‘सुभाषशेठ’ व सिनकरांच्या पोलीस चातुर्यकथा

सिनकरांनी आपल्या पोलीस चातुर्यकथांमध्ये अशोक व्यास याच्यासंबंधी प्रदीर्घ कथा लिहिली. ती १९८० च्या सुमारास प्रसिद्ध झाली.

(संग्रहित छायाचित्र)

‘सुभाषशेठ’ व सिनकरांच्या पोलीस चातुर्यकथा

‘लोकरंग’मधील (७ ऑक्टोबर) संजय मोने यांच्या ‘मी जिप्सी..’ या सदरातील ‘सुभाषशेठ’ हा लेख आणि त्यावरील १४ ऑक्टोबरच्या अंकातील कृ. ज. दिवेकर यांचे पत्र, तसेच कुलवंतसिंग कोहली यांचा ‘माझा लेखक मित्र’ (७ ऑक्टोबर) हा लेख वाचला. कोहली यांनी पोलीस चातुर्यकथा लिहिणाऱ्या श्रीकांत सिनकर यांचे व्यक्तिचित्र रेखाटले आहे. सिनकरांनी आपल्या पोलीस चातुर्यकथांमध्ये अशोक व्यास याच्यासंबंधी प्रदीर्घ कथा लिहिली. ती १९८० च्या सुमारास प्रसिद्ध झाली.

अशोक व्यास त्याच्या गुन्ह्य़ामुळे नाशिकच्या तुरुंगात बंदिवान असताना आणीबाणीमुळे अटक झालेल्या काही सद्वर्तनी व्यक्तींच्या सहवासात आला. त्यांच्या वागणुकीमुळे आणि उपदेशामुळे त्याला उपरती होऊन त्याने गुन्हेगारी सोडून प्रामाणिकपणे उद्योगधंदा करून चांगला माणूस बनण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. अरविंद पटवर्धन, सुरेश पेंडसे या नि:स्पृह, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने त्याने आपल्यात आमूलाग्र बदल केला. वरीलप्रमाणे उल्लेख सिनकरांच्या कथेत आहे. सिनकरांच्या पोलीस चातुर्यकथांच्या वाचनासोबतच त्यांची व्याख्याने प्रत्यक्ष ऐकण्याचा आणि त्यांच्या भेटीचादेखील योग आला. पुढे अशोक व्यास जळगाव येथे स्थायिक झाला. मी नोकरीनिमित्त जळगावला असताना अशोक व्यासची भेट घेऊन त्याचा यशस्वी व्यवसाय आणि सुखी संसारही पाहिला. वरील लेखांच्या निमित्ताने अशोक व्यासच्या प्रेरणादायी आठवणींना उजाळा मिळाला.

– रा. शं. ताकमोगे, पनवेल

नि:स्वार्थी नरसिंह राव

‘लोकरंग’मधील ‘सत्तेच्या पडछायेत..’ या राम खांडेकर यांच्या सदरातील ‘स्थितप्रज्ञ नरसिंह राव’ हा लेख माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या अज्ञात पैलूंचे दर्शन घडवणारा आहे. लाल बहादूर शास्त्री, अटलबिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यात नि:स्वार्थी असणाऱ्या नरसिंह रावांकडे भारतीय समाजाने दुर्लक्षच केले. राजकारणात त्यांचा वापर करून त्यांना दूर सारले गेले. राव यांनी आत्मचरित्र लिहिले असले, तरी त्यांच्या कार्याचा समग्र आढावा घेणारे चरित्रपर

पुस्तक मराठीत लिहिले जाणे ऐतिहासिकदृष्टय़ा आवश्यक आहे. त्यांचे माजी सहकारी राहिलेले राम खांडेकर त्यास योग्य न्याय देऊ शकतील असे वाटते.

– सुहास शाळिग्राम, पुणे

अणुकरार आणि एनएसजी : तुलना नको!

‘लोकरंग’मधील (१४ ऑक्टोबर) ‘भारत-अमेरिका अणुकरार : मागे वळून पाहताना..’ हा संकल्प गुर्जर यांचा लेख वाचला. गुर्जर यांनी लेखात ‘आघाडी सरकार असूनसुद्धा २००८ मधील अणुकराराचे यश आणि स्थिर सरकार असूनसुद्धा २०१६ मध्ये अणुपुरवठादार देशांच्या गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळवण्यात आलेले पूर्ण अपयश याची तुलना करून पाहण्यासारखी आहे,’ असे मत मांडले आहे. परंतु हे दोन्ही मुद्दे वेगळे असून आंतरराष्ट्रीय राजकारणात याची तुलना करणे अयोग्य आहे. खरे तर तेव्हाच्या यूपीए सरकारला अमेरिकेबरोबर करार करण्यासाठी जास्त खटाटोप करावा लागला नाही. कारण अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश याबाबत स्वत: रस घेत होते. या कराराला अडचण ही फक्त आपल्या देशातील अंतर्गत राजकारणाची होती. डाव्यांच्या विरोधाला डावलून इतरांची संमती मिळवणे हेच मोठे आव्हान या करारादरम्यान होते.

दुसरीकडे, न्यूक्लीअर सप्लायर्स ग्रुप- एनएसजीबद्दल आव्हाने संपूर्ण वेगळी आहेत. यात स्थिर वा अस्थिर सरकारचा प्रश्नच येत नाही किंवा अंतर्गत राजकारणातूनही विरोध नाही. एनएसजीसाठी मुख्य आव्हान आहे ते त्या समूहातील ४८ देशांपैकी भारताला विरोध करणाऱ्या चार देशांचे (चीन, न्यूझीलंड, आर्यलड, ऑस्ट्रिया)! भारताने सही न केलेली ‘आण्विक अप्रसार संधी’ (एनपीटी) हेच प्रमुख कारण विरोध करणाऱ्या देशांकडून दिले जाते. विशेषत: पाकिस्तानला मदत करण्यासाठी चीनने घेतलेली भारतविरोधी भूमिका पाहता चीनला एनएसजीसाठी तयार करणे खूपच कठीण आहे. असे असताना या दोन्ही वेगळ्या आणि निराळी आव्हाने असलेल्या घटनांची तुलना करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न निर्माण होतो.

– मोईन अब्दूलरहेमान शेख, पालघर

समाजमनाचा दस्तावेज

‘लोकरंग’मधील कुलवंतसिंग कोहली यांची ‘ये है मुंबई मेरी जान!’ ही नितीन आरेकर यांनी शब्दांकन केलेली लेखमाला नियमित वाचनात येते. कोहली यांच्या आठवणींचे संचित आरेकर शब्दरूपाने प्रकट करीत आहेत.

या सदराविषयी थोडे उशिरा कळाले; मात्र कळाल्यानंतर बसल्या बैठकीत पाच-सहा लेख वाचून काढले. पहिल्या लेखापासूनच मी त्यात पूर्ण रंगून, गुंगून गेलो. आठवणींच्या या झुळझुळ वाहणाऱ्या प्रवाहात निळी, हिरवी वळणं आहेत, उमाळ्यांचे झरे आहेत. या उबदार डोहात डुंबायची मजा घ्यायला हवी. हे आपल्या समाजजीवनाचे अक्षरांतून उमटलेले चित्रीकरण आहे. यातले काही रंग आकर्षक आहेत, काही रंग एकमेकांत मिसळून गेलेत, काही रंग धूसर आहेत; पण त्यांच्यामागे लपलेले कवडसे जाणवत आहेत आणि हे चित्रगान मनात सतत रुंजी घालते आहे. हे लेखन वाचताना सारखे जाणवतेय की, हा आपल्या समाजमनाचा एक दस्तावेज आहे.

या लेखांतून दिसते ती, कोहली यांची आयुष्याला उराउरी भेटण्याची वृत्ती, माणसांकडे ‘माणूस’ म्हणून बघण्याचा दृष्टिकोन, मनमोकळेपणा आणि शुचिता! मी ‘शुचिता’ हा शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे. आपल्या साऱ्यांचेच पाय मातीचे असतात. परंतु या मातीच्या पायांनी चालत, स्वच्छ हातांनी ‘ज्यो कि त्यो धर दिनी चदरिया’ करावेसे ज्यांना वाटते, त्यांच्याकडे ही शुचिता असते असे मला वाटते. हे केवळ कोहली यांच्या आयुष्यात आलेल्या फिल्मी ताऱ्यांचे, राजकीय पुढाऱ्यांचे वा प्रकाशझोतात असलेल्यांचे व्यक्तिचित्रण नाही, तर हे कोहली यांच्या वाटचालीचे संध्याछायेतून केलेले सिंहावलोकन आहे. त्यात व्यक्तिपूजा कुठेही नाही, परंतु निखळ ‘मैत्र’ ठायी ठायी आहे.

– मयूर देवल, मेरिलँड, यू.एस.ए.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पडसाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Letters from lokrang readers

ताज्या बातम्या