scorecardresearch

शेक्सपिअर.. जगाचा नागरिक

आपल्या पित्याच्या खुनामागे चुलता असून आपली माताच त्याला वश झाल्याचे पाहून त्याचे विश्वच कोसळून पडते.

शेक्सपिअर.. जगाचा नागरिक

शेक्सपिअर.. आफ्रिकेतील झुलू भाषेतही ज्याच्या नाटकांची भाषांतरे झाली असा नाटककारांचा पितामह. चारशे वर्षांनंतर त्याच्या लिखाणाचा आजच्या काळाशी काय संबंध असणार, असा प्रश्न विचारणाऱ्यांनी आजच्या काही वृत्तपत्रांतील लेखांचे मथळे पाहिले तर शेक्सपिअरच्या
नाटकांच्या नावाचा व संवादांतील वाक्यांचा वापर होत असल्याचे दिसेल. शेक्सपिअरमुळे अनेक शब्द व वाक्प्रचार रूढ झाले. तेव्हा शेक्सपिअर कालबा झाला नसून तो कालातीत आहे. शेक्सपिअरच्या चारशेव्या पुण्यतिथीनिमित्त गोविंद तळवलकर यांनी घेतलेला त्याच्या कालातीततेचा वेध.. (पूर्वार्ध)

‘सिटिझन ऑफ द वर्ल्ड’ हे गोल्डस्मिथचे नावाजलेले पुस्तक आहे. एक चिनी आपला देश सोडून लंडनला येतो. पोशाखापासून बदल करून तो इंग्रजी भाषा, आचार वगरे सर्वच बदलून वावरू लागतो तेव्हा त्याला दिसते, की आपण जी इंग्रजी भाषा शिकलो ती व लंडनमध्ये लोक बोलतात ती यांत तफावत आहे. लोकांच्या आचारविचारांनीही तो भांबावून जातो. यासंबंधी तो जे लिहितो ते चांगलेच करमणूक करणारे आहे.
गोल्डस्मिथचा हा चिनी एका देशातून दुसऱ्या देशात येतो व त्याला लेखकाने जगाचा नागरिक ठरविला. पण जगाचा खरा नागरिक पूर्वीच मान्य झाला होता व तो म्हणजे विल्यम शेक्सपिअर! तो स्वत:च्या देशापलीकडे कधी गेला नव्हता. त्याच्या काही नाटकांचा विषय व पात्रे इटलीची आहेत. पण तो स्वत: आपल्याच मायभूमीत राहत होता. असे असूनही जगातील जास्तीत जास्त देशांत त्याचे वाङ्मय पोचले, देशोदेशीचे त्याचे भक्त आणि रसिक वाढत गेले आणि हे आजतागायत चालू आहे. लौकिक वाढू लागला तेव्हा वृत्तपत्रांचा फार आधार नव्हता. प्रारंभीच्या काळात त्यांचा प्रसार मर्यादित होता. शेक्सपिअरची नाटके हेच माध्यम इतके जबरदस्त प्रभावशाली होते, की तेव्हाच्या वृत्तपत्रांवर सर्वस्वी अवलंबून राहण्याचे कारण नव्हते. पुढच्या काळात वृत्तपत्रे, आकाशवाणी आणि नंतर दूरचित्रवाणी ही फार व्यापक साधने आली. उपयोगी पडू लागली. त्यांनी शेक्सपिअरच्या नाटकांचा उठाव करण्यात मोलाची कामगिरी बजावली.
काही जणांनी असेही म्हटले आहे की, ब्रिटिश साम्राज्यसत्ता जगाच्या कानाकोपऱ्यात पसरली होती, तिचा उपयोग होऊन शेक्सपिअरच्या नाटकांचा इतका प्रसार झाला. पण इंग्रजांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नसल्याचा काळ केव्हाच संपून काही दशके झाली तरी शेक्सपिअरच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली नाही.
अनेक देशांत त्याच्या नावाने संस्था स्थापन झाल्या आहेत; विद्यापीठांत अध्यासने आहेत. आश्चर्य वाटेल, पण आफ्रिकेतील झुलू भाषा बोलणाऱ्या देशांत शेक्सपिअरच्या नाटकांची भाषांतरे झाली असून त्यांचे प्रयोग होतात.
ज्याच्या निधनाला चारशे वर्षे झाली त्याच्या लिखाणाचा आजच्या काळाशी काय संबंध असणार, असा प्रश्न विचारला जातो. तो विचारणाऱ्यांनी आजच्या काही वृत्तपत्रांतील लेखांचे मथळे पाहिले तर शेक्सपिअरच्या नाटकांच्या नावाचा व संवादांतील वाक्यांचा वापर होत असल्याचे दिसेल. हे अर्थात इंग्रजीत जाणवेल. शेक्सपिअरमुळे अनेक शब्द व वाक् प्रचार रूढ झाले. इंग्रजीचा उपयोग करणाऱ्यांना हे नित्य व्यवहारातील अनुभवास येते. तेव्हा शेक्सपिअर कालबा झाला नसून तो कालातीत आहे.
जे त्याच्या नाटकांच्या प्रभावातून दूर झाले नाहीत त्यांना अनेक प्रसंगी त्याची वाक्येच्या वाक्ये आठवतात. एडिंबराच्या भव्य किल्ल्यावर चढून गेल्यावर ‘कोण येत आहे? मित्र की शत्रू?’ हे हॅम्लेटमधील वाक्य आठवले.
विद्याधर गोखले व मी एकत्र काम करत असताना काही त्रासदायक माणसांपकी कोणी आला असता, गोखले त्यांच्या स्वभावाप्रमाणे काही तरी बोलण्याचा संभव दिसला. मी त्यांना आवरले. तो माणूस निघून गेल्यावर मी गोखले यांना म्हणालो की, ‘‘मी अशा वेळी कोणी जवळचा असल्यास त्याच्यापाशी आणि नसेल तर मनात हॅम्लेटच्या बापाचे भूत येत असल्याचे पाहून त्याचा सहकारी म्हणतो ते बोलतो- ‘माय लॉर्ड, इट कम्स्’.’’ गोखले यांनी या वाक्याचा कधी विसर पडू दिला नाही.
व्हर्जिनिया वुल्फ शेक्सपिअरच्या घरात जाऊन कोपरा न कोपरा धुंडाळण्यात रमली असता, आपल्याला शेक्सपिअर वावरत असल्याचा भास होत असल्याचे तिने लिहून ठेवले आहे. मी जवळजवळ ५० वर्षांपूर्वी प्रथम लंडनला गेलो व तिथून कॅन्टरबरीला. शेक्सपिअर वडिलांच्या बरोबर ज्या कॅन्टरबरीला जात होता तिथून आपण सुरुवात करून त्याच्या स्ट्रॅटफर्डला जाणे चांगले, असा विचार मी केला होता. गावात बराच फेरफटका मारला. नाताळ जवळ येत होता. त्यामुळे रोषणाई होऊ लागली होती. रात्रीच्या वेळी गाणी, वाद्यसंगीत आणि नाच यांत लोक रंगले होते.
त्या आनंद व संगीतमय वातावरणात मला शेक्सपिअरच्या ‘र्मचट ऑफ व्हेनिस’मधील ओळी आठवल्या.
‘‘संगीताने माणसाचा स्वभाव बदलून जातो. ज्या माणसाच्या व्यक्तित्वात संगीत नाही आणि
सुरांच्या मिलाफाने जो भारावून जात नाही, तो कटकारस्थानी असतो आणि अशा माणसावर कधीही विश्वास ठेवू नये.’’
But music for the time doth change his nature.
The man that hath no music in himself,
Nor is not mov’d with concord of sweet sounds,
Is fit for treasons, strategems and spoils; —
Let no such man be trusted.
या ओळी आठवत झोप काढली आणि दुसऱ्या दिवशी अनेक वर्षे ज्या स्ट्रॅटफर्डला जाण्याचे मनात होते तिकडे उल्हसित वृतीने गेलो. दिवस व रात्रीचा काही काळ स्वप्नभूमीत वावरल्याप्रमाणे वावरलो. काळाचे बंधन नसलेला शेक्सपिअरसारखा अलौकिक लेखक स्ट्रॅटफर्डला जन्मला व वाढला. ते अगदीच लहान नव्हते. तिथून १८ मलांवर असलेल्या कॅन्टरबरी या महत्त्वाच्या गावास सात-आठ वर्षांच्या विल्यमला त्याचे वडील करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यासाठी मधूनमधून नेत. शेक्सपिअरच्या नाटके लिहिण्याच्या प्रेरणेचा अंकुर तेव्हा फुटला असे मानले जाते. नंतर अगदी तरुण शेक्सपिअर नशीब काढण्यासाठी लंडनला गेला आणि तिथल्या नाटकांच्या प्रयोगांनी आकर्षति होऊन ‘जो आला तो रमला’ हा न्याय त्यालाही लागू झाला. पहिला काही काळ तो रंगभूमीवर शिकाऊ नट म्हणून आला. नंतर नाटके लिहावी व नट म्हणून काम करावे हा नित्याचा परिपाठ झाला.
याचे कारण आíथक होते. कारण तेव्हा नाटककारास क्षुल्लक मिळकत होती, पण नटाला रोजची कमाई होत होती. नाटकाचे रीतसर पुस्तक निघत नसे; त्यातल्या त्यात शेक्सपिअरच्या काही नाटकांची पुस्तके निघाली तरी कमाई काही नव्हती. नट म्हणून काम करत असल्यामुळे लोकांना काय आवडते याची कल्पना या नवोदित नाटककारास आली. पण लोकांना हवे ते देऊन त्यास यश आले असे नाही. उलट असे दिसेल की, नाटकाचा कर्ता आणि प्रेक्षक यांची तार जुळत गेली आणि म्हणून हा नाटककार देईल त्यावर प्रेक्षक खूश होत गेले.
नाटकाच्या विविध अंगांशी इतका परिचय असल्यामुळे शेक्सपिअरला नाटक मंडळींच्या आगमनामुळे उडालेली गडबड हॅम्लेटमध्ये चांगली दाखवता आली. नाटक सादर करण्यापूर्वी पात्रांना हॅम्लेट अभिनयासंबधी ज्या सूचना देतो त्या तशाच्या तशा आजही दिग्दर्शक देत असेल. शेक्सपिअरने प्रथम नाटय़गृहाच्या व्यवहारात भागीदारी सुरू केली आणि ती वाढत गेली. सर्व थरांतल्या प्रेक्षकांचा भक्कम आधार आणि राजा किंवा राणी- जो कोणी सिंहासनावर असेल तो व ती शेक्सपिअर ज्या कंपनीत महत्त्वाचा भागीदार असेल त्या कंपनीला आश्रय जाहीर करत असत. व्यावहारिकदृष्टय़ा ते हिताचे होत असे.
राजे, राण्या, बडे उमराव व ज्यांना पिटातले प्रेक्षक मानले जाते त्यांची संख्या वाढती ठेवण्यात आर्थिक लाभ होता. यामुळे तेव्हाच्या इंग्रजी नाटकाचे स्वरूप बनत गेले. यामुळे श्रमजीवी प्रेक्षकांना बांधून ठेवणारे विनोद नाटकात हमखास येत. मराठी रंगभूमीवर त्या इंग्रजी नाटकांचा प्रभाव होता. यामुळे बहुतेक नाटकांत एखाददुसरा विनोदी प्रवेश असे आणि आपल्याकडे दिनकर कामण्णा हा नट पूर्वी गाजला होता आणि नंतर अनेक नटांनी नाव मिळवले.
‘एकच प्याला’त तळीराम आणि आर्य मदिरा मंडळ आहे. ‘राजसंन्यासा’ त जिवा आहे तर ‘भावबंधन’ मध्ये धुंडिराज.
शेक्सपिअरच्या नाटकांचे विषय, काळ इत्यादी काहीही असो, तो आपल्या पात्रांच्या मानसिकतेवर कटाक्ष ठेवणारा नाटककार म्हणून नावाजला गेला. पण पात्रांचे मानसिक विश्लेषण करून मानसशास्त्राचा तास नाटकाच्या रूपाने घेण्याचा त्याने प्रयत्न केला नाही किंवा प्रवचनही ऐकवले नाही.
हॅम्लेट, ऑथेल्लो, मॅक्बेथ अणि किंग लिअर या चार श्रेष्ठ शोकांतिकांसंबंधी ए. सी. ब्रॅडली यांनी अतिशय अभ्यासपूर्ण भाषणे दिली आणि नंतर ती पुस्तक रूपाने लोकांपुढे आली. त्याच्या किती आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या हे माहीत नाही. ब्रॅडली यांच्यावर एक कविता प्रसिद्ध झाली होती. शेक्सपिअरचे भूत सरकारी सेवेच्या परीक्षेस बसते.
पण त्यास किंग लिअरबद्दलच्या प्रश्नपत्रिकेस उत्तर देता येत नाही, कारण त्याने ब्रॅडली वाचला नव्हता.
I dreamt last night that Shakespeare’s Ghost
Sat for a civil service post.
The English paper for that year
Had several questions on King Lear
Which Shakespeare answered very badly
Because he hadn’t read his Bradley.
ब्रॅडली यांचे मुख्य सूत्र हे आहे की, स्वभाव हा व्यक्तीच्या शोकान्तिकेच्या वा सुखान्तिकेच्या मुळाशी असतो. हॅम्लेट संवेदनशील वा भावनाशील आहे, तसाच तो आदर्शवादी आहे.
आपल्या पित्याच्या खुनामागे चुलता असून आपली माताच त्याला वश झाल्याचे पाहून त्याचे विश्वच कोसळून पडते. संवेदनशीलतेमुळे तो उपाययोजनेबाबत विलंब करत होता, कृती करण्याचा निर्णय घेण्यास तो असमर्थ असल्याचा समज बरोबर नसून कृतीनंतर तिचे परिणाम काय, हा प्रश्न त्याला सतावत होता. ते प्रतिभावंताचे बंधन होते. या नाटकास शोभेल अशी शेक्सपिअरची भाषा आहे, तर ऑथेल्लो या योद्धय़ाला शोभेल अशी सरळ, उघडीवाघडी भाषा आहे. ऑथेल्लोच्या सरळ, भोळ्या स्वभावामुळे इआगोसारखा महत्त्वाकांक्षी आणि कारस्थानी सहकारी ऑथेल्लोच्या मनात डेस्डेमोना या त्याच्या पत्नीबद्दलच संशयाचे विष पेरतो आणि तिचा बळी घेतला जातो.
मॅक्बेथ योद्धा खरा, पण महत्त्वाकांक्षी. त्याला राज्यपद हवे होते, पण त्याला यासाठी तयार करते ती त्याची पत्नी. इतकेच काय, आपल्या आकांक्षेच्या आड आपला सहकारी बांकुओ येईल म्हणून त्याचा काटा काढण्यास मॅक्बेथला त्याची पत्नी तयार करते. साध्याबद्दल पती-पत्नीत एकमत असले तरी साधनाबाबत ती ठाम होती, तर तो गोंधळात. पण अखेर पत्नीची सरशी होते आणि मॅक्बेथ पाहुणा म्हणून आलेल्या राजाचा खून करतो. मग राज्य मिळाले तरी ते टिकत नाही. असा हा स्वभावाचा खेळ आहे.
‘किंग लिअर’ हे नाटक रंगभूमीवर आणावे की नाही, तसेच ते रंगभूमीच्या मर्यादांमुळे आणणे रास्त आहे की नाही, याची बरीच चर्चा होत होती. अर्थात असे असूनही ते रंगभूमीवर आले. पण शेक्सपिअरच्या इतर नाटकांप्रमाणे हे नाटक फार वेळा रंगभूमीवर आले नसण्याचा संभव अधिक. त्याचा आवाकाच मोठा, विषय व भाषा हीसुद्धा सामान्य व्यवहारापलीकडची. त्याचा नायक हा कमालीचा आत्मकेंद्रित आहे तसाच तो अतिउदारही आहे. त्याच्या तीन मुलींवर त्याचे जिवापाड प्रेम होते.
यामुळे लिअर जे करू नये ते करण्यासाठी पुढचे पाऊल टाकतो. शापिरो या शेक्सपिअरविषयक अभ्यासकाने दाखवून दिले आहे की, लिअरच्या पूर्वी स्वत:च्या राज्याचे विभाजन करणारा राजा होऊन गेला होता व तो अयशस्वी झाला होता. शेक्सपिअरने तोच विषय निवडला.
गोविंद तळवलकर – govindtalwalkar@hotmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-04-2016 at 02:30 IST

संबंधित बातम्या