‘लोकरंग’ पुरवणीतील (१७ ऑगस्ट) गिरीश कुबेर यांच्या ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ सदरातील ‘अभ्यासू अपरिहार्य’ या पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरील लेखावरील निवडक प्रतिक्रिया…

या लेखातून पृथ्वीराज चव्हाणांच्या व्यक्तिमत्त्वातील वेगळेपणाच्या अनेक गोष्टी समजल्या. पृथ्वीराज चव्हाणांचे वेगळेपण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाही होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर त्यांनी पारदर्शकतेच्या आणि लोकोपयोगाच्या चाडेपोटी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या काही योजनांना स्थगिती दिली होती. जास्त चटई क्षेत्र निर्देशांक असलेल्या एका योजनेच्या सादरीकरणादरम्यान ‘हे काय चाललंय?’ म्हणत त्यांना डोक्याला हात लावून बसलेलेही पाहण्यात आहे. विकास म्हणजे केवळ जास्त चटई क्षेत्र निर्देशांक नाही असं म्हणत तशा योजना एकतर त्यांनी थांबविल्या होत्या किंवा कमी चटई क्षेत्र निर्देशांक देणाऱ्या योजनांत रूपांतरित केल्या होत्या. ते मुख्यमंत्री असताना मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर विकासकांना प्रवेश बंद केल्याच्या बातम्या ऐकिवात आहेत. विकासकांना / कंत्राटदारांना अंगावर घेणारा पहिलाच मुख्यमंत्री पाहण्यात आला होता. श्रीमंत राजकीय वारसा असूनही त्यांचा जसा बँक, दूध संघ वा साखर कारखाना नाही तसेच ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांच्या मुलीच्या लग्नाची बातमीही कुठे आली नाही. ते मुख्यमंत्री होण्यापूर्वी जसे त्यांच्याकडे केंद्र सरकारचे विज्ञान तंत्रज्ञान खाते होते तसेच कार्मिक खातेही होते. त्या अंतर्गत प्रशासकीय सेवेबाबत धोरणे आखताना यूपीएससीच्या चाळणी परीक्षेचे सध्याचे लागू असलेले स्वरूप ठरविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता म्हणे. पृथ्वीराज चव्हाणांच्या वेगळेपणाला खुळेपणा समजण्याच्या आजच्या काळात, सध्या ते कोणत्याही पक्षात असते तरी ते विरोधकांच्या दृष्टीने अयोग्य पक्षातील योग्य (तरीही नकोशी असलेली) व्यक्ती राहिले असते, असे वाटते. – सुमीत कुलकर्णी

सुसंस्कृत राजकारणी

लेख वाचून माझ्या नोकरीच्या एकदम सुरुवातीच्या काळातील आठवण जागी झाली. १९९९मध्ये मी नुकताच मुंबई विद्यापीठाची एमएमएस पदवी घेऊन त्यावेळेच्या एका ‘स्टार्ट अप’ कंपनीमध्ये विश्लेषक म्हणून कामाला सुरुवात केली होती. आमच्या कंपनीचे मालक आणि सगळा कर्मचारी वर्ग एकदम तरुणच होता आणि आमच्या मुख्य अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील जाणकार मंडळींना आपल्या ऑफिसात बोलावून बोलते करण्याची आवड होती. त्याप्रमाणे दर महिन्याला एक मान्यवर आमच्या कार्यालयात येऊन तरुण मंडळींशी गप्पा मारायचे. त्याप्रमाणे एकदा पृथ्वीराज चव्हाण (तेव्हा ते खासदार होते ) आमच्या भेटीला आले होते. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या ज्या आजही लक्षात आहेत – १. आम्ही राजकारणी लोक सार्वजनिकपणे सांगतो की तुमच्यासारख्या तरुण आणि शिकलेल्या मुलांनी राजकारणात यायला पाहिजे. पण आम्ही याचा विचार करत नाही की तुम्हा शिकलेल्या तरुण मुलांमध्ये राजकारणी माणसाची प्रतिमा फक्त भ्रष्टाचारी, चोर, सर्रास खोटे बोलणारी मंडळी वगैरे आहे आणि अशी प्रतिमा बदलण्याचे प्रयत्न काही आम्ही राजकारणी लोक करत नाही. मग चांगली मंडळी इथे कशाला येतील? त्यामुळे तुम्हाला राजकारणाचा तिटकारा असेल तर तो तुमचा दोष नाही. आणि २. राजकारणात येणे काही सोपे नाही. मी स्वत: अमेरिकेतून एरोनॉटिकल इंजिनीयरिंगमध्ये पदवी घेतली आणि राजीव गांधी वैमानिक असल्यामुळे एरोनॉटिक्समध्ये आणि तंत्रज्ञानात रस होता त्यामुळे माझ्यासाठी काही गोष्टी सोप्या झाल्या. पण हेही खरे आहे की, माझे आई-वडील आधीच काँग्रेसमध्ये होते आणि गांधी परिवाराच्या ओळखीचे होते. या दोन गोष्टी माझ्या बाजूने नसत्या तर मला संधी मिळणे कठीण होते.

जवळपास पाऊण तास त्यांनी राजकारणाशी काही संबंध नसलेल्या आमच्यासारख्या तरुण मुलांशी मोकळेपणाने गप्पा मारल्या आणि प्रश्नांना प्रामाणिकपणे उत्तरेसुद्धा दिली. या संवादात कुठेही आपले शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी, खासदारपद, गांधी परिवाराशी असलेली जवळीक वगैरेबद्दल अहंकार नव्हता. काही वर्षांनी ऐकिवात आले की, चव्हाण यांना महाराष्ट्राच्या मुखमंत्रीपदाबद्दल त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी विचारले (ही आदर्श घोटाळ्याच्या बरीच आधीची घटना आहे.) तेव्हा त्यांचे उत्तर आमच्या ऑफिसमधील त्या १९९९ मधील भेटीची आठवण करून देणारे होते. चव्हाण म्हणाले की, मला तर आपल्याच पक्षातील फारसे आमदार फार ओळखत नाहीत, तर मला मुख्यमंत्री कशाला करता? – सुदीप राऊळ, मुंबई

आदरणीय पृथ्वीराज

लेख वाचताना पृथ्वीराज यांच्याबद्दल आदर आणि सध्याच्या राजकारणाबाबत निराशा निर्माण झाली. लेखाच्या शेवटाकडे येताना, देवेंद्र फडणवीस आणि पृथ्वीराज चव्हाण यांची जी गोष्ट येते त्यात फडणवीस यांनी दिलेले उत्तर हुकमी हशा घेणारे असले तरी ते सुसंस्कृत, प्रगल्भ नेत्याचे निदर्शक आहे असे म्हणता येणार नाही हे नक्की! उलट पृथ्वीराज चव्हाण यांची गुणग्राहकता आणि खिलाडूवृत्ती दिसते. त्यांचे गुण हेच दोष ठरवणारे गेल्या काही वर्षांतील राजकारण हे शीर्षकातील ‘अपरिहार्य’ शब्द अधोरेखित करणारे वाटले. – गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर.

एकही ठपका नसलेले बाबा!

श्रीमंत असूनही पृथ्वीराज चव्हाण यांनी घराणेशाही लांब ठेवली. त्यांच्या आई राजकारणात होत्या. त्यांनी साखर कारखाना किंवा सहकारी संस्था स्थापन केली नाही हे राजकारणातील दुर्मीळ असे उदाहरण आहे. कारण राजकारणात आल्यावर पहिल्यांदा अशा प्रकारच्या संस्था तर असतातच, पण पेट्रोल पंप यावरदेखील राजकीय नेत्यांचे बारीक लक्ष असते. पृथ्वीराज चव्हाण यापासून लांब राहिले हा त्यांच्या मनाचा मोठेपणा तर आहेच, पण असल्या जंजाळात मात्र ते पडले नाहीत. याचाच अर्थ असा की, ते जे आहे त्यात समाधान मानणारे असे राजकारणी आहेत. ईशान्येकडील राज्यात पहाटे उजाडते व साडेचार वाजता अंधार पडू लागतो, तेव्हा तिथल्या कार्यालयीन वेळा हा त्यांचा विचार रास्तच होता. त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट म्हटले होते की, भारतातील हवामान हे वेगवेगळ्या प्रकारचे असते त्याचमुळे हवामान अंदाज चुकतात, पण त्यांनी वैज्ञानिक वर्गाला दोष दिला नाही. ‘लोकसत्ता’च्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांची अभ्यासू मांडणी ऐकण्यासाठी त्यांनी व्यक्त केलेली इच्छा हा त्यांच्या मनाचा मोठेपणा तर दाखवतोच, पण विरोधी पक्षनेत्यांचे विचारही समजावून घ्यायलादेखील तितकाच वेळ काढावा लागतो हे त्यांचे वैशिष्ट्य आहे असे म्हणावे लागेल. राज ठाकरे यांनी त्यांची चंद्रकांत-सूर्यकांत या अभिनेत्यांशी केलेली तुलना ही खरी असली तरी काहीवेळा त्यांनी त्यांची खिल्लीदेखील उडवली होती. परंतु ते कधीही विचलित झाले नाहीत, तर संयम राखून असत. – सुनील समडोळीकर, कोल्हापूर.

योग्य व्यक्तीची दलख

सदर लेख म्हणजे योग्य व्यक्तीची दखल घेतल्यासारखे वाटले. राजकारणात अभ्यासू असणं कठीण. शेवटास देवेंद्र फडणीस यांचा अभ्यासू उल्लेख खटकला. कारण त्यांनी दोनदा मुख्यमंत्री होताना महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेचा कसा विनाश केला हे सर्वश्रुत आहे. ते ज्या तालमीत तयार झाले ती फक्त द्वेषसूत्रावर आधारित आहे. – रंजन र. इं. जोशी, ठाणे</strong>

राजकारणातील आदरणीय नेते

लेख उत्तमच. पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल आदरभाव होता, तो आणखी वाढला. राजकीय अभ्यासक व व्यावसायिक म्हणून गेल्या दहा वर्षांत अनेकदा कराड शहरात जाण्याचा योग आला. लेखकाने सांगितले तसे तिथे स्थानिक पातळीवर गुंड – पुंड भासणारे पृथ्वीराज चव्हाणांचे कार्यकर्ते कधीही भेटले नाहीत. २०१९च्या निवडणूक प्रचारात असताना तर त्यांचा पराभव नक्की वाटत होता. परंतु त्यावेळी कराडकरांनी त्यांना संधी दिली. २०२४ची निवडणूक मात्र वेगळी ठरली. पण त्यानिमित्तानेही पृथ्वीराज यांच्याबद्दलचा आदर वाढला. आता राजकारणात संधिसाधूंची चलती आहे. अशावेळी पृथ्वीराज आणखी विश्वासार्ह वाटतात. पण त्यांनी विधानसभेचे अध्यक्षपद न घेतल्याचा राग अजूनही कायम आहे आणि राहील. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात झालेल्या नाना तऱ्हा पाहता त्याबद्दल त्यांना माफी नाही. – सचिन मोहन चोभे, अहिल्यानगर

जुनी आठवण ताजी झाली

पृथ्वीराज चव्हाण यांना अलिबागला पाहण्याचा, ऐकण्याचा योग आला तेव्हा त्यांनी इतक्या सोप्या शब्दात अर्थकारण उलगडून दाखवलं की थक्क व्हायला झालं. त्यानंतर ते अलिबाग शहर, रायगड जिल्ह्यातील राजकारणावर बोलले. सगळ्या पक्षातील नेत्यांचा इतक्या आदराने उल्लेख, कुणीही, कुठल्याही एका शब्दाने दुखावले जाणार नाही असे त्यांचे उच्चदर्जाचे विचार ऐकून मन कृतकृत्य झाले. या लेखामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. – सुरेश तिरमले, अलिबाग.