विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज या मध्य प्रदेशमध्ये प्रचार करत असताना शिवपुरी येथे स्वागताला कोणीही स्थानिक भाजप नेता न आल्याने संतापल्या. तसेच परवानगीशिवाय वाहनातून प्रवास करत असल्याने पोलिसांनी ते थांबवल्याने त्यांचा पारा आणखी चढला. तुम्ही हवेत आहात अशा शब्दांत त्यांनी भाजपचे गुणा येथील उमेदवार जयभानसिंह पवैय्या यांचा पाणउतारा केला. पवैय्यांचा सामना काँग्रेसचे उमेदवार ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी आहे.
स्थानिक नेत्यांचे आपल्याशी हे वर्तन वाईट होते, अशा शब्दांत सुषमांनी पवैय्यांना सुनावले. आपल्या स्वागताला एकही स्थानिक नेता येऊ नये हा अवमान असल्याचे सांगत शिवपुरी येथे सभेला जाण्यास नकार दिला. स्थानिक नेत्यांनी क्षमायाचना केली. मात्र तुमच्या उमेदवाराला घमेंड आहे असे सुषमांनी सुनावले. विशेष म्हणजे शिवपुरीत काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत ज्योतिरादित्य यांच्यासारखा मुजोर माणूस आपण पाहिला नव्हता असा उल्लेख केला होता. अशोकनगर येथील सभेत मात्र सुषमा स्वराज यांनी भाषण केले.