफुगवटा आणि बेकारीनं जर्मनीला अजूनच गत्रेत लोटलं होतं. पहिल्या महायुद्धाची भरपाई म्हणून दोस्तराष्ट्रांना अब्जावधी रुपयांची खंडणी द्यायची होती. तरीही जर्मनी परदेशी विद्यार्थ्यांना साद घालत होती. शिक्षणासाठी तिकडे जाणं तुलनेनं स्वस्त ठरल्यानं चौधरी व त्यांचे मित्र अक्षरश: गावकऱ्यांकडून वर्गणी काढून जर्मनीला गेले. जर्मनीला जाण्याच्या त्यांच्या अविश्रांत आणि निकराच्या धडपडीपासून ते बोटीचा प्रवास, बर्लिन शहराशी सहजगत्या जोडली गेलेली नाळ, तिथले पद्धतशीर शिक्षण, जर्मन समाजजीवनावर झालेले युद्धाचे भयानक परिणाम, परतीचा इंग्लंडहून प्रवास आणि शेवटी भालोद गावी झालेले आगमन असा तीन-साडेतीन वर्षांचा काळ या पुस्तकाद्वारे आपल्यासमोर येतो.

पुस्तकाची सुरुवात होते तीच ‘जर्मनीस यावयास निघताना कोणता शिक्षणक्रम घ्यावा याबद्दल नेहमी विचार पडत असे..’ या वाक्याने. त्याने पुस्तकाचा अक्ष सिद्ध होतो. कुठेही कुठलाही भावनिक फापटपसारा नसलेली, संयमी, सौम्य आणि तरीही एका लोभस दृष्टिकोनातून लिहिलेली ही टिपणं. सुरुवातीला काठाकाठाने कथानायकाच्या आयुष्याच्या या कालखंडात डोकावणारा आपल्यासारखा वाचक हळूहळू या प्रवासात रस घ्यायला लागतो. एकापाठोपाठ एक प्रतिमा आपल्या अंतर्चक्षूसमोर सरकू लागतात. आणि त्या सहज-सरल भावविश्वात आपण गुंतून जाऊ लागतो. बऱ्याच वेळा या कथनातला आत्मचरित्रात्मक तपशील एकरेषीय होतो. कालक्रमानुसार घटना घडतात आणि घटनाक्रमाला आठवणी संदर्भ पुरवतात. ‘जसे घडले तसे अलिप्तपणे सांगितले’ अशा वृत्तीनं हे कथन पुढे सरकतं.

१९२२ चा काळ. तंत्रज्ञान अर्थातच आजच्याइतकं विकसित झालेलं नव्हतं. माहिती मिळवायला ना कुठल्या संस्था, ना कुठली संकेतस्थळे. एका खेडेगावातून आलेल्या या विद्यार्थ्यांना होती फक्त अनंत ध्येयासक्ती आणि मनात अनंत आशा. मार्गदर्शनासाठी त्यांची खरी मदार होती ती फक्त बíलन इन्फॉम्रेशन ब्यूरोवर. जर्मनीतील विद्यापीठे, तिथली शैक्षणिक संस्कृती, परंपरा, निवासस्थानांची सोय, खाद्यसंस्कृती, प्रवासाची साधने अशी मूलभूत माहिती मिळवण्यासाठीही या त्रिकुटाला अभूतपूर्व प्रयत्न करावे लागले. मुळात जर्मन भाषा शिकायला हवी होती. ती पुण्यात ते मिस कोहेनकडे शिकलेही. पण ते जुजबी ज्ञान नंतर प्रत्यक्ष जर्मनीत तोकडंच पडलं. तिथल्या साहेबी पोषाखाची तजवीज करणंही ओघानं आलंच. जर्मनीला जायची तयारी करायची म्हटल्यावर भक्कम आíथक पाठबळ हवं होतं. पशांची जमवाजमव करताना त्यांना अनेक सुखद, काही कटू अनुभव आले. विविध स्रोतांतून पशांची जमवाजमव करणं भाग होतं. त्यात कित्येकदा तोंडघशी पडायला झालं. भरवशाच्या लोकांनी दगा दिला. आजार बळावले. तरीही या सगळ्यावर मात करून हे तिघे जर्मनीला जाणाऱ्या जहाजावर एकदाचे चढले. त्यावेळचा निरोपाचा अविस्मरणीय प्रसंग अत्यंत हृद्य आहे. आई-वडिलांना, मातृभूमीला सोडून जाताना विव्हल झालेला तुकाराम इथे दिसतो. बाकी पुस्तकात मात्र त्याचा बाज संयत आहे. बोटीचा पहिलाच प्रवास करताना तुकारामची जी लोभस नजर कुतूहलाने विस्फारलेली आहे, ती संपूर्ण पुस्तकभर तशीच औत्सुक्याने भारलेली राहते. प्रत्येक नव्या अनुभवाला ते तितक्याच तीव्रतेने भिडतात. बोटीच्या प्रवासाचे वर्णन, सुवेझ कालवा, मास्रेल्स, पॅरिस ते बíलन हे या पुस्तकातले सुरुवातीचे महत्त्वाचे टप्पे आहेत. हे विस्फारलेले डोळे संपूर्ण पुस्तकभर एका भाबडय़ा कुतूहलाने भोवतालचे निरीक्षण करीत राहतात. आणि तरीही या संपूर्णत: नवीन अनुभवविश्वाला ते अतिशय परिपक्व समंजसपणे सामोरे जातात. जर्मन संस्कृती आणि रीतीभाती यांचे कुठल्याही प्रकारे पूर्वग्रहदूषित मूल्यमापन या कथनात आढळत नाही. आणि पुरोगामी संस्कृतीचे अवलोकन करताना अनेकदा तौलनिक विधाने समोर आली तरी तो फक्त संदर्भसूचक उल्लेख असतो. त्यात भारतीय असल्याचा न्यूनगंड नाही, किंवा देशीवादाचे देव्हारेही मांडलेले नाहीत.

जर्मनीतील जीवनशैलीचा परिचय, शिष्टाचार, अभिवादनाची पद्धत, पाणी आणि वाईन यांची तुलना, गरम आणि थंड पाण्याच्या वेगवेगळ्या तोटय़ा, दुकानाबाहेरच्या दर्शनी भागातल्या बाहुल्या, हात धुण्याचे सिंक.. इथपासून ते हिवाळ्यात घरात उबदारपणा कायम राखण्यासाठी घराच्या अंतर्भागात असलेल्या भट्टीपर्यंत तुकाराम चौधरींची लेखणी दुर्बीण होऊन फिरते. हे तिघेजण महानुभाव पंथातले, वारकरी कुटुंबातले. सुरुवातीला त्यांच्या खाण्यापिण्याचे कसे हाल होतात आणि अखेर तिथल्या पाककृतींशी ते कशी तडजोड करतात याचं मोठं गमतीशीर वर्णन त्यांनी केलं आहे. जर्मनीतील शिस्त, काटेकोरपणा, वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा हे गुण त्यांना ग्रहणीय वाटतात हे पदोपदी जाणवतं.

तुकाराम चौधरींच्या जर्मनीतील वास्तव्यातील त्यांचे सुखद अनुभव, टेक्स्टाईल मिलमध्ये काम मिळवण्याची धडपड व त्यात आलेलं यश, त्यांचं आवडतं कार्यक्षेत्र हे त्यांच्या या कथनातले वैयक्तिक संदर्भातले मलाचे दगड आहेत. याखेरीज तत्कालीन जर्मन संस्कृतीच्या अभ्यासकांसाठी आणखीनही काही मौलिक रत्ने या पुस्तकात हाती लागतात. ती म्हणजे ‘गेझेल्शाफ्ट्सश्पीलं’.. म्हणजे परंपरागत मनोरंजनात्मक सामूहिक खेळ; ज्याबद्दल आजकालच्या नव्या जर्मन पिढीलाही फारशी माहिती नाही. अगदी आपल्याकडच्या ‘माझ्या आईचं पत्र हरवलं’सारखं. याशिवाय जर्मनीतील क्लब्ज, त्यांचे समन्वय आणि संघटनांचे वेड, स्त्री-पुरुष संबंधांतील दिलखुलास मोकळेपणा, मातृभाषा शुद्ध राखण्याचा तत्कालीन जर्मन लोकांचा ध्यास, तिथल्या सांस्कृतिक प्रतिसादाच्या प्रचलित पद्धती, जर्मनीतील सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचे या त्रयीला झालेले आकलन व त्यांनी आपल्या परीने केलेले विश्लेषण हे सारे ताज्या टवटवीत भाषेत प्रसंगानुषंगाने सामोरे येते. संशोधकांसाठी हेही महत्त्वाचे ठरू शकते. बर्लिन व पॅरिसची त्यांनी केलेली तुलना आजही तितकीच प्रत्ययकारी आहे. त्यांना पॅरिसचा दिमाख कृत्रिम वाटतो, तर बर्लिन निसर्गदत्त उत्साहाने सळसळणारं शहर वाटतं.

काही वर्णनपर प्रकरणांत जर्मनीतील उत्सवप्रिय जनता वेगवेगळे सणसमारंभ (उदा. ईस्टर वा नाताळ) कसा साजरा करते, वसंत ऋतूचं स्वागत करताना तरुणाई कशी जल्लोशात असते, दारिद्रय़ाचे भीषण वास्तव अधोरेखित न करता सर्वसामान्य जर्मन माणूस सोशिकपणे आयुष्याशी हसत दोन हात करायला कसा तयार असतो, हे सांगत लेखक अनेक मनोज्ञ धाग्यांनी हा पट गुंफत गेला आहे.

हे तीन ग्रामीण भागातले तरुण ज्या निव्र्याज आणि खेळकर वृत्तीने या नवीन विश्वात स्वतला सामावून घेतात, त्याला तोड नाही. तसं त्यावेळी त्यांच्याजवळ फार काही नव्हतं. होता फक्त प्रचंड आत्मविश्वास, जीवनावरची व माणुसकीवरची अपार श्रद्धा आणि साहसी वृत्ती. एका मागासलेल्या, गुलाम राष्ट्राचे नागरिक हा त्यांचा मूळ परिचय. पण ही स्वाभिमानी मुले त्यांचे नतिक संस्कार आणि देशी परंपरा यांना गौण न मानता जर्मन लोकांशी ज्या बरोबरीच्या नात्याने वागतात, ते आजही भल्याभल्यांना जमत नाही. हळूहळू लबाड, मिश्कील आणि विनोदी चिमटे काढत हे कथन सुरू राहतं.

जर्मनीत वस्त्रनिर्मितीचे उच्च शिक्षण घेतलेले तुकाराम गणू चौधरी हे कामगारांचे हितसंवर्धक होते. एक नि:स्पृह व कर्तबगार अधिकारी म्हणून त्यांनी ठाणे, मुंबई, अंबाला, कानपूर  आणि अहमदाबादमध्ये अनेक गिरण्या उभारल्या. १९६२ मध्ये अमळनेर येथील प्रताप मिलला त्यांनी ऊर्जतिावस्था आणली. ‘टेक्स्टाईल असोसिएशन ऑफ इंडिया’चे ते संस्थापक सदस्य होते.

गरीब शेतकरी कुटुंबात वाढलेल्या या मुलाला त्याची जन्मतारीख जेमतेम ठाऊक आहे. त्याचा वाढदिवस आयुष्यात पहिल्यांदा साजरा होतो तो जर्मनीत.. आणि त्याला भरून येतं. संयुक्त कुटुंबात वाढलेला हा मुलगा जर्मनीतही नाती रुजवत जातो. त्याला जर्मनीत मिळते फ्राऊ वेसली ही मानलेली आई. हळूहळू तिथे मत्रीचे, आपुलकीचे धागे जुळतात. एक कुटुंब तयार होतं. ही आंतरिक नाती माया लावतात. ‘तुझ्या आईला माझा निरोप सांग, की असा मुलगा मला असता तर मी किती सुखी झाले असते!’ हे फ्राऊ वेसलीचे वाक्य त्या वात्सल्याचे द्योतक आहे. तुकाराम तिथे कफल्लक होतो. भारतातून पसे पाठवणं घरच्यांना शक्य होत नाही. तेव्हा जवळ पसे नसताना एक जर्मन कुटुंब त्याच्या या आर्थिक तंगीच्या काळातही पोटच्या पोरासारखा त्याचा खर्च भागवतं. मावशी मार्था आणि तिच्या बहिणी तुकारामला फ्लू झाला असताना त्याची ममतेने शुश्रूषा करतात. कुठले तरी नाजूक अनुबंध झूसे या सखीच्या मनाच्या तारा छेडून जातात. पण विवाहाच्या सूत्राने बद्ध असलेला तुकाराम हे झंकार कानी पडू देत नाही. हेही स्वत: झूसे आणि इतरजण एक अपरिहार्यता म्हणून समजुतीने स्वीकारतात. भावनिक गोडव्याची कितीतरी उदाहरणे या पुस्तकात सापडतात. सर्वस्वी परक्या देशात ऋणानुबंधांच्या या मनोरम गाठी पडतात आणि तुकाराम सर्वाना माया लावून भरल्या हृदयाने त्यांचा निरोप घेतो. ‘ऐसी कळवळ्याची जाती’ ही जर्मन लोकांची वृत्ती आपल्या मनाला भिडते.

जर्मनीत दादाला झालेला भीषण अपघात आणि बाळचा फुप्फुसाच्या आजाराने झालेला मृत्यू या दोन काळजाला चटका लावणाऱ्या घटनाही अखेरच्या भागात येतात. त्याचे हिंदू पद्धतीने दहन करण्यासंबंधीचे हे प्रकरण संस्कृतीच्या अभ्यासकांसाठी नक्कीच महत्त्वाचे आहे. लेखकाच्या तटस्थ व निल्रेप शैलीमुळे हे प्रसंग अजूनच शोकात्म झाले आहेत, असे मत नेमाडे यांनी प्रस्तावनेत नोंदवले आहे.

या पुस्तकाची सांगता होते ती लंडनमाग्रे झालेल्या परतीच्या प्रवासाच्या चित्रणाने. लंडनमध्ये शैक्षणिक सल्लागार त्यांना फक्त एकच प्रश्न विचारतो-‘इंग्लंडात टेक्स्टाईलचे एवढे ज्ञान असताना तू त्या जर्मनीत का गेलास?’ या प्रश्नानं एक जुनी जखम ठसठसू लागते आणि एरवी सौम्य असलेला तुकाराम उत्तरतो, ‘इथे आम्हा हिंदी विद्यार्थ्यांना तुमच्या मिलची पायरीही चढायला मिळत नाही..’ हे तिखट प्रत्युत्तर देण्यासाठीचा प्रगल्भ आत्मविश्वास तो बरोबर घेऊन आलेला आहे. भालोदला परत आल्यावर प्रियजनांच्या भेटीचा वृत्तान्त आपल्याला वाचायला मिळतो.

एका गोष्टीचं मात्र राहून राहून आश्चर्य वाटतं. नव्याने स्थापन झालेल्या वायमार प्रजासत्ताकाला राजकीय अस्थिरतेचा शाप होता. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीची परिस्थिती बिकट झालेली होती. ढासळलेली अर्थव्यवस्था, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराचा कळस झाला होता. अशात हेर्मान ग्योरिंग आणि अ‍ॅडोल्फ हिटलरची पहिली भेट घडली १९२२ मध्ये. त्यानंतरही १९२५ पर्यंत पुढील सामाजिक आणि राजकीय घडामोडींची नांदी म्हणता येतील अशा अनेक महत्त्वपूर्ण घटना जर्मनी आणि युरोपमध्ये घडल्या. पण तुकारामसारख्या जागरूक आणि विचक्षण व्यक्तीनं राजकीय परिस्थितीचा उल्लेख अथवा विश्लेषण कुठेही केलेले दिसत नाही. खरे तर तेवढा त्यांचा आवाका निश्चितच होता. दुसरी गोष्ट म्हणजे जर्मन भाषेत कविता करणाऱ्या या तरुणाने कुठल्याच जर्मन साहित्यिकाबद्दल किंवा साहित्यकृतीबद्दल मते नोंदवलेली नाहीत.

तत्कालीन मराठी भाषेची काही गोंडस रूपे या पुस्तकात आढळतात. उदा. विडी ‘ओढणे’ऐवजी ‘खेचणे’, ब्रेसलेटसाठी ‘हातगोफ’, ‘भेटवस्तू’ऐवजी ‘बक्षीस’, ‘अश्लील’ अथवा ‘अश्लाघ्य’ऐवजी ‘अश्लिष्ट’ असे काही शब्दप्रयोग वाचताना मौज वाटते. कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी आपल्या बोलीभाषेत आत्मविश्वासाने लिखाण करावे अशी परिस्थिती तेव्हाच्या अलंकारिक, शुद्ध आणि उच्चभ्रू अभिरुचीने निर्माण होऊ दिली नसावी. त्यामुळेच हे हस्तलिखित बासनात पडून राहिलं असावं असा अंदाज भालचंद्र नेमाडे यांनी वर्तवला आहे. मात्र, नेमाडे यांचं संपादन प्रगल्भ आणि कल्पक आहे. त्यामुळे लेखकाच्या शब्दकळेला आणि शैलीला त्यांनी अबाधित ठेवलं आहे आणि संहितेतली कथात्मकता वाहती ठेवली आहे.

पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीचं काय स्वरूप होतं यावर फारच तुटपुंजं साहित्य मराठीत उपलब्ध होतं. या पुस्तकानं ती बंद दालनं उघडली आहेत. हे आत्मकथन म्हणजे स्वदेशाबद्दल स्मरणरंजन आणि परदेशी संस्कृतीत येणाऱ्या उपरेपणाच्या अनुभवांना शब्दबद्ध करणारं ‘डायस्पोरिक लिटरेचर’ नाही. हे एक मिश्र ललित लेखन आहे. ललित लेखकालाही स्वत:ला, परिसराला, समाजाला उकरून, शोधून आधी त्या माहितीचं संकलन करावं लागतं. मी कोण? माझ्या परिसराशी माझं नातं नेमकं कुठल्या स्वरूपाचं आहे? माझी ओळख किंवा अस्मिता कुठली? या प्रश्नांची उत्तरे शोधत तीक्ष्ण नजरेने जगाकडे पाहणारा तुकाराम गणू चौधरी बदललेल्या सांस्कृतिक संदर्भात जगण्याची, जाणिवेची, आत्मभानाची नेमकी कुठली सम पकडतो, हे नक्कीच वाचनीय आहे. म्हणूनच ‘चांगदेव चतुष्टय’च्या लेखकानंच या पुस्तकाचं संपादन करावं, हा दुग्धशर्करा योग नव्हे काय?

‘जर्मन रहिवास : १९२२-१९२५ मधील जर्मनीचा अनुभव’ – तुकाराम गणू चौधरी,

संपादक- भालचंद्र नेमाडे,

लोकवाङ्मय गृह प्रकाशन,

पृष्ठे- ३४५, मूल्य- ३९५ रुपये.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जयश्री हरि जोशी snehjayam@gmail.com