07 July 2020

News Flash

पवार आणि मुख्यमंत्र्यांचे निवडणुकीत तरी सूर जुळले..

आपल्या विरोधात बातम्या पेरल्या जात असल्याची पंतप्रधानांकडे केलेली तक्रार असो वा लकव्याची उपमा, राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना असलेला विरोध नवीन

| April 15, 2014 03:43 am

आपल्या विरोधात बातम्या पेरल्या जात असल्याची पंतप्रधानांकडे केलेली तक्रार असो वा लकव्याची उपमा, राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना असलेला विरोध नवीन नाही. पण राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांचीही परिस्थिती फारशी काही चांगली नसल्याने बहुधा लोकसभेच्या प्रचारानिमित्ताने पवार आणि चव्हाण या उभयतांचे सूर जुळले असून, दोघेही संयुक्त सभा घेत आहेत.
पंतप्रधानांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू यांच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या पुस्तकात शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील वादावर प्रकाश टाकला. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत कराडमध्ये शरद पवार यांच्या उमेदवाराने केलेला पराभव पृथ्वीराज चव्हाण अजूनही विसरलेले नाहीत. राज्याच्या राजकारणात पवार आणि पृथ्वीराजबाबांचे कधीच फारसे जमले नाही. कृषी खाते किंवा आपल्या विरोधात पंतप्रधान कार्यालयातून बातम्या पेरल्या जात असल्याची तक्रार पवार यांनी पंतप्रधानांकडे केली होती. या बातम्यांचा स्रोत हा पृथ्वीराज चव्हाण हे होते, असा निष्कर्षही बारू यांनी काढला आहे.
ही पाश्र्वभूमी असली तरी प्रचाराच्या निमित्ताने पवार आणि मुख्यमंत्र्यांचे चांगले जमले आहे. जागावाटपापासून प्रचारात पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या मताचा आदर केला. प्रचाराच्या काळात पवार यांनी काँग्रेसचे नेतृत्व चपापेल, अशी वक्तव्ये केली तरी एरव्ही राष्ट्रवादी किंवा पवारांच्या विरोधात लगेचच प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या विधानांवर मौन बाळगणे पसंत केले. सुनील तटकरे यांचा अर्ज भरण्याकरिता पवार जाणार असल्याने मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली व त्यांनी लगेचच त्याला होकार दिला. सरकारच्या कारभाराबाबत विचारले असता पवार यांनी, आचारसंहितेपूर्वी धडाधड निर्णय घेतले गेले, असे सांगत मुख्यमंत्र्यांच्या निर्णयक्षमतेचे कौतुकच केले.

जवळचा कोण?..
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोबत यावे म्हणून भाजपचे गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी या दोघांनीही भरपूर प्रयत्न केले. पण शिवसेनेच्या विरोधामुळे अखेर राज ठाकरे यांनीही भाजपचा नाद सोडला आणि एकला चलो रे मार्ग अवलंबला. तरीही, भाजपमधून मनसेला खाणाखुणा सुरूच असल्याच्या चर्चेने शिवसेनेत अस्वस्थता होतीच. राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरविलेले उमेदवारदेखील केवळ शिवसेनेच्या उमेदवारांनाच आव्हान देणार आणि भाजपच्या उमेदवारांना मात्र अभय देणार अशीही चर्चा सुरू होती. पुढे तर या चर्चेला आणखी गाळणी लागली आणि मनसेच्या उमेदवारांनी भाजपला आव्हान देतानाही, नितीन गडकरींच्या विश्वासातील उमेदवारांना धक्का लावलेला नाही, अशीही चर्चा सुरू झाली. या चर्चेमुळे, राज ठाकरे यांची जवळीक भाजपमध्ये नितीन गडकरी यांच्याशी की गोपीनाथ मुंडे यांच्याशी अधिक यावरही म्हणे पैजादेखील लागल्या होत्या. अखेर, राज आणि गडकरी यांचेच सख्य अधिक असल्याचा निष्कर्ष निघाला.. याला कारणदेखील पुणे हेच होते. ज्या पुण्यातच राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना सोबत येण्याची गळ मुंडे यांनी घातली होती, त्याच पुण्यात राज ठाकरे यांनी भाजपच्या उमेदवाराविरुद्ध दीपक पायगुडे यांना उमेदवारी दिली. भाजपचे अनिल शिरोळे यांच्या उमेदवारीसाठी मुंडे यांनी आग्रह धरल्याने ते मुंडे गटाचे उमेदवार असल्याचे म्हणतात. राज ठाकरे यांनी पुण्यात मुंडे गटाच्या उमेदवाराविरुद्धच उमेदवार उभा केल्याने, गडकरी यांच्याशी असलेली जवळीक राज ठाकरेंनी जपली, असेही भाजपमध्ये बोलले जातेय. म्हणून, राज ठाकरे यांची मुंडे यांच्यापेक्षा गडकरींच्याच जवळचे आहेत असा छातीठोक दावाही केला जातोय. मग या पैजा कोण जिंकले आणि कोण हरले, हे मात्र नंतर गुलदस्त्यातच राहिले.. आपल्यावर कुठल्याच गटाचा शिक्का नको, एवढी खबरदारी तर सगळे घेणारच!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2014 3:43 am

Web Title: chavan credits sharad pawar for congress ncps cohesive campaign
Next Stories
1 संक्षिप्त :‘प्राईम टाईम’मध्ये केजरीवालना मोदी, राहुलपेक्षाही ‘टीआरपी’
2 प्रियंका गांधींनी सभ्यतेची लक्ष्मण रेषा ओलांडली- वरूण गांधींचा पलटवार
3 ‘महेशजी आले दारी..मनसेचे इंजिन सर्वात भारी’
Just Now!
X