भाजपला मतदान करा, असे आवाहन करणारा व्हिडीओ संदेश प्रसारित करून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी मतदानाच्या दिवशीच नव्या वादाला तोंड फोडले आहे. मोदी यांची कृती हा निवडणूक आचारसंहितेचा सरळसरळ भंग असल्याने निवडणूक आयोगाने त्यांच्याविरुद्ध कृती करावी, अशी मागणी काँग्रेसने आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगाने याबाबत तपासणी केली जात असल्याचे स्पष्ट केले.
वाराणसीत मतदानाची प्रक्रिया सुरू असतानाच मोदी यांनी सोमवारी मतदारांना गंगा-यमुनेचा संदर्भ दिला. मतदारांच्या मतांमधून ऐक्य आणि सलोख्याचे प्रतिबिंब दिसले पाहिजे, असे आवाहनही मोदी यांनी केले.
व्हिडीओद्वारे दिलेल्या संदेशात मोदी यांनी मतदारांना, या पवित्र शहराच्या उच्च परंपरेचे जतन करण्याचे उद्दिष्ट ठेवा, असे आवाहन ‘माँ गंगा’ संदर्भ देऊन केले. मतदानाच्या सर्व टप्प्यांमध्ये मतदारांनी जो उत्साह दाखविला त्याच उत्साहाने अंतिम टप्प्यातही मतदारांनी उत्साह दाखवावा, असे आवाहनही मोदी यांनी केले. शांतता, सलोखा आणि ऐक्य यामध्येच काशीचा सन्मान असल्याचे आवाहन येथील बंधू-भगिनींना करीत असल्याचे मोदी म्हणाले.
अखेरच्या टप्प्यात मतदानाची प्रक्रिया सुरू असतानाच मोदी यांनी मतदारांना व्हिडीओ संदेश दिल्याने नवा वाद उफाळून आला आहे. मोदींच्या या कृतीमुळे आचारसंहितेचा भंग झाला असल्याची तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली असून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मतदानाच्या दिवशीच मोदी यांनी मतदारांना व्हिडीओ संदेश देऊन आवाहन करणे हा आचारसंहितेचा भंग असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, असे पत्र काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. मित्तल यांनी मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांना पाठविले आहे. हा आचारसंहितेचा भंग असल्याने मोदी आणि भाजपविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. वाराणसी मतदारसंघातून मोदी निवडणूक लढवीत असून त्यांचा संदेश संपूर्ण वाराणसीत प्रक्षेपित करण्यात आला. मोदी हे  पक्षासाठी मतदान करण्याचे आवाहन करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मोदी यांनी लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदींचाही भंग केला आहे, असेही काँग्रेसने आपल्या तक्रारीत म्हटले.