स्थळ : प्रीतम हॉटेल, दादर, मुंबई, वर्ष : १९४५ असेल.
महान गायक कुंदनलाल सैगल फुणफुणत आत आले व बसले. पाठोपाठ रणजित स्टुडिओचे मालक सरदार चंदुलाल शहा आले. त्यांची समजूत घालायला लागले.. ‘‘देखो कुंदन, तुमने जितने पैसे मांगे है, मी ते दिलेत. तुम टाइम पे आ जाओ. त्यात एवढी मोठी फिल्म तू पूर्वी केलेली नाहीस.’’ सैगल फाडकन् उत्तरले, ‘‘सेठ, तुम्ही खूप मोठे सेठ आहात आणि मी एक कलाकार आहे. पैशाच्या गोष्टी तुम्ही मला सांगू नका. तुम्ही मला या चित्रपटासाठी जेवढे पैसे दिलेत ना, त्यापेक्षा जास्त पैसे मी गळ्यात पेटी अडकवून ‘प्रीतम’बाहेर चौकात गाणं गाईन आणि मिळवीन.’’
या आणि अशा कितीतरी गोष्टींना आमचं प्रीतम हॉटेल साक्षीदार आहे. कोण कुठले रावळपिंडीचे आम्ही ‘कोहली’.. आमच्या नावाची तिथं ‘कोहली गली’च आहे. पण माझ्या पापाजींच्या- सरदार प्रल्हादसिंग धरमसिंग कोहलींच्या मनात आलं- आपण मुंबईत हॉटेलचा धंदा करू या. ते घरच्यांचं न ऐकता मुंबईत आले. १९३४ साली. हॉटेलच्या व्यवसायात त्यांना दोनदा अपयश आलं. तिसऱ्या प्रयत्नात मात्र ते यशस्वी झाले.. आणि आम्ही मुंबईकर झालो. उत्कृष्ट कलाकाराच्या रांगोळीतले रंग स्वत:च्या जागी आपसूक पडतात आणि तिथं साजून दिसतात. परमेश्वरानं माझ्या आयुष्याच्या रांगोळीचे रंग मुंबईत टाकले व मी सजून गेलो.
मोठं अजब शहर आहे ही मुंबई! सदैव चैतन्यानं रसरसलेली. उत्साहानं भरलेली. आणि सर्वाना आपल्या पोटात सामावून घेणारी! एका असीम ओढीनं देशभरातली माणसं इथं येतात, राहतात, जगतात. मुंबई त्यांना घडवते; ते मुंबईला घडवतात.
आम्ही कोहली अतिशय सधन होतो. रावळपिंडीत माझ्या आजोबांचा फळांचा मोठा व्यापार होता. ते रावळपिंडी परिसरातल्या आणि काश्मिरातल्या बागाच्या बागा उक्त्या घेऊन तिथली फळं मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये घाऊक बाजारात विकत असत. त्यावेळपासूनचे क्रॉफर्ड मार्केटमधील मोठे फळविक्रेते ‘ढोबळे अँड सन्स’ हे सारा माल आमच्याकडून घेत असत. त्यांच्या दुकानाचा एक लोकप्रिय सिंबॉल होता : मोठय़ा मोठय़ा तलवारछाप मिशांचा टोपी घातलेला माणूस! माझ्या आजोबांना (त्यांना ‘लालाजी’ म्हणत.) तो माणूस वाकून नमस्कार करायचा आणि म्हणायचा, ‘‘तुम्ही आमचे अन्नदाता आहात. तुम्ही फळं आणता आहात म्हणून आम्ही ती विकू शकतो.’’ त्या काळात भारतात फळं मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध नसत. पण कोहली मंडळी अगदी ताजी, तजेलदार फळं बाजाराला पुरवीत असत. लालाजींना सहा मुलं होती. तीन मुलगे, तीन मुली. माझे वडील त्यातले सर्वात लहान. लालाजींनी मुलांसाठी सहा घरं बांधली. तीन घरं गल्लीच्या एका बाजूला, तीन घरं दुसऱ्या बाजूला.. अशी सहा घरं आणि या सहा घरांना जोडून त्यांनी एक छत बांधलं. गल्लीच्या वर. तिला झाकून टाकणारं. मग या गल्लीला लोक ‘छती गली’ म्हणू लागले. त्या छताचा उपयोग सामायिक बैठकीसारखा व्हायचा. एकत्र नसूनही एकत्र कुटुंबाचा तो मस्त अहसास होता. त्या गल्लीतील सर्व जातीधर्माचे लोक एकमेकांत मिसळून राहायचे, एकमेकांच्या सुखदु:खांत सामील व्हायचे.
लालाजींना लांबलचक मोठय़ा मोटारगाडय़ांचा मोठा शौक होता. तो शौक आजही आमच्या रक्तात आहे. रावळपिंडीत तेव्हा अगदी मोजक्याच तीन-चार मोटारी होत्या. त्यातली आमची एक मोठी कार लाकडी होती. त्या गाडीतून फिरताना खूप मजा वाटायची. माझ्या वडिलांचा मी एकुलता एक मुलगा होतो. पण लाड नव्हते होत. कडक शिस्त असायची.
आमचं काश्मीरमध्येसुद्धा एक वंशपरंपरागत घर होतं. बारामुल्ला भागात. तो भाग आज अतिरेक्यांचा अड्डा बनलाय. पण त्यावेळचं काश्मीर.. खऱ्या अर्थानं तो स्वर्ग होता. हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगा, निळंभोर आकाश, खळखळणाऱ्या नद्या, उंचच उंच झाडांच्या रेषा, साधी-भोळी, देखणी काश्मिरी माणसं, अप्रतिम बागा. आमचं ते घर होतं अगदी झेलम नदी जिथं वळते त्या वळणावर! जणू अगदी नदीच्या पात्रातच! खाली लाकडी फळ्यांची जमीन. जमिनीखालून खळखळत वाहत जाणारी झेलम. लालाजी त्यांच्या खुर्चीत वाचत बसत किंवा काहीतरी काम करत बसत. त्यांच्या सैलशा अंगरख्याच्या खिशातून सुटी नाणी खाली पडत. ती नाणी उचलण्याच्या भानगडीत ते पडत नसत. ही नाणी घरंगळत लाकडांच्या फटीतून झेलमच्या उथळ पात्रात पडत. लालाजी बाहेर गेले की पापाजी आणि इतर भावंडं पाण्यात उतरून ती नाणी गोळा करत असत. काय मौज असेल तेव्हा! पण आज तो परिसर म्हणजे अक्षरश: उद्ध्वस्त धर्मशाळा झाली आहे!
अशा संपन्न घरातल्या सर्वात धाकटय़ा मुलानं- पापाजींनी (माझ्या वडिलांनी)- स्वतंत्र विचार करून ठरवलं की आपण हॉटेलचा व्यवसाय करू या- आणि तोही मुंबईत! तेव्हाही मुंबई ही स्वप्ननगरीच होती. पापाजींना जळी- स्थळी-काष्ठी-पाषाणी सर्वत्र फक्त मुंबईतले स्वत:चं हॉटेल दिसत असे. पापाजींनी आपल्याला हॉटेल काढायचं आहे असं सांगितलं आणि लालाजींच्या त्या घरात जणू बॉम्बस्फोटच झाला. लालाजी तेव्हा हयात नव्हते; मात्र त्यांच्या नावाचा दबदबा होताच. त्यांच्या मोठय़ा मुलाला- बडय़ा ताऊजींना- पापाजींची ही कल्पना मुळीच आवडली नाही. त्यांनी पापाजींना जोरदार विरोध केला. लालाजींचा मुलगा आणि क्षुद्र हॉटेलधंद्यात? ‘‘दुसऱ्याची भांडी घासायची ही कुठली हौस तुझी?’’ अशा शब्दांत त्यांनी जोरदार विरोध केला. पापाजींचं तेव्हा लग्न झालेलं. माझा जन्मही झालेला. आणि अशा वेळी आपल्या या धाकटय़ा भावास हा खालच्या प्रतीचा धंदा कुठे सुचला, या विचारानं ते भयंकर अस्वस्थ झाले. मग घरात जोरदार ड्रामा झाला. पण पापाजींनी मुंबईत हॉटेल व्यवसाय करायचं नक्की केलेलं. ते जिद्दी होते. मनात आलेली गोष्ट अत्यंत कष्टाने पूर्ण करण्याचा त्यांचा स्वभाव होता. उंच, सुदृढ, पंजाबी बांध्याच्या पापाजींनी कोणालाही न सांगता आम्हाला रावळपिंडीतच ठेवलं आणि ते चक्क मुंबईत पळून आले.
पापाजी ढुकूढुकू चालणाऱ्या रेल्वेने तीन दिवसांचा प्रवास करून मुंबईला पोहोचले. रेल्वेत कोणी ओळखीचा भेटू नये म्हणून त्यांनी खूप आटापिटा केला होता. त्यावेळी मुंबईत एकच पंजाबी हॉटेल होतं.. जनरल पोस्ट ऑफिसजवळचं ‘शेर-ए-पंजाब!’ त्याच्या मालकांना ते भेटले. गप्पा झाल्या. मग त्यांच्या ध्यानात आलं, की पंजाबी खाण्याची चव इथल्या लोकांना अजून लागलेली नाहीए. आपण पंजाबी जेवणाचं हॉटेल थाटू या असा विचार करून त्यांनी मोर्चा वळवला तो चिरा बाजारकडे.
पापाजींच्या खिशात तेव्हा पंधराशे रुपये होते. त्या काळात पै, ढब्बू (अडीच पैसे), आणा, रुपया यांना मान होता. पंचतारांकित हॉटेलातला राहण्या-खाण्याचा खर्च पंधरा-वीस रुपयांपेक्षा जास्त नसे. तरीही चिरा बाजारचे दिवस काही फार चांगले नव्हते. त्यांनी एक जागा भाडय़ानं घेऊन छोटंसं हॉटेल थाटलं. त्याला नाव दिलं- ‘प्रीतम पंजाब हिंदू हॉटेल’! ‘प्रीतम’ म्हणजे लाडकं या पहिल्या प्रयत्नापासून आमच्या हॉटेलची नावं ‘प्रीतम’ने सुरू होणारीच राहिली. त्या काळात हॉटेलच्या नावात ‘हिंदू’ हा शब्द वापरलेला चालत असे. त्याचं कारण म्हणजे आत्यंतिक धर्मवाद तेव्हा नव्हता. आणि कोणी कुठं खावं, याविषयीचे काही संकेत पाळले जात असत. त्यावेळी मुंबईतल्या हॉटेल व्यवसायावर राज्य होतं इराणी हॉटेलिअर्सचं. इराण्याकडे जाऊन ब्रुन मस्का किंवा बन मस्का खाल्ला जायचा. त्याला वेगळीच प्रतिष्ठा होती. पण धोतर, अल्पाकच्या कोटातला अस्सल मुंबईकर अजून हॉटेलात खायला जाऊ लागला नव्हता. तो दुपारी घरचा डबा आणि रात्री ताटातला वरण-भातच महत्त्वाचा मानायचा. चूष म्हणूनही हॉटेलात जाणं तेव्हा निषिद्ध मानलं जाई. परिणामी हॉटेलात लोक फारसे फिरकत नसत. त्यात आमच्याकडे एक तर पंजाबी खाणं मिळे. छोटीशी जागा, धंद्याचा फारसा अनुभव नाही, आणि वर पापाजींचा कडक स्वभाव! काही महिने लोटले. पापाजी प्रामाणिकपणे व्यवसाय करत होते, पण फायद्याचा साधा कवडसाही दिसत नव्हता. अखेरीस जे व्हायचं तेच झालं. हॉटेल बंद करून रावळपिंडीला त्यांना परतावं लागलं. परंतु घरच्या व्यवसायात लक्ष घालायला ते मनापासून राजी नव्हते. जे पैसे हॉटेलच्या धंद्यातून गेले ते त्याच धंद्यात परत मिळवायचे याचा त्यांना ध्यास लागला होता. शेवटी मुंबईत जाण्याचा किडा त्यांना परत मुंबईला घेऊन आला. रावळपिंडीतली थोडीशी प्रॉपर्टी विकून ते मुंबईला आले. तेव्हाही बीजी (माझी आई) आणि मी इथं यायला तयार नव्हतो. मी तेव्हा पिंडीत रमलेला. दुसऱ्या वेळी पापाजींनी टपरीनुमा हॉटेल टाकलं, ते दादरमधल्या प्लाझा सिनेमाच्या जवळ. त्याचंही नाव ठेवलं- ‘प्रीतम पंजाब हिंदू हॉटेल’! (आता त्या जागेत ‘सिंध पंजाब हॉटेल’ आहे.) पापाजींनी खूप प्रयत्न केले. मी व बीजी- आम्ही दोघंही तेव्हा मुंबईत आलेलो. पण ते हॉटेलही फेल गेलं. अगदी मराठमोळ्या वस्तीतलं ते पंजाबी हॉटेल! कसं चालणार?
पापाजी ‘शेर-ए-पंजाब’च्या मालकाशी सहज गप्पा मारत असताना या अपयशाबद्दल बोलले. त्यांनी सुचवलं की, नाशिक किंवा पुण्यात जा. ती वाढणारी शहरं आहेत. पापाजींनी मुंबईतला गाशा गुंडाळला आणि त्यावेळच्या व्ही. टी. स्टेशनवरून ट्रेनने निघाले पुण्याला जायला! शेर-ए-पंजाबच्या मालकांनीच त्यांना तिकिटं काढून दिली. ट्रेन निघेस्तोवर ते स्टेशनवर थांबले. ते पाहून बीजी काहीतरी विचार करत होती. ट्रेन भायखळा ओलांडून दादरला आली, आणि बीजीने पापाजींना ठामपणे सांगितलं, ‘‘आपण इथं खाली उतरू या! मुंबईतून हार मानून जायचं नाही.’’ पापाजी तिला सांगत होते, ‘‘अगं, आपला निवाला (अन्नाचा घास) इथं नाहीये.’’ पण ती ऐकेना. ट्रेनमधून हातात ट्रंक घेऊन ती चक्क खाली उतरली. मग पापाजीही कुरकुरत का होईना, उतरले. स्टेशनवर उतरून ते दोघं बाहेर पडले ते दादर टी. टी.च्या बाजूने. समोर रस्ता होता. तो रस्ता दुसऱ्या मोठय़ा रस्त्याकडे जात होता. हा हळूहळू विकसित होत जाणारा भाग होता. ठिकठिकाणी छोटय़ा छोटय़ा दुकानांवर To Let (भाडय़ाने देणे आहे) अशा अर्थाच्या पाटय़ा होत्या. दोघं चालत चालत पुढे निघाले.
एवढय़ात कोपऱ्यावरच्या चहाच्या एका छोटय़ा टपरीवाल्याने साद घातली, ‘‘ओये पापे, किथे (कहां) जा रैय्यो? चायवाय लेके तो जाओ!’’ तो पंजाबी होता. पापाजी आणि बीजी थांबले. चहा घेतला. त्याच्याशी गप्पा मारताना पापाजींना कळलं, की मोक्याच्या वळणावरील त्या नव्या इमारतीत २९ गाळे होते. त्यातले अनेक गाळे भाडय़ाने देणे आहेत. मुख्य रस्त्यावरील गाळ्याचं भाडं होतं छत्तीस रुपये, तर आतल्या गाळ्याचं भाडं होतं अठ्ठावीस ते तीस रुपये. पापाजींनी लगेच विचार केला- आतला गाळा घेतला तर पाच रुपये वाचतील. त्यांनी लगेच आतला एक गाळा भाडय़ाने घेऊन टाकला. कुणाचा आता विश्वास बसणार नाही, परंतु पापाजींनी त्यावेळी पागडी वगैरेही दिली नव्हती. आपण इथंच हॉटेल टाकू या असं त्यांनी ठरवलं! त्याच वेळी जीपीओसमोरचं एक छोटंसं हॉटेल विकायला निघालेलं. पापाजींना ते कळलं. ते तिथं गेले. पाच-सात टेबलं, मोठमोठी पातेली, पळ्या वगैरे सारं काही. मालकानं त्याची किंमत दीडशे रुपये सांगितली. पापाजी वस्ताद! त्यांनी तो सौदा शंभर रुपयांत पटवला. अधिक वेळ न गमावता ते सगळं सामान एक रुपयात रेडीवाल्याला सांगून सरळ दादरला घेऊन आले.
दुसऱ्या दिवशीपासून आमचं ‘प्रीतम हॉटेल’ सुरू झालं. ते नीट सुरू व्हायला थोडा वेळ लागला, पण आम्ही मुंबईत रुळलो.. रुजलो. त्या काळातले ८० टक्के टॅक्सीचालक पंजाबी होते. दादरच्या मोक्यावरचं आमचं ‘प्रीतम’ त्यांना आवडू लागलं. त्यांच्या तोंडी ‘प्रीतम’ हे नाव घोळू लागलं. जवळच अनेक फिल्मी स्टुडिओ होते. तिथले बरेचसे निर्माते बंगाली आणि पंजाबी होते. हळूहळू कारदार, केदार शर्मासारखे पंजाबी निर्माते; पृथ्वीराज कपूर, बी. आर. चोप्रांसारखे दिग्दर्शक, राज कपूर, दिलीपकुमार, देव आनंद, जयश्री, मीनाकुमारीसारख्या नट-नटय़ा, शंकर जयकिशन, रवी, चित्रगुप्त यांच्यासारख्या संगीतकारांना प्रीतमची ओळख झाली. त्यातून जन्माला आली एक आगळीवेगळी ‘खाद्य लव्हस्टोरी’!
..पन्नासनंतरची मुंबई आणि मी एकत्रच वाढलो.
कुलवंतसिंग कोहली
ksk@pritamhotels.com
शब्दांकन : नीतिन आरेकर