लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील २२८० मतदान केंद्रे संवेदनशील जाहीर करण्यात आली आहेत. गडचिरोली-गोंदियाचा नक्षलप्रभावित भाग वगळता राजकीय राडेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हय़ात या वेळी सर्वाधिक संवेदनशील मतदान केंद्रे असल्याची माहिती निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली.
गडचिरोली-चिमूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम या १० लोकसभा मतदारसंघांत १० एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर जळगाव आदी मतदारसंघांत मतदान होणार आहे. नक्षलप्रभावित गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्य़ातील आमगाव तालुक्यात एकूण ३१७ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागासाठी प्रथमच दोन हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिली असून निमलष्करी दलाच्या दोन तुकडय़ाही या भागासाठी देण्यात आल्या आहेत. नक्षलग्रस्त क्षेत्राचा अपवाद वगळल्यास नेहमीच राजकीय राडेबाजीने चर्चेत राहणाऱ्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात या वेळी सर्वाधिक मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. सिंधुदुर्गमधील ९७, तर रत्नागिरीत ७४ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. मतदानाच्या दिवशी तेथे खास खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय जळगाव ७०, सोलापूर ६३, अकोला ७४, ठाणे २७, नाशिक ६४, कोल्हापूर ६३, उस्मानाबाद ५० आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ४० मतदान केंद्रे संवेदनशील जाहीर करण्यात आली आहेत.