जालना लोकसभा मतदारसंघात आघाडीचे पाच आमदार. उमेदवारी नाकारल्याने नाराज असणारे भाजपचे हरिभाऊ  बागडे या पाश्र्वभूमीवर सलग ३ लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळविणाऱ्या भाजपच्या रावसाहेब दानवे यांच्यासमोर काँग्रेसने मोठे आव्हान उभे केले आहे. काँग्रेसने विलास औताडे यांना मैदानात उतरविले आहे. जालना व औरंगाबाद जिल्ह्य़ातील प्रत्येकी तीन विधानसभा क्षेत्रांचा या मतदारसंघात समावेश होतो. पैकी पाच आमदार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे, तर एक शिवसेनेचा आहे. पाच आमदारांचे पाठबळ ही औताडे यांची जमेची बाजू. परंतु त्यांची ज्यांच्याशी लढत आहे, ते दानवे निवडणुका जिंकण्याच्या राजकारणात वाक्बगार मानले जातात. या आधी त्यांनी दोन वेळा विधानसभा, तर तीन वेळा लोकसभा निवडणुकात सलग विजय संपादन केला.
दानवे यांच्या कार्यपद्धतीत बेदरकारपणा ठासून भरलेला. इतरांना कस्पटासमान लेखण्याची वृत्ती हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतच नव्हे, तर भाजप-शिवसेनेतही टीकेचा विषय. निवडणुकीत राजकारण करायचे आणि निवडून आल्यावर ‘अर्थराजकारण’ करायचे असा त्यांच्यावर होणारा आरोप. पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेर अशा दुहेरी संघर्षांस दानवे यांना सामोरे जावे लागत आहे. काँग्रेसच्या सभांमधून दानवे यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाचे आरोप केले जात आहेत. महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे उमेदवार रामभाऊ उगले  दानवे यांच्या कारभाराविषयी उदाहरणांसह अनेक प्रश्न उपस्थित करतात. दानवे यांच्यावर गैरकारभाराचे आरोप करून तुटून पडणारे अनेक वक्ते काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे आहेत. मतदारसंघात मोदींची नव्हे, तर दानवे विरोधाची लाट असल्याचा प्रचार ते करीत आहेत.
काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे संपूर्ण मतदारसंघास परिचित नाहीत. परंतु त्यांचे वडील, तीन वेळा आमदारकी भूषविलेल्या काँग्रेसचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे राजकारणातील अनुभवी व बुजूर्ग नेते. वडिलांच्या पुण्याईमुळेच विलास औताडे यांना औरंगाबाद महापालिका निवडणुकीत पराभूत होऊनही जालना लोकसभेची उमेदवारी मिळाली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधीपासूनच औताडे यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतील गट-तटांना सामोरे जावे लागत आहे. उमेदवारांनी सर्व यंत्रणा आपल्याच ताब्यात असावी, यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पुढाऱ्यांचे प्रयत्न आहेत. आपापले गट-तट सांभाळीत उमेदवारासमोर त्याचे महत्त्व निर्माण करायचे व पक्षातील नको असतील त्या मंडळींना जाणीवपूर्वक दूर ठेवायचे, असा प्रकार प्रचाराच्या निर्णय प्रक्रियेतील पुढाऱ्यांकडून होत आहे. त्यातून मार्ग काढून सर्वाना सोबत घेण्याची अवघड कसरत उमेदवारास करावी लागत आहे.
काँग्रेसमधील या बेदिलीचा लाभ कसा उठवायचा, याचे कसब भाजप व सेनेचे जिल्ह्य़ातील नेते अर्जुन खोतकर यांच्याकडे आहे. त्यामुळे गट-तट विसरून एकदिलाने काँग्रेस-राष्ट्रवादीतील सर्वाना कामास कसे लावायचे, हाच प्रश्न औताडे यांच्यापुढे आहे. आम आदमी पार्टीने दिलीप म्हस्के यांना उमेदवारी दिली आहे. एकूण २२ उमेदवार रिंगणात आहेत.

मतदारसंघात नरेंद्र मोदी यांची नव्हे तर भाजपच्या दानवे यांच्या विरोधाची लाट आहे. निवडून आल्यानंतर आश्वासनांची पूर्तता न करणारे दानवे स्वपक्षातील नाराजांशी संघर्ष करता-करता थकले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीशी लढण्याची शक्ती त्यांच्यात राहिलेली नाही.
    – विलास औताडे (आघाडी)

राज्य व केंद्रातील घोटाळे, तसेच महागाईस वैतागलेली जनता नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी आहे. या मतदारसंघातील भाजपची सलग पाच विजयांची परंपरा खंडित करण्यात विरोधकांना यश येणार नाही. काँग्रेसकडे प्रचारासाठी योग्य मुद्देही नाहीत.
    – रावसाहेब दानवे, (महायुती)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.