डॉ. नितीन हांडे
पन्नाशी आणि साठीचे दशक हा भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ समजला जातो. याकाळात सत्यजीत रे, विमल रॉय, गुरुदत्त, व्ही. शांताराम, राज कपूर या दिग्गज दिग्दर्शकांच्या एकापेक्षा एक सरस कलाकृती भारतीय सिनेमासृष्टीला समृद्ध करत होत्या. या दिग्गजांचे सिनेमे हे केवळ रसिकांचे मनोरंजन करत नव्हते तर नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशाची अभिव्यक्ती तयार करू पाहत होते. सर्जनशीलता आणि कलात्मक उंची असलेले हे चित्रपट प्रेक्षकांना जीवनाचे तत्त्वज्ञान सांगत असतानाच देशातील तत्कालीन प्रश्नांनादेखील हात घालत होते. त्यांनी रचलेल्या पायावर पुढच्या पिढीतील श्याम बेनेगल, हृषीकेश मुखर्जी या संवेदनशील दिग्दर्शकांनी अर्थपूर्ण सिनेमांची इमारत रचली आणि भारतीय सिनेमाला जागतिक दर्जा मिळवून दिला. या सात दिग्गज दिग्दर्शकांच्या निवडक कलाकृतींचा रसास्वाद नव्याने करून देण्यासाठी दीपा देशमुख यांचे ‘डायरेक्टर्स’ हे पुस्तक मनोविकास प्रकाशनामार्फत नुकतेच प्रकाशित झाले आहे.
समीक्षकाच्या अंगाने नाही तर एक सर्वसामान्य रसिक या चित्रपटांचा आनंद कसा घेतो या दृष्टिकोनातून हे पुस्तक लिहिले आहे. या सिनेमातील तांत्रिक बाबींवर अधिक भर न देता त्यांनी कथा, पटकथा आणि संवाद यातील शक्ती उलगडून सांगितल्या आहेत. चित्रपट म्हणजे मनोरंजनातून लोकांना सजग आणि जागरूक करणारं सशक्त माध्यम. ‘मास ते क्लास’ म्हणजे सर्वसामान्यांपासून ते बुद्धिवंतांपर्यंत प्रत्येकाला घटकाभर वास्तवाचा विसर पाडण्याची आणि एका स्वप्नाच्या जगात घेऊन जाण्याची ताकद या माध्यमात आहे. चित्रपटातल्या पात्रांच्या सुखदु:खांशी, वेदनांशी, परिस्थितीशी आपण एकरूप होतो.
या पुस्तकासाठी प्रत्येक दिग्दर्शकाच्या कलाकृती निवडताना ही काळजी घेतली आहे की या कलाकृतींमध्ये दिग्दर्शकाच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब दिसून येते. या दिग्दर्शकांनी चित्रपट म्हणजे समाज जागृतीचं उत्तम साधन आहे याची जाणीव ठेवून त्याचा प्रभावी वापर केला आहे. या पुस्तकात सहभागी असलेल्या दिग्दर्शकांनी भारताच्या स्वातंत्र्यपूर्वीचा काळही अनुभवलेला आहे आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा काळही पाहिलेला आहे, त्यामुळे स्वातंत्र्यापूर्वी असलेलं वातावरण, जमीनदार पद्धती, शेतकऱ्यांची परिस्थिती, सरंजामशाही व्यवस्था, स्त्रीला दुय्यम स्थान असणं तसेच समाजातील जातीभेदाचे वास्तव या सगळ्याचा परिणाम समाजावर कसा होत होता याचं चित्रण या दिग्दर्शकाच्या चित्रपटातून दिसतं. स्वातंत्र्याची पंचविशी ओलांडल्यानंतर सुरू झालेल्या समांतर चित्रपटाच्या नजरेतून श्याम बेनेगल यांनी तत्कालीन समाजाचं केलेलं वास्तव चित्रण दाहकपणे समोर येतं. त्याच वेळी आपल्या चित्रपटातून हलकेफुलके, जीवनातील लहानसहान सुखदु:ख तरलपणे मांडणारे ऋषीकेश मुखर्जीदेखील सत्यकाम चित्रपटात वास्तव, कल्पना, स्वप्न यांचा अद्भुत मेळ घालून त्यात तरुणांची होणारी घुसमटसुद्धा यथार्थपणे रंगवतात. भारतात त्याकाळात प्राथमिक अवस्थेत असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून एवढ्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती हे खूप मोठं आव्हान होतं. मात्र प्रचंड कलासक्ती, कामाविषयी अपार निष्ठा आणि विषय पोचविण्याची प्रचंड तळमळ यामुळेच या कलाकृती घडू शकल्या. चित्रपट निर्मिती ही एक सांघिक कृती आहे, तिच्यामागे अनेकांचे परिश्रम असतात असं आपण म्हणत असलो तरी ‘कॅप्टन ऑफ द शीप’ हा त्या चित्रपटाचा दिग्दर्शक असतो हेच खरं. हा दिग्दर्शक किती तरल आहे, किती सर्जनशील आहे यावर त्या चित्रपटाची परिणामकारकता अवलंबून असते.
प्रत्येक चित्रपटाची थोडक्यात ओळख करून देताना चित्रपटनिर्मितीच्या वेळी घडलेल्या गमतीजमती, आलेले अडथळे आणि या कलाकृतींचा प्रवास लेखिका त्यांच्या ओघवत्या शैलीत आपल्यापर्यंत पोचवतात.
या पुस्तकात आपल्याला व्ही. शांताराम, बिमल रॉय, सत्यजीत रे, हृषीकेश मुखर्जी, राज कपूर, गुरुदत्त आणि श्याम बेनेगल या सातही दिग्दर्शकांची कारकीर्द यांची इत्थंभूत माहिती मिळते. ज्या व्यक्तीला सिनेमांची फारशी माहिती नाही, त्यांच्यासाठी कलंदर कलाकार आणि कलाकृती हा दुसरा विभाग मेजवानी ठरू शकतो. सिनेमाची आवड असलेल्या आणि नसलेल्या प्रत्येकास भारतीय सिनेमाची गौरवशाली परंपरा समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक चांगला पर्याय आहे.
‘डायरेक्टर्स’, – दीपा देशमुख, मनोविकास प्रकाशन, पाने- ४५६, किंमत- ५८० रुपये.