ठाणे जिल्ह्य़ातील एकूण ७२ लाख मतदारांपैकी अजूनही १७ लाख मतदारांची छायाचित्रे यादीमध्ये नसली तरी ओळखीचा पुरावा दाखवून त्यांना मतदानाचा हक्क बजावता येईल, मात्र मतदार यादीत नावच नसणाऱ्यांना आता कोणत्याही परिस्थितीत मतदान करता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा जिल्हा निवडणूक अधिकारी माधवी सरदेशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.  
यादीतून नावे वगळली तरी नागरिकांकडून त्यांचे मतदान ओळखपत्र परत घेतले जात नाही. त्यामुळे केवळ ओळखपत्राच्या आधारे कुणालाही मतदान करता येणार नाही. त्यासाठी यादीत नाव असणे आवश्यक आहे. यादीतल्या नावापुढे छायाचित्र नसले तरी ओळखीचा अन्य पुरावा दाखवून मतदान करता येणार
आहे.
‘व्हॉट्सअप’वरील संदेश ही अफवा
यादीत नाव नसले तरी सात नंबरचा अर्ज भरून मतदान करता येईल, अशा अर्थाचा एक लघुसंदेश व्हॉटस् अपवरून प्रसारीत होत असून ती अफवा आहे. मूळात सात नंबरचा अर्ज नाव नोंदणीसाठी नसून नाव वगळण्यासाठी आहे. लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदार याद्यांना आता अंतिम स्वरूप देण्यात आले असून त्यात आता वाढ किंवा घट होणे शक्य नाही, असेही  निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.