ही परदेशी पाखरे पुन्हा दिसतील- न दिसतील; पण त्यांनी मला सुंदर आठवणींचा ठेवा दिला. पक्षी.. मग तो देशी असो वा विदेशी- आभाळ पंखावर घ्यायला सुचवतात आणि कळत-नकळत सृजनाचे बीज पेरायलाही शिकवतात.. अशा काही परदेशी पाखरांविषयी…
मुंबईहून निघून २४ तासांच्या विमानप्रवासानंतर आम्ही पोर्टलंडला पोहोचलो. आमची जवळजवळ अर्धपृथ्वीप्रदक्षिणा झाली होती. अमेरिकेच्या ओरेगन राज्यातले ‘गुलाबनगरी’ म्हणून ओळखले जाणारे हे देखणे शहर. लेकीच्या घराच्या अंगणात पाऊल टाकल्याबरोबर हे नाव किती सार्थ आहे, हे जाणवले. दाराच्या दुतर्फा पिवळ्या गेंदांची गच्च लहडलेली गुलाबाची झाडे पाहून मन हरखले. साऱ्या प्रवासाचा शिणवटा क्षणात विसरायला लावणारा तो स्वर्गीय गुलाबगंध फारा दिवसांनी अनुभवायला मिळाला.
घराच्या जेवणगृहाची काचेची भव्य खिडकी मागीलदारचे रम्य निसर्गचित्र दर्शवीत होती. त्यापल्याड लोकलची एक रूळरेषा गेलेली. दर तासाने चार डब्यांची खेळण्यातल्यासारखी रंगीत साजरी लोकल झाडापानांतून अस्पष्टशी सरकताना दिसे. तत्पूर्वी तिच्या आगमनाची वर्दी देणारा नाजूक घंटानाद कानावर यायचा. ‘या जंगलावर राज्य आहे एका ‘ब्लू जे’ पक्ष्याचे. थोडे लक्ष ठेव- तुला दिसतीलच त्याच्या निळ्या भराऱ्या..’ लेक सांगत होती.
या हिरव्यागर्द जंगलात उठून दिसत होता- एका महाकाय सूचिपर्णी जातीच्या डग्लस फर वृक्षाचा पर्णहीन सांगाडा! जमिनीपासून दहाएक फुटांवर फुटलेले निष्पर्ण फांद्यांचे आडवे बाहू. हँगरवर हँगर जोडल्यासारखे वाटणारे ते एक काष्ठशिल्पच होते जणू. त्याच्या प्रथमदर्शनानं मला शाळेत शिकलेल्या हिंदीच्या एका धडय़ातील दोन वाक्ये आठवली. त्यात समोरच्या वाळक्या, पर्णहीन वृक्षाचे वर्णन दोन शिष्य गुरूंना दोन वेगळ्या पद्धतीने करतात. एक म्हणतो- ‘शुष्कं काष्ठं निष्ठ त्यग्रे.’ तर दुसरा शिष्य म्हणतो- ‘नीरस तरुवर तिष्ठति पुरत:’ त्या जंगलात मेपलसारख्या देखण्या वृक्षवृंदाबरोबर फरचा एक नीरस तरुवर कायम मनात ठसण्याजोगाच होता.
दुसऱ्या दिवशी छान उन्हेरी सकाळी खिडकीतून बाहेर नजर गेली. निष्पर्ण फरच्या थेट शेंडय़ावर एक पक्षी चित्रवत बसलेला दिसला. एकदा पाहिले. पुन्हा नीट निरखले. ‘ब्लू जे’च असावा हा. पक्षिमित्र असलेल्या जावयाकडून खात्री करून घेतली- हाच तो. याला आपण नक्कीच कुठेतरी यापूर्वी किंचित काळ का होईना, पण पाहिलंय. हो! सिक्कीमभेटीत! बॉर्से या दार्जिलिंग परिसरातील जंगलात डोंगरमाथ्यावरील विश्रामगृहाच्या अंगणात. लाकडी घराच्या ठेंगण्या, उतरत्या छताच्या वरच्या मजल्यावरील खिडकीतून बाहेर डोकावताना. रात्री धुँवाधार पाऊस पडून गेलेल्या स्वच्छ, ताज्या सकाळी अंगणातल्या ध्वजस्तंभाच्या टोकावर बसलेला तो नव्या नवलाईचा पक्षी. अगदी अस्साच. ब्लू जे!
आज त्याचे पुन्हा दर्शन झाले. गर्द निळेसे पंख, डोके, पाठ व शेपूट. पाठीवर इवला तपकिरी टिळा. हनुवटी, छाती, पोट पांढुरके. लांब शेपूट. साधारण आपल्या पोपटासारखाच. चोच मात्र सरळ काळी. पाय अन् डोळेही काळेभोर. आभाळ पंखावर घेऊन उडणारा फूटभर लांबीचा हा पक्षी.
हळूहळू ‘ब्लू जे’ची आणखीही माहिती समजली. मादीही त्याच्याच रंगरूपाची असते म्हणे. झाडावर काही वेळा दोन ‘ब्लू जे’ दिसत. ते एकमेकांचे भाऊ होते की श्री. व सौ. जे होत्या, कळेना. एकमेकासन्निध वरचेवर दिसत असल्याने त्या सौभाग्यवतीच असाव्यात, असे मानायला जागा होती. कपाच्या आकाराचे घरटे ते दोघं मिळून बनवतात. अंडी उबवण्याचे काम अर्थातच मादीचे. साधारणत: १७ दिवसांनी पिल्लू जगात येते. ते रंग-रूपाने आई-बाबांसारखेच दिसते. तिनेक आठवडे दोघं पिल्लांचं भरणपोषण करतात. हा पक्षी माणसांचा सहवास रुचणारा. त्यामुळे शहरी परिसरातही आढळतो. बागा, घरांसमोर झुलणाऱ्या ‘खाद्यका’ (फीडर)वर तो विनासंकोच येतो. बसतो. आपल्या साथीदाराशी एकनिष्ठ राहणारे जसे मॅगपाय वा आपले चक्रवाक; तसाच हादेखील. अंडी उबवण्याच्या काळात नर मादीला अन्न पुरवतो. पिल्ले दीड-दोन वर्षे त्यांच्यासमवेत राहतात व धाकटय़ा भावंडांना वाढवायलाही मदत करतात म्हणे. (त्यांना नात्यातली ऊब जाणवत असेल का?) हा ‘निळोबा’ ओक व पाईन वृक्षांच्या बिया नंतर (थंडीत वगैरे) खाण्यासाठी जमिनीत साठवून, पुरून ठेवतो. कधी कधी त्या त्यांच्याकडून खाल्ल्याही जात नाहीत. अशा प्रकारे कळत-नकळत बीजारोपणाला त्याची मदत होते.
घराच्या मागील गॅलरीत लोखंडी दांडीच्या हूकला एक पक्षी खाद्यक (फीडर) टांगलेला होता. ताटलीत ठेवलेल्या मंदिराच्या सुबक आकाराचा. बऱ्याचदा ‘ब्लू जे’ तिथे येऊन बसायचा. दांडीला पायांनी घट्ट पकडून, पंखांच्या स्पर्शाने झुलणाऱ्या हूकच्या खाद्यकातील बिया, दाणे टिपून, तोबरा भरून स्वारी उडून जायची. काही वषेर्ं त्याला नित्य पाहणाऱ्या जावयाने मला त्याचे एक निरीक्षण सांगितले. ‘ब्लू जे’ पूर्वी आल्यावर टांगलेल्या फीडरवरच बसायचा. त्याच्या वजनाने फीडर खूपच झुलायचा. बरेच खाद्य सांडायचे. ही गडबड त्याच्या लक्षात आली की काय न कळे. नंतर मात्र तो शहाण्यासारखा बाजूच्या उभ्या दांडीवर बसून तिरपा झुकून शेजारच्या फीडरवरील भोजनाचा समाचार घ्यायला लागला. त्यामुळे ते झुलणे, ती सांडलवंड कमी व्हायची. ‘ब्लू जे’ने त्याच्या वर्तनात केलेला हा बदल कौतुकास्पदच. गॅलरीतल्या ब्लू जेला स्वयंपाकघरातून अगदी जवळून निवांत न्याहाळता यायचे. त्याला दूर झाडांवरून उडत असताना नुसत्या डोळ्यांनी बघताना निळी झालर झुलल्याचा भास होई. कधी तो फरवृक्षाच्या टोकावर शांतपणे टेहेळणी करीत बसायचा. झाडावर चोच घासत किंवा सौभाग्यवतीशी गप्पा छाटत बसलेला दिसायचा. त्याचे बोलणे मंजूळ वगैरे नव्हते. ते बरेचसे पोपटाच्या कर्कश्श गलक्यासारखे वाटे. कधी त्याच्यासोबत मानेला लाल कॉलर असलेला काळाभोर ‘ब्रुअर्स ब्लॅकबर्ड’, चमकदार काळा शिडकाव्यांचा अंगरखा घातलेला ‘स्टारलिंग’, एखादा भुरकट तपकिरी ‘रेन’ पक्षीही असत. ‘निळोबा’ला विहरताना बघणे हा एक प्रसन्न अनुभव होता.
अशावेळी स्मरणस्मरणीचे मणी झरझर मागे पडू लागत. आठवायचा- माझ्या अंगणबागेत पाहुणा म्हणून वास्तव्यास आलेला ‘हळद्या’! त्याचे त्याच्या सहचरीसह बागेतले विहरणे, घरटे, अंडी-पिल्ले.. एक दिवशी कुठेसे उडून जाणे.. हे सारेच आम्हा कुटुंबीयांना चिरस्मरणीय आहे. पोर्टलंडच्या मुक्कामात येता-जाता निळोबाचे निरीक्षण करताना स्वदेशी बागेतल्या पक्ष्यांच्या आठवणी मनात उजळत होत्या.
पुढे आम्ही मध्य ओरेगन परगण्यातील ला पाईन या सुंदर निसर्गस्थळी जंगलातील वास्तव्यास गेलो असता आम्हाला भेटला तो पोर्टलंडच्या ब्लू जेचा चुलतभाऊ. त्याला ‘स्टेलर जे’ नावाने ओळखतात. निळ्या जेपेक्षा आणखीन गर्द निळा. डोक्यावर बुलबुलसारखा उभारलेला मजेशीर कोंबडा. पण काळतोंडय़ा! मोबाइलची रेंज घरात येत नव्हती, म्हणून भल्यासकाळी मी दार उघडून बाहेर व्हरांडय़ात आले आणि अगदी काही हातांवर पाइनच्या फांदीवर हे नवे नवलाईचे पाखरू दृष्टीस पडताच मी मोबाइल बंद करून तिथेच थबकले. मग बाकीच्यांना आतून खाणाखुणा करून बाहेर बोलावले आणि ते निळेभोर कौतुक दाखवून माझा आनंद शतगुणित केला.
जशी लळा लावणारी अमेरिकन माणसं; तशीच ही परदेशी पाखरंही! त्या पाखरांना जाणीवही नसेल, की आपल्याला कुणीतरी रोज निरखतंय. आपली वाट पाहतंय. आपल्यासाठी दाणापाणी ठेवतंय. पाखरांचं भावविश्व आणि त्यांच्या बुद्धय़ांकाविषयी पक्षीशास्त्रज्ञच जाणोत. पण माझ्यापुरते सांगायचे तर आपली ही एकतर्फी का होईना- असलेली गुंतणूक आपल्याला श्रीमंत करून जाते. तसे नसते तर आंग्लकवी शेली स्कायलार्कवर कविता किंवा कीट्स नाइटिंगेलला उद्देशून ‘ओड’ लिहितेच ना!
नंतर न्यूयॉर्कला परतल्यावर मला संध्याकाळच्या फेरफटक्यावेळी एक ‘ग्रे जे’ दिसला आणि पुन्हा ‘निळोबा’ आठवून गेला. ही परदेशी पाखरे पुन्हा दिसतील- न दिसतील; पण त्यांनी मला सुंदर आठवणींचा ठेवा दिला. पक्षी.. मग तो देशी असो वा विदेशी- आपल्याला भरारी घेण्याचा संदेश देतो. आभाळ पंखावर घ्यायला सुचवतो. कळत-नकळत सृजनाचे बीज पेरायला शिकवतो. त्याच्या दर्शनाने तो एक ताजा, टवटवीत, प्रसन्न अनुभव देत असतो. म्हणूनच पक्षी, पाने, फुले, मुळे ही सारी निसर्ग, जीवन आणि सौंदर्याची एकात्म प्रतीके वाटत राहतात. त्यामुळेच पोर्टलंडच्या या नीलपंखी दिवसांची आठवण शब्दबद्ध करताना सहज ओळी स्फुरतात-
अंकावर झाडाच्या झुलते एक पाखरू
पंखांवर आभाळ पेलते एक पाखरू
रोज स्पर्शते झगमग झुंबर आभाळाचे
लोलक त्याचा मजला देते एक पाखरू
उद्ध्वस्ताचे ओल्या पंखी पचवुनि वादळ
झटकफुलवुनी पिसास उडते एक पाखरू
जाणुनिया, लागे पोटास्तव दाणापाणी
श्वासांसाठी जपते गाणे एक पाखरू…
संग्रहित लेख, दिनांक 3rd Mar 2013 रोजी प्रकाशित
पोर्टलंडचे नीलपंखी दिवस
ही परदेशी पाखरे पुन्हा दिसतील- न दिसतील; पण त्यांनी मला सुंदर आठवणींचा ठेवा दिला. पक्षी.. मग तो देशी असो वा विदेशी- आभाळ पंखावर घ्यायला सुचवतात आणि कळत-नकळत सृजनाचे बीज पेरायलाही शिकवतात.. अशा काही परदेशी पाखरांविषयी...

First published on: 03-03-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Portland birds