06 July 2020

News Flash

ठाणे राखण्यासाठी वसईचा तह दादा आणि अप्पांमध्ये दिलजमाई..!

ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक असो अथवा जिल्हा बँकेवर वर्चस्व गाजविण्याची लढाई. ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक यांना उघड आव्हान

| April 9, 2014 02:05 am

ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक असो अथवा जिल्हा बँकेवर वर्चस्व गाजविण्याची लढाई. ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक यांना उघड आव्हान देत त्यांच्या राजकीय वर्चस्वापुढे सातत्याने प्रश्नचिन्ह उभे करणारे बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मीरा-भाईंदर शहरातून नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांना पाठिंबा व्यक्त केला आहे.
वसई-विरारचे अप्पा (ठाकूर) आणि नवी मुंबईचे दादा (नाईक) यांच्यामधील राजकीय हाडवैर चर्चिले जायचे. हितेंद्र ठाकूरांचे वसईतील कट्टर विरोधक विवेक पंडित यांच्यासोबत मध्यंतरीच्या काळात नाईक यांचा सलोखा वाढू लागल्याने अप्पा आणि दादांमधील कटुता वाढू लागली होती. मात्र अप्पा म्हणूनच ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे मुरबाड येथील आमदार किसन कथोरे यांनी निवडणुकांच्या तोंडावर ही कटुता कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजाविल्याचे विश्वसनीय वृत्त असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मध्यस्थीमुळे नाईक-ठाकूरांमध्ये दिलजमाई झाल्याचे सांगण्यात येते. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महत्त्वाचे अंग असलेल्या मीरा-भाईंदर महापालिकेत बहुजन विकास आघाडीचे तीन नगरसेवक आहेत. विरार-नालासोपारा शहरांप्रमाणे मीरा-भाईंदरमध्ये ठाकूरांची फारशी ताकद नसली तरी निवडणुकीच्या तोंडावर शत्रूलाही मित्र करावे, या न्यायाने ही दिलजमाई झाल्याचे सांगितले जाते. पालघर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने येथून राज्यमंत्री राजेंद्र गावितांना दिलेली उमेदवारी ऐन वेळी मागे घेत बहुजन विकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला असला तरी ठाकूरांना राष्ट्रवादीची मदत लागणारच आहे. पालघरमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठाकूरांना मदत करावी, असे फर्मान अजित पवारांनी सोडले असले तरी या भागातील पक्षातील एक मोठा गट नाईक यांनाही मानणारा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या दोन नेत्यांमध्ये दिलजमाई घडवून आणल्याचे सांगितले जाते.

कटुता कशाची?
वसई, विरार, नालासोपारा, बोईसर या पट्टय़ातील राजकीय क्षेत्रात एकहाती वर्चस्व राखणाऱ्या ठाकूरांच्या पक्षाचे दोन आमदार, तर एक खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्य़ातील पश्चिम पट्टय़ात ते फारसे कुणाला जुमानत नाहीत, असे चित्र आहे. ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यावरून ठाकूर यांचे पहिल्यांदा नाईक यांच्यासोबत बिनसले. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ठाकूरांनी प्रतिष्ठेची केली. ठाकूर-नाईक यांच्यामधील या मतभेदांना खतपाणी घालत जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी स्वत:चे डाव ‘खरे’ करण्याचा प्रयत्न केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2014 2:05 am

Web Title: hitendra thakur support sanjeev naik
Next Stories
1 अपमान किती सहन करणार? मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला चिमटा
2 काँग्रेसच्या जागा पाडण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न?
3 निवासी डॉक्टरांवरील कारवाईचे हीना गावित यांच्यावर बूमरँग?
Just Now!
X