गिरीश कुबेर यांनी ‘पराजयदशमी’ (लोकरंग, १३ ऑक्टोबर) लिहिताना हात राखून शब्दप्रयोग केल्याचे वारंवार जाणवते. आज महाराष्ट्रातील वैचारिक दहशतवाद एवढय़ा थराला गेला आहे की, काही व्यक्तिमत्त्वांबद्दल वेगळे काही मत मांडणे अशक्यप्राय झाले आहे. असा दृष्टिकोन व्यक्त केलाच तर जीवघेणे हल्ले होणे सर्वमान्य झाले आहे. इतिहास कोणालाच माफ करत नाही, हे विधान अपूर्ण सत्य आहे. इतिहास आपल्याला आकलन झाल्यानुसार मांडणे हा आता सार्वजनिक प्रतिक्रियेचा विषय झाला आहे. समाजाला रुचेल, पचेल अशा प्रकारे इतिहासलेखन करण्याची तडजोडी प्रवृत्ती आज सर्वत्र दिसत आहे. त्यामुळे इतिहासाची मांडणी निर्भय स्वरूपात होणे बहुतांश मोडीत निघाले आहे. एवढेच नव्हे तर आपल्याला खटकणारा, नावडता किंवा ऐतिहासिक घटनांवर नवा प्रकाश टाकणारा इतिहास आगामी काळात नाहीसा होणार आहे. ही वैचारिक दहशत मूलगामी संशोधनाचा गळा घोटणार आहे.
कुबेर यांनी केलेले कंपूशाहीचे विवेचन म्हणूनच आणखी व्यापक स्तरावर होणे आवश्यक आहे. याची काही मासलेवाईक उदाहरणे येथे उद्धृत करण्यासारखी आहेत. प्रचलित राजकारणाशी संबंधित एक प्रकरण म्हणजे लालूप्रसाद यादव यांची अंधार कोठडीत झालेली रवानगी. या प्रकाराला सर्वप्रथम तोंड फुटले तेव्हा लालूंची चलती होती. ‘लालू सेक्युलर आहेत म्हणून त्यांना या गैरप्रकारात गोवण्यात आलं आहे, आपण त्यांच्या बाजूनं उभं राहिलं पाहिजे,’ असा तावातावानं युक्तिवाद करणारे अनेक विचारवंत डावे त्याकाळी महाराष्ट्रात मुखर होते.
संघ परिवार आणि हिंदुत्व यांना अहोरात्र झोडपणारे मधु दंडवते यांच्याबरोबर माझा एकदा कडाक्याचा वाद झाला होता. दंडवते यांना १९७७ आणि १९८९ साली तत्कालीन जनसंघ आणि नंतरचा भारतीय जनता पक्ष यांच्या मदतीमुळेच ते सत्तेवर आल्याचे स्मरण करून दिल्यानंतर ते आणि त्यांचे अनुयायी विलक्षण संतापले होते. त्यांनी माझी संभावना कोणत्या शब्दांत केली असेल याची सहज कल्पना करता येईल.
असाच प्रकार भाजपाचे तेव्हाचे अध्यक्ष कुशाभाऊ ठाकरे यांच्याबाबत घडला होता. सोनिया गांधी राजकारणात आल्यास त्यांना भारतीय समाजमन स्वीकारेल काय, असा मुद्दा त्या काळात चर्चेत होता. भाजपाचे अनेक नेते त्यांच्या इटालियनपणाचे भांडवल करत होते. पत्रकार परिषदेत याबाबतच्या प्रश्नांची सरबत्ती चालू होती. तेव्हाही कुशाभाऊ आणि भाजपाचे उपस्थित पदाधिकारी रागावले होते. या प्रकारचे अनुभव सर्वच पक्षांच्या बहुतेक सर्व नेत्यांच्या बाबतीत येतात. त्यांच्या वागण्यातून योग्य तो संदेश त्यांचे समर्थक, अनुयायी आणि कार्यकर्ते घेत असतात. अगदी गल्लीबोळातील नेत्याच्या इशाऱ्यानुसार पद्धतशीर हल्ले चढवण्यात येतात. अशा वातावरणात वैचारिक स्वातंत्र्य वाहून जाणे अपेक्षित आहे. महाराष्ट्रात तेच घडत आहे.
एखाद्या व्यक्तीचे कार्य थोर असले तरी त्या व्यक्तीचे नव्याने मूल्यमापन करणे, इतिहासातील नव्याने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे ती व्यक्ती आणि तत्कालीन घटना यांचे पुनर्विलोकन करणे हे इतिहासाचा अन्वयार्थ लावणाऱ्यांचे खरे कर्तव्य असले पाहिजे. दुर्दैवाने तसे करण्याची सोय आज महाराष्ट्रात राहिलेली नाही. काही व्यक्तिमत्त्वांच्या बाबतीत तरी नक्कीच नाही. कोणी तसे वेडे धाडस केलेच तर अनर्थ ओढवेल. महाराष्ट्र एकेकाळी सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात अग्रस्थानी होता, ही वस्तुस्थिती न वाटता कविकल्पना वाटावी असा वैचारिक दुष्काळ आज आहे. सर्वच नेते किंवा विचारवंत या टोळीयुद्धात चिथावणी देतात असे म्हणणे अन्यायकारक ठरेल. परंतु त्यांची संख्या आणि शक्ती एवढी नगण्य आहे की, मोठय़ा झुंडशाहीसमोर त्यांचा क्षीण आवाज दबून जातो. आजकालचे वर्तमानपत्रातील आणि नियतकालिकांमधील लेखन पाहिले तरी किती सावधपणे शब्दांचा वापर करण्यात येतो याची साक्ष पटते.
सवर्णानी दलितांबद्दल बोलायचे नाही, हिंदुत्ववाद्यांनी अल्पसंख्याकांबद्दल बोलायचे नाही, मुस्लिमांनी राम मंदिराबद्दल आवाज करायचा नाही, उत्तर भारतीयांनी मराठी माणसाबद्दल मतप्रदर्शन करायचे नाही, सेक्युलरवाद्यांनी समान नागरी कायद्याचा विषय झुरळासारखा झटकून टाकायचा, सीमेवरील हिंसाचाराविरुद्ध मानवी हक्कवाल्यांनी मौन पाळायचे, महाराष्ट्रातील कोणीही कोणाचाही पुतळा उभारण्यास विरोध करायचा नाही, असे अनेक अलिखित नियम आज कसोशीने पाळण्यात येतात. त्यांचा अनादर कोणीही करायचा नसतो. कराराचा भंग होताच कोणाच्या तरी भावना दुखावतातच. परिणामी कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण होते आणि संबंधितांना असा फटका बसतो की त्यांची वाचाच बसते.
आनंद यादव प्रकरणात महाराष्ट्राच्या वैचारिक पुरोगामित्वाच्या बुरख्याच्या चिंध्या झाल्या. तमाम लेखक मंडळी गप्पगार झाली. या काळात वृत्तमाध्यमांनीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने आवाज उठवला. राजकीय पक्षांनी सोयीस्कर मौन पाळले. यादव साहित्य संमेलनाला जाऊ शकले नाहीत याचा कोणाला ना खेद ना खंत. संमेलन उत्साहात पार पडले. राजकीय नेत्यांना साहित्यिक व्यासपीठापासून दूर ठेवा असा कंठशोष इतर प्रसंगी करणारे तथाकथित विचारवंत मावळते संमेलनाध्यक्ष अरुण साधू अशा कृ तीच्या निषेधार्थ मांडवातून बाहेर पडले, तेव्हा त्यांना निरोप देण्यासाठी बाहेपर्यंत येण्यासही धजावले नाहीत.
पत्रकारितेच्या संदर्भात अशी  अनेक उदाहरणे देता येतील. पत्रकारांवरील हल्ल्यांना आता आपली शासकीय यंत्रणा एवढी सरावली आहे की, पत्रकार संघटनांची निवेदने स्वीकारायची, ठरावीक पोपटपंची करायची आणि झाले गेले विसरून जायचे हा पायंडा मंत्रालयात पडला आहे.
अशा वाातावरणात मनगटशाहीचे फावत असते. ही मनगटशाही विविध प्रकारे जाणवत असते. समाजजीवन, राजकारण, शैक्षणिक संस्था, सहकारी उद्योग, व्यावसायिक संघटना, साखर कारखाने आणि अशा प्रत्येक सत्ताकेंद्रात आज तिचे आस्तित्व सहजपणे जाणवते. जागेच्या मर्यादेमुळे कुबेर यांनी फक्त वैचारिक क्षेत्राचा परामर्श घेतल्याचे दिसते. परंतु आजच्या महाराष्ट्रात सर्वच क्षेत्रांना दहशदवादाची लागण झालेली दिसत आहे. महाराष्ट्राच्या पीछेहाटीचे हे एक कारण आहे. उद्दाम भाषा, मग्रूर वर्तणूक, प्रच्छन्न धमकी, बेफिकीरी आणि आक्रमक देहबोली यांचे प्रस्थ वाढत आहे. वैचारिक दहशतवादाची ही पुढची पायरी आहे. परिस्थिती याच वेगाने ढासळत गेल्यास काही वर्षांनी बिहार, उत्तर प्रदेश यांच्याबरोबर महाराष्ट्राचा उल्लेख होऊ लागेल. कुबेर यांच्या लेखनाचा हा अन्वयार्थ आहे.
दिलीप चावरे, मुंबई

वैचारिक खुलेपणासाठी निर्भयता लागते!
‘चोवीस वर्षांची सवय’ हा अग्रलेख आणि पाठोपाठ ‘पराजय दशमी’ हा लोकरंगमधील लेख लिहून गिरीश कुबेर यांनी निर्भीड आणि निर्भय पत्रकारितेचा वस्तुपाठच घालून दिला आहे. हे लिहिण्यासाठी धर्य, कदाचित त्याहूनही अधिक वैचारिक खुलेपणा असावा लागतो. सत्ता हाती आली की धर्य येते, पण विचारात बंदिस्तपणा येण्याची शक्यता अधिक. तो न येऊ देण्याकरिता प्रयत्नच करावे लागतात आणि प्रसंगी सत्तास्थान सोडण्याची तयारीही लागते. अगदी प्रथमपासूनच कुबेर यांच्या प्रतिपादनातील वैचारिक खुलेपणा ध्यानात आला होता. आणि त्याने लोकसत्ता अधिक नि:पक्षपाती आणि संतुलित होतो आहे असे वाटते. उत्तरोत्तर ही धारणा दृढ होत आहे.
सतत ‘एक्स्प्लोर’ करत राहणे, विशेषत: वैचारिक क्षेत्रात हे क्वचित दिसते. ‘विचाराने दृढ तो मूढ’ अशा अर्थाचे वचन फार पूर्वी ऐकल्याचे स्मरते. त्यात तथ्य आहे. विचाराने दृढ (अविचल) असणे म्हणजे आपोआप नतिक ठरणे असे मानले जाते आणि या वचनाचा उपहास होतो. व्यवहारात निवड करावी लागते, तडजोड असते म्हणजे शुद्ध नतिक भूमिकेला काहीशी मुरड पडते. पण तर्काधिष्ठित विचाराला अशी मर्यादा पडायचे कारण नाही. शुद्ध विचारांचा रियाज करत राहिले पाहिजे. ती एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. तो एकदाच केलेला ‘फुल अ‍ॅण्ड फायनल सेटलमेंट’ स्वरूपाचा दृढ विचार झाला तर वैचारिक क्षेत्रात तो प्रमाद ठरतो, याची तितकीशी जाणीव समाजात नाही. वैज्ञानिक क्षेत्रात हा दोषच मानला जातो हे सामान्यपणे माहीत असते. परंतु सतत स्वत:च्या उलट तपासाला तयार असणे आणि नवनवीन शक्यता अजमावून बघणे, नवीन पुरावा मान्य करणे आणि स्वत: त्यानुसार बदल करणे ही वैज्ञानिक दृष्टी विचारांच्या क्षेत्रातपण लागू होते हे तितकेसे मान्य झालेले नाही. उलटपक्षी लेखात म्हटल्याप्रमाणे आपापल्या कंपूत ‘परस्पर प्रशंसा’ करून आणि सार्वजनिक आयुष्यात माध्यम-वीरांना हाताशी धरून स्वत:चे ढोल पिटून मूढ लोकच ‘प्रस्थापित विचारवंत’ होऊन बसले.
विविध विचारव्यूह समजून आणि सामावून घेणे हे आजच्या युगात जेव्हढे आवश्यक आहे तेव्हढे इतिहासात कधीच नसावे. हे विविध विचारव्यूह, त्यातील अंतर्वरिोध कमी करत जाणे, त्यांच्याशी अधिकाधिक सुसंगत वर्तन राखणे ही आधुनिक काळातील काहीशी लवचिक (प्लास्टिसिटी) असलेली नतिकता आहे. याचे भान बदलाला तयार नसलेल्या विचारवंतांत दिसते.  ते सर्वार्थाने कर्मठच असतात, पण आपल्या कर्मठपणाला नतिकतेची आणि पुरोगामित्वाची झूल चढवतात आणि लोकांना बनवत राहतात. सहस्र वर्षांच्या परंपरांना चिकटून बसणारे ते प्रतिगामी आणि शतक दोन शतकांच्या परंपरेला चिकटून बसणारे ते पुरोगामी, असा समज यांनी सर्वत्र पसरून दिला आहे.  कर्मठपणा म्हणजे खरे तर बदलाला तयार नसणे.  त्या अर्थाने तथाकथित पुरोगामीही ‘मार्क्‍सवाद’ या धर्माला चिकटून बसणारे कर्मठ प्रतीगामीच आणि उज्ज्वल नसलेल्या परंपरांना चिकटून बसणारे कर्मठही  प्रतिगामीच. कितीही आधुनिक असला तरी त्या विचारांची चिकित्सा करायला तयार असणारे आणि कितीही जुनी असली तरी मानवतेला अभिमानास्पद असलेल्या परंपरा टिकवण्याचा आग्रह धरणारे हे दोघेही खरे तर पुरोगामी.
तथाकथित पुरोगामी आणि खरे पुरोगामी यातील फरक करणे, आधुनिक बनणे पण उत्तर- आधुनिक न बनता आधुनिक पण उत्तरदायित्व मानणारे बनणे, यासाठी आपल्या डोळ्यांवरची झापडे, डोक्यावरच्या पगडय़ा कानावरचे नॉइज कॅन्सिलग हेडसेट्स काढणे आवश्यक आहे.
वेगवेगळे घोटाळे बाहेर काढणे,  प्रस्थापित राजकीय शक्तींविरुद्ध लिहिणे यालाच ‘निर्भीड’ पत्रकारिता म्हटले जाते. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता लिहिणे असे त्याचे स्वरूप. पण स्वत:चाही मुलाहिजा न ठेवणे याला निर्भयता लागते. वैचारिक खुलेपणासाठी ही निर्भयता लागते.
-अजय ब्रह्मनाळकर, कऱ्हाड

not a single word about Sharad Pawar in pm narendra modis speech in wardha
मोदींच्या भाषणात शरद पवारांबाबत चकार शब्द नाही, काय असावे कारण…
Ajit pawar explaination on controversial statement
“निधी पाहिजे तर कचाकचा बटणं दाबा”, वादग्रस्त विधानानंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण; म्हणाले “सुशिक्षित वर्गाची…”
mp udayanraje bhosale firm on to contest lok sabha election
सातारा: कदाचित त्यांचा मला बिनविरोध करण्याचा विचार असेल-उदयनराजे
Letter to Vijay Shivtare
“माझा नेता पलटूराम निघाला, आता..”; विजय शिवतारेंना कार्यकर्त्यांनी लिहिलेलं खरमरीत पत्र व्हायरल

सामूहिक मानसिकतेचा जय
गिरीश कुबेर यांचा ‘पराजयदशमी’ (लोकरंग, १३ ऑक्टोबर) हा लेख त्यांच्या संपादकीयासारखाच रोखठोक वाटला. कंपू करून समाजावर विचार लादण्याचा प्रकार पूर्वापार चालत आलेला आहे. पण त्यात सर्व समाजाचं भलं व्हावं, त्यासाठी प्रसंगी हलाहल पचवावं लागलं तरी बेहत्तर ही आत्मसमर्पणाची जाज्वल्य भावनाही कुठे कुठे दिसायची. पण आजकालचे कंपू हे नतिक-अनतिकतेमधल्या भिंतींनाच पादाक्रांत करू पाहत आहेत, ही चिंतेची बाब आहे. ज्या विचारांनी आम्हाला मध मिळेल त्यांचंच मोहोळ उठवून स्वार्थी माहोल तयार करायचा आणि त्याला विरोध करणाऱ्यांना डसायचं, प्रसंगी जिवावर उठायचं हा खरा आपल्या विचारांचा पराजय आहे.
दूरचित्रवाणी प्रसारमाध्यमं हे सारं अतिरंजित पद्धतीने मांडून आगीत तेल ओतायचं काम करत असतातच. त्यात सर्वसामान्यांचं कर्तव्य असतं. आपली रोजीरोटी कमावण्याच्या दैनंदिनीत, अशा सामूहिक मानसिकतेच्या भडकावण्याच्या वृत्तींना बळी न पडता सदसद्विवेकबुद्धीचा उपयोग करून समाजात शांतता आणि सुव्यवस्था राहील हे पाहणं, पुरोगामी असोत वा परंपरावादी असोत, कोणाच्याही टोकाला जाणाऱ्या िहस्र विचारांना प्रोत्साहन न देता समाजात शांतता कशी राहील आणि सर्वागीण विकासाच्या दृष्टीनं पडणाऱ्या दमदार पावलांचंच आपण अनुकरण कसं करू हे पाहणं प्रत्येक समाजघटकाच्या हिताचं आहे. सामूहिक मानसिकतेला विधायक कामाकडे वळवणं हाच खरा विजय. लेखातला ‘घराणेशाही’च्या विचाराचा उल्लेख जरासा खारट वाटला. कारण सहानुभूतीपोटी एखाद्या पदावर कुटुंबातला वारस आणि तोही लायक असेल तर नेमला जाणं हे काही आपल्याकडे नवीन नाही.
पण हा लेख एकंदरीत आजच्या कंपूगिरी करून बऱ्याच क्षेत्रांत जातीयतेच्या राजकारणाचा वास आणणाऱ्या वृत्तींवर परखड भाष्य करणारा आहे. गटबाजी करून एकमेकांचे पाय ओढू पाहणाऱ्या कूपमंडूक वृत्तीची महाराष्ट्रात वाढ होऊ लागली आहे याची जाणीव करून देणारा आहे.
– श्रीपाद पु. कुलकर्णी,  पुणे</strong>

वैचारिक सीमोल्लंघन
‘पराजयदशमी’ हा लेख अप्रतिम आहे. आज कोणत्याही विषयावर नि:स्पृह पद्धतीने विचार करण्यास कोणी तयार नाही. टीव्हीवरील चर्चा ऐकताना हे नेहमी खटकते. हा देश कोणत्यातरी एकाच विचारांच्या चौकटीने हाकला पाहिजे हा विचारवंत वा राजकारण्यांचा अट्टहास देशाला कुठे घेऊन जाणार आहे, माहीत नाही!  कुणीतरी सीमोल्लंघन करणे गरजेचे आहे ते या लेखाने साध्य केले! हळूहळू असा विचार करणाऱ्यांची गर्दी वाढेल.
– रवींद्र गोखले, औरंगाबाद</strong>

यथा राजा तथा प्रजा
‘पराजयदशमी’ या लेखात वर्णन केलेली परिस्थिती हेच वास्तव आहे, ते नाकारण्यात अर्थ नाही. आपला मतलबी स्वार्थीपणा आपण सोडायला हवा आणि सत्याच्या पाठीमागे उभे राहायला हवे. मात्र ‘यथा राजा तथा प्रजा’ हा नियम आहे. या उक्तीचा नित्य अनुभवही येत आहे. अशा परिस्थितीत सुरुवात कोणी आणि कोठून करावी, हा प्रश्नच नाही.  
 आता ‘सत्यं वद धर्मम चर’ याचे आचरण कोण करणार? आता स्पर्धा आहे- ती नालायकाला लायक बनवण्याची नाही तर त्याला लायक म्हणण्याची आणि विशेष म्हणजे त्याचा प्रसार करण्याची, त्याला पािठबा देण्याची. हे धर्याने सोडले ‘विजयादशमी’ साजरी करता येईल..    
 – माधव भोकरीकर

महाराष्ट्राचं दुर्दैव
‘पराजयदशमी’ हा लेख अतिशय कालसमयोचित वाटला. लेखात वर्णन केल्याप्रमाणे कंपूशाहीचा फटका महाराष्ट्रात सर्वच क्षेत्रांत बसला असला तरी साहित्य-कला क्षेत्रास तो सर्वाधिक बसला आहे.
लेखात वर्णिलेल्या कंपूशाहीत गुदमरलेले अनेक स्वतंत्रविचारी जीव महाराष्ट्रात आढळतील. या लेखाने अशा जीवांची कोंडी फोडली आहे. लेखात नरहर कुरुंदकरांचा उल्लेख आला आहे. लेखासंदर्भाने कुरुंदकरांचे साहित्यविषयक खालील विचार उद्धृत करणे समर्पक ठरावे. ते ‘धार आणि काठ’मध्ये म्हणतात, ‘‘बोधवाद आणि रंजनवाद दोन्ही साहित्याचे रूप हिणकस करून टाकतात. कलावंताच्या कृतीला बाधा आणतात. जेथे कलावंताचा प्रामाणिकपणा प्रभावी होतो, तेथे दोन्हींच्याही कक्षा ओलांडल्या जातात. बोधवादी आणि रंजनवादी साहित्यकृतीला विरोध त्या वास्तववादी नाहीत या मुद्दय़ावर नसतो. या कलाकृतींना अनुभवाच्या सलगतेचा आधार नसतो या मुद्दय़ावर असतो. विरोध बोध अगर प्रचाराच्या हेतूला नाही, तर तो या हेतूच्या कक्षेत अडकून अनुभवाच्या खरेपणाला शबलीत करण्याला आहे.’’
जगभर जनुकशास्त्र, खगोलशास्त्र, अणुशास्त्र जीवनाच्या आणि विश्वाच्या अनेक गूढांना स्पर्श करत असताना, जगात कल्पनातीत राजकीय उलथापालथ होण्याच्या शतकात आपण असताना, मागे वळून आपल्या विचार-समजाचं लेखापरीक्षण करणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात असं कुठलंच लेखापरीक्षण करण्याची कुणाचीही तयारी नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैवच.
मनोज महाजन,  मुंबई

धाडसी लेख
गिरीश कुबेर यांनी ‘पराजयदशमी’ हे विजयादशमीचं केलेलं विडंबन आवडलं. स्वतंत्र विचार असू शकतो, हा मुद्दा अगदीच पटला. प्रसारमाध्यमे या कंपूचे सभासद आहेत, असे असूनसुद्धा प्रसारमाध्यमांचे उगवत्या सूर्याला नमस्कार करणे व तो उतरणीला लागला की नको ते ओझे दुर्लक्षित करणे हा या कंपूचा नियम स्पष्टपणे सांगण्याचे धैर्य दाखवले ते खरोखरच अभिनंदनीय आहे.
आपल्या महाराष्ट्रात विविध कंपू आहेत व त्यातील नियमांशी हे कंपू प्रामाणिक असतात व एकमेकांशी जुळवून घ्यायला अजिबात तयार होत नाहीत, हे आपले विधान थोडे खटकते. प्रत्येक गट कितीही तत्त्ववेत्तेपणाचा आव आणत असला तरी खुर्ची समोर दिसू लागली म्हणजे मग..? बहुजन समाजाचा शत्रू असणाऱ्या ब्राह्मण समाजाला मायावती यांनी जवळ करताना आपली तत्त्वे बाजूला ठेवण्यात कोणताही कमीपणा मानला नाही. गंमत म्हणजे त्या गोष्टीचे माध्यमांनीही कौतुक केले. कारण त्यामुळे सूर्य उगवला. जॉर्ज फर्नाडीस, नितीशकुमार व शरद यादव यांसारखे निधर्मी म्हणवणारे समाजवादी  हे परंपरावादी व जातिव्यवस्था मानणाऱ्या भाजपबरोबर मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात एकत्र बसत होतेच ना? जेव्हा नरेंद्र मोदींची पंतप्रधानपदासाठी एनडीएचा उमेदवार म्हणून शक्यता दिसू लागली तेव्हा आपला पत्ता कट झाला, हे लक्षात घेऊन लगेच शरद यादव यांच्याशी सल्लामसलत न करता काडीमोड देऊन टाकला. ज्या काँग्रेसला शिव्या देण्यात आयुष्य गेलं, त्याच काँग्रेसशी सत्तेसाठी ‘सर्व पर्याय खुले आहेत,’ हे जाहीर करण्यात जराही संकोच वाटला नाही. चंद्रशेखर यांच्यासारखे वातानुकूलित झोपडीत वास्तव्य करणारे व काँग्रेसशी जन्मभर उभा दावा मांडूनसुद्धा काँग्रेसच्या पाठिंब्यावर (कल्पना असूनही) औट घटकेचे पंतप्रधान झाले. मुलायमसिंहाचा समाजवाद, लालूप्रसाद यादव यांचा समाजवाद, दक्षिणेत देवेगौडांचा समाजवाद व नितीश-शरद यांचा समाजवाद यांत कोणता तात्त्विक फरक आहे? महाराष्ट्राचा विचार केला तर अबू आझमी सोडले तर सक्रिय राजकारणातील समाजवादी नेत्यांची संख्या १० तरी असेल का? तसेच त्यांना अनुयायीच नाहीत ही गोष्ट निदान महाराष्ट्रात तरी दिसून येते. नेतेमंडळी मात्र मधूनअधून ‘वनराई’च्या व्यासपीठावर सरकारी कुबडय़ांच्या साहाय्याने हजेरी लावताना दिसतात. त्यामुळे निदान महाराष्ट्रात तरी समाजवादी विचार आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
‘साधने’च्या संपादकपदी हमीद दाभोलकरांना नेमले ही तुम्हाला खटकलेली गोष्ट आपण उघडपणे मांडून कुबेर यांनी आपला धाडसी स्वभाव आणि परिणामांची पर्वा न करणारा स्वतंत्र बाणा दाखवला. त्याद्वारे विचारस्वातंत्र्याची मशाल जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला, हे खरोखरच धाडसाचे वाटले.    
प्रसाद भावे, सातारा.