काही वर्षीपूर्वी ब्राह्मणी व नंतर ओबीसी म्हणून ओळखला जाणारा भाजपचा चेहरा बहलू लागला असून आता मराठा समाजाच्या नेत्यांचीही पक्षात गर्दी वाढू लागली आहे. केंद्रात सत्तास्थापनेसाठी चांगले वातावरण असल्याचे दिसू लागल्याने राज्यातही तो प्रभाव दिसून येईल, या अपेक्षेने सत्तापदे आणि उमेदवारी मिळविण्यासाठी अन्य पक्षातील नेत्यांची आवक पक्षात वाढत असून त्यामध्ये मराठा समाजातील नेत्यांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून राजकारण करणाऱ्या भाजपचा चेहरा काही वर्षांपूर्वी ब्राह्मणी होता. प्रमोद महाजन, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर यांच्यासारखे अनेक नेते प्रदेश भाजपमध्ये सक्रिय होते आणि पुढे ते दिल्लीतील राजकारणात गेले. भाजपचा ब्राह्मणी चेहरा बदलून पक्षाला बहुजनांचा चेहरा मिळावा या हेतूने दिवंगत नेते वसंतराव भागवत यांनी राज्यातील सूत्रे व जबाबदाऱ्या जाणीवपूर्वक ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सोपविल्या. परिणामत ओबीसी आणि मागासवर्गामधील नेते पक्षाशी जोडले गेले. त्यांना पक्षातील पदेही मिळाली.  
आताही जनमताचा कौल व सत्तेची संधी लक्षात घेत सत्तापदे आणि उमेदवारी मिळविण्यासाठी भाजपमध्ये दाखल होत असलेल्या अनेक राजकीय नेत्यांमध्ये मराठा समाजातील नेत्यांचे प्रमाण मोठे आहे. सत्ता मिळवायची असेल, केवळ मागासवर्गीय समाजाचे राजकारण करून चालणार नाही, तर मराठा समाजालाही बरोबर घ्यावे लागेल, या हेतूने भाजपची वाटचाल आहे. सत्ता आल्यास मराठा आरक्षण व छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देऊन विनायक मेटे यांच्यासारख्या नेत्याला भाजपमध्ये आणले गेले. आमदार संजय पाटील यांच्यासह काही मराठा समाजातील नेते भाजपमध्ये आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाचा चेहरा मराठा असला तरी पक्षातील अनेक नेते व मंत्री मागासवर्गीय आहेत. भाजपच्या नेतृत्वाचा चेहरा ओबीसी असला तरी आता मराठा नेत्यांची संख्या वाढल्याने पक्षाच्या ध्येयधोरणातही बदल होण्याची शक्यता भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने वर्तवली.