एकाच वेळी एका ठिकाणी अनेक मंच… त्यांवर साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल….ज्याला ज्या विषयांत रस त्याच्यासाठी ‘मंत्रमुग्ध’ वगैरे होण्याचे बहुपर्याय. मराठी समुदायाला ‘लिटफेस्ट’ संकल्पनेची आणि त्याच्या आवाक्याची जाणीव करून देण्यासाठी ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’चा पहिलावहिला उपक्रम यंदा मुंबईत पुढील आठवड्यात सुरू होईल. यात अभिजात साहित्य-कला-संगीत-नृत्य-नाटक यांचा सन्मान तर आहेच, त्याशिवाय लेखनातल्या नव्या प्रवाहांची, नव्या लेखकांची आणि समकालीन साहित्यजगताची दखल घेण्याचा प्रयत्न असेल. काय असेल या ‘लिटफेस्ट’मध्ये त्याची झलक…
पारंपरिक संमेलने आणि उत्सवांची घडी खरे तर नव्वदीपूर्वी विस्कटली. कारण त्यांना समाजाची अन् साहित्याची नाडी पकडण्याची कला जमलीच नाही. नव्वदीपर्यंत मराठी लोकांचे जगणे एकरेषीय, संथगतीने सुरू होते. नव्वदोत्तरीनंतरच्या तंत्रज्ञान बदलाने, सांस्कृतिक क्रांतीने, मध्यमवर्गाच्या आर्थिक उन्नयनामुळे जगण्यात आमूलाग्र उलथापालथ झाली. हा वेग इतका भीषण आणि शहर-ग्रामीण भेद मिटविणारा होता, की या सगळ्यात घडणारे साहित्य-लिहिणारे लेखक यांना समजून घेण्याचे संमेलनांसारख्या रूक्ष, मान-अपमानांचे, सवत्यासुभ्यांचे जाड थर चढलेल्या संस्थांना जमले नाही. त्यामुळे या दशकांत काय नवीन येतेय, काय वाचले जातेय, यांची चर्चा करण्याऐवजी गतकातरतेत तसेच जुन्यांच्या आरती ओवाळणीकडे कल अधिक राहिला. ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’चा हेतू या चुकांना टाळत नव्या जाणिवांचे साहित्य समोर आणण्याचा. जागतिकीकरणानंतर जगणे बदललेल्या साहित्यिकांचे आजचे प्रश्न काय आहेत, लेखन करताना या प्रश्नांशी ते कसे भिडतात, समाजमाध्यमकाळाने दिलेल्या आत्मउदोउदोकरणाच्या बुजबुजाटात चांगले लिहिण्याची कास धरणाऱ्या साहित्यिकांना भवताल कसा दिसतो, या साऱ्यांवर ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या व्यासपीठावर चर्चा होईल. या लेखकांशी गप्पा-त्यांना भेटण्याची-त्यांची पुस्तके खरेदी करण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध आहेच.
लिटफेस्टविषयी…
येत्या ३० ऑक्टोबरपासून मुंबईभर तब्बल आठवडाभर चालणाऱ्या या लिटफेस्टचा पडदा उघडेल. यात ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्याशी संवादाचा कार्यक्रम असेल. त्यानंतर मराठी संस्कृतीच्या श्रीमंतीचा हा सौंदर्योत्सव प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर प्रांगण, कल्याण येथील आचार्य अत्रे सभागृह, पार्ल्यातील लोकमान्य सेवा संघ, ठाण्यातील गडकरी रंगायतन आणि डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सर्वांसाठी साजरा होईल. जगणे समृद्ध करण्यास आवश्यक वाङ्मय, चित्र, नाट्य, संगीत अशा क्षेत्रांचा कलात्मक आनंद या महोत्सवातून आकंठ लुटता येईल. स्वानंद किरकिरे, चंद्रकांत काळे, अंबरीश मिश्र, वैभव जोशी, बेगम परवीन सुलताना, अश्विनी भिडेदेशपांडे, रोणू मजुमदार, रोंकिणी गुप्ता, बेला शेंडे, प्रियांका बर्वे आदी कलाकारांचे विशेष सादरीकरण, सुधीर पटवर्धन यांच्यासारख्या ज्येष्ठ चित्रकर्मींचा सहभाग. शिवाय त्यांच्यावरील विशेष डॉक्युमेण्ट्रीचे पहिले सादरीकरण खास या मंचावर होईल. चंद्रकांत कुलकर्णी यांच्या ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ या नाटकाचा शुभारंभ प्रयोग तसेच देवेंद्र पेम यांच्या ‘ऑल दी बेस्ट’ या नाटकाचा खास प्रयोग सादर होईल. श्रीनिवास खळे यांच्या अमीट गाण्यांचा नृत्यात्मक आविष्कार सोनिया परचुरे साकारतील. प्रथितयश कलाकारांच्या पुुढल्या पिढीचा ‘शागीर्द’ हा कार्यक्रमदेखील लिटफेस्टमधील विशेष आकर्षण ठरेल.
उद्याच्या जाणिवेचे लेखक…
गुहागरजवळच्या आडगावातून चौथ्या इयत्तेत मुंबईत आलेला प्रदीप कोकरे त्याच्या घरात शिकलेला पहिलाच. दूरस्थ ओळखीच्या घरांत राहून, रात्रशाळेतून शिक्षण घेऊन मुंबई आपल्या आत भिनवत गेला. नोकरी करीत उच्च शिक्षण घेऊन त्याने चाळीत हक्काचा निवारा मिळवला. ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ ही त्याची पंचविशी-तिशीच्या आसपास लिहिली गेलेली पहिली कादंबरी राज्य पुरस्कारासह साहित्य अकादमी युवाचा टप्पा पार पाडणारी ठरली. ‘पटेली’ ही अविनाश उषा वसंत याची पहिली कादंबरी मुंबईच्या मध्यवर्ती भागातील आजच्या तरुणाचे जगणे मांडणारी. महानगर नव्वदीनंतर नुसत्या चेहऱ्या-मोहऱ्यानेच देखणे बनले. पण शहराच्या आतमध्ये त्यामुळे आणखी कितीतरी नव्या समस्या तयार झाल्या. लोकांच्या मनांचा दुभंग आधीच्या पिढ्यांपेक्षा खूप भिन्न होता. तिशी-पस्तिशीतल्या अविनाशला तो कादंबरीतून पकडता आला. गावाशी नव्या पिढीचे नाते दोन हजारोत्तर काळात कसे बदलले. मुळात या काळात गावांचेदेखील शहरीकरणासारखेच अभिसरण झाल्याने साहित्यात त्याचे पडसाद कसे उमटले यावर लिटफेस्टमध्ये या दोघांना ज्येष्ठ पत्रकार आणि लोककलांचे अभ्यासक प्रशांत पवार बोलते करतील.
कथा अभिवाचन…
माणदेशातल्या कोरडवाहू भागात वाढलेल्या, डॉ. मॅक्सिन बर्नसन, डॉ. मंजिरी निंबकर यांनी काढलेल्या प्रयोगशील शाळेत कला आणि लेखनाचे धडे घेतलेल्या वसिमबार्री मणेर हा गेल्या दशकापासून कथा साहित्यात झळकतोय. फलटणमध्ये ‘दवात ए दक्कन’ ही प्रकाशनसंस्था उभारून त्याने स्वत: मुलांना पुस्तकांची गोडी लागावी अशी पुस्तके लिहिली. त्यातून आलेल्या ‘मौजे पुस्तक संच १’ या खंडाला राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले. चित्रकार आणि लेखक असलेल्या वसीमबार्रीने फलटणमध्ये स्टुडिओ उभारला. गेली पंधरा वर्षे त्याने सिनेमॅटोग्राफर आणि कॅमेरामन म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये काम केले. ‘डॉक्युमेण्ट्री’मेकर म्हणूनदेखील त्याची आणखी एक ओळख. सध्या एफटीआयआयमध्ये प्राध्यापकी करणाऱ्या वसीमबार्रीचा ‘झुम्कुळा’ हा संग्रह बराच गाजलेला. त्यातील ‘ऑपरेशन’ या कथेची पटकथा अमेरिकेतील सनडान्स महोत्सवात निवडली गेलीय. वसीमबार्री हा उत्तम निवेदकदेखील आहे. तो या लिटफेस्टमध्ये त्याच्या कथेचे अभिवाचन करेल.
‘तोडी मिल फँटसी’ हा सांगीतिक प्रयोग गेल्या दोन वर्षांपासून बराच चर्चिला जातोय. मुंबईवरच्या या आधुनिक संगीत नाटकाचा कर्ता-धर्ता सुजय जाधव कामगार वस्तीतून पुढे आलेला कलावंत. रॅप आर्टिस्ट आणि परफॉर्मर. त्याची दुसरी बाजू म्हणजे उत्तम कथालेखन. ‘जिब्रिश कथा’ या नावाचा त्याचा संग्रहदेखील प्रकाशित. मुंबई शहरातील प्रत्येकाच्या अस्तित्वाचा विचार करायला लावणाऱ्या तीन तासांच्या सांगीतिक प्रयोगाइतकेच त्याचे कथा अभिवाचनदेखील लिटफेस्टचे खास आकर्षण राहील.
‘भुरा’नंतरचे बाविस्कर…
धुळे जिल्ह्यातील एका कोरडवाहू खेड्यातील एका जिद्दी मुलाची गोष्ट म्हणजे ‘भुरा’ हे पुस्तक. प्रा. शरद बाविस्कर यांच्या आत्मकथनाने मराठी साहित्यात अचंबित करणारे यश मिळविले. युरोपातील तीन आणि भारतातील दोन मास्टर्स पदव्या मिळवून ‘जेएनयू’मध्ये फ्रेंच त्त्वज्ञान शिकविणाऱ्या बाविस्कर यांचे सामाजिक भाषाशास्त्र, फ्रेंच साहित्य, संस्कृती अध्ययन आणि तत्त्वज्ञान हे अभ्यासविषय आहेत. ‘लोकसत्ता’त सुरू असणाऱ्या ‘तत्त्व-विवेक’ या त्यांच्या सदराचा संदर्भ अर्थातच त्यांचे प्रारंभिक भाषण आणि नंतरची प्रश्नोत्तरे यांना असणार आहे.
कवितेचा प्रहर…
मराठी सारस्वताच्या प्रांगणातील काव्यप्रभुत्वासाठी ओळखले जाणारे नाव म्हणजे अरुणा ढेरे. शांता शेळके यांच्यानंतर मराठीचा काव्यकोश असेच अरुणा ढेरे यांचे वर्णन करता येईल. ‘मी आणि माझी कविता’ असा शुद्ध कवितेस वाहिलेला कार्यक्रम त्या लिटफेस्टमध्ये सादर करतील. अनेक अभिजात कवींचा, त्यांच्या कवितांच्या रसग्रहणाची संधी यानिमित्ताने मिळेल.
युवा अकादमिस्टांशी चर्चा…
कवी आणि कादंबरीकार प्रणव सखदेव मूळचा कल्याणचा. आता पुण्यात रोहन प्रकाशनासह अनेक संस्थांमध्ये अनुवादक-संपादक या पदावर कार्यरत. कॉलेजवयीन संदर्भ असलेली त्याची ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ साहित्य अकादमी, युवा पुरस्कार पटकावणारी ठरली. ‘निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य’ हे त्याचे लोकप्रिय कथासंग्रह. कल्याणमधील संदर्भ असलेली ‘के कनेक्शन’ ही त्याची कादंबरी नुकतीच प्रकाशित झालीय.
‘मी संदर्भ पोखरतोय’ या राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या पवन नालट याच्या काव्यसंग्रहाला तीन वर्षांपूर्वी साहित्य अकादमी, युवा पुरस्काराने गौरविण्यात आले. अमरावतीचा हा कवी आता खूप लोकप्रिय बनला आहे. समकालीन सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जगतात जे घडते-बिघडतेय त्याचे पडसाद त्याच्या काव्यसंग्रहात आहेत.
याशिवाय ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या मुंबईतील तरुणाच्या जगण्यावरील कादंबरीसाठी ताजा साहित्य अकादमी, युवा पुरस्कार मिळालेला प्रदीप कोकरे याचाही सहभाग असलेला ‘युवा अकादमिस्टांशी चर्चे’चा कार्यक्रम चुकवू नये गटात मोडणारा असेल.
पुस्तकांची मेजवानी…
राजहंस, रोहन, मॅजेस्टिक, लोकवाङ्मय गृह, पॉप्युलर, ज्योत्स्ना प्रकाशन यांसह मराठीतल्या महत्त्वाच्या प्रकाशकांच्या नव्या आणि गाजलेल्या पुस्तकांचे कार्यक्रम ‘लिटफेस्ट’च्या व्यासपीठावर समांतररीत्या होतील. यांत ‘लेखक तुमच्या भेटीला’, ‘नव्या पुस्तकांची प्रकाशने’, लेखकांशी गप्पा अशा अनेकविध उपक्रमांची रेलचेल असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘वाचू आनंदे’ या लोकसत्ताच्या उपक्रमामधून तयार झालेल्या यादीतील बहुतांश पुस्तके, तसेच खरेदीचा प्रचंड पर्याय असलेली पुस्तके वाचकांना पाहतानिवडता येतील.
लव्ह अॅण्ड लावणी…
लावणीला देशभरच नव्हे तर विदेशातील मंचावरदेखील गांभीर्याने पोहोचविण्याचे काम केले ते भूषण कोरगावकर यांच्या ‘लव्ह अॅण्ड लावणी’ या कार्यक्रमाने. मराठी, हिंदी आणि दखनी भाषेचा वापर असलेला हा प्रयोग शबाना अष्टुरकर या नामवंत लावणी कलावंताच्या आयुष्यावर बेतलेला आहे. प्रख्यात अभिनेत्री अनिता दाते, अभिनेता संभाजी ससाणे या सूत्रधारांसह शंकुतलाबाई सातारकर, पुष्पा सातारकर, गौरी जाधव, चंद्रकांत लाखे, विनायक जावळे, सुमित कुडाळकर आदी कलाकार हा प्रयोग गाजवतात. लिटफेस्टमध्ये या प्रयोगाचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल.
जीएसुनीताबाई पत्रसंवादाचे नाट्यरूप
जी. ए. कुलकर्णी आणि सुनीताबाई देशपांडे या दोन प्रतिभावान सारस्वतांमधील मैत्र त्यांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रांच्या ग्रंथातून समोर आले. ‘प्रिय जी. ए.’ या ग्रंथाचे अभिवाचन प्रयोगही रंगले. मात्र, नाटकाच्या रूपात ही संहिता पहिल्यांदाच समोर येणार आहे. या अभिनव ‘पत्र’ नाट्याचा विशेष प्रयोग गिरीश कुलकर्णी आणि माधुरी पुरंदरे ‘लिटफेस्ट’च्या मंचावर सादर करणार आहेत.
१९७५ हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर झाले… यंदाचं हे पन्नासावं वर्षं. त्यानिमित्ताने मराठीतील नामवंत कवयित्रींची ‘तिची कविता’ या काव्यमैफलीचं आयोजन लिटफेस्टमध्ये असेल. यात मराठी कवितेत आपल्या कवितांचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या संवेदनशील कवयित्री सहभागी होतील. कवयित्री नीरजा, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, प्रज्ञा दया पवार आणि मीनाक्षी पाटील आपल्या कविता सादर करतील.
‘दास्तानएरामजी’
‘दास्तानगोई’ हा उर्दू कलाप्रकार मराठीत आणणारा अक्षय शिंपी अनेक हिंदी मालिका-चित्रपटांत झळकलेला अभिनेता. २०१० पासून व्यावसायिक स्तरावर पूर्णवेळ अभिनेता आणि लेखक म्हणून कार्यरत. मुंबई शहरावरील ‘दास्तान-ए-बड़ी बांका’ हा प्रयोग प्रचंड गाजला. ‘बिनचेहऱ्याचे कभिन्न तुकडे’ हा कवितासंग्रह प्रकाशित. ‘शंकर शेष फाउंडेशन’, ‘शरद पवार फेलोशिप’ तसेच साहित्य अकादमीची प्रवासवृत्तीदेखील २०२३ सालासाठी प्राप्त. ‘दास्तानगोई’मधील ‘दास्तान-ए-रामजी’ हे पुष्प अक्षय शिंपी व नेहा कुलकर्णी सादर करतील. ‘आता आमोद सुनासि आले’ या दि. बा. मोकाशींच्या बहुचर्चित कथेवर हा प्रयोग आधारलेला आहे.
खाद्यासंस्कृती… पुस्तके ते मोबाइल
जगभरातील खाद्यासंस्कृती वैविध्यपूर्ण आहे. मराठी पाककलेच्या पुस्तकांचा इतिहास सुमारे १८७५ पासून सुरू झाला तो रामचंद्र सखाराम गुप्ते यांच्या ‘सूपशास्त्र’ या पुस्तकाने. हीच परंपरा पुढे कशी सुरू राहिली… तिचे बदलते स्वरूप आणि खाद्यासंस्कृतीच्या अभ्यासातील त्यांचे महत्त्व सांगणार आहेत खाद्यासंस्कृतीच्या अभ्यासक डॉ. मोहसिना मुकादम आणि डॉ. सागर कारखानीस.
लेखन मार्गदर्शन…
गणेश मतकरी हे शिक्षणाने आर्किटेक्ट. गेल्या दोन दशकांत सिनेमासमीक्षा ते कथनसाहित्य असा त्यांचा लेखनप्रवास विविध माध्यमांतला. शॉर्टफिल्म, मालिका लेखनदिग्दर्शन, मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रांसाठी चित्रपट परीक्षण यांत ठसा उमटवणारी ओळख. तसेच आघाडीचे कथालेखक हाही लौकिक. निखिलेश चित्रे यांचा लेखनप्रवासदेखील सिनेसमीक्षणाकडून कथालेखनाकडे वळलेला. शॉर्टफिल्म दिग्दर्शन, पटकथा, पत्रकारिता, अनुवाद असे लेखनाचे बहुविध प्रकार हाताळले. यादरम्यान ‘आडवाटेची पुस्तके’ हे अकथनात्मक आणि ‘गॉगल लावलेला घोडा’ हे कथांचे पुस्तक. या दोघांची विविध माध्यमांतील लेखनावरील कार्यशाळा लिटफेस्टमध्ये असेल. ‘लिहिणे’ या कलेविषयी आस्था असणाऱ्यांसाठी, लेखनेच्छुकांसाठी, पत्रकारलेखक बनण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही पर्वणी असेल.
नवे लेखक काय म्हणतायत?
मराठवाड्याच्या निमशहरी भागातून मुंबईत आलेल्या प्रसाद कुमठेकरने आपले उदगीर शहरच ‘बगळा’ या कादंबरीचा भाग बनविले. तिथला भूगोल आणि बोलीभाषा यांना नव्वदोत्तरी दशकात जडणघडण होत असलेल्या नायकाबरोबर फुलविले. असंख्य टीव्ही मालिकांच्या पटकथा आणि संवादाच्या व्यापात त्याच्या ‘बारकुल्या बारकुल्या गोष्टी’चं पुस्तक साकारले. त्यानंतर आणखी दोन पुस्तकांनी त्याला या दशकाच्या महत्त्वाच्या लेखकांमध्ये नेऊन ठेवले.
गारगोटी येथला जन्म असलेल्या मृद्गंधा दीक्षित हिचे वकिलीपर्यंतचे शिक्षण कोल्हापूरमधले. मात्र वकिलीला बगल देत तिने पुण्यात साधना प्रकाशनामध्ये उपसंपादक म्हणून काही वर्षे काम केले. यशवंतराव चव्हाण सेंटरची शरद पवार फेलोशिपअंतर्गत प्रकाशित झालेल्या ‘करुणापटो’ या तिच्या कादंबरीची दुसरी आवृत्ती लवकरच येत आहे. सध्या युनिक फीचरच्या ‘अनुभव’ मासिकात तिची कथामालिका सुरू आहे.
जाणीवपूर्वक मुस्लीम समाजाबद्दल सडेतोड लेखन अनेक माध्यमांमधून करणाऱ्या हिना कौसर खान हिचा नवा कथासंग्रह ‘स्टिअरिंग’ नुकताच प्रकाशित झालाय. ‘इत्रनामा’ या तिच्या पहिल्या कादंबरीआधी रिपोर्ताज, मुलाखती, कथा, कादंबरी, कविता, ललित, स्फूट असे अनेक दमदार घटक तिच्या लेखनभात्यात आहेत. हिनाने समाजमाध्यमावर चालवलेला ‘भिंतीशी मारलेल्या गप्पा’ हा हॅशटॅग संवादी आणि विचारप्रवर्तक लिखाणामुळे लोकप्रिय झालाय. या तिन्ही लेखकांशी संवादाची, त्यांना जाणून घेण्याची संधी एकाच सत्रात असेल.
‘न आकळे विनोद?’
सध्या भारतीय समाज काही गोष्टींविषयी अधिकच संवेदनशील झालेला दिसतो. पूर्वी विनोदाला विनोद म्हणून स्वीकारणारा समाज अधिक प्रगल्भ होता की काय असं वाटावं असं सध्याचं चित्र. समाजातील हा बदल का आणि कसा झाला याविषयी ‘न आकळे विनोद?’ या चर्चासत्रात विनोदी लेखक सॅबी परेरा आणि मंदार भारदे प्रकाशझोत टाकतील.
खरा खोटा इतिहास…
तथ्यांवर आधारलेला इतिहास लोकांपर्यंत जावा व त्याचे विकृतीकरण टळावे यासाठी ऐतिहासिक साधनांचा अभ्यास आणि पद्धतशीर संशोधन करणे फार गरजेचे आहे. अनेकदा केवळ एका विशिष्ट दृष्टिकोनातून इतिहास सांगितला जातो आणि त्यातील सत्य आणि असत्य यांची सीमारेषा धूसर होत जाते. या विषयावर ऊहापोह करणाऱ्या ‘खरा खोटा इतिहास…’ या चर्चासत्रात इतिहास अभ्यासक श्रद्धा कुंभोजकर आणि हेमंत प्रकाश राजोपाध्ये सहभागी होतील.
‘पारलैंगिकांची अभिव्यक्ती’…
पारलैंगिकांचं अर्थात LGBTQ यांचं जगणं… आपला समाज या लोकांना अजूनही तितक्या खुलेपणाने स्वीकारत नाही हे आताच्या घडीचे सत्य. ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ ही समाजाची धारणा या लोकांबाबतीत मात्र दिसत नाही. समाजातील या घटकांचा सहज स्वीकार व्हावा यासाठी त्यांना अधिकाधिक समजून घेणं गरजेचं आहे. समाजातील त्यांचं जगणं, स्वीकार यावर खुली चर्चा ‘पारलैंगिकांची अभिव्यक्ती’ सत्रात केली जाईल. यात नक्षत्र बागवे, प्रीशा, जमिनी बाविस्कर यांच्याबरोबरच अशा मुलांच्या पालकांचे मनोगत व्यक्त करतील अरुणा देसाई.
जश्नएमराठी
तरुण शास्त्रीय गायक मंदार पिलवलकर आणि त्यांचे सहकारी त्यांची ‘जश्नएमराठी’ ही गानसंध्या लिटफेस्टमध्ये गाजवतील.
स्वरचित प्रयोग…
खणखणीत अभिनयासाठी नावाजलेले अभिनेते अतुल कुलकर्णी आणि अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी ही जोडी पहिल्यांदाच एका नव्या कोऱ्या प्रयोगाच्या सादरीकरणासाठी एकत्र आली आहे. या दाम्पत्याचा ‘स्वरचित’ असा विशेष प्रयोग या साहित्यिक मंचावर होईल.
चित्रभान…
‘लोकसत्ता‘मधून दररोज ‘काय चाललंय काय’ विचारणारे व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी व्यंगचित्रावर गप्पा, चर्चा आणि सादरीकरण करणार आहेत. ‘लोकसत्ता’चे चित्रकार नीलेश जाधव खास मुलांसाठी चित्रसादरीकरण करणार आहेत.
का वाचायचं?…
‘वाचाल तर वाचाल’ हे केवळ म्हणण्यापुरते नाही. वाचनाचा आपल्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो. वाचन किती महत्त्वाचे आहे याविषयी ‘वाचन आणि मानसिक स्वास्थ्य’ या सत्रात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभा थत्ते आणि डॉ. अद्वैत पाध्ये संवाद साधतील.
सेल्फ हेल्प अर्थात स्वमदत यावर आधारित पुस्तकांचा आपल्या जीवनात कसा फायदा करून घ्यावा याचा कानमंत्र देतील डॉ. यश वेलणकर.
कवी आणि गायक
‘कवी आणि गायक’ या कार्यक्रमात कवी वैभव जोशी यांच्या कविता गायिका प्रियांका बर्वे सादर करणार आहेत.
गीत हे कविता असते का?
मंदार चोळकर, समीर सामंत आणि आश्विनी शेंडे या लोकप्रिय गीतकार आणि कवींशी चर्चा…
● मुख्य प्रायोजक :सारस्वत बँक
● सहप्रायोजक : केसरी टूर्स
● सहाय्य : कौटिल्य मल्टिक्रिएशन
