अभिनेत्री किरण खेर यांना मंगळवारी भाजपच्या काही संतप्त कार्यकर्त्यांनी चंदिगडमध्ये दोन ठिकाणी काळे झेंडे दाखविले. तसेच त्यांच्यावर अंडय़ांचाही वर्षांव करण्यात आला़ भाजपने चंदिगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर खेर प्रथम मतदारसंघाच्या दौऱ्यावर आल्या होत्या़
चंदिगड मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी माजी खासदार सत्यपाल जैन, चंदिगड भाजपचे अध्यक्ष संजय टंडन आणि माजी केंद्रीय मंत्री हरमोहन धवन हे इच्छुक होते. मात्र तरीही भाजपने शनिवारी खेर यांच्या नावाची उमेदवार यादीत घोषणा केल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामेही दिले आहेत़ खेर या बाहेरच्या असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.
मंगळवारी दुपारच्या विमानाने खेर येथे पोहोचल्या़ त्यांच्यासोबत पक्षाचे माजी खासदार सत्यपाल जैन हेसुद्धा होत़े त्यांना ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागल़े त्यांच्या गाडीवर काही कार्यकर्त्यांनी अंडी भिरकावली़ परंतु, त्या गाडीत किरण यांचे पती अनुपम खेर होत़े दरम्यान, किरण खेर यांनी मात्र या विरोधाकडे दुर्लक्ष करणेच पसंत केल़े भाजप कार्यकर्त्यांच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी स्वत:चे मूळ चंदिगडमध्येच असल्याचे म्हटल़े