या लेखात मनोहर भिडे यांचे यथायोग्य व्यक्तिदर्शन वाचले. संचालकपदांवर किंवा अधिकारी पदांवर काम करताना योग्य आणि परखड सल्ला देणारे भिडे यांच्याबद्दल वाचायला मिळाले. सत्य मांडताना भीड न बाळगणारे भिडे हे त्यांचे अजून एक वैशिष्ट्य. सध्या विद्वान सर्वत्र पूज्यते ऐवजी विद्वान शक्यतो विसरलेत ही नव्या महाराष्ट्राची ओळख होते आहे.

– श्रीराम शरद दांडेकर

भिडे यांची निरीक्षणे महत्त्वाची

निर्भीड स्वभावाच्या भिडे यांचे व्यक्तिचित्र आवडले. या लेखातले तीन मुद्दे लक्षात ठेवण्यासारखे वाटले- थोडे पैसे जास्त मिळतात म्हणून त्याच हुद्द्यावर दुसरीकडे नोकरी पत्करणे म्हणजे लॅटरल चेंज कसा अंतिम तोट्याचा असतो हा तरुणांनी विचार करण्यासारखा मुद्दा आहे. बँकेतले बरेच व्यवहार संगणकावर होत असल्याने खातेदारांचा वेळ, श्रम वाचले हे खरे नव्हे हे अनेकदा अनुभवलं, पण भिडे यांचेदेखील मत तसेच आहे हे कळलं तेव्हा बरं वाटलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेची घोडदौड वगैरे ‘ऑल इज वेल’ प्रकारचा प्रचार आहे. कारण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बँक व्यवसायाचे जे वास्तव निर्भीडपणे भिडे सांगतात ते त्याला दुजोरा देणारे निश्चितच नाही.

– गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर

कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची गरज

या लेखात स्टेट बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर भिडे यांचा परिचय तसेच कार्याची ओळख करून दिली आहे ती आवडली. ते प्रसिद्धीपासून अलिप्त राहिले. बँक, अर्थव्यवस्था याबाबतचे त्यांचे कार्य फार मोठे असून आधुनिक काळात होत असलेल्या बदलांवर त्यांचे भाष्य योग्यच आहे. कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती, अनेक ठिकाणी होत असलेले आर्थिक गैरव्यवहार अशा अनेक गोष्टी यावर उपाय केव्हा होणार? सर्वसामान्य माणूस यात काही करू शकत नाही. तरीही मनोहर भिडे यांच्यासारखे कर्तव्यनिष्ठ, सर्वसामान्य माणसांचे हित पाहणारे, देशहिताचा विचार करणारे अधिकारी आहेत त्यामुळे काहीतरी चांगले घडण्याची अपेक्षा असते.

– प्र. मु. काळे, नाशिक.

प्रमाणिक माणसाची ओळख

या लेखाने मी मनापासून प्रभावित झालो. एवढ्या कर्तृत्ववान, प्रामाणिक आणि संवेदनशील अधिकाऱ्याविषयी आजवर इतकी अल्प माहिती असणे हेच आपल्या समाजातील विदारक सत्य अधोरेखित करते. खरी माणसं गाजावाजा करीत नाहीत, ती शांतपणे कार्य करतात. मनोहर भिडे यांच्यासारखे अधिकारी आजच्या काळात दुर्मीळ होत चालले आहेत. आज अयोग्य, प्रसिद्धीप्रिय लोक अग्रस्थानी आहेत, तेव्हा भिडे यांच्यासारख्या प्रामाणिक, विचारशील व्यक्तींचं योगदान विस्मरणात जाणं खेदजनक आहे. आपल्याला अशा माणसांची गरज आहे- ज्यांचं मन स्वच्छ आहे, ज्यांचं कार्यच त्यांची ओळख आहे. सगळ्यांनीच या परिस्थितीचा गंभीर विचार करायला हवा. देशाला आज मनोहर भिड्यांसारख्या प्रामाणिक माणसांची गरज आहे.

– डॉ. विजय आठल्ये, मुलुंड