‘राष्ट्रीय दिनदर्शिका’ हा माहितीपूर्ण लेख वाचला. त्यानंतरही मनातील काही प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत. आज भारतात तीन प्रमुख कालगणना पद्धती प्रचलित आहेत.. इंग्रजी किंवा ग्रेगेरियन पद्धत, विक्रम संवत आणि शलिवाहन शक. त्यानुसार-
lok13१) इंग्रजी वर्षांरंभ १ जानेवारी २०१४ रोजी झाला.
२) विक्रम संवत २४ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरू झाले. विक्रम संवत २०७१ वर्षांरंभ.
३) शालिवाहन शक ३१ मार्च २०१४ रोजी सुरू झाले. शालिवाहन शक १९३६ वर्षांरंभ.
थोडक्यात, राष्ट्रीय वर्षांरंभ १९३६ हा २२ मार्च २०१४ रोजी झाला आहे; तर शेवट मात्र शालिवाहन शक १९३६ मध्ये न होता २१ मार्च २०१५ ला होणार आहे.
आता इंग्रजी कालगणनेबद्दल थोडी माहिती पाहू या. ही कालगणना बाबिलोनियन लोकांनी मूळ स्वरूपात चालू केली असे समजले जाते. त्या वर्षांमध्ये फक्त दहा महिनेच होते. मार्च ते डिसेंबर हेच ते दहा महिने होते. इ. स. पूर्व ६९३ मध्ये न्यूपा नावाच्या राजाने त्यामध्ये जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांची भर घालून ते वर्ष ३०४ ऐवजी ३६५ दिवसांचे केले. मार्च ते डिसेंबरपैकी काही महिन्यांची नावेही मोठी सूचक आहेत. सहावा महिना षष्ठ- ऑगस्ट. सातवा महिना सप्तम- सप्टेंबर. आठवा महिना अष्टम- ऑक्टोबर. नववा महिना नवम- नोव्हेंबर. दहावा महिना दशम- डिसेंबर. रोमन अंकानुसार दहावा महिना ें२ किंवा दशम मास म्हटला जातो. हा योगायोग आहे का? ३०-३१ दिवसांसाठी हा ढोबळ नियम असा आहे. हाताची मूठ मिटल्यावर पालथ्या भागावर बोटांच्या मुळाशी उंचवटे दिसतात. त्या उंचवटय़ावर येणारे महिने म्हणजे जाने- मार्च- मे-जुलै- ऑक्टोबर- डिसेंबर हे ३१ दिवसांचे असतात, तर खळग्यांत येणारे एप्रिल- जून-सप्टेंबर- नोव्हेंबर हे महिने ३० दिवसांचे असतात. फेब्रुवारीमध्ये मात्र ‘लीप’ वर्षांनुसार २८ अथवा २९ दिवस असतात. त्यातही अपवाद म्हणून शतकी वर्षांला जरी चारने भाग जात असला तरी ते वर्ष २८ दिवसांचेच असते. प्रचलित इंग्रजी कालगणना सन १७५२ पासून अमलात आली आहे. इंग्रजी कालगणना जरी सूर्यभ्रमणाबरोबर सुसंगत वाटली तरी तिचा चंद्रभ्रमणाशी काहीही संबंध नाही.
भारतीय कालगणना पद्धती- विक्रम संवत असो वा शालिवाहन शक असो, दोन्ही पद्धती चंद्रभ्रमणावर आधारित आहेत. विक्रम संवत हे कार्तिक शुद्ध प्रतिपदेला सुरू होते, तर शालिवाहन शक चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू होते, एवढाच फरक आहे. प्रतिपदा हा भारतीय कालगणनेनुसार महिन्याचा पहिला दिवस असतो. त्यासाठी तिथी ही संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे. चंद्र हा सूर्यापेक्षा जास्त गतीने प्रवास करताना दिसतो. सूर्य जेव्हा एक अंश सरकतो, त्या कालावधीमध्ये चंद्र सरासरी १२ अंश पुढे जातो. ज्या वेळेला सूर्य-चंद्र यांच्यामधील अंतर शून्य अंश असते, त्या स्थितीला ‘अमावस्या’ म्हणतात. त्यानंतर नवीन महिना प्रतिपदेने सुरू होतो. महाराष्ट्रात सर्वत्र शालिवाहन शक पाळले जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाढवा हा दिवस वर्षांरंभ समजतात; तर व्यापारी लोक मात्र कार्तिक शुद्ध प्रतिपदा- बलिप्रतिपदा हा दिवस वर्षांरंभ मानून हिशेबाच्या नव्या चोपडय़ांचे पूजन करतात.
‘राष्ट्रीय दिनदर्शिका’ ही जर अधिकृत दिनदर्शिका असेल तर सरकारचे आर्थिक वर्ष ३१ मार्च रोजी का सुरू होते? ते १ चैत्र या दिवशी का सुरू केले जात नाही? काही वर्षांपूर्वीपर्यंत व्यापाऱ्यांनाही कार्तिक वर्षांनुसार जमाखर्च ठेवण्याची सवलत होती.
राष्ट्रीय कालगणनेमध्ये महिन्यांची नावे चैत्र-वैशाख अशीच ठेवण्यामागे काय उद्देश आहे, याचा खुलासाही लेखामध्ये झालेला नाही. भारतीय कालगणनेमध्ये पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्राजवळ असतो त्या नक्षत्राच्या नावाने तो महिना ओळखला जातो. उदा. चित्रा नक्षत्र- चैत्र, विशाखा नक्षत्र- वैशाख, इ. राष्ट्रीय दिनदर्शिकेमध्ये असा काही विचार झालेला आहे का?
राष्ट्रीय दिनदर्शिका केंद्र सरकारने २२ मार्च १९५७ या दिवसापासून अधिकृतरीत्या स्वीकारली. त्यानुसार तो दिवस १ चैत्र १८७९ असा होता. जर नवीनच कालगणना पद्धती स्वीकारायची होती तर वर्षांरंभ १ पासून का धरला नाही? असे १८७९ हे आडनिडे वर्ष स्वीकारण्याने काय साधले? भावी काळात हे आकडे मनात गोंधळ मात्र निर्माण करतील.
भारतीय कालगणनेनुसार दिवस आणि वाराची सुरुवात सूर्योदयाबरोबर होते. सूर्योदय हा स्पष्ट क्षण सर्वजण अनुभवू शकतात. याउलट, इंग्रजी तारखेची व वाराची सुरुवात मात्र मध्यरात्री
१२ वाजता होते. राष्ट्रीय दिनदर्शिकेमध्ये तारखेचा-वाराचा प्रारंभ कोणत्या क्षणी धरलेला आहे याचा खुलासाही लेखामध्ये आलेला नाही.
वर्षांचा आरंभदिवस लीप वर्षांनुसार (बहुधा इंग्रजी वर्ष असावे!) २१-२२ मार्च असेल. जर आपण शालिवाहन शक हा आधार म्हणून धरणार असलो तर लीप वर्षांसाठी इंग्रजी वर्षांचा आधार का घेतला जातो? शालिवाहन शकाचा आधार का घेतलेला नाही? हे असे अर्धवट इंग्रजी-भारतीय मिश्रण केल्याने खरोखरच सुलभता आलेली आहे का? दशमान पद्धतीने व्यवहार नक्कीच सुलभ झाले आहेत. पण राष्ट्रीय दिनदर्शिकेने ते खरोखरच सुलभ होणार आहेत का? भारतीय कालगणनेमध्ये दिवस, वार हे सूर्योदयाशी, महिना- चंद्र नक्षत्राबरोबर, तर तिथी- रवी-चंद्र यांच्यामधील अंशीय अंतरानुसार निश्चित केलेले आहेत. अधिक मास, क्षयमास, तिथी या संकल्पनाही संपूर्णपणे खगोलशास्त्रीय घटनांशीच संबंधित आणि आधारित आहेत. पण राष्ट्रीय दिनदर्शिकेमध्ये सूर्याचे कर्क- मकर- विषुववृत्तावरील स्थान या घटनेशीच ओढूनताणून जमवलेले आहे. त्यामुळे ही अशी मिश्र विचारसरणीवर आधारित कालगणना आणि दिनदर्शिका लोकांच्या पचनी पडणे कठीण आहे.
– शशिकांत काळे,डहाणू रोड

बोथट पत्रकारिता
सात डिसेंबरच्या ‘लोकरंग’मधील ‘व्यक्त होण्याचा भीषण नाद !’, ‘परवडू लागण्यास कारण की !’ आणि ‘बळी.. बोथट संवेदनेचा!’ हे तीनही लेख अचूक असले तरी मूलभूत झालेल्या चुका पदराआड करण्यात सफल वाटले. कुठलीही समस्या वाढत ठेवून ती जोपर्यंत गंभीर होत नाही, तोपर्यंत त्या समस्या भारतीय समाजात चच्रेत येत नाहीत. सगळं हाताबाहेर गेलं याची पूर्णपणे खात्री झाल्यावर अचूक वेध घेणारे अर्जुन मग युद्धात लेखणी घेऊन उतरतात. भारतीय पत्रकारिता शोध व वेध घेण्याच्या लढाईत हार पत्करत बोथट होत चालली आहे, हीच खरी शोकांतिका आहे.
– जगदीश दुबे

eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
Ramtek Lok Sabha
‘भाजपच्या ‘धृतराष्ट्र’ने नैतिकतेचे वस्त्रहरण निमूट बघितले’, कोणाला उद्देशून केला आरोप जाणून घ्या…
vanchit bahujan aghadi marathi news, prakash ambedkar marathi news
ॲड. प्रकाश आंबेडकरांकडे एकही वाहन नाही, कर्ज नाही; जंगम व स्थावर मालमत्तेत मात्र…
CM Eknath Shinde
शिवसेनेच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर, ‘या’ नेत्याचं नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा

अण्णांची जादुई कारकीर्द
डॉ. मृदुला दाढे- जोशी यांनी सी. रामचंद्र तथा अण्णांची संगीतशैली इतक्या बाजूंनी उलगडून दाखविली आहे, की हृदयापासून दाद द्यावीशी वाटली. अण्णांच्या मराठी संगीत क्षेत्रातील कार्याचा उल्लेख जितका अलौकिक आहे, अण्णांचे संगीत जितक्या उच्च दर्जाचे होते, ते मृदुला दाढे- जोशी यांनी आपल्या समर्थ लेखणीतून तितक्याच नजाकतीने पेश केले आहे. ‘देखो जी बहार आई’ या माझ्या आवडीच्या गोड गाण्याच्या उल्लेखाने मला आणखीनच आनंद झाला. (कारण हे गोड, सुंदर गाणे फारसे कुणाला माहिती नाही.) आज अण्णांसारखे संगीत प्रांतातील दिग्गज आपल्यात नाहीत; पण त्यांचे महान कार्य नेहमीच संगीतरसिकांच्या स्मरणात राहील यात शंका नाही.
– संदीप पेंढारकर

स्मरणीय ‘रहे ना रहे हम’
‘लोकरंग’मधील ‘रहे ना रहे हम’ हे सदर गेले वर्षभर मी न चुकता वाचतो आहे. या सदरातून ज्या प्रकारे हिंदी चित्रपट संगीताबद्दल लिहिले गेले आहे, तसे अभ्यासपूर्ण सदर यापूर्वी कधी वाचनात आले नव्हते.
– राजीव कर्णिक

अस्सलतेचा आग्रह उचितच!
२२ डिसेंबर २०१४ च्या ‘लोकरंग’मध्ये नागराज मंजुळे यांनी ‘लोकसत्ता- लोकांकिका’ स्पर्धेचे परीक्षक म्हणून केलेलं भाषण वाचलं. ते मनापासून भावलं. म्हणूनच त्याचं समर्थन करायला एक पालक या नात्यानं हे पत्र लिहीत आहे.
त्यांनी त्यांच्या भाषणात अस्सलतेचा आग्रह धरला आहे. हा आग्रह धरणारे आता कमी होत चालले आहेत, किंवा त्यांना वेडे ठरवले जात आहे. पण हा आग्रह धरायलाच हवा. नव्हे, तो जोपासायला हवा. बनचुके भरमसाठ होऊ लागल्यानं तर अस्सलपणाचा आग्रह हवाच हवा. पण, एक सांगू का? या अस्सलपणाचा आग्रह विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या आई-वडिलांकडून आणि माध्यम सम्राटांकडूनही ठेवायला हवा. पोर जन्माला आल्यापासून कळतं होईस्तो नाहीतरी हेच त्याचे शिक्षक. (बाकी सध्याच्या शिक्षणव्यवस्थेबाबत आणि शिक्षकांबाबत न बोललेलं बरं.) आई-वडील- मग ते कुठल्याही घरचे असोत, आताशा स्वत:च्या मातृभाषेच्या सौंदर्याबाबत इतके अनभिज्ञ असतात, की ते डोळे झाकून सामाजिक रेटय़ापोटी पोराला इंग्लिश शाळेत घालतात. मग ते स्वत:ही आपल्या मुलाबरोबर मिश्र भाषा बोलू लागतात. ३१ डिसेंबरला मराठीतही पालक ‘थर्टी फर्स्ट’ डिसेंबर म्हणतात. अस्सलतेची नाळ सगळ्यात आधी तुटते ती इथंच.
मग पुढे तर काही विचारता सोय नाही. पोर जगाच्या रेटय़ात पुढं जातं. पण ही केवळ सूज असते; पोषण नाही. त्याच्या वाढीला, पुढं जाण्याला खतपाणी माध्यमांतून घातलं जातं. पोरांसाठी गाण्याचे, नाचण्याचे, विनोदनिर्मितीचे कार्यक्रम आणि त्यातला सहभाग हा बहुसंख्य पालक प्रतिष्ठेचा करू लागलेत. काय असतं त्यात? तर परीक्षकांकडून होणारी ‘टीआरपी’ टिकवणारी खिदळकी किंवा बथ्थड सादरीकरणाची तोंड फाटेस्तोवर होणारी स्तुती. (आता एखाद्याच्या अभिनयाला कुणी सोम्यागोम्या नट गुण देणार असेल तर मग काय.. देवा रे देवा!) तर अशा या स्तुतीमुळे पोरांना आता इतकं गोड ऐकायची सवय लागली आहे, की अस्सलतेचा अट्टहास धरणाऱ्याला ते ठरलेलं वाक्य फेकतात- ‘ओ काका, भावना पोचल्या नं? मग झालं तर!’ गोम खरं तर इथंच असते. तुझ्या भावना पोचल्या नाहीत, हे सांगण्याचा आपला प्रयत्न असतो. पण आपण चुकलोय हे मान्य करायची पोरांची तयारी नसल्याने ते स्वीकारलं जात नाही. मी परीक्षक असलेल्या एका वादविवाद स्पध्रेत पोरांनी ‘सावरकर मंडालेच्या तुरुंगात होते’ आणि ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ असं वाक्य सावरकरांच्या तोंडी असल्याचं ठासून सांगितलं होतं, ते या फाजील आत्मविश्वासामुळेच.
शुद्धलेखनाचा आग्रह हासुद्धा असाच एक मुद्दा आहे. पण त्यावर स्वतंत्र प्रबंध होईल. एकूणात, पालक, शिक्षक आणि माध्यमांत अज्ञान, माज आणि निर्लज्जपणाचा पारा असा काही वाढत आहे, की उद्या अस्सल काही उरेल असं वाटतंच नाही. पण आजच्या स्थितीतही नागराज मंजुळे यांनी अस्सलतेचा आग्रह धरला, हे उत्तमच झाले. पालक, शिक्षक आणि माध्यमांनाही त्यांच्या रसातळाला जाण्यासाठीचे खडे बोल संधी मिळताच जरूर सुनवायला हवे.
– प्रसाद काथे

नकारात्मक सूर पुरे!
संजय पवारांचा (७ डिसेंबर) लेख वाचला. काही मुद्दे आवडले, काही खटकले. त्याचाच हा पंचनामा..
६ डिसेंबरला बौद्ध समाजवासीयांचे लोंढे मुंबानगरीत येतात. त्यांना ‘इतर’ लोक तिरस्काराची वागणूक देतात, ही निश्चितच लाजीरवाणी गोष्ट आहे. परंतु याची तुलना पंढरपूरच्या वारीसोबत करताना संजय पवारांनी म्हटले आहे की, ‘वारकऱ्यांना कोणीही अस्वच्छ, गलिच्छ म्हणत नाही. त्यांच्या विष्ठेला चंदनाचा दरवळ येतो का?’ तर न्यायालयाने वारकऱ्यांना व पंढरपूर मंदिर समितीला खडय़ा शब्दांत सुनावले आहे की, जर वारकऱ्यांनी पंढरपूर अस्वच्छ करणे, उघडय़ावर शौचास बसणे थांबविले नाही तर न्यायालयाला वारीवरच बंधने घालावी लागतील. हेही वारकऱ्यांनी व ‘इतर’ लोकांनी शांततेने ऐकून घेतले. हीच प्रतिक्रिया न्यायालयाने सहा डिसेंबरच्या मुंबईवारीबद्दल व्यक्त केली असती तर..? कल्पनाच न केलेली बरी!
पंढरपुरात वारीनंतरचे घाणीचे साम्राज्य व त्यानंतरची अमानवीय अवस्था खरोखरच विदारक असते. न्यायालयाने, मंदिर समितीने तसेच जनसामान्यांच्या विचारपूर्वक वागणुकीने हे चित्र हळूहळू का होईना, पण पालटू शकेल.
या लेखात संजय पवारांनी म्हटले आहे की, तेंडुलकर, कमल हसन, सलमान, आमीर, गावस्कर, स्मृती इराणी, उमा भारती, पवार काका-पुतण्या, सुप्रिया सुळे यांनी मोदींच्या सांगण्यावरून स्वच्छता अभियानात उतरण्याऐवजी पंढरपुरात वारीनंतर फक्त उभे राहून दाखविण्याचे आवाहन केले आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे वारीनंतरची परिस्थिती खरोखरच अमानवीय असते. परंतु मोदींनी सांगितल्यानुसार जनतेचे आयकॉन किंवा प्रतिनिधी असलेली ही मंडळी सफाई अभियानात सहभागी झाली; जेणेकरून सर्वसामान्य जनताही स्वच्छता अभियानात सहभागी होईल. परंतु संजय पवारांनी त्यांना थेट पंढरपुरात वारीनंतर उभे राहण्याचे आवाहन करणे हे समंजसपणाचे वाटत नाही. मौखिक वा शाब्दिक चिवचिवाटापेक्षा स्वच्छता अभियान उत्तम.
संजय पवार यांनी आपल्या लेखात, मोदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळय़ाऐवजी संसदेच्या पायरीला प्रणाम केला, याचाही उल्लेख केला आहे. मला मात्र असे वाटते की, मोदींना एखाद्या थोर पुरुषापेक्षा या देशाची संसद जास्त पूजनीय वाटली असावी.
पवार म्हणतात तशी भारतातील जात, धर्मविषयक परिस्थिती सुधारणे फार मुश्कील आहे. त्याचे हे म्हणणे योग्यच आहे. परंतु थोडासा नकारात्मक सूर बाजूला ठेवून सदसद्विवेकबुद्धीने विचार केल्यास परिस्थिती सुधारायला आता फार वेळ लागणार नाही.
पंकज माळी, कोपरगांव 

ए मेरे वतन के लोगोऽऽ
२१ डिसेंबरच्या लोकरंगमध्ये मृदुला दाढे- जोशी यांच्या ‘रहे ना रहे हम’ या सदरात त्यांनी सी. रामचंद्र यांच्या अवीट गोडीच्या गाण्यांविषयी लिहिले होते. त्यात सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांमध्ये ‘ए मेरे वतन के लोगो..’ या अजरामर गाण्याची दखल त्यांनी घेतली होती. मात्र अनवधानाने त्यांच्या लेखातील या गाण्यासंबंधीचा उल्लेख असलेला भाग संपादित करण्यात आला. अनेक वाचकांनी या गाण्याचा उल्लेख राहिल्याचे कळवले. याची दखल घेत मृदुला दाढे- जोशी यांनी लेखांकात या गाण्याविषयी लिहिलेला मजकूर प्रकाशित करीत आहोत..

ए मेरे वतन के लोगोऽऽ (प्रदीप)
या गाण्याच्या प्रभावाबद्दल, त्याभोवती जोडलेल्या अनेक किश्श्यांविषयी खूप लिहिलं गेलंय. मुळात कवी प्रदीप यांची ही कविता जवानांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी. देशबांधवांना आवाहन करणारी. जवानांच्या बलिदानाबद्दल विलक्षण हळव्या शब्दांत त्यांना सलाम करणारी.. सुरुवातीची ‘ए मेरे वतन केऽऽ लोगोऽऽ’ ही पुकार इतकी दमदार, की कोटय़वधी भारतीय जनतेनं स्तब्ध होऊन ऐकावं.. ‘लहरा तिरंगा प्यारा’नंतर ‘पर मत भूलो’ला कोमल गंधारावर जाऊन अण्णा वातावरण बदलतात. म्हणजे हा उत्सव, हे सेलिब्रेशन चालू द्या; पण.. हा ‘पण..’ जो आहे, तो कोमल गंधार दाखवतो. ‘पर मत भूलो सीमापर, वीरों ने है प्राण गंवाए’ हे फार महत्वाचे आहे.. ‘ए मेरे वतन के लोगो’च्या शेवटच्या शब्दांना दिलेला माìचगचा जोर.. एक विलक्षण शिस्त.. सन्याप्रती असलेला आदर दाखवून जातो. तिथे तालसुद्धा थबकतो.. राष्ट्रगीताच्या खालोखाल मान असलेलं हे अभिमानगीत होय. जवानांच्या शौर्याचा, त्यांच्या हौतात्म्याचा अभिमान बाळगणारं! त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेने ओथंबलेलं! डोळ्यांतून पाणी नव्हे, कढत अश्रू वाहायला लावणारं.. क्वचित त्यांच्यावरच्या अन्यायाने मनातला अंगार डोळ्यांवाटे वाहताना कढत होणारे हे अश्रू मी स्वत: अनुभवले आहेत.. ही जबरदस्त किमया या गाण्याच्या संगीतकाराची, गीतकाराची आणि लताबाईंच्या आवाजाची! ‘खुश रहना देश के प्यारोंऽऽ, अब हम तो सफर करते है..’ ला कातर होणारा.. निरोप घेणारा.. शेवटच्या श्वासापर्यंत देशावर प्रेम करणारा तो आवाज..
– मृदुला दाढे जोशी