मंगल कातकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयुष्य जगत असताना माणसाला कधी इच्छेने तर कधी अनिच्छेने वेगवेगळय़ा वाटेने मार्गक्रमण करावे लागते. ज्याच्याकडे जिज्ञासा असते तो नवीन अनवट वाटा शोधत राहतो, जगण्याचे विविध अनुभव घेत राहतो. अशाच अनवट वाटा अनुभवलेले व ते आपल्या लिखाणातून वाचकांपर्यंत पोहोचवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे अनिल अवचट.

अनिल अवचटांनी औत्सुक्याने जे जग पाहिले ते आपल्यापर्यंत पोहोचवणारे पुस्तक म्हणजेचं ‘अनवट.’ हे पुस्तक अनिल अवचटांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले असले तरी त्यांच्या अनुभवांची शिदोरी वाचकांपर्यंत प्रामाणिकपणे पोहचवण्याचा प्रकाशकाने चोख प्रयत्न केलेला आहे. तेरा लेखांचा समावेश असणारा हा ललित लेखसंग्रह आपल्याला माहीत नसणाऱ्या बऱ्याच गोष्टींची ओळख करून देणारा आहे.

हेही वाचा >>>वास्तवदर्शी व्यक्तिचित्रांचा नजराणा

संगीत शिकवणारे, शिकणारे, आस्वाद घेणारे, तबला, सतार, तंबोरा यांसारखी वाद्ये कोण, कुठे, कसं बनवतं हे ही वाद्य शिकणारा जाणून घ्यायच्या भानगडीत पडत नाही. पण अनिल अवचटांनी ही वाद्ये बनविणाऱ्या लोकांचे कष्टमय जीवन जाणीवपूर्वक जाऊन पाहिले. तबला नेमका कसा बनवला जातो, त्याला शाई कशी लावली जाते, तबल्याच्या वाद्या कशा बनवल्या जातात, कोणत्या जनावराचं चामडं कसं वापरलं जातं, सतारीला वापरला जाणारा भोपळा कसा व कुठे मिळतो इथपासून ते तारा कशा जोडल्या जातात या सगळय़ाची माहिती व वाद्य करणाऱ्या कारागिरांचे  संघर्षमय आयुष्य ‘तबलायन’, ‘सतार आणि तंबोरे’ या लेखांमधून वाचायला मिळते.  ज्या देशात ओरिगामी कलेचा जन्म झाला त्या देशात जाऊन तिथल्या लोकांना ओरिगामी शिकवणं व तिथे आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविणं जरा धाडसाचंच. अनिल अवचटांनी आपलं ओरिगामी कलाकृतींचं प्रदर्शन कसं भरवलं, जपानी लोकांना ओरिगामी शिकवताना कोणते अनुभव आले, जपानी लोकांचे वेगळेपण कसं आहे, हे सगळं आपल्याला वाचायला मिळतं ते ‘घडीबाजांच्या देशात’ या लेखात.

लहानपणापासून सुरांची आवड असणाऱ्या अवचटांचा संगीतप्रेमाचा प्रवास कसा होत गेला हे ‘मी गुणगुणसेन’ या लेखात वाचण्यासारखा आहे. कुणीतरी म्हटलंय, ‘तुम्ही माणसाला गावातून बाहेर काढू शकाल, पण माणसाच्या मनातलं गाव बाहेर काढू शकणार नाही.’ हे अनिल अवचटांच्या बाबतीत खरं होतं. फक्त चौदा वर्षे ओतूरमध्ये वास्तव्य जरी अवचटांनी केले होते तरी गावात झालेले बालपणीचे संस्कार, चांगल्या-वाईट आठवणी ते विसरू शकत नव्हते. त्यांना आपल्या गावाविषयी विशेष प्रेम होते. त्यामुळे त्यांनी ‘ओतूरचं जग’ या लेखात गावाचे, तिथल्या माणसांचे, आपल्या घराचे, बालपणीचे जग मोकळेपणाने उलगडून दाखविले आहे. त्यांच्या मनात जसे ओतूर गाव कायमचे कोरले गेले होते, तसेच कोल्हापूर मुंबई या गावांनीही त्यांच्या मनात घर केले होते. त्यांना जाणवलेले कोल्हापूरचे व मुंबईचे वेगळेपण, तिथल्या भाषेची गंमत, वाढणारी प्रदूषण समस्या, मुंबईतल्या वेगवगळय़ा भागांत राहणारे वेगवेगळय़ा समाजाचे लोक व त्यांची वैशिष्टय़े, मुंबईच्या लोकाचे मुंबईकर स्पिरिट असे बरेच काही आपल्याला ‘गावं मनांत वसलेली’ या लेखात वाचायला मिळते.   

हेही वाचा >>> पाण्याबद्दलचे अनुभवनिष्ठ, पण अपुरे चिंतन

वयाच्या सत्तरीपर्यंत आपण हिमालय पाहू शकलो नाही याची रूखरूख अवचटांना होती. ती संधी त्यांना मिळाली व ते उत्तराखंड व हिमाचल प्रदेशला भेट देऊन आले. हिमालय पाहण्याचे समाधान जरी अवचटांना मिळाले तरी तिथे होणाऱ्या निसर्ग ऱ्हासाने ते व्यथित झाले. हिमालयाच्या परिसराचे बदलते रूप आपल्याला वाचायला मिळते ‘हिमालयावर सावट’ या लेखात. ‘लक्षद्विपच्या वाटेवर’, ‘लग्नाच्या बेडी’चे दिवस, ‘कैनाड-कोसवाडची पदयात्रा’ हे लेखदेखील वाचण्यासारखे आहेत.

अवचटांना आयुष्य जगत असताना सकाळबद्दल, काळाबद्दल, गावात भेटलेल्या दत्तगुरू या व्यक्तीबद्दल व आपल्या आजारपणाबद्दल काय काय वाटले हे ‘जगण्यातील काही’ या लेखात खूप छान पद्धतीने आले आहे.

जीवनातील वखवख कमी करण्यासाठी, जगण्यातले शहाणपण मिळविण्यासाठी झेन तत्त्वज्ञान आपल्याला मदत करू शकते असे अवचटांना वाटत होते. बुद्ध धर्माचे अपत्य असणाऱ्या झेन पंथाचे तत्त्वज्ञान सांगणारा लेख म्हणजे ‘झेनच्या गोष्टी.’ हा लेखही आपल्याला विचार करायला लावणारा आहे.

‘अनवट’ लेखसंग्रहातले अनुभव जरी अवचटांच्या ‘स्व’चे असले तरी ते त्यापलीकडे जाऊन आपल्याला विचार करायला लावणारे आहेत. अवचटांचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन, निसर्गप्रेम, माणसाची असणारी ओढ, समाजातल्या दुर्लक्षित लोकांचे जग जाणून घेण्याची इच्छा, तटस्थपणे स्वत:चा विचार करण्याची वृत्ती आपल्याला या लेखांमधून जाणवत राहते. लेखांची भाषा लालित्यपूर्ण, प्रवाही असून तिला मिश्किलपणाचा बाज आहे. जीवनाचे अनेक रंग दाखविणारे हे लेख वाचताना वाचक प्रत्येक लेखात गुंतत जातो व आपल्या अनुभवांशी ते अनुभव जोडण्याचा प्रयत्न करत राहतो. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी ओरिगामी कलाकृतीच्या आकारांच्या मदतीने बनविलेले समर्पक असे मुखपृष्ठ व अनिल अवचटांचा विचारात गढलेला फोटो असलेले मलपृष्ठ पुस्तकाचे वेगळेपण अधोरेखित करते. अनवट वाटांची सैर घडविणारे अवचटांचे अनुभव वाचकाला वाचनानंदाबरोबर विचार करायलाही प्रवृत्त करतात.

‘अनवट’- अनिल अवचट, समकालीन प्रकाशन, पाने- १७१, किंमत- २५० रुपये

mukatkar@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi book review anawat marathi book by author anil avchat zws
First published on: 30-10-2022 at 01:01 IST